दादागिरी आणि रणनीती…सारं काही फेल!

भाजपला अभिप्रेत असलेले कार्य करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना जीभ घसरली आणि नको तेच झाले. राणेंच्या अटकेसाठी नाशिक, रत्नागिरी, महाड पोलीस फौजफाट्यासह रवाना झाल्याने एका माजी मुख्यमंत्री, विद्यमान केंद्रीय मंत्र्यावर अशी वेळ का आली, याचा विचार राणे यांनी करायला हवा. कारण दादागिरी आणि रणनीती दोन्हीही सफशेल फसलेली आहे. राणे यांनीही बुद्धिबळातील मोहर्‍यांप्रमाणे आपला वापर व्हायला देऊ नये. कारण भाजपला आता शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी नारायण राणे यांची आवश्यकता आहे. पण राजकारणात सत्तेसाठी कुणीही कुणासोबत जाऊ शकतो, हे ध्यानात ठेवूनच राणेंनी आपली पावले टाकायला हवीत.

नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. राणे यांनी अनेकदा शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नको नको ते बोलणे, खालच्या पातळीवर जाऊनही ठाकरे यांनी अनेकदा राणेंना अनुल्लेखाने गप्प केले तर काही वेळा आपल्या नावानंतर बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे याची आठवणही करून दिली. अगदी काही दिवसांपूर्वीच चिपळूणमधील पूरपरिस्थितीचा दौरा करायला गेलेल्या राणे यांनी कुणीही अधिकारी उपस्थित नसल्याने संताप व्यक्त करताना म्हटलं होतं, तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? हे कमी म्हणून की काय कोकणातील पूरग्रस्त भागाचा दौरा करताना राज्यावर येणार्‍या संकटाला कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पायगुण. ते आल्यापासून वादळ काय, पाऊस काय सर्व चालूच आहे. मुख्यमंत्री आले आणि कोरोना घेऊन आले. त्यांचे पाय बघायला हवेत, पांढर्‍या पायाचे, असे जाहीर बोलल्यानंतरही शिवसेना शांत होती.

भाजपने काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेतून वारंवार शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करताना, डिवचताना माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांचा तोल गेला असे म्हणणे फार धरिष्ट्याचे होईल. कारण त्यांनी १५ दिवसांपूर्वीच असेच बेताल वक्तव्य केले होते. आता तर राणे यांनी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला हीरक महोत्सव म्हणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या मी असतो तर कानशिलात लगावली असती, असे तारे तोडले आणि शांत असलेली शिवसेना जागी झाली. सेनेने त्यांच्या स्टाईलने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये भाजप, राणे यांच्या पोस्टर्सची फाडाफाड, शाईफेक, पुतळे जाळणे असे प्रकार केले. कोरोना काळात या महामारीचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वच जण आपापल्या परीने काळजी घेत असताना भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले. त्यांना आवरताना पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि काही जणांना ताब्यातही घ्यावे लागले.

जनआशीर्वाद यात्रा, पूर, कोरोना किंवा राज्यातील इतर कोणतीही परिस्थिती असो. या गोष्टी केवळ निमित्त आहेत. पण नारायण राणे आणि उद्धव ठाकरे-शिवसेना हा संघर्ष काही नवीन नाहीये. नारायण राणे हे एकेकाळचे कट्टर शिवसैनिक. शाखाप्रमुख, नगरसेवक, तीन वर्षे बेस्ट समितीचे अध्यक्षपद, मंत्रिपद आणि नंतर थेट मुख्यमंत्रीपद असा शिवसेनेत राणेंच्या कारकिर्दीचा चढता आलेख होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत मर्जीतील नेते म्हणून नारायण राणे ओळखले जायचे. पण 2005 साली राणेंनी रंगशारदा इथल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना ‘सेनेमध्ये पदांचा बाजार मांडला जातोय,’ असे वक्तव्य केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी रंगशारदामधील मेळाव्यातच राणेंच्या या वक्तव्यावर जाहीर नाराजी व्यक्त करत त्यांची हकालपट्टी केली होती. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 2005 मध्ये नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर स्वाभिमानी पक्ष आणि नंतर भाजप असा नारायण राणेंचा शिवसेना सोडल्यानंतरचा 16 वर्षांतील राजकीय प्रवास आहे.

राणेंची शिवसेनेत असलेली दादागिरी आणि तोच आक्रमकपणा ते त्यांच्यासोबत घेवून जात होते. म्हणतात ना, स्वभावाला औषध नसते. मात्र ज्या शिवसेनेची अरे ला का रे करण्याची पद्धत आहे ती काँग्रेसची नाही ना भाजपची. त्यामुळेच राणेंची गोची होत गेली. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी राणेंचा वापर शिवसेनेविरोधात केला. काही प्रमाणात काँग्रेसला त्याचा फायदा झाला, पण राणे यांचे मात्र वैयक्तिक नुकसान झाले. कारण पक्षप्रवेशावेळी त्यांना हायकमांडकडून दिलेले मुख्यमंत्रीपदाबाबतचे वचन पूर्ण झाले नाही. त्यामुळेच काँग्रेसच्या हायकमांडला दोष देत आणि राज्यातील नेतृत्वावर टीका करीत काँग्रेसला हात दाखवला. त्यानंतर स्वाभिमान पक्षाची स्थापना केली, पण पक्ष स्थापनेनंतर अवघ्या सहा महिन्यांच्या आतच पक्ष विसर्जित करून भाजपवासी झालेले राणे यांना त्यांचे नेमके चुकतंय काय, याचे आत्मपरीक्षण करणे आता गरजेचे आहे.

राणे आता केवळ भाजपचे राज्यसभा सदस्य नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत. शिवसेनेला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नामोहरम करण्याची भाजपची रणनीती असली तरी त्याचे नेतृत्व राणेंकडे दिल्याने भाजपची राज्यात अवस्था बिकट झाली की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राणे केंद्रीयमंत्री झाल्यापासून माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि टीम बॅकफूटवर गेल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले. त्यामुळेच की काय राणे यांनी सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्रीही उद्धव ठाकरे यांचाच धोशा सुरू ठेवल्याने जनआशीर्वाद यात्रेत नक्की चाललंय तरी काय असा सवाल भाजपच्या नेत्यांनाही पडला.

राणेच केवळ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर जहरी टीका करू शकतात, त्यांना एक्स्पोज करू शकतात, मातोश्रीवर बोलू शकतात, अशी चाणक्यनीती भाजपकडूच तयार केली गेली असणार. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची कार्यपद्धती यांच्यावर वारंवार आक्षेप घेऊनही महाविकास आघाडी सरकारवर काहीच फरक पडत नसल्याने भाजपने नारायणास्त्र बाहेर काढले. पण ते भाजपवरच उलटल्याचे दिसत आहे. नारायण राणे यांच्या अटकेने दादागिरी आणि रणनीतीच्या जोरावर महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना नक्कीच खीळ बसली यात वादच नाही.

महाराष्ट्रातील शिवसेनेचा मुख्यमंत्री, पुढील वर्षी होणारी मुंबई महापालिका निवडणूक आणि मराठा आरक्षण ही त्रिसूत्री ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी नारायण राणे हे कार्ड खेळले आहेत. शिवसेना सोडल्यापासून राणे आणि शिवसेना यांच्यामधून विस्तवही जात नाही. शिवसेना सोडल्यानंतर 16 वर्षानंतरही राणेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर असणारा राग तसूभरही कमी झालेला नाही. हाच राग भविष्यात पेटवून शिवसेनेची मुंबई महापालिकेतील एकहाती सत्ता मिळवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राणेंसाठी केंद्रीय मंत्री पदाची खेळी खेळली आहे. अतिशय आक्रमक, हजरजबाबी नेता अशी राणे यांची ओळख असल्याने शिवसेनेच्या आक्रमकतेला ते सडेतोड उत्तर देऊ शकतील, अशी चाणक्यनीती भाजपने आखली असणार. त्यांच्या आक्रमक स्वभावाचा भाजप फायदा घेत राज्यात शिवसेनेला धक्का देणार अशीही सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मूळचे कट्टर शिवसैनिक असलेले राणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या उपस्थितीतच त्यांनी शिवसेना सोडली, हे महाराष्ट्रात सर्वज्ञात आहे. राणेंचे उद्धव ठाकरे यांच्याशी कधीही जमले नाही. सुरूवातीला काँग्रेस आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राणे यांनी आपल्या प्रत्येक भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर आणि शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. त्यामुळे आता केंद्रातून ताकद लावून शिवसेनेला घेरण्यात आणखी बळ मिळेल याच उद्देशाने राणे केंद्रात मंत्री झाले. भाजपला अभिप्रेत असलेले कार्य करताना त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना जीभ घसरली आणि नको तेच झाले. राणेंच्या अटकेसाठी नाशिक, रत्नागिरी, महाड पोलीस फौजफाट्यासह रवाना झाल्याने एका माजी मुख्यमंत्री, विद्यमान केंद्रीय मंत्र्यावर अशी वेळ का आली, याचा विचार राणे यांनी करायला हवा. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो किंवा शत्रूही नसतो. त्यामुळे राणे यांनीही बुद्धिबळातील मोहर्‍यांप्रमाणे आपला वापर व्हायला देऊ नये. कारण भाजपला आता शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी नारायण राणे यांची आवश्यकता आहे. पण राजकारणात सत्तेसाठी कुणीही कुणासोबत जाऊ शकतो, हे ध्यानात ठेवूनच राणेंनी आपली चाल खेळायला हवी.

एक कुशल मुख्यमंत्री म्हणून नारायण राणे यांनी आठ महिने कारभार पहिला होता. प्रशासकीय अभ्यास आणि निर्णय घेण्याची क्षमता ही राणेंची ओळख आहे. राणे यांनी राजकारणात अनेकवेळा आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. मंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचा अनुभव असल्यामुळे प्रशासन सांभाळण्यास ते सक्षम आहेत. एकीकडे राणेंचा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याशी असलेला वाद हा सर्वश्रुत आहे. त्यामुळे राणेंच्या केंद्रातील पदामुळे कुठेतरी भाजपला याचा फायदा होणार आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि तळकोकणात म्हणजे सिंधुदुर्गात शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी राणेंचा आवाज भाजपसाठी फायद्याचा ठरेल. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये याचा शिवसेनेला धक्का बसतो का? भाजपला राणेंचा फायदा करुन घेता येतो का? राणेंना मानणारा मोठा वर्ग कोकणात, मुंबई आणि ठाण्यातही आहे. त्यामुळे याचाही फायदा भाजपला होणार आहे. मार्च 2022 पूर्वी मुंबईसह 10 महापालिका निवडणुका आहेत. मुंबई पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता मागील 25 वर्षांपासून आहे.

यावेळी मुंबई पालिकेतून शिवसेनेला बाहेर काढण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यामुळेच केंद्रीय मंत्री असलेल्या राणेंचा जितका उपयोग भाजपला होईल तितका करून घेण्यासाठी भाजप आतूर आहे. मात्र राणे यांच्या आजच्या अटकेमुळे राणेंच्याही अडचणीत वाढ झाली आहे. मोंदीच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री असलेल्या एकाही मंत्र्याला मागील सात वर्षांत कोणत्याही गुन्ह्याखाली अटक झाली नव्हती. महाराष्ट्रात भाजपची दादागिरी आणि चाणक्यनीती दोन्ही सपशेल फसली आहे. कारण ज्या जनआशीर्वाद यात्रेतून केंद्राच्या योजनांचा प्रसार व्हावा हा उद्देश ठरवला होता. त्याऐवजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांविरोधात प्रक्षोभक बोलल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे सारं काही दादागिरी करून, रणनीती आखून मिळवता येत नाही. काही वेळेला गप्प राहून सारं काही करायचं असतं. हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करून दाखवलं असंच म्हणावं लागेल.