वेल डन फडणवीस!

Subscribe

सरकारचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो त्यानुसार दोन वर्षे ठाकरे सरकारने पूर्ण केलेली आहेत, अद्याप तीन वर्षांचा कालावधी या सरकारला पूर्ण करायचा आहे. ठाकरे आणि पवार हे जोपर्यंत एकसंध आहेत तोपर्यंत सरकार सुरक्षित आहे. अर्थात तीन वर्षानंतर किंवा त्याआधी जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर भाजप सत्तेवर येऊही शकते. मात्र तोपर्यंत फडणवीस आणि त्यांच्या सहकार्‍यांना विधानसभेत पेनड्राईव्ह धमाके तर करावे लागतीलच, शिवाय ‘नवाब हटाव, महाराष्ट्र बचाव’ सारखे मोर्चाचे प्रयोगही राज्यभरात करावे लागतील. फडणवीस त्याकरता तयार आहेतच.

गरुडाच्या पिल्लानं कोंबडीच्या पिल्लांची दोस्ती केली किंवा त्यांच्या अवतीभवती वावरायला सुरुवात केली की त्याचा ‘गगनभरारी’चा स्वाभाविक धर्म ही ते गरुडाचं पिल्लू विसरून जातं, पण त्यातूनही हे पिल्लू जर वेळीच सावरलं तर त्याला पुन्हा एकदा आपल्या मूळ स्वभावधर्माकडे झेपावणं फारसं काही कठीण नसतं हेच मंगळवारी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं. साडेपाचच्या सुमारास फडणवीस बोलायला उभे राहिलेल्या आणि आपल्या काही मिनिटांच्याच नेमस्त भाषणात देवेंद्र फडणवीसांनी तंत्रज्ञान, संपादकीय मूल्य, प्रशासन, पोलीस सेवा आणि विधी विभागात वावरणार्‍या वजनदार मंडळींचा सत्तेच्या पाठबळामुळे सुरू असलेला चाबरटपणा, महाराष्ट्राच्या जनतेसमोर ‘लाईव्ह’ मांडला आणि सगळ्यांनाच स्तब्ध करून टाकलं. फडणवीस यांच्या भाषणाच्या काही मिनिटे आधी उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाचा परिसर सोडला होता. उद्धव ठाकरे आपली आलिशान मर्सीडीज चालवत स्वतः वर्षाच्या दिशेने रवाना झाले. त्यांना तसं पाहिल्यानंतर अनेकांना सुखद धक्का बसला. कारण आपली गाडी स्वतःच चालवत इच्छित स्थळी पोहोचण्याच्या उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न तरुणाईला सुखावणारा असतो त्याच उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या विरोधात शड्डू ठोकताना विधानसभेत फडणवीसांनी काल कमालच केली.

मी देवेंद्र फडणवीस यांच्या मित्र मंडळाचा सदस्य नाही किंवा ‘फ्रेंडस ऑफ बीजेपी’चा मेंबरही नाही. मात्र 1999 पासून देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला आणि स्वतःला योग्य पद्धतीने सादर करण्याला बारकाईनं निरीक्षण करण्याचा प्रयत्न करतोय. 2019 च्या नोव्हेंबरमध्ये सत्तेचा मार्ग गमावलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी अजूनही मुख्यमंत्रिपदाच्या कैफातून बाहेर पडलेली नव्हती आणि त्यामुळेच भाजप मधले नेते आणि फडणवीसांचे हितचिंतक वेगवेगळ्या तारखा देण्याचं पंडितजींचं काम इमानेइतबारे करत आहेत. लोकशाहीमध्ये सत्तेसाठी गरजेची असलेल्या आमदारांची संख्या आपल्याकडे जमा होत नाही तोपर्यंत आपल्याला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.

- Advertisement -

ही गोष्ट फडणवीस आणि त्यांच्या काही सहकार्‍यांच्या अंगवळणी पडत नव्हती. सहाजिकच ते विरोधी पक्षाच्या बाकावर बसून कसदार काम करण्याचं सोडून चिल्लर-थिल्लर गोष्टी करण्याकडे त्यांचा कल होता. फडणवीस यांच्या सहकार्‍यांनी विरोधी पक्ष म्हणून केलेल्या कामगिरीकडे पाहताना हा खरंच सक्षम विरोधी पक्ष आहे का असा प्रश्न पडावा इतकी वाईट स्थिती भाजपच्या मंडळींची झाली होती. मात्र आपल्याबरोबर असलेली मंडळी कोंबडीच्या पिल्लांसारखीच असून ती छप्परापेक्षा जास्त उंचीवर उडू शकणार नाहीत हे लक्षात येताच फडणविसांनी स्वतः पंख पसरायचं ठरवलं. आणि त्याचा परिणाम राज्याच्या जनतेला अनुभवता आला. देवेंद्र फडणवीस यांचा मूळ पिंड हा एखादी गोष्ट समजून घेण्याचा शिकण्याचा आणि त्यानंतर त्यावर आक्रमकपणे कुठेही तोल न ढळवता व्यक्त होण्याचा आहे.

या आधीही विरोधी पक्षनेतेपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी काही पथ्य स्वतःसाठी आणि आपल्या कार्यशैलीसाठी पाळली होती. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत इतक्या तरुण वयातच झेप घेऊ शकले. मात्र गेल्या काही काळात कसदार मूल्यांसहित सत्ताधार्‍यांविरोधात तुटून पडणं हे बहुदा देवेंद्र फडणवीस विसरले होते की काय असा प्रश्न पडणे इतपत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची कामगिरी ढेपाळली होती. काही नेमक्या मंडळीचा अपवाद वगळता भाजपची मंडळी विरोधी पक्ष म्हणून हे ढेपाळलेले आहेत हे याच स्तंभात त्याआधी मांडण्यात आलेलं आहे. मात्र मंगळवारी फडणवीस यांनी केलेली कामगिरी ही द्विशतक झळकावण्यासारखीच आहे. असं म्हणायला हरकत नाही. अर्थात या द्विशतकाचा उपयोग विजयासाठी होणं अद्याप बाकी आहे. पेनड्राईव्ह बॉम्बनंतर सत्ताधारी नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांना नटसम्राट म्हणण्याचा प्रयत्नही करून पाहिला. मात्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या माहितीतली वस्तूनिष्ठ मूल्यं आणि वास्तवता यांचा विचार करता संपूर्ण राजकीय वर्तुळात कमालीची शांतता आहे.

- Advertisement -

या ‘पेन ड्राईव्ह’ बॉम्बमध्ये मंगळवारी ‘मोठ्या साहेबां’च्या नावाचा उल्लेख येताच राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेच्या काही मंत्र्यांमध्ये चलबिचल सुरू झाली होती. मात्र या माहितीतलं गांभीर्य आणि प्रमुख व्यक्तींची नाव पाहता अजित पवार आणि शिवसेनेच्या काही प्रमुख नेत्यांमध्ये ‘आँखो आँखो में’ झालेले इशारे येणार्‍या महाविकास आघाडीवरील संकटाची जणूकाही नांदी देणारे होते. त्यानंतर मोठ्या साहेबांनी या प्रकरणाशी आपला संबंध नसल्यांचं लगोलग स्पष्ट केलंय. सरकारी वकील असलेल्या प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात झालेल्या संवादाचं सव्वाशे तासाचं रेकॉर्डिंग मविआ सरकारला कामाला लावण्यासाठी पुरेसे आहे. यातील व्हिडिओ माझा आहे, पण आवाज माझा नाही असं सांगण्याचा तोकडा प्रयत्न सरकारी वकील चव्हाणांनी करुन पाहिला. या सगळ्या प्रकारणात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी केलीय. त्यामुळे गेली दोन वर्षे सरकार पाडण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ देणारे भाजप नेते आतातरी खर्‍या अर्थानं विरोधी पक्षाच्या भूमिकेत शिरतील आणि फडणवीस यांनी काढलेल्या वातीला अगरबत्ती लावण्याचं काम करतील असं वाटतंय.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सध्या जी धुमस आमदारांमध्ये जोरात सुरू आहे, ती सरकारकडून मिळणार्‍या विकासनिधी साठी आहे. उपमुख्यमंत्रिपदी असलेल्या अजित पवारांनी अर्थमंत्रालय सक्षमपणे सांभाळताना सर्वाधिक विकासनिधी आपल्या पक्षाच्या आमदारांना उपलब्ध करून दिलेला आहे. त्यातही हे आमदार अजित पवार यांचं नेतृत्व मानणारे असतील याची काळजीही घेण्यात आलेली आहे. त्याखालोखालचा निधी हा काँग्रेसच्या आमदारांना मिळालेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे बसूनही शिवसेनेचे आमदार जे विशेषत्वाने ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतात त्यांना मात्र निधीच्या बाबतीत ठेंगा दाखवण्यात आलेला आहे. ही गोष्ट पाहता मोठ्या प्रमाणात विकास निधी खर्च होताना होणार्‍या चुका यादेखील राष्ट्रवादीच्या आमदारांकडूनच अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येणार्‍या काळात देवेंद्र फडणवीसांनी जितकं योजनाबद्ध काम करत सरकारी वकील, पोलीस आणि सत्ताधारी नेते यांच्यामधील अभद्र युती जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला.

तसाच प्रयत्न इतर भाजपच्या सहकार्‍यांनाही करता येऊ शकतो. मात्र या सदस्यांना विधिमंडळाच्या पायरीवरचा चमकेशपणा सोडून प्रत्यक्षात फिल्डवर उतरावं लागेल आणि आपली जाकीट उतरवून अवतीभवती घडणार्‍या भ्रष्टाचारी कारनामे उघड्या डोळ्यांनी बघत न बसता तो व्यवस्थेमार्फत चव्हाट्यावर आणावं लागेल. भाजपची काही नेतेमंडळी विरोधकांवर आरोप करत आहेत मालमत्तांची काही प्रकरणे उजेडात आणत आहेत. पण त्यामध्ये प्रत्यक्ष कागदपत्रं आणि त्या कागदपत्रांवर असलेल्या आकडेमोडीची सत्यता किंवा वस्तुनिष्ठता यामध्ये सपशेल कमी पडत आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या 19 बंगल्यांबाबत केलेल्या आरोपांचा देता येईल. प्रत्यक्षात जागेवर बंगले नसताना ठाकरेंचे अलिबागमध्ये 19 बंगले असे आहेत असे हाकारे देत सोमैयांनी जे रान उठवले ती बाब पक्षाच्या फारशी पथ्यावर पडू शकलेली नाही. त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ‘पेन ड्राईव्ह’ मध्ये सरकारी वकिलांनी उद्धृत केलेल्या आणि त्यांच्यासमोर बसून सत्तेच्या जोरावर व्यवस्थेचा बाजार मांडणार्‍या राजकीय दलालांच्या बाबतीत केलेला खुलासा हा सरकार साठीच नव्हे तर राजकीय बिरादरीसाठी चिंतेचा विषय आहे.

अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्हमध्ये दिलेल्या गोष्टी, सभागृहातलं धमाकेदार भाषण आणि त्यातलं वास्तव याची सक्षम व्यवस्थेमार्फत तपासणी होणं अद्याप बाकी आहे. हा कॉलम लिहीत असताना गृहमंत्र्यांनी याच्यावर ठोस निर्णय घेतलेला नाही. या संपूर्ण प्रकाराचा तपास उच्चस्तरीय पातळीवर होण्याची गरज आहे. यामध्ये राज्य पोलिसांचे अधिकारी आणि राज्यातील प्रभावशाली व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावं अशी मागणी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस करत असले तरी सीबीआयने फारशी गुणवत्तापूर्ण कामगिरी गेल्या काही काळात महाराष्ट्रात तरी सिद्ध केलेली नाही. सत्ताधार्‍यांकडून याबाबतीत अजून अधिकृतरित्या कोणतेही आदेश पारित झालेले नाहीत. राजकीय डावपेच लक्षात घेता यातलं खरे-खोटे तपशील बाहेर यायला जरी वेळ लागणार असला तरी देवेंद्र फडणवीस यांनी मारलेला ‘मास्टर स्ट्रोक’ ही सरकारची झोप उडवण्यासाठी पुरेसा आहे.

सरकारचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो त्यानुसार दोन वर्ष नव्या सरकारने पूर्ण केलेली आहेत अद्याप तीन वर्षांचा कालावधी या सरकारला पूर्ण करायचा आहे. ठाकरे आणि पवार हे जोपर्यंत एकसंध आहेत तोपर्यंत सरकार सुरक्षित आहे. अर्थात तीन वर्षानंतर किंवा त्याआधी जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर भाजप सत्तेवर येऊही शकते. मात्र तोपर्यंत फडणवीस आणि त्यांच्या सहकार्‍यांना विधानसभेत केलेल्या पेनड्राईव्ह धमाके तर करावे लागतीलच शिवाय ‘नवाब हटाव, महाराष्ट्र बचाव’ सारखे मोर्चाचे प्रयोगही राज्यभरात करावे लागतील. फडणवीस त्याकरता तयार असतीलच, कारण विरोधी नेत्याचा पिंड कसा असतो याची फडणवीस यांना उत्तम कल्पना आहे. ही जाणीव त्यांनी बारा घाटावरुन येऊन सत्तेसाठी आणि स्वसंरक्षणासाठी भाजपच्या कमळामध्ये भुंग्यासारखे विसावलेल्या सर्वपक्षीय नेत्यांना दिली आणि ते सगळे मिळून विरोधी पक्षाचं काम करू शकले तरच महाविकास आघाडीच्या सरकारला धक्का देणं शक्य होऊ शकतं. ते झालं नाही तर मात्र भाजपला प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा परिस्थितीत आपण इतकंच म्हणू शकतो वेल डन फडणवीस!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -