घरफिचर्समायमहानगर ब्लॉगउतावळे नेते आणि हातात रणशिंग!

उतावळे नेते आणि हातात रणशिंग!

Subscribe

सध्या महाराष्ट्रातील भाजप त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या नेत्यांची अवस्था पाहिली तर ती उतावळे नेते आणि हातात निवडणुकीचे रणशिंग, अशी झालेली दिसेल. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना असे झाले आहे की, कधी एकदा उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला खिंडार पडून हे सरकार पडते आणि आमचे सरकार येते, तर दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना असे वाटतेय की, कधी एकदा केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडतेय आणि आमचा सहभाग असलेले तिसर्‍या आघाडीचे सरकार केंद्रात येतेय. भाजपचे नेते महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत, तर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेतेे केंद्रातील भाजपचे बहुमतातील सरकार पाडण्यासाठी इतर राज्यांमधील प्रादेशिक पक्षांचा गोतावळा जमवण्यात गुंतले आहेत. पण दोन्ही बाजूंना यात काही यश येताना दिसत नाही. २०१९ साली महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांमध्ये आपलाच विजय होणार आणि आपणच पुन्हा मुख्यमंत्री होणार याविषयी कॉक शुअर असलेल्या भाजपच्या नेत्यांचा दारूण अपेक्षाभंग झाला.

२०१४ सारखीच मोदींची लाट चालेल आणि आपल्याला बहुमत मिळेल, असे त्यांना वाटत होते. शिवसेनेशी केलेली युती ही मराठी मते विभागली जाऊ नयेत, म्हणून सेफ साईडच्या हेतूने करण्यात आलेली होती. बहुमत आपल्यालाच मिळणार आहे आणि निवडणूक केवळ एक औपचारिकता आहे, असे भाजप नेते निवडणुकीपूर्वीच आपल्या विजयाचे ढोल बडवू लागले होेते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तर मोदी लाटेने २०१४ साली पार धुवून काढले होेते. त्यात पुन्हा केंद्रात काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व नसणे आणि राज्यात त्या पक्षात उफाळलेली गटबाजी यामुळे तो आपले काही बिघडवणार नाही, तसेच शरद पवार यांचे आता वय झाले, अशा भ्रमात राज्यातील भाजपचे नेते होते. आता शरद पवारांचे राजकारण संपले असे फडणवीस आपल्या प्रचारसभांमधून बेधडक सांगत होते. पण त्यांना याचे भान नव्हते की, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला मोदींच्या बळावर राज्यात यश मिळाले होते. आता आपण सहज बाजी मारून जाऊ असे त्यांना वाटते होते, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला राज्यात चांगले यश मिळत होते.

- Advertisement -

पण विधानसभा निवडणुकीचे जसे निकाल आले तसे भाजपचे बहुमत तर दूरच राहिले, पण मागील निवडणुकीपेक्षा जागा कमी झाल्या आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या. पवारांनी आपले वय झाले असले तरी आपला करिष्मा कमी झालेला नाही हे पुन्हा सिद्ध केले. त्यात पुन्हा शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसली त्यामुळे भाजपची अधिकच कोंडी झाली. बहुमतही गेले, आणि आता मुख्यमंत्रीपदी जाणार, या चिंतेने भाजप नेते खट्टू झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संधी ओळखून महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या शिडातील हवा साफच निघून गेली. त्याचसोबत महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याची हातातोंडाशी आलेली सत्ता गेली, याचे दु:ख केंद्रातील भाजपच्या नेत्यांनाही झाले. मोदींचे चाणक्य समजले जाणारे अमित शहा यांना याचे जास्त दु:ख झाले. कारण हातात आलेला सत्तेचा चेंडू अगदी थोडक्यात निसटून हाताशी आलेली मॅच हातातून गेली होती. हा अमित शहांच्या रणनीतीचा पराभव होता.

अमित शहा यांंनी आम्हाला बंद दाराआड मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले होते, असे शिवसेना म्हणत होती. त्यामुळे अमित शहा यांच्या प्रतिमेला धक्का बसलेला होता. या सगळ्या अपेक्षाभंगातून निर्माण झालेला संघटित राग भाजपच्या नेत्यांच्या मनात तेव्हापासून खदखदत आहे. त्यामुळे काहीही करून ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार पाडून त्यांना धडा शिकवायचा, असा भाजपने चंग बांधलेला आहे. त्यासाठीच गेल्या दीड वर्षात सातत्याने प्रयत्न सुरू आहे. ठाकरे सरकारला पेचात आणण्यासाठी राज्यातील भाजपचे नेते दररोज नवनवीन प्रकरणे शोधून काढत आहेत. त्याची सुरुवात सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणापासून झाली, त्यात ठाकरे सरकारमधील एक मंत्र्याचा संबंध आहे, हा विषय घेऊन त्यांनी त्या प्रकरणावरून राज्यात एकच गहजब आणि गदारोळ केला.

- Advertisement -

आमचा राज्यातील पोलिसांवर विश्वास नाही त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे दिले जावे, यासाठी हलकल्लोळ केला. ते प्रकरण सीबीआयकडे गेले, पण त्यातून भाजपला जे साध्य करायचे ते झाले नाही, त्यामुळे ते सोडून देण्यात आले. त्यानंतर रायगडमध्ये ठाकरे कुटुंबियांची जमीन खरेदी, शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा, मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील जिलेटिन ठेवलेली गाडी, मनसुख हिरेन यांची हत्या, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांची ईडी चौकशी अशा अनेक गोष्टींचा सपाटा लावूनही ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार काही पडताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील भाजपचे नेते हताश झाले आहेत. हताश आणि हतबलतेची त्यांनी इतकी पातळी गाठली की, त्यांनी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली.

दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे तर केंद्रातील मोदी सरकार पाडण्यासाठी रात्रीच नव्हे तर भरदिवसाही उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहत आहेत. पंतप्रधान होण्याची आपली इच्छा शरद पवारांना पूर्ण करायची आहे. त्याचसोबत दुर्दम्य आशावादी असलेल्या संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर आता पंतप्रधान करायचे आहे. अलिकडेच त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, उद्धव ठाकरे हे केंद्रात नरेंद्र मोदी यांना पर्याय ठरू शकतात. यशवंत सिन्हा यांच्या ‘राष्ट्र मंच’ या सामाजिक संघटनेच्या छत्राखाली शरद पवारांनी नुकतीच दिल्लीत आपल्या निवासस्थानी चिंतन बैठक घेतली. त्यासाठी सुमारे १५ पक्षांना बोलावले होते. त्यात त्यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना पाचरण केले होेते. ही बैठक केंद्रातील मोदी सरकारला खाली खेचण्यासाठी तिसर्‍या आघाडीच्या स्थापनेसाठी होती का, अशी विचारणा केल्यावर त्यांनी ते फेटाळून लावले.

देशातील जनता मोदी सरकारच्या धोरणांमुळे त्रस्त झालेली आहे, तेव्हा देशासाठी नव्या व्हिजनची निर्मिती करण्यासाठी आम्ही बैठक घेतली होती, असे पवारांकडून स्पष्ट करण्यात आले. पण बैठक तिसर्‍या आघाडीसाठी देशातील प्रादेशिक पक्षांच्या अनुकुलतेची चाचपणी करण्यासाठी होती, हे समजण्याइतके लोक सुज्ञ आहेत. त्यात पुन्हा त्यांनी या बैठकीला काँग्रेसला निमंत्रण दिलेच नाही. इतकेच नव्हे तर शिवसेनाही बोलावले नव्हते, हेही एक गूढ आहे. केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे बहुमताचे सरकार आहे, अजून त्यांचा साडेतीन वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. त्यात पुन्हा तिसर्‍या आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचा पाठिंबा लागतोच, हा इतिहास आहे. या एकूणच परिस्थितीचा विचार बाजूला ठेवून पवार आणि राऊत मोदींना नमवण्यासाठी रणशिंग घेऊन मैदानात उतरलेले आहेत. राज्यातील भाजपचे नेते तर गेल्या दीड वर्षांपासून ठाकरे सरकारविरोधात रणशिंग फुंकत आहेत. पण दोन्ही बाजूंना काही यश मिळताना दिसत नाही. फक्त त्यांचा सत्तेसाठीचा उतावळेपणाच लोकांना दिसत आहे, आणि ही मंडळी आपलेच हसे करून घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -