विरोधी पक्ष म्हणून भाजप पास की फेल?

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 28 नोव्हेंबरला दोन वर्ष पूर्ण झाली. तर विरोधक म्हणून भाजपने देखील दोन वर्ष पूर्ण केली. भाजप महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार कधी पडेल याची भविष्यवाणी सातत्याने करत राहिले आहेत. मात्र, सरत्या वर्षात त्यांनी सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याच्या भूमिकेत राहणार असल्याचे ठरवले आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने संघर्षाची भूमिका घेतली आहे. नोव्हेंबरमध्ये विरोधक म्हणून भाजपला दोन वर्ष पूर्ण झाली. या दोन वर्षात एकदाही मवाळ भाजप दिसली नाही. सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसातच भाजप नेत्यांनी हे सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी केली. ती भाकीते भाजप आजही करत आहे.

महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यामध्ये संघर्षाचे अनेक प्रसंग गेल्या वर्षभरात आले. सत्ताधारी विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार, अशी भविष्यवाणी अनेकदा केली. पण हे सर्व भाजपने आता सोडून दिले असल्याचे पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपचे सरकार कधी येईल, याची वाट न पाहता सक्षम आणि प्रभावी विरोधी पक्ष म्हणून लढा देण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्षांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले होते. पण तेवढ्यापुरतेच.

सुरुवातीपासून प्रभावी विरोधी पक्ष म्हणून आम्ही कार्य करणार आहोत, अशी भूमिका भाजपने घेतली असती तर त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले नसते. आता महाविकास आघाडीच्या कारकीर्दीत बोकाळलेला अनाचार, भ्रष्टाचार, दुराचार याविरुद्ध रस्त्यांवर उतरून संघर्ष करण्याचे भाजपने ठरवले आहे. राज्य सरकारच्या गैरकारभारावर टीका करणे, त्याविरुद्ध आवाज उठविणे, आंदोलनाचे विविध मार्ग हाताळून सरकारविरुद्ध जनजागृती करणे हे विरोधकांचे कामच आहे. भाजपनेही राज्य सरकारचे विविध आघाड्यांवरील अपयश चव्हाट्यावर मांडून राज्य सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरविले. मात्र, राज्यापुढे अनेक प्रश्न असताना त्या समस्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधक कुरघोडीच्या राजकारणातच अधिक रस घेताना दिसले. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उरलेले नाही तर ‘काय दे’चे राज्य सुरू असल्याची टीका भाजपने अनेकदा केली.

नुकतेच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला धारेवर धरण्याचे काम भाजपने उत्तम केले. या अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे गैरव्यवहार, आमदार-खासदार यांचे बेकायदेशीर धंदे करणार्‍यांशी असलेले साटेलोटे यावर प्रकाशझोत टाकला आहे. तसेच अलीकडे राज्यात अमरावती, मालेगाव, नांदेड या ठिकाणी ज्या दंगली झाल्या. त्या म्हणजे देशात अराजक माजविण्याचा एक प्रयोग असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात ज्या दंगली उसळल्या त्यावरून भाजपने सत्ताधारी आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, आता मुंबई महापालिकेसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने मतांचे ध्रुवीकरण करण्याचे उघड प्रयत्न सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

आपण भाजपचे सत्तेसाठीचे प्रयत्न पाहिले. तर त्यांचे प्रयत्न विरोधक म्हणून कमी पडत असल्याचे दिसून आले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठवून दिली. बरे, भ्रष्टाचार 50-100 कोटींचा नाही, तर हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप सोमय्या यांनी केले. यात अनेक नेत्यांना ईडी, आयकर विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी जावे लागले. विशेषत: त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच लक्ष्य करत सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांना लक्ष्य करत उद्धव ठाकरेंना धक्का पोहोचवण्याचे काम केले. अशा पद्धतीने सोमय्यांनी एका बाजूने सरकारला सळो की पळो करून सोडले.

तर दुसरीकडे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोरात लावून धरली. यामध्ये भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी सातत्याने मागणी लावून धरली. अखेर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. हा भाजपने महाविकास आघाडीला दिलेला पहिला धक्का ठरला. त्यानंतर आणखी बर्‍याच जणांना राजीनामे द्यावे लागतील, असा दावा भाजपचे नेते करत होते. यामध्ये मोठ्या नेत्यांची, मंत्र्यांची नावे भाजपचे नेते घेत होते.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीला दुसरा धक्का बसला तो अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याने. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. अखेर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला.

याशिवाय हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेला सातत्याने टीका करणे, सरकारकडून हिंदू धर्म आणि महाराष्ट्र धर्म यांच्यावर घाला घालण्यात येत असून त्याविरुद्ध भाजप संघर्ष करेल, असे सातत्याने माध्यमांसोमर येऊन सांगणे, हे काम भाजप पक्ष उत्तमपणे नियोजितरित्या करत आला आहे. भाजपने आता विरोधकाच्या भूमिकेत राहून आगामी निवडणुका लक्षात घेऊन भाजपने महाविकास आघाडीविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका, आरोप करून देखील आघाडी सरकारच्या किल्ल्याचा एक चिराही का ढळला नाही. यावर भाजप नेत्यांनी आता आत्मपरीक्षण, चिंतन करायला हवे. विरोधी पक्ष म्हणून आता राज्यातील वातावरण ढवळून काढण्यासाठी एसटी संप, भ्रष्टाचार, दंगली आदी अनेक विषय त्यांच्यासमोर आहेत. अशा सर्व मुद्यांवर आवाज उठवून विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याच्या पवित्र्यात आहोत, हे भाजपने दाखवून द्यावे.