घरफिचर्समायमहानगर ब्लॉगत्यांच्या नावाने राजकारण कशाला?

त्यांच्या नावाने राजकारण कशाला?

Subscribe

राजकारण करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाला अनेक विषय आणि मार्ग आहेत. यासाठी थोर व्यक्तींच्या नावाने राजकारण करण्याची आवश्यकता नाही. असं राजकारण केलं की हसं होत असतं. असं राजकारण केल्याने असंख्य खड्डे निर्माण होऊनही भारतीय जनता पक्षाचे नेते स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं. प्रत्येक गोष्टींचं राजकारण करण्याचे परिणाम यथावकाश सोसावे लागतात आणि त्यामुळे मानहानीच पदरात पडते. जगात आणि भारतात कोरोना संसर्गाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी केलेल्या राजकारणाची कोण चर्चा आजही सार्‍या देशभर सुरू आहे. कधी ती केंद्राने पीपीई कीट दिले नाहीत, म्हणून होत होती तर कधी राज्यातल्या भाजप नेत्यांनी आपला निधी पंतप्रधानांच्या केअर फंडात दिल्याने होत होती. पक्ष जणू आपणच चालवतो, अशी मानसिकता झालेल्या राज्यातील भाजप नेत्यांनी पक्षाला खड्ड्यात घालण्याचा जणू विडाच उचललेला दिसतो आहे. महामारीच्या संकटाला जणू आपणच तोंड देऊ शकतो, अशी समज झालेल्या भाजपच्या राज्यातल्या नेत्यांना सत्तेची इतकी भूक आहे, की सत्तेवर आपण नसू तर तो अधिकार कोणालाच नाही, असं त्यांना सातत्याने वाटत आहे. पुन्हा येईन… म्हणून आरोळ्या ठोकणार्‍यांना महाविकास आघाडीच्या सत्तेचं वर्ष सरलं याचंही भान राहिलेलं दिसत नाही.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वापर करूनही आणि विविध मार्गांचा वापर करूनही सत्ता मिळत नाही, असं दिसू लागल्यावरही भाजप नेते शहाणे होताना दिसत नाहीत. यामुळे सत्तेवर बसलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत बदनाम करायचा त्यांनी उचललेला विडा सार्‍या देशाने पाहिला. एकीकडे आघाडी सरकारच्या कामाची प्रशंसा देशभर होत असताना दुसरीकडे बदनामीचं अस्त्र पारजण्याचा प्रकार भाजपच्या गोटात सुरू होता. महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात कोरोनाची कटकट लावण्याची एकही संधी या पक्षाच्या नेत्यांनी सोडली नाही. याची सुरुवात राज्यात सुरू असलेल्या उपचारांवर बोट ठेवण्यापासून झाली. संकटावर मात करण्यासाठी राज्यातल्या सरकारला मदत करण्याऐवजी भाजप नेत्यांनी सरकारपुढे अडचणी कशा येतील, असाच प्रयत्न सातत्याने केला. तो इतका संतापजनक होता की दुसरं कोणी असतं तर त्याला मारच खावा लागला असता.

- Advertisement -

राज्यातील संकट दूर व्हावं, यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरीने प्रयत्न करत होता. शक्य तिथे सरकारच्या तिजोरीत मदत देत होता. व्यक्तीगत स्तरावर गरीबांना जगण्याचा मार्ग देत होता. स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन इतरांना जगण्यासाठी हात देत होता. पण भाजपचे नेते मात्र अशा संकटातही इतरांच्या मदतीचा हिशोब मागत होते. राज्यातल्या संकटाला हात देण्याऐवजी त्यांनी आपली मदत पंतप्रधान केअर फंडात ओतली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पाडुरंगाच्या दर्शनाचं निमित्त त्यांनी राजकारणासाठी केलं. ज्या पंढरपुरात आषाढीच्या यात्रेला 20 लाखांहून अधिक भाविक गर्दी करतात त्यांच्या जिविताचा प्रश्न महत्वाचा की यात्रा महत्वाची याचं तारतम्य भाजप नेत्यांना राहिलं नाही. या सोहळ्याला वारकर्‍यांनी स्वत:च रोखलं असताना भाजपचे नेते मात्र यासाठी टाळगजर आणि दरवाजे उघडण्याचे उद्योग करत होते. इतक्या मोठ्या संख्येने जमणार्‍या वारकर्‍यांच्या जिविताचा आणि त्यांच्या भल्याचा विचार करण्याऐवजी भाजप नेत्यांना आषाढीची वारी महत्वाची वाटत होती. या वारीचं निमित्त करत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही तिथे जाण्यापासून रोखण्याचा अर्धवटपणा केला. एकीकडे डॉक्टर, परिचारिका आणि पोलीस संसर्गाला आवर घालण्यासाठी जिवाचं रान करत असताना भाजपचे नेते मात्र या असाध्य रोगाचा खेळ करत असल्याचं लोकांनी पाहिलं. मंदिरांच्या नावाने राजकारणाची पोळी भाजणार्‍या भाजप नेत्यांना बंद असलेल्या उद्योगांचा कळवळा आला होता. हे उद्योग एकट्या महाराष्ट्रात बंद असं नाही.

सगळीच राज्य यात भरडली जात असल्याचं दिसत असतानाही हे नेते केवळ राज्यातल्या सरकारकडे बोट दाखवत होते. लोकल रेल्वे सुरू करण्याच्या मुद्याचंही या नेत्यांनी कोण राजकारण केलं. मुंबई महानगर क्षेत्रात लोकल प्रवासाच्या गर्दीची अवस्था प्रत्येकजण जाणून आहे. लोकल प्रवास न करणार्‍या भाजप नेत्यांना हे कळणार नाही. पण तिथेही सरकारला बदनाम करण्याचा विडा भाजप नेत्यांनी उचलला. संकटसमयी लोकल सुरू करणं म्हणजे संसर्गाला आपसुक फैलावण्याला वाव देण्यासारखं होतं. पण हे समजून घेण्याची भाजप नेत्यांची तयारी नव्हती. मंदिरं खुली करून आणि रेल्वे सेवा सुरू करून संसर्ग वाढला की मग पुन्हा सरकारच्या कामाला दोष द्यायचा, असा खेळ भाजप नेते करत होते. शाळा सुरू करण्याच्या विषयातही भाजपकडून आगाऊपणा करण्यात आला. तिथे शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या जीविताला बाधा पोहचू नये, यासाठी काही उपाय देण्याऐवजी विद्यार्थ्यांना संकटात टाकण्याचा उद्योग या मंडळींनी केला. निमित्त व्यवहार सुरू करण्याचं होतं, पण प्रत्यक्षात सरकारची बदनामी कशी होईल, याची पुरेपूर आणि जाणीवपूर्वक आखणी सुरू होती. आता या मंडळींनी छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकारण करण्याचा विडा उचललेला दिसतो आहे. शिवजयंतीचं निमित्त करत त्यांनी हे राजकारण सुरू केलं आहे. येत्या 19 तारखेला सर्वत्र शिवजयंती सोहळा राज्यात पार पडतो आहे.

- Advertisement -

या सोहळ्याच्या निमित्ताने शासनाने काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. या अटी म्हणजे जणू छत्रपतींची अवहेलनाच होय, असा प्रचार भाजपच्या नेत्यांनी सुरू केला आहे. शिवरायांप्रति केवळ आपल्यालाच प्रेम आहे, इतर जणू छत्रपतींच्या अवहेलनेमागेच असल्याचा भ्रम या मंडळींचा झाला आहे. छत्रपतींविषयीचं भाजप नेत्यांचं हे प्रेम म्हणजे अप्पलपोटेपणाच होय. अहमदनगरमधील महानगरपालिकेचे उपमहापौर असलेल्या श्रीपाद छिंदम याने छत्रपतींविषयी तोडलेले तारे आणि ज्या छत्रपतींविषयी लोकभावनेचा आदर जो भाजप करू शकत नाही, त्यांनी छत्रपती शिवरायांविषयी इतका कळवळा दाखवावा, हे अजबच म्हटलं पाहिजे. शिवरायांविषयी अश्लाघ्य शब्दांचा भडीमार करणार्‍या या उपमहापौराचं नगरसेवकपद रद्द करण्याची वेळ विधानमंडळावर येते, असल्या व्यक्तीला संरक्षण देण्याचं काम ज्या भाजपने केलं, तेच भाजपचे नेते आज उमाळा यावा, अशा प्रकारे शिवजयंतीचं निमित्ताने गळा काढत आहेत.

ज्या छत्रपतींच्या नावाने भाजप नेते आंदोलनाची भाषा करत आहेत, त्याच छत्रपतींचा अवमान केला म्हणून श्रीपाद छिंदमविरोधी आंदोलन करावं, असं भाजप नेत्यांना का वाटलं नाही? यालाच तर भाजपच्या सोयीचं राजकारण म्हणतात. पुन्हा छत्रपती शिवराय होणं हे अशक्य असताना कोणी नेता उठतो आणि पंतप्रधान मोदींना छत्रपती शिवरायांची उपमा देतो तरी भाजप नेते मूग गिळून गप्प बसतात याचा अर्थ काय? ज्यांना छत्रपती शिवरायांहून मोदी श्रेष्ठ वाटू शकतात त्यांनी शिवजयंतीविषयी अधिक बोलावं म्हणजे अति झालं. कोरोना संसर्गाचं संकट अद्याप आ वासून उभं आहे. एकाच दिवसात राज्यात पाच हजार केसेस सापडत असल्याचं उघड झाल्यावर प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणं हे अगत्याचं असल्याने हव्या हव्याशा वाटणार्‍या प्रत्येक गोष्टीला लोकांनी स्वत:च अव्हेरलं आहे. विवाहासारखे सोहळे घरच्या घरी पार पाडले. मंदिरं आणि मशीदीतील धार्मिक सोहळे लोकांनी स्वत:हून रोखले असताना त्यांना आगीत लोटण्याची आसक्ती भाजप नेत्यांची दिसते आहे. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये आजही लॉकडाऊन करावं लागत असताना भारतातही तशी स्थिती यावी, असं कोणाला वाटत असेल तर त्यांच्या बुध्दीची करावी तितकी किव कमीच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -