घरफिचर्समायमहानगर ब्लॉगभाजप, शिवसेनेचे जात वास्तव !

भाजप, शिवसेनेचे जात वास्तव !

Subscribe

भाजपची जनसामान्यांमध्ये पक्षबांधणी करण्यासाठी अनेक वर्षे झटलेले एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपचा त्याग करून महाराष्ट्रातील मराठा लॉबीचे प्रमुख शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्रय घेतला. कारण जेव्हा मुख्यमंत्रीपद देण्याची वेळ आली, त्यावेळी मात्र ब्राम्हणी चेहरा पुढे आणून देवेंद्र फडणवीस यांना ते पद देण्यात आले. असाच अनुभव छगन भुजबळ यांना आला होता. भुजबळ यांनी शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती, पण जेव्हा महत्वाचे पद देण्याची वेळ आली, तेव्हा त्यांच्याजागी ब्राम्हण असलेल्या मनोहर जोशी यांना पुढे आणण्यात आले. त्यामुळेच भुजबळ यांनी शिवसेनेचा त्याग करून शरद पवारांचा आश्रय घेतला. भाजप आणि शिवसेना या पक्षांच्या जात वास्तवामुळे अनुक्रमे खडसे आणि भुजबळांनी मूळ पक्षांचा त्याग केला.

भाजपचा प्रसार तळागाळात करणारे आणि भाजपचा ब्राम्हणी चेहरा ओबीसी आणि इतर सर्वसामान्य लोकांना अंगवळणी पाडायला लावणारे एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता धरला. खडसे यांनी अलीकडच्या काळात आक्रमक धोरण घेतले होते, त्यांच्या संयम सुटू लागला होता. भाजपमधून आपल्याला बाजूला करण्यात आले, याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत, असे बोलून यांनी फडणवीसांवर उभी आडवी टीका करायला सुरूवात केली होती. अगदी शेवटी भाजप सोडताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी फडणवीसांवर सगळे खापर फोडले. खरे तर एकनाथ खडसे हे भाजपमधील ज्येष्ठ नेते होते.

२०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रव्यापी लोकप्रियतेमुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपला जास्त जागा मिळून त्यांचे सरकार आले तेव्हा एकनाथ खडसे हे सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी नेते म्हणून मुख्यमंत्रीपदाचा मान त्यांनाच मिळेल असे वाटत होते. त्यात पुन्हा ते ओबीसी समाजातील असल्यामुळे भाजपला अधिक उदारमतवादी करण्यासाठी खडसेंना संधी देण्यात येईल, अशी शक्यता होती. अर्थात, त्यावेळी एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपली नावे पुढे करण्यास सुरुवात केली होती, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांचे नाव मोदींनीच निश्चित केले आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस हे एक हुशार आणि चांगला राजकीय अनुभव असलेले नेते आहेत, त्याबद्दल प्रश्नच नाही, पण एकनाथ खडसे हे त्यांच्यापेक्षा सगळ्याच बाबतीत ज्येष्ठ होते. तरीही त्यांना महसूलमंत्रीपद देऊन मुख्यमंत्रीपदापासून लांब ठेवण्यात आले. अर्थात, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्यामागे त्यांची केवळ कर्तबगारी आणि हुशारी कारणीभूत नव्हती, तर त्यांना गॉडफादर होते, तसे गॉडफादर खडसेंना नव्हते. देवेंद्र यांच्या डोक्यावर केंद्रातील नरेंद्रांचा वरदहस्त होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती होती आणि त्यांच्याच इच्छेनुसार ते मुख्यमंत्री झाले. २०१४ साली महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली, त्याआधी लोकसभा निवडणूक झालेली होती. मोदींच्या करिश्म्याने भाजपला केंद्रात प्रथमच बहुमत मिळाले होते.

महाराष्ट्राचा विचार करता जे असाध्य ते मोदींनी साध्य करून दाखवले होते. त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा आजवर अभेद्य असलेला बालेकिल्ला उध्वस्त केला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची या भागात नेहमीच हुकमी मक्तेदारी राहिलेली होती. त्यामुळे महाराष्ट्रीय जनतेवरही मोदींचे गारूड निर्माण झालेले होते. त्यात पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पंधरा वर्षे राज्यात चाललेल्या सत्तेतील सुुंदोपसुंदी आणि सिंचन घोटाळ्यांसारखे भ्रष्टाचार यामुळे जनता कंटाळली होती. मोदी गुजरातप्रमाणे महाराष्ट्रासाठीही विकास पुरुष ठरतील, अशी आशा महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागली होती. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात स्टार प्रचारक हे नरेंद्र मोदीच होते. भाजपच्या अनेक उमेदवारांना मोदींनीच निवडून आणले होते. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला सर्वात जास्त जागा आल्यानंतर मोदी सांगतील तीच पूर्वदिशा अशी परिस्थिती आपोआप आली.

- Advertisement -

भाजप ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर संघाचा स्वयंसेवक असलेला माणूस मुख्यमंत्री व्हावा, असे वारे वाहू लागले. त्यात पुन्हा संघाचे मुख्यालय महाराष्ट्रातच आहे. या निवडणुकीतील विजयात जसा मोदींनी केलेला प्रचार प्रभावी ठरला होता, तसेच संघाच्या स्वयसेवकांनी घरोघरी जाऊन भाजपचा केलेला प्रचारही सहाय्यभूत ठरलेला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत, असा संघाचाही सूर होता. एकनाथ खडसे हे महाराष्ट्रात भाजपच्या उभारणीत महत्वाची भूमिका असलेले नेते असले तरी उद्या त्यांना मुख्यमंत्री केल्यानंतर ते आपल्या म्हणण्याप्रमाणे किती वागतील, याचीही मोदींच्या मनात शंका होती. खडसेंच्या तुलनेत फडणवीस हे वयाने कमी आणि मोदींना जसे पाहिजे तसे वागणारे होते. मोदींच्या मनात देशविकासाच्या नवनवीन स्मार्ट कल्पना होत्या. त्याची वेगवान अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना नव्या दमाचा तरूण टीम लिडर हवा होता. तो त्यांना फडणवीस यांच्यामध्ये दिसत होता. त्याचसोबत महाराष्ट्रातील भाजपच्या सरकारला उच्चभ्रू समाजातील चेहरा देण्याचा मोदींचा हेतू होता. त्यामुळे खडसे यांची महसूलमंत्रीपदावर बोळवण करण्यात आली.

पण यामुळे खडसे मनातून दुखावले होते. त्याचा परिणाम मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत होता. त्यामुळे खडसेंना मंत्रिमंडळाच्या बाहेर काढणे हा एक पर्याय होता, त्याचा अवलंब करण्यात आला. जमीन घोटाळ्यासंबंधी त्यांची चौकशी सुरू करण्यात आली. त्यांचे दाऊदच्या पत्नीशी संभाषण झाले, असा ठपका ठेवण्यात आला. त्यातून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आले. आपले वाईट दिवस संपतील आणि आपल्याला भाजपमध्ये पुन्हा संधी मिळेल, अशी आशा खडसेंना वाटत होती, पण महिन्यांमागून महिने आणि वर्षे गेली तरी खडसेंचे वाईट दिवस संपत नव्हते. ते अधिक वाईट होत चालले होते. त्यामुळे खडसेंची राजकीय कारकीर्द संपल्यात जमा झाली होती. त्यांची वर्णी मंत्रिमंडळात तर सोडाच, पण अलीकडे खडसेंच्या तुलनेत वय आणि अनुभवाने लहान असलेल्या विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय पातळीवरील भाजपच्या कार्यकारिणीत सामील करून घेण्यात आले, पण खडसेंना बाहेरच ठेवण्यात आले. आज उद्या असे करत खडसेंना झुलवत ठेवणार्‍या भाजप नेत्यांकडून आता अधिक आशा ठेवण्यात काही अर्थ नाही, असे लक्षात आल्यावर खडसेंनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

आज जसे खडसे भाजपच्या उच्चभ्रूपणाला कंटाळून राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या आश्रयाला आले आहेत, तसेच काही वर्षांपूर्वी छगन भुजबळ शिवसेना सोडून पवारांच्या आश्रयाला आले होते. जो अनुभव खडसेंना आला साधारण तसाच अनुभव छगन भुजबळ यांना आला होता. प्रत्यक्ष मैदानात उतरून एकनाथ खडसे यांनी जशी तळागाळात आणि सामान्य माणसांमध्ये जाऊन भाजपची पक्ष संघटना बांधली होती, तशी छगन भुजबळ यांनी मैदानात उतरून शिवसेनेची पक्ष संघटना बांधली होती. पण जेव्हा महत्वाचे पद देण्याची वेळ आली, त्यावेळी आपल्याला डावलले जात आहे. आपल्या जागी ब्राम्हणी चेहरा असलेल्या मनोहर जोशी यांना पुढे आणण्यात येत आहे, असे भुजबळ यांच्या लक्षात आल्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या या निष्ठवंत शिवसैनिकाने शिवसेनाचा त्याग केला आणि आपले संरक्षण करेल, अशा व्यक्तीचा आश्रय घेतला. छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे हे महाराष्ट्रातील ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. पण शिवसेनेने आणि भाजपने जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा मान देण्याची वेळ आली तेव्हा ब्राम्हणी चेहरे पुढे आणले. त्यामुळेच खच्चीकरण झालेल्या या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांचा आश्रय घेतला. शिवसेना आणि भाजपच्या श्रेष्ठींकडून बिगरब्राम्हण व्यक्तीला मुख्यपदावर संधी न देण्यामागे काय कारण आहे. ते त्यांना मुख्यपदासाठी कार्यक्षम आणि पात्र समजत नाहीत का, त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही का, की, त्यांना मुख्यपदावर ब्राम्हण चेहरा जास्त फायदेशीर वाटतो, असे विविध मुद्दे उपस्थित होतात.

शिवसेनेच्या जास्त जागा निवडून आल्यामुळे १९९५ साली स्थापना झालेल्या शिवसेना-भाजपच्या युती सरकारमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वरदहस्तामुळे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर थोड्या जागा कमी पडत असल्यामुळे राष्ट्रवादीच्या तांत्रिक पांठिब्यावर भाजपचे सरकार सत्तेत आले. शिवसेना नंतर सत्तेत सहभागी झाली. त्यावेळी नरेंद्र मोदींच्या वरदहस्तामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मनोहर जोशी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपले मुख्यमंत्रीपद अबाधित राहण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची नेहमी मर्जी सांभाळली. त्याच वेळी आपली पात्रता आणि पक्षासाठी योगदान असूनही महत्वाचे पद देण्याची वेळ आली तेव्हा आपल्याला डावलण्यात आले आणि मानसिक त्रास सहन करावा लागला, ही भावना असह्य झाल्यामुळे भुजबळ आणि खडसे यांना आपल्या मूळ पक्षांतून बाहेर पडावे लागले.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -