घरफिचर्समायमहानगर ब्लॉगराणेंच्या खांद्यावर भाजपची बंदूक

राणेंच्या खांद्यावर भाजपची बंदूक

Subscribe

मुंबई महापालिकेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून भाजप नारायण राणे यांना केंद्रात मंत्री करायच्या कामाला लागला आहे. केंद्रीय राजकारणात राहूनही मुंबई-सिंधुदुर्गात राणे स्वैर राजकीय वावर करु शकतील, असं मंत्रीपद राणेंच्या पदरी पडेल असं दिसतंय. याच राणेंच्या होमपीच मालवणातील 90 च्या दशकांत कुठेही विशेष चर्चेत नसलेल्या तारकर्ली-देवबागमध्ये देशभरातून पर्यटक येतायत. राणेंना बळ देऊन कोकणच्या पर्यटनाचा विकास होईल, अशी अपेक्षा आहे, पण त्याचवेळी पूर्वीश्रमीचे शिवसैनिक असलेल्या आक्रमक राणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेचा काट्याने काटा काढण्याचा प्रयत्नही असणार हे नक्की.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी राज्यसभेत भाषण करताना काहीसे भावूक झाले. काँग्रेसनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार राज्यसभा सदस्यांच्या निवृत्तीवर मोदी बोलत होते. यावेळी बोलताना मोदी यांनी आझाद यांनी मुख्यमंत्रीपदी असताना आपल्याला कशा स्वरुपाची मदत केली हे जाहीर केले. त्याचं झालं असं 25 मे 2006 रोजी गुजरातमधील काही पर्यटक काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या बसवर अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात काही व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या. त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलं होती. या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य ओळखून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना फोन केला आणि अतिरेकी हल्ल्यात सापडलेल्या पर्यटकांना मदत करण्याची विनंती केली.

मोदींच्या विनंतीनंतर गुलाम नबी आझाद यांनी खास विमानाने या पर्यटकांना गुजरातला जाण्याची व्यवस्था केली. मृत्यू पावलेल्या व्यक्तींची पार्थिवं विशेष विमानाने गुजरातला नेण्याची व्यवस्था केली. सगळं नीट होतंय की नाही हे पाहण्यासाठी मुख्यमंत्री आझाद स्वतः विमानतळावर पोचले. तेव्हा मृत्यू पावलेल्या व्यक्तींची लहान मुलं आझाद यांना बिलगून ओक्साबोक्शी रडत होती. आक्रोश करत होती. त्यावेळी आझाद यांनाही अश्रू अनावर झाले होते. खरंतर मोदी आणि आझाद हे प्रतिस्पर्धी पक्षांचे नेते आहेत.

- Advertisement -

मात्र मोदी यांनी आझाद यांनी केलेली ही मदत लक्षात ठेवून त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच याबाबत संपूर्ण जगाला आझाद यांच्या अंगच्या माणुसकीचं दर्शन घडवलं आणि त्यांचे जाहीर आभार मानले. (मीडियानं यथाशक्ती त्याचाही छान इव्हेंट केला) दस्तुरखुद्द पंतप्रधान यांनी आझाद यांची स्तुती करताना काँग्रेसच्या नेत्यांना हे सुनावूनही टाकलं की, मी आझाद यांची स्तुती करतोय याचा कृपया कोणीही गैरअर्थ काढू नये. पण त्यांनी केलेली 15 वर्षांपूर्वीची मदत आजही पंतप्रधानपदी पोहोचल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःचा ठसा उमटवल्यानंतर मोदी यांनी ते लक्षात ठेवलंय. यावरून आपल्या लक्षात येईल की ही माणसं इतकी मोठी का आणि कशी होतात? आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत गेल्या सात वर्षात मोदी सात वेळा भावूक झाले. त्यातला त्यांचा शेवटचा भावूक क्षण हा प्रतिस्पर्धी पक्षातील एका नेत्याच्या निवृत्तीवर भावूक होणं यावरून आपल्या लक्षात येईल की मोठे राजकीय नेते राजकारणाच्या पलीकडेही संबंध राखून आहेत. बहुदा त्यामुळेच ते या उंचीवर पोहोचले असावेत.

अशीच गोष्ट राज्यातील आकाराने छोटा पण राजकीय धूमशानाने मोठा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडलीय. जिल्ह्यातील पहिल्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन ७ फेब्रुवारीला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं. हे मेडिकल कॉलेज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळींचं आहे. या कॉलेजच्या परवानगीची फाईल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सहीसाठी पोचली. तेव्हा राजकारणात हाडवैरी असणार्‍या नारायण राणे यांनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि फाईल आपल्या कार्यालयात आली आहे. तिच्यावर आपण सकारात्मक शेर्‍यासह सही करावी अशी विनंती केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही या फाईलवर सही करून परवानगीचे सोपस्कार आटोपले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या मेडिकल कॉलेजचा रस्ता मोकळा झाला. त्यानंतर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे जाहीर आभारही मानले. सिंधुदुर्ग हा राज्यातला सगळ्यात छोटा जिल्हा मात्र नव्वदच्या दशकात युतीच्याच काळात त्याला देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलं.

- Advertisement -

मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या त्याच मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा समावेश होता. आक्रमक राणेंनी आपल्या कार्य कौशल्याने आणि अंगभूत गुणांनी प्रशासनावर आणि पक्षावरही स्वतःची वेगळी पकड मिळवली. आणि कमी वेळात राणेंना सत्तेची वेगवेगळी पदं एकामागोमाग एक मिळत गेली. राणेंच्या वेगवान प्रगतीने सगळ्यांचे डोळे विस्फारले, आणि तिथेच ‘मातोश्री’ची दुसरी पिढी आणि राणे यांच्यात संघर्ष सुरू झाला. त्यातून पुढे जे काय झाले हे आपण सगळेच पाहत आहोत. नारायण राणे एखाद्या गोष्टीच्या मागे लागले की, ते साम-दाम-दंड-भेद करत मैदानात उतरतात. बर्‍याचदा ते यशस्वीही होतात पण त्यांना थोडं जरी अपयश आलं तर विरोधक सगळी ताकद लावून त्यांना घेरून टाकतात. आणि मग सुरू होतं राजकीय सूडचक्र.

अशाच राजकीय सूडचक्राचे बळी स्वतः नारायण राणेही ठरलेत आणि त्यांचं जिवापाड प्रेम असलेला कोकणही ठरलाय. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील भाजप हा चौथा पक्ष आहे. आधी शिवसेना, काँग्रेस, स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष आणि आता केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय पक्ष भाजप असा राणे यांचा प्रवास आहे. राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या प्रमुखाच्या गुडबुकमध्ये येनकेन प्रकाराने स्थान मिळवतात. भाजपमध्ये जातानाही कोकणातील नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फारसं मनात नसतानाही राणेंचा भाजप प्रवेश हा अमित शहा यांच्याबरोबरच्या संबंधांमुळेच झाला. साहजिकच अमित शहा कॉलेजच्या उद्घाटनासाठी आले. 6 तारखेला शहांचा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलला म्हणून राणेंच्या काही विरोधकांना उकळ्या फुकट होत्या.

पण दुसर्‍या दिवशी शहा आले आणि उद्घाटन करुन गेले. राणे म्हणाले, ‘मेडिकल कॉलेज सुरू झालं. माझं एक स्वप्न पूर्ण झालं. मी सात वर्षे केलेली मेहनत कारणी लागली.’ अगदी खरंय, या कॉलेजमुळे जिल्ह्यात पहिलं मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानं छोटा सिंधुदुर्गही पुणे, नगरसारख्या बड्या जिल्ह्यांच्या पंक्तीत बसलाय. याबद्दल राणेंचं कौतुक करायलाच हवं पण त्यांची राजकीय गल्लत कुठे होते तर ते ज्या पक्षात असतात तोच पक्ष बरोबर आणि त्यांचेच नेते- कार्यकर्ते हेच बिनचूक…ते सोडून आलेला पक्ष, संघटना हे बाकी सगळं सफेद झूठ! अशी त्यांची धारणा झालेली असते. आणि तिथेच खरा संघर्ष सुरू होतो. आपण सगळे लोकशाही माननार्‍या देशात राहतो हेच ते विसरुन जातात. गेला काही काळ राणे बॅडपॅचमध्ये होते.

भाजपचे चाणक्य समजल्या जाणार्‍या अमित शहा यांनी कोकणातील त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि राणे यांना अभिप्रेत असलेली शिवसेना संपवण्याची भाषा केली. खरंतर मोदी शहा काय किंवा भाजप काय राणेंच्या बाबतीत फुंकून आणि विचारपूर्वक पावलं टाकत आहेत. मात्र ७ तारखेला अमित शहा यांनी केलेल्या भाषणातून कोकणातलं राजकीय धूमशान अजून तापणार आणि त्याची धग मुंबईसह राज्यात जाणवणार. शहांनी उडवलेला शिवसेना द्वेषाचा धुरळा खाली बसायच्या आत खासदार विनायक राऊत यांनी वैभववाडी नगरपंचायतीच्या भाजपच्या सहा नगरसेवकांना मातोश्रीवर आणून मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून टाकले. त्यावर नितेश राणेंनी व्हॅलेंटाईन डे च्या आधीच शिवसेना हेच आमचं पहिलं प्रेम असल्याचं सांगून नव्या ‘लवस्टोरी’चे संकेत दिलेत.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून भाजप नारायण राणे यांना केंद्रात मंत्री करायच्या कामाला लागला आहे. केंद्रीय राजकारणात राहूनही मुंबई-सिंधुदुर्गात राणे स्वैर राजकीय वावर करु शकतील, असं मंत्रीपद राणेंच्या पदरी पडेल असं दिसतंय. याच राणेंच्या होमपीच मालवणातील 90 च्या दशकांत कुठेही विशेष चर्चेत नसलेल्या तारकर्ली-देवबागमध्ये देशभरातून पर्यटक येतायत. पण तिथे आजही कचर्‍याची विल्हेवाट आणि पाणी समस्या आवासून आहेत. जिल्ह्यातील पर्यावरण आणि सागरी समस्यांनी कोकणी माणूस हैराण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चे काम अंतिम टप्प्यात असताना सत्तेतील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विरोधक आजही विकासात मोडा घालताना जागोजागी दिसतात. महामार्गावरुन कुडाळ शहरात शिरायच्या प्रवेशद्वारावर असंच काहीसं राजकारण सुरू आहे. ते किळसवाणं आहे.

निसर्ग संपन्न भागातील घृणा आणणार्‍या उचापती कोणी निष्ठावान कार्यकर्ते करत नाहीत तर नेत्यांमागून रस्ते, वाळू, आणि इतर कामांसाठी ठेके मिळवायच्या धावपळीत असणारे स्वार्थी ‘राजकीय फेरीवालेच’ करतायत. राणे असोत किंवा ठाकरे यांनी स्वतःसह आपापल्या पाठीराख्यांना बजावायला हवं ‘विकासात राजकीय खोडा नको!’ कारण त्यानं नेत्यांचा-कार्यकर्त्यांचा इगो सांभाळला जातो, मात्र त्या त्या भागाचं आणि राज्याचं नुकसान होतं. कोरोनानं आधीच प्रगतीचं एक अख्खं वर्ष हिरावलंय. आता फालतू राजकीय कद्रुगिरी कोणालाच परवडणारी नाही. घड्याळाच्या काट्यावर धावणार्‍या मुंबईलाही आणि निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या कोकणालाही… पंतप्रधान मोदींचे काही चांगले गुण राणेंनीही आत्मसात करावेत आणि ठाकरेंनीही! ते सगळ्यांच्याच फायद्याचं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -