घरफिचर्समायमहानगर ब्लॉगभाजपचं मिशन मुंबई

भाजपचं मिशन मुंबई

Subscribe

भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबईत मंगळवारी संपन्न झाली. त्यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे यांना स्थानापन्न होण्याची संधी मिळाली ती पक्षीय शिष्टाचारानुसार. पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे राज्यातील तत्कालीन सहकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपले स्पर्धक वाटू लागले होते. आता ते नेते राष्ट्रीय पातळीवर गेल्यानंतरची ही पहिली कार्यकारणी होती. या बैठकीत सरकारला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चाणक्यांना कसं घेरायचं याचं मंथन करण्यात आलं. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्याला आता शिवसेना बाळासाहेबांच्या शिवसेनेसारखी 24 कॅरेटची राहिलेली नाही, असा शोधही याच बैठकीत लागला. तर दिल्लीतून आलेल्या काही नेत्यांना उद्धव ठाकरे हे पार्ट टाईम मुख्यमंत्री असल्याचा साक्षात्कार झाला. आज शिवसेनाप्रमुखांचा नऊवा स्मृतीदिन आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच मुनगंटीवार आणि त्यांच्या पक्षाला शिवसेनेच्या कॅरेटचा शोध लागलाय. तर विक्रम गोखले यांच्यासारख्या कसदार अभिनेत्याला भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याशिवाय पर्याय नसल्याचं लक्षात आलं.

या सगळ्या गोष्टी घडत असताना घटनांचा केंद्रबिंदू असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मात्र याबाबतीत काय वाटतं हेच सगळ्यात महत्वाचं आहे. विधानसभेच्या निवडणूक प्रचारात ‘दिल्लीत नरेंद्र राज्यात देवेंद्र’ अशा स्वरूपाची घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी तयार केली होती. ही घोषणा जरी यमक जुळल्यामुळे आकर्षक वाटत असली तरी त्यातील मतितार्थ राज्यात निटसा समजून घेतला गेला नाही. याचं कारण दिल्लीत नरेंद्र यशस्वी झाल्याची जी अनेक कारणं दिली जातात त्यातील प्रमुख कारण हे त्यांचा करिष्मा असला तरी त्यांच्याकडे अमित शहा नावाचा एक लक्ष्मणदेखील आहे. तो मोदींइतकाच तत्परतेने आणि मन लावून त्यांच्यासाठी अहोरात्र काम करतो. अर्थात, या लक्ष्मणाची क्षमता, बुद्धिमत्ता, निष्ठा, रणनीती या सगळ्याच गोष्टी वादातीत आहेत. ती किमया देवेंद्र फडणवीस यांना साधता आलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांचे निवडणुकीआधीचे आडाखे निकालानंतर चुकत गेले. आणि ते चुकलेले आडाखे दुरुस्त करण्यासाठी त्यांच्याकडे अमित शहा यांच्या तोडीचा सोडाच, त्यांच्या आजूबाजूला पोहचू शकणाराही लक्ष्मण ते आपल्यासोबत उभा करू शकले नाहीत.

- Advertisement -

सध्या एसटी कामगारांचा संप चिघळला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल आहेत. माजी गृहमंत्री आर्थर रोड तुरुंगात आहेत. विद्यमान गृहमंत्री अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये लागलेला दंगलींचा आगडोंब विझवण्यासाठी धावपळ करत आहेत. राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत, मात्र ते धसाला लावण्यासाठी सरकारला घेरायला हवं त्यात भाजपची मंडळी कमी पडतायत. त्यातही देवेंद्र फडणवीस यांनी आपले मुद्दे शेअर करण्यासाठी, त्यावर आंदोलन करण्यासाठी किंवा ते झालेलं आंदोलन माध्यमांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्वतःची अशी एक मर्यादित क्षमतेच्या सदस्यांची टीम बनवलेली आहे. या टीममधल्या सदस्यांना इतरांना त्यात सामावून घ्यायचं नसतं. मग ती भाजपमधल्या नेत्यांची बात असूद्या किंवा माध्यमांमधल्या देवेंद्रस्नेही मंडळींची असूद्या. त्यामुळे ठाकरे सरकारमधल्या संजय राठोड यांना घरी पाठवताना जी रणनीती आखली आणि तत्परता दाखवली, ती इतर मंत्र्यांच्या घोटाळ्यांबाबत भाजपच्या नेत्यांना दाखवता आली नाही.

किरीट सोमय्या यांच्यासारखे अनुभवी नेते आर्थिक घोटाळ्यांवर काम करतात, मात्र त्यांच्या कामाची पद्धत आणि आक्रस्ताळेपणा यामुळे त्यांनी स्वतःचे नुकसान करून घेतलेलं आहे, त्यापेक्षा पक्षांची प्रतिमाच खराब केली आहे. आरोपांनंतरच्या शांततेचा अर्थ समजण्याची हुशारी जनतेत आहे. हीच गोष्ट नारायण राणे यांच्या बाबतीतही म्हणता येईल. राणे हेदेखील अभ्यासू नेत्यांपैकी एक आहेत, मात्र त्यांना वैयक्तिकरित्या उद्धव ठाकरेद्वेषाने पछाडलं आहे, त्यामुळे जुनेच तपशील आणि जुन्याच गोष्टी मांडण्यात त्यांना भूषण वाटते. केंद्रीय मंत्रिमंडळात यांची वर्णी लागली आणि त्यानंतर राणेंच्या काही समर्थकांनी आणि भाजपमधल्या काही मंडळींनी पक्ष आता मुंबईची जबाबदारी नारायण राणेंवर सोपवणार असल्याच्या वावड्या उठवल्या. यामुळे शिवसेनेचा काहीसा सुस्तावलेला तळाचा कार्यकर्ता कमालीचा जागृत झाला आणि त्याने भागाभागातल्या शाखांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली. खरंतर शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य आहे. त्यातही युवराज आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून युवासेना आगामी महानगरपालिकेचे आडाखे बांधणार अशा स्वरूपाची चर्चा रंगू लागलेली आहे. त्यामुळे ज्येष्ठ आणि कट्टर शिवसैनिक हे काहीसे प्रेक्षकांच्या भूमिकेत आहेत.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आपल्या विश्वासातले अनेक सहकारी जमवण्याचा प्रयत्न केला. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, निरंजन डावखरे, चित्रा वाघ आणि नितेश राणे अशी या मंडळींची यादी आहे. मात्र यातील जे जुने भाजपचे सहकारी होते, त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आणि कामं सोपवण्यात फडणवीस कमी पडले. एखादा नेता मोठा होत असताना पक्ष आणि त्यातल्या जुन्या-नव्या सहकार्‍यांबरोबर कसं जुळवून घेतो, यावर त्याचं यशापयश अवलंबून असतं. देवेंद्र फडणवीस यांची झालेली गल्लत ही एव्हाना त्यांच्या लक्षात आली असावी. या सगळ्या सहकार्‍यांची क्षमता आणि मर्यादा जर आपण पाहिली तर जिंकलेल्या संघाच्या जल्लोषात सगळेच दिमाखदार दिसतात.

पण संघ पराभवाच्या गर्तेत असताना संघाला एक हाती नेटाने विजयाकडे नेणं हे एका चांगल्या कर्णधाराचं वैशिष्ठ्य समजलं जातं. देवेंद्र यांच्याबरोबरीने काम करणार्‍या दोन सहकार्‍यांचा उल्लेख इथे जाणीवपूर्वक करावासा वाटतो ते म्हणजे एक आशिष शेलार आणि दुसरे नितेश राणे, या दोन्ही नेत्यांकडे असलेला गुणात्मक मुद्यांचा विचार करता फडणवीस यांचे ‘खास’ सहकारी कोसो दूर असल्याचं आपल्या लक्षात येतं. रझा अकादमीबाबत जी भूमिका सोमवारी नितेश राणे यांनी मांडली किंवा आशिष शेलार यांनी महापालिकेच्या घोटाळ्यात ज्या गोष्टी उजेडात आणल्या त्यांना उत्तेजन देऊन महाविकास आघाडी सरकारवर अधिकाधिक तिखट हल्ला करण्याची वेळ येऊन ठेपली असताना फडणवीस नेमकं येणार्‍या काळात काय करणार हेच अधिक औत्सुक्याचे आहे.

उध्दव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हे जरी राज्याच्या सत्तेत असले तरी त्यांचा जीव मात्र मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत गुंतलेला असतो. महापालिकेतली टेंडरं, तिथलं प्रशासन पालिकेतील सत्तेच्या माध्यमातून शिवसेनेला आपल्या हाती ठेवायचे असते. याच शिवसेनेच्या गंडस्थळावर हल्ला करण्यासाठी नारायण राणे यांच्यापेक्षा नितेश राणे अधिक उपयुक्त ठरू शकतात. ज्या स्वरूपाचा ठाकरेद्वेष राणेंनी स्वतःमध्ये जिरवला आहे, त्याला अत्यंत कौशल्याने नितेश राणे यांनी हाताळलं आहे. हीच गोष्ट आशिष शेलार यांची असून त्यांच्याकडे असलेल्या मुद्यांमधील गुणात्मकता ही भाजपमधल्या कोणत्याही नेत्यापेक्षा उजवी ठरते. मुंबई महापालिकेचा कार्यभाग साधण्यासाठी आशिष शेलार आणि नितेश राणे यांच्या गुणांची आणि शक्तीस्थळांची सांगड फडणवीस यांना घालावी लागेल. प्रसाद लाड किंवा प्रवीण दरेकर हे दोन्ही नेते मागच्या दाराने विधिमंडळात पोहोचलेले आहेत. या दोन्ही नेत्यांनी विद्यार्थीदशेपासून मुंबई आणि मुंबईचे राजकारण जवळून पाहिले आहे, हे जरी खरं असलं तरी तळाच्या कार्यकर्त्यांना ते ज्या वेळेला एखादी गोष्ट समजावून सांगतात त्यावेळेला कार्यकर्त्यांना त्यांच्या ‘थिअरी’ पेक्षा शेलार, राणे यांचं प्रॅक्टिकल अधिक महत्वाचं वाटतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -