घरफिचर्समायमहानगर ब्लॉगलोढा, लोढणं आणि युवासेना!

लोढा, लोढणं आणि युवासेना!

Subscribe

गेली जवळपास तीस वर्षं मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत बसलेल्या शिवसेनेच्या आगामी निवडणुकांसाठीची व्यूहरचना, रणनीती आणि तिकीट वाटप या गोष्टी युवासेना प्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. गेली दोन वर्षं आदित्य ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे रिमोट कंट्रोलधारी ‘कारभारी’ आहेत. त्यांना युवा सेनेच्या माध्यमातून ही संपूर्ण निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखालीच पार पाडायची आहे. अशा वेळेस 66 वर्षांच्या मंगल प्रभात लोढांपेक्षा 49 वर्षांच्या आशिष शेलार यांच्या हाती सूत्र देणं भाजपने निवडणुकीला तीन महिने शिल्लक असताना उचित समजलं आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतल्या व्यापार आणि उद्योगातून हजारो कोटींची उलाढाल होते. त्यामुळे हे शहर सतत आपल्या किंवा आपल्या माणसांच्या ताब्यात असावं असं दिल्लीत बसलेल्या सत्ताधार्‍यांना नेहमीच वाटतं. काँग्रेसच्या काळात गांधी कुटुंबीयांसाठी ही जबाबदारी रजनी पटेल, मुरली देवरा या मंडळींनी पार पडली होती. त्यानंतरच्या काळात मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात देऊन काँग्रेसनं राज्यात आणि देशात आपल्याला जे हवं ते करून घेतलं. आता केंद्रातल्या सत्तेत मोदी-शहांचा भाजप आहे. तरीही अजून निर्विवादरित्या मुंबई भाजपला काबीज करता आलेली नाही. नाही म्हणायला हे शहर एव्हाना गुजराती, मारवाडी आणि जैनांनी आपल्या आर्थिक कब्जामध्ये घेण्याचा पराकोटीचा प्रयत्न सुरू केलेलाच आहे.

त्याचाच भाग म्हणून मग कधी परळ-लालबाग मधल्या चाळ संस्कृतीला हटवून तिथे जैन देरासरांसह आकाशाला गवसणी घालणारे टॉवर उभे झालेत. बांधकाम क्षेत्र, शेअर बाजार, सोन्या चांदीचा व्यवसाय, चित्रपट व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांत गुजराती-मारवाडी जैनांनी जोरदार मुसंडी मारलीय. कशाला ज्या मुंबई महानगरपालिकेवर गेली 30 वर्षे मराठमोळ्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकतोय. त्या महापालिकेतली कंत्राटं आणि निविदाही शिवसेनेची नेते मंडळी याच गुजराती-मारवाडी आणि सिंध्यांना वर्षानुवर्षे न चुकता देतायत. याचं मंडळींनी बळ दिलेल्या भाजपने मुंबई महानगरपालिका स्वतंत्रपणे एक हाती आपल्याकडे राखण्यासाठी कंबर कसलेली आहे. यंदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे.

- Advertisement -

2019 मध्ये शिवसेना-भाजप यांचं मुख्यमंत्रीपदावरून फाटलं. सेनेनं मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी सलगी केली आणि तेव्हापासून भाजपने शिवसेनेच्या अर्थार्जनाचा आत्मा असलेल्या मुंबई महानगरपालिकेलाच ताब्यात घेण्याचा जणू विडाच उचललाय. त्यासाठीच भाजपच्या दिल्लीश्वरांनी जुलै 2019 मध्ये मुंबई भाजपाध्यक्ष केलंय मारवाडी मंगल प्रभात लोढांना. ते शहरातल्या पहिल्या तीन मोठ्या बिल्डरांपैकी एक आहेत. लोढा मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. लोढांच्या आधी मुंबईच्या अध्यक्षपदी होते आशिष शेलार. लोढा यांच्या काळात निवडणुकीला सामोरं जायचं आहे याचं भान असूनही त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. भाजपशी अध्यक्षपदाची कारकीर्द ही तीन वर्षांची असते. मात्र निवडणुकीला तीन महिने शिल्लक असतानाच भाजपच्या नेतृत्वाला हे कळून चुकलं की, मंगलप्रभात हे मुंबई महानगरपालिका जिंकणारे नेते नसून मुंबई भाजपच्या गळ्यातलं लोढणं आहेत. त्याचं कारण गेल्या पन्नास वर्षांत शिवसेना ऊर्जावान आणि सळसळत्या उत्साहानं एखाद्या आव्हानाला सामोरा जाणारा पक्ष म्हणून कार्यरत आहे.

या पक्षातला 65 वर्षांचा शिवसैनिकही पस्तिशीच्या उत्साहाने काम करत असतो. त्याच वेळी 66 वर्षांचे लोढा यांच्या शारीरिक, मानसिक मर्यादांमुळे सत्ता टिकवण्यासाठी त्वेषाने बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या मंडळींशी मुकाबला करू शकत नाहीत हे स्पष्ट झालं. पण त्यासाठी बराच वेळ वाया गेलाय. लोढा हे मलबार हिलचे आमदार असल्यामुळे त्यांनी जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी पाहिलेली मुंबई आणि मुंबईच्या उपनगरातील गल्लीबोळातून आणि झोपडपट्ट्यांमधून पसरलेली मुंबई यांचा ताळमेळ लोढा साधू शकले नाहीत. सात वर्षं मुंबईचं अध्यक्षपद सांभाळणार्‍या आशिष शेलार यांना देवेंद्र फडणवीस यांनी असुरक्षिततेच्या भावनेतून दूर लोटलं होतं. याला आशिष शेलार यांचं धडाकेबाज काम जितकं कारणीभूत होतं त्याहीपेक्षा शेलार यांचे दिल्लीतल्या राष्ट्रीय नेत्यांशी असलेला जिव्हाळा हेदेखील निमित्त होतं.

- Advertisement -

सहाजिकच शेलार जाऊन लोढा यांच्यासारखा आपल्या हातातलं बाहुलं होऊ शकेल असा अध्यक्ष फडणवीस यांना अपेक्षित होता. मात्र निवडणुकीची हवा तापत आज लोढांसारखा शारीरिक-मानसिक मर्यादा असलेला, आक्रमकतेची वानवा असलेला मुंबई अध्यक्ष घेऊन शिवसेनेसारख्या पक्षाबरोबर मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणं म्हणजे हात चोळत बसण्याचे उद्योग ठरलेले आहेत. याची कल्पना फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना काहीशी उशिरा आलेली आहे. सहाजिकच या नेत्यांनी पुन्हा एकदा शेलार यांचा घोडा मुंबईच्या मैदानावर उतरवला आहे.

गेली जवळपास तीस वर्षं मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत बसलेल्या शिवसेनेच्या आगामी निवडणुकांसाठीची व्यूहरचना, रणनीती आणि तिकीट वाटप या गोष्टी युवासेना प्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. गेली दोन वर्षं आदित्य ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे रिमोट कंट्रोलधारी ‘कारभारी’ आहेत. त्यांना युवा सेनेच्या माध्यमातून ही संपूर्ण निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखालीच पार पाडायची आहे. अशा वेळेस 66 वर्षांच्या लोढांपेक्षा 49 वर्षांच्या आशिष शेलार यांच्या हाती सूत्र देणं भाजपने निवडणुकीला तीन महिने शिल्लक असताना उचित समजलं आहे. याआधी भाजपने प्रभारी म्हणून कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर यांची निवड केली होती. भातखळकर समाज माध्यमांवर खूपच सक्रिय असलेले भाजपचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनीच सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ट्विट करत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना संशयाच्या धुक्यात लोटलं होतं.

पण त्याच भातखळकरांना प्रत्यक्ष मैदानात आदित्य यांना थोपवता आलेलं नाही. कारण समाजातल्या सगळ्या थरांमध्ये जाऊन काम करणं ही गोष्ट अतुल भातखळकरांना अजून तितकशी जमलेली नाही. भातखळकरांना मुंबईची जबाबदारी देताना आशिष शेलार यांना ठाण्याची आणि नवी मुंबईची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र शिवसेनेला जिथे थोपवायचं आहे त्या मुंबईत नेतृत्वाची डाळ शिजत नाहीये हे लक्षात येताच निवडणूक संचालन समिती बनवून आशिष शेलार यांना त्याचा प्रमुख बनवण्यात आलं आहे. या समितीमध्ये शेलार यांच्याबरोबर कधीकाळी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेणारे कालिदास कोळंबकर, राहुल नार्वेकर, नितेश राणे यांनादेखील स्थान देण्यात आलेलं आहे. कार्यकर्त्यांचा तळापासून केडर असलेल्या भाजपमध्ये बनलेल्या कोणत्याही समित्या या अध्यक्षांच्या नेतृत्वाखालीच काम करत असतात. मात्र मुंबईमधली परिस्थिती लोढा-भातखळकरांच्या नियंत्रणाबाहेर आहे हे लक्षात येताच आशिष शेलार यांना स्वतंत्र कार्यभार देण्यात आलेला आहे. महानगरपालिकेची खडानखडा माहिती असलेले आशिष शेलार हे अभ्यासू नगरसेवक आणि आमदार म्हणून मुंबईकरांना परिचीत आहेत.

स्वतःचा अभ्यास स्वतः करणारे लोकप्रतिनिधी म्हणून तसंच जाणीवपूर्वक स्वतःचं ट्विटर हँडल स्वतःच्याच नियंत्रणात ठेवणारे लोकप्रतिनिधी म्हणून ते ओळखले जातात. या सगळ्यापेक्षा सात रस्त्याच्या कामगार वस्तीत लहानपण गेलेल्या आणि वांद्य्राच्या बहुभाषी आणि बहुसंस्कृती असलेल्या भागात लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या या नेत्याशी दोन हात करण्यासाठी शिवसेनेलाही तयारी करावी लागणार आहे. त्यामुळेच निवडणुकीपर्यंत मंगल प्रभात लोढा हे अध्यक्षपदावर राहणं ही गोष्ट शिवसेनेच्या पथ्यावर पडणारी होती. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणि गेली 30 वर्षे मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेशी लढाई म्हणजे ‘काँटे की टक्कर’ असणार आहे. याचं कारण मागच्या वेळेस शेलार यांनी पक्षाच्या नगरसेवकांच्या अर्धशतकी संख्येपासून शतकाच्या उंबरठ्यापर्यंत वाटचाल केली होती. त्यावेळी मुख्यमंत्रीपदावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मनाच्या मोठेपणामुळे सेनेला महापौरपद मिळालं होतं. कदाचित आता ती चूक भाजप आणि नेते न करण्याच्या मानसिकतेमध्ये पोचलेले आहेत.

भाजपने शिवसेनेच्या मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘मराठी कट्टा’ तर उत्तर भारतीयांना आपल्याकडे खेचण्यासाठी ‘चौपाल’ सारखे चाबरट उद्योग करून पाहिले. ‘मराठी कट्ट्या’ ची जबाबदारी बोरवलीचे आमदार सुनील राणे आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे यांच्याकडे दिली होती. त्याच्याआधी नारायण राणे केंद्रीय मंत्रीपदी विराजमान होताच त्यांच्याकडे मुंबईची सूत्रं देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. ही गोष्ट शिवसेनेच्या पूर्णतः पथ्यावर पडणारी होती. राणेंच्या प्रमोशनची बातमी येताच शिवसेनेच्या शाखा-शाखांमध्ये सत्तेमुळे आलेलं शैथिल्य अचानक गळून पडलं. आणि नेहमीच ऊर्जावान असणारा मुख्यमंत्रीपदी पक्षप्रमुख बसल्यामुळे रस्त्यावरची राडेबाजी विसरलेला शिवसेनेचा शिवसैनिक शाखांमध्ये जमू लागला. शाखांमधल्या रजिस्टरमध्ये जुन्या-जाणत्या शिवसैनिकांची नोंद होऊ लागली आणि शिवसेना कामाला लागली हे लक्षात येताच भाजपलाही आपल्याकडे मतदार यादीतल्या एका पानावरच्या मतदारांसाठी ‘पृष्ठप्रमुख’ बनवण्याची वेळ येऊन ठेपली. येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही शिवसेना राज्यात सत्तेत असल्यामुळे तर भाजप केंद्रात सत्तेत असल्यामुळे जनशक्ती इतकीच धनशक्तीची होणार याचेदेखील संकेत मिळू लागलेले आहेत.

भाजपसाठी लोढा जसे लोढणं झाले होते, तीच गोष्ट शिवसेनेसाठी युवासेनेच्या बाबतीत होऊ शकते. युवासेना हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी लॉन्चिंगचा प्लॅटफॉर्म होता असं असलं तरी आता त्यावरूनच कुटुंबातली इतर काही मंडळी राजकारणात थेट ‘वरूण’ येण्यासाठी उत्सुक आहेत. शिवसेना हा आधी एका नेत्याच्या अंकुशाखाली असलेला आणि आता एका कुटुंबाच्या नियंत्रणात असलेला पक्ष झालेला आहे. अशावेळी त्या पक्षातील पदं आणि जबाबदार्‍या हे ते कुटुंबच ठरवणार आहे. पण तरीही हा पक्ष ज्या भूमिपुत्रांसाठी आणि मराठी माणसांसाठी निर्माण झाला त्या मूळ मुंबईकरांशी आणि मराठी माणसांशीदेखील शिवसेनेचे उत्तरदायित्व असल्याचं ’मातोश्री’ ला विसरून चालणार नाही. त्यामुळे युवा सेना आणि शिवसेना यांच्यामध्ये तिकिटांवरून किंवा प्रचारावरून दरी निर्माण झाली तर लोढांचं जे लोढणं भाजपच्या गळी होतं तीच गोष्ट शिवसेनेसाठी युवासेनेच्या बाबतीतही ठरु शकते. त्यामुळे कुठल्याही स्वरूपाचं लोढणं या दोन्ही पक्षांना परवडणारं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -