अक्कलशून्य आत्मविश्वास!

मुळात या सगळ्यामध्ये आपल्याकडचा फाजील आत्मविश्वास आपल्याला नडतो हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तसा तो ज्या ज्या देशांमध्ये करोनाचा फैलाव आज मोठ्या प्रमाणावर झालाय, तिथल्या लोकांनाही नडलाच आहे, पण आपल्याकडे त्याचं प्रमाण काहीसं जास्तच आहे. स्पेन, इटली, चीन या देशातल्या नागरिकांनी पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यामध्ये करोनाबद्दल कसा बेजबाबदारपणा आणि बेदरकारपणा दाखवला होता, हे सांगणारे व्हिडिओ आता तिथलेच नागरिक जाहीर करत आहेत. नशिबाने, पुण्याईने, अपघाताने किंवा कशानेही म्हणा, पण आपला देश या कर्कवृत्तावर उष्ण हवामानाच्या भूभागावर आहे म्हणून किमान थंड हवामान आवडणारा करोना आपल्याकडे शिरताना त्याचा वेग मंदावला आहे. नाहीतर कदाचित आत्तापर्यंत आपलीही अवस्था इटली किंवा स्पेनसारख्या थंड देशांसारखी झाली असती हे नक्की!

जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलेली जागतिक साथ…जगभरात अडीच लाखांहून जास्त लोकांना लागण…१० हजारांहून जास्त रुग्णांचा मृत्यू…२०० हून जास्त भारतीय ग्रस्त आणि दुसर्‍या टप्प्याच्या सुरुवातीलाच झालेले दोन भारतीयांचे मृत्यू… ज्या करोना व्हायरसने जगभरात, भारतभरात, महाराष्ट्रभरात धुमाकूळ घातला, प्रसारमाध्यमांचा प्राईमटाईमच काय, सगळाच टाईम खाल्ला, सोशल मीडिया अक्षरश: ‘हात धुवून’ ज्याच्या मागे लागला आणि जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी ज्याचा जाप गल्लीपासून दिल्लीपर्यंत होतोय, त्या करोना व्हायरसची किंवा त्याच्या भीषणतेची माहिती नसेल, असा भारतातला एकही सूज्ञ किंवा सुशिक्षित माणूस आजघडीला तरी उरला नसेल, पण इतकं असून देखील करोनाबद्दल बेजबाबदारपणा आणि बेदरकारपणा दाखवण्याचा एक वेगळाच व्हायरस लोकांच्या मानसिकतेमध्ये घुसला आहे. त्याच्यावरचा इलाज मात्र भारतातल्याच काय, जगभरातल्या आणि प्रत्यक्ष जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ला देखील सापडायचा नाही. कारण हा व्हायरस अनेकांच्या अगदी रक्तातच भिनलेला आहे! आणि त्याचा उत्तम आणि आदर्श नमुना म्हणजे भारतीय गायिका बेबी डॉल फेम कनिका कपूर!

भारतात ज्या देशातून येणार्‍या नागरिकांना बंदी आहे किंवा त्यांची चाचणी करून, क्वॉरंटाईन करूनच त्यांना प्रवेश दिला जातो त्यातल्या एक म्हणजे इंग्लंडमधल्या लंडनमधून या महोदया १० दिवसांपूर्वी भारतात आल्या. विमानतळावर त्यांचं रीतसर करोनासंदर्भात स्कॅनिंग देखील झालं. त्यात त्यावेळी करोनाचे विषाणू त्यांच्यात नसल्याचं दिसलं आणि तिथून त्या थेट भारतातल्या गर्दीत मिसळल्या. गेले १० दिवस त्या सगळ्यांसोबत बिनधास्त राहात आहेत आणि त्याउपर कडी म्हणजे त्यांनी स्वत:च इथे पार्टीचं आयोजन केलं! या पार्टीला राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, त्यांचे पुत्र, भाजप खासदार दुश्यंत सिंह, उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह अशी दिग्गज आणि थेट संसदेपर्यंत ज्यांची ये-जा आहे, अशी मंडळी हजर होती! त्याशिवाय पार्टीमध्ये इतर देखील लोकं होती! ही सगळी लोकं या पार्टीनंतर पुढच्या शेकडो लोकांच्या संपर्कात आली. दुश्यंत सिंह तर थेट सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हजेरी लावून आले! आणि या सगळ्यानंतर आता कनिकाला करोनाची बाधा झाल्याचं निदान झालं आहे! याहून धक्कादायक काय असू शकतं?

स्वत:ला करोनाची लागण झाल्यानंतर कनिकाजींनी इन्स्टाग्रामवर मारे ऐटीत एक पोस्ट टाकली. यामध्ये त्या म्हणतात, ‘माझं कुटुंबं आणि मी सध्या पूर्णपणे क्वॉरंटाईनमध्ये आहोत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वागत आहोत. आता आम्ही ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आलो, त्यांची यादी बनवण्याचं काम सुरू आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की लक्षणं दिसत असतील तर तुम्ही सगळ्यांनी स्वविलगीकरणाचा स्वीकार करा!’ आता इतक्या लोकांपर्यंत करोना घेऊन गेल्यानंतर कनिकाला स्वविलगीकरण म्हणजेच सेल्फ आयसोलेशनची उपरती झाली म्हणजे विशेषच आहे! कनिकाच्या कुटुंबियांना देखील करोनाची लागण झाली आहे. दुष्यंत सिंह तर थेट संसदेत हजेरी लावून आले आहेत. त्यामुळे कनिकाच्या एका चुकीचा कदाचित फार मोठी किंमत या देशालाच चुकवावी लागू शकते. आता तर हे दुश्यंत सिंह राष्ट्रपतींच्या भेटीला देखील गेल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्याची व्याप्ती किती असेल, याचा अंदाज आत्ताच लागणं कठीण आहे.

खरंतर, जगभरात ज्या व्हायरसबद्दल इतकं सगळं बोललं जात आहे, त्याबद्दल एकवेळ ग्रामीण भागातल्या, अशिक्षित किंवा ज्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आपल्यासारखी इंटरनेट, मोबाईल किंवा टीव्हीसारखी साधनंच पोहोचली नाहीत, अशा आदिवासी लोकांकडून बेजबाबदार किंवा अनभिज्ञ वर्तन होणं ही एकवेळ समजण्याजोगी बाब आहे, पण कनिका कपूरसारख्या समाजातल्या कथित उच्चभ्रू वर्गातल्या लोकांना देखील आपल्या आसपास घडणार्‍या गोष्टींचं गांभीर्य समजू नये, नव्हे, त्यांनी त्याकडे सर्व माहिती असून देखील दुर्लक्ष करावं याचं वैषम्य आणि त्याहून जास्त भीती आहे. कारण परदेशातून मोठ्या संख्येने प्रवास करून येणारी ही मंडळी जर अशा प्रकारे बिनधास्तपणे देशात फिरू लागली आणि त्याहून वर पार्ट्या करू लागली, तर ‘गर्दी टाळा, एकत्र जमू नका, लग्न पुढे ढकला, समारंभ थोडक्यातच करा’, असले सल्ले काय फक्त देशातल्या सामान्य जनतेसाठीच आहेत काय?

खरंतर यात चूक एकट्या कनिका कपूरची नाहीच मुळी. ही सगळ्याच भारतीयांची खोडच आहे असं म्हटलं, तरी वावगं ठरू नये. दररोज स्वत: मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री, पालिका आयुक्त घसा ताणून ताणून करोनाविषयी जनजागृती आणि आवाहनांच्या मागून आवाहनं करत असताना ते गांभीर्य अजून घराघरात पोहोचलं नसल्याचंच चित्र आहे. वास्तविक तोंडावर रुमाल ठेऊन शिंकावं किंवा खोकावं हे समजण्यासाठी कुठल्या करोना व्हायरसची गरज नव्हती. ती तर सामान्य परिस्थितीत देखील आरोग्याची काळजी घेण्यासाठी लावून घ्यायची सवय आहे. कित्येक वर्षांपासून डॉक्टर हेच तर सांगतायत! पण करोना पार उंबर्‍यावर येऊन खुन्नस देऊन आपल्याकडे बघतोय, तरी देखील साधं तोंडावर रुमाल ठेऊन शिंकणं किंवा खोकणं आपल्याकडच्या मंडळींना जमेना झालंय. बाहेरून आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवायला हवेत, हे गेल्या कित्येक पिढ्यांपासून आपल्या आया-आज्यांनी पार कंठशोष करून सांगितलंय. त्यात नवीन असं काहीही नाही, पण त्याची देखील अक्कल येण्यासाठी आपल्याला करोनामुळे जाणार्‍या बळींची वाट पाहायची होती.

स्वच्छतेच्या बाबतीत तर आपण आपली तुलना अमेरिका, स्पेन, इटली या देशांशी न केलेलीच बरी. कारण आपल्याकडचा स्वच्छतेबाबतचा ‘आनंद’ इथल्या मलेरिया, डायरिया, न्यूमोनिया, हगवण, दमा, कॅन्सर अशा अनेक जीवघेण्या आजारांना रोजच्या रोज नित्यनव्याने आमंत्रण देत असतो…त्यात आत्तापर्यंत शेकड्याने लोकं मृत्यूमुखी देखील पडली आहेत. त्यामुळे इतक्या मृत्यूंनंतर देखील आपण स्वच्छतेबाबत धडा घेतलेला नसताना एकट्या बिचार्‍या करोनामुळे आपल्यात शहाणपणा, जबाबदारीची जाणीव आणि सतर्कता येणं ही जवळपास अशक्य अशीच बाब आहे. त्यातही ती आलीच, तर तोपर्यंत करोनासारखाच आणखी एखादा जीवाणू किंवा विषाणू आपल्या तोंडात मरायला तयार असेल. मुळात आपल्या रोजच्या सवयींमुळे अशा अगणित जीवाणू, विषाणू आणि रोगांसाठी आपण स्वत:च स्वत:ला सॉफ्ट टार्गेट करून ठेवलं आहे आणि त्यातही जर अशा विषाणूग्रस्त देशातून येऊन देखील तुम्ही कोणतीही काळजी न घेता बिनबोभाटपणे फिरणार असाल आणि पार्ट्या करणार असाल, तर प्रत्यक्ष करोनाने देखील कनिका महोदयांना साष्टांग दंडवतच घातला असेल यात तिळमात्र शंका नाही!