घरफिचर्समायमहानगर ब्लॉगभाजप नेत्यांनी जीभ आवरावी

भाजप नेत्यांनी जीभ आवरावी

Subscribe

गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवें भेटी केली तेणें । गाढवाच्या अंगाला चंदनाचं उटणं लावून त्याला आंघोळ घातली काय वा त्याला अत्तरातून काढलं तरी ते शेवटी उकिरड्यावर जाऊन लोळणारच. उकिरड्यावरची राख अंगाला माखून घेण्याचा त्याचा स्थायीभाव असतो. तेव्हा गाढवाच्या मागे किती लागावं, याचा मंत्र संत तुकोबारायांनी दिला आहे. एकीकडे गाढवाच्या या स्थायीभावाप्रमाणेच त्यांनी माकडाचीही स्थिती या रचनेत मांडली आहे. माकडाच्या गळ्यात सोन्याची घंटा बांधा वा मौल्यवान मणी टाकून सोन्याने मढवा. तो आपल्या मूळ स्वभावावरच जाणार. हा मंत्र सध्या महाराष्ट्रात सातत्याने वापरावा लागतो आहे. विशेषत: भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुरू केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरच्या राजकारणामुळे त्यांची तुलना आता तुकोबारायांच्या या अभंगात चपखल बसू लागली आहे.

माणूस हा बदल घडवणारा, बदल स्वीकारणारा आणि बदलाला आपलंसं करणारा प्राणी आहे. या मनुष्य प्राण्याची इतरांशी बरोबरी होऊ शकत नाही. यामुळेच त्याला अनन्य महत्व आहे. तो म्हणजे उकिरड्यात लोळण घेणारा गाढवही नाही आणि खुषमस्कर्‍या माकडही. पण गेल्या सात वर्षांपासून भाजपच्या नेत्यांनी राज्यात खालच्या टीकेचा मांडलेला उच्छाद पाहाता आता हद्द झाली, असं म्हणायची वेळ आली आहे. त्यांच्या राजकीय उच्छादाने हाता हद्द गाठली आहे. गाढवं आणि माकडंही लाजावीत अशी स्थिती त्यांनी स्वत:ची करून ठेवली आहे. तुकोबांच्या अभंगातून अशांची चांगलीच भादरली आहे. तुकाराम महाराज म्हणतात दुष्टाला हिताचं सांगितलं तरी ते आवडत नसतं. अज्ञानामुळे तो आपल्या मनाला येईल तसंच वागतो. उटी या शब्दाचा शब्दश: अर्थ घेतला काय आणि मूळ कोषातील अर्थ घेतला काय काहीही फरक पडत नाही. किर्ती, प्रसिध्दी, नावलौकीकाला साजेसं उटी या शब्दाचा अर्थ. माणसाच्या बाह्य रुपाला भुलून माणसं त्यांच्या आहारी जातात, असा त्याचा अर्थ.

- Advertisement -

राज्यातील राजकीय वातावरण सातत्याने कलुषित करण्याचा चंग बांधलेल्या भाजप नेत्यांनी तुकाबांची ही अभंगवाणी लक्षात घेण्याची गरज आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उधळलेल्या मुक्ताफळांमुळे भाजप नेत्यांनी आता संयमाचा जालीम डोस घेण्याची गरज आहे, असेच वाटते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी पाटलांनी काढलेल्या एकेरी उद्गाराने झालेलं हसं हा पाटलांसाठी तुकोबांच्या पंक्तींचा भाग होऊ शकतो. खूप टीका झाल्यावर त्यांना उपरती आली आणि आपली जीभ घसरली, असं त्यांनाच मान्य करावं लागलं. ही काही एकमेव घटना नाही. याआधीही ते असंच बडबड करत होते. प्रदेशाध्यक्ष असे वायफळ बोलू लागल्याने इतरांच्या जीभेला धार चढली आणि ते मुख्यमंत्र्यांचाही बाप काढू लागले. चंद्रकांत पाटील यांची कारकीर्द ही विधिमंडळाचं कामकाज कव्हर करणार्‍या पत्रकारांना चांगली ठावूक आहे.

विधान परिषदेत त्यांची वर्णी लागली तेव्हा कोण हे पाटील, याचीही अनेकांना जाणीव नव्हती. सभागृहात त्यांनी कधी तोंड उघडल्याचंही अनेकांना स्मरत नाही. अचानक लॉटरी लागावी आणि युतीच्या मंत्रिमंडळात त्यांची महसूल मंत्रालयासारख्या महत्वाच्या मंत्रिपदी वर्णी लागावी हे सर्वांसाठीच सखेद अश्चर्य होतं. इतरांना दूर ठेवत महत्वाची जबाबदारी पाटलांकडे आल्यावर पक्षात त्यांचं कोणीतरी आहे, हे कळायला लागलं. एव्हाना पक्ष वाढवणार्‍या अनेकांना दूर ठेवत जेव्हा पाटलांच्या गळ्यात मोठी जबाबदारी आली तेव्हाच कोणाच्या तरी वशिल्याचे ते धनी आहेत, हे कळून चुकलं. पाटील तसे सुशिक्षित असलेले सुचिर्भूत राजकारणी. त्यांना अशी जबाबदारी मिळणं हे लक्षण चांगलं. सामान्यत: राजकारणात वरचढ असलेल्यांची वर्णी अशा मंत्रिपदावर लागण्याची एक पध्दत आहे. तसा कुठलाही करिष्मा पाटलांकडे नव्हता. असं असूनदेखील महत्वाची जबाबदारी गळ्यात पडणं हाच पाटलांचा सन्मान होता. सत्ता गेल्यावर त्यांच्याकडे प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी देत पक्षाचं पालकत्वही त्यांच्याकडे दिलं, पण ते जबाबदारीचे भान ठेवताना दिसत नाहीत.

- Advertisement -

गेला काही काळ पाहिला तर आपल्या प्रदेशाध्यक्षांच्या तोंडचाळ्यांची री पक्षाच्या इतर नेत्यांनी ओढल्याचं दिसतं. यात आशिष शेलार, अतुल भातखळकर, किरीट सोमय्या, नारायण राणे त्यांची मुलं यांनी प्रदेशाध्यक्षांप्रमाणेच मर्यादा ओलांडल्या आणि अत्यंत खालच्या दर्जाची भाषा ते वापरू लागले. कोण पवारांना लुटारू म्हणतो तर कोण मुख्यमंत्र्यांना दरोडेखोर म्हणतो. राज्यातील राजकारण किती खालच्या स्तरावर या नेत्यांनी आणून सोडलंय, याचं हे उदारहरण म्हणता येईल. देशाच्या राजकारणात आपल्या वयाइतका काळ पार केलेल्या शरद पवार यांनाही हे नेते शिकवू लागले. ज्या व्यक्ती पवारांवर शरसंधान करतात ते इतरांना किंमत देण्याचा प्रश्नच उरत नाही. चंद्रकांत पाटील यांनी यात कडी केली आणि ते एकेरीवर उतरले. अति झाल्यावर सारवासारव करण्यात पाटलांहून कोणीही माहीर नाही. त्यांनी नेहमीप्रमाणेच पवारांबद्दल आपल्याला आदर आहे, असं सांगता सांगता जीभ घसरल्याची कबुली देऊन टाकली. तुकोबाराय असल्या वायफळांसाठीच माकडाची आणि गाढवाची उपमा देतात. असल्या उपद्व्यापींना सुधारण्याची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.

अशांना कितीही मढवा ते लोळण घेणार हा त्यांचा स्थायी स्वाभाव असतो. तो या नेत्यांना चांगला लागू होतो. तेव्हा त्यांना बोलूद्या. स्थायी स्वाभावाचा तो भाग आहे. पवारांसारख्यांनी त्यांच्याकडे लक्ष देण्याने अशांना आपण योग्य असल्याचा साक्षात्कार होतो. हातातोंडाशी आलेली सत्ता गेल्यानंतर राज्यातील भाजपचे नेते केंद्रातील सत्तेचा आधार घेऊन राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा शर्थीने प्रयत्न करत आहेत. राज्यातील सरकार पडण्याच्या तारखांवर तारखा जाहीर करत आहेत. पण भाजपकडून जितका कडवा विरोध केला जात आहे, तितके राज्यातील सरकार अधिक भक्कम होत जाताना दिसत आहे. उलट, भाजपच्या नेत्यांनी संयमित राजकीय विरोधकाची भूमिका घेतली असती तर कदाचित राज्यातील आघाडी सरकारमधील अंतर्गत मतभेद अधिक उफाळण्यास वाव मिळाला असता, पण भाजपच्या नेत्यांनी तसे न करता सत्तेतील तीनही पक्षांवर देमार टीका आणि आरोपांच्या फैरी सुरू ठेवल्या आहेत.

किरीट सोमय्या यांनी तर सत्ताधार्‍यांविरोधात घोटाळ्यांचे आरोप करण्याचा विडाच उचलला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सोमय्या यांनी आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी सातत्याने अनेक आरोप केले, पण त्यांचा काही उपयोग होताना दिसत नाही. भाजप नेत्यांना अपेक्षित असलेला हेतू साध्य करता येत नाही. त्यामुळे या नेत्यांना आता वैफल्य येऊ लागले आहे. त्यातून ते आता एकेरीवर येऊ लागले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. पण त्यामुळे त्यांचेच हसे होऊ लागल्यामुळे त्यांना आपली जीभ चुकून घसरली, असे मान्य करावे लागले. खरे तर आता राज्यातील भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी चंद्रकांत पाटलांची झालेली ही चूक प्रातिनिधीक समजून यापासून स्वत:ही धडा घ्यायला हवा, नाही तर त्यांची अवस्था, एक ब्रम्हचारी झोंबे गाढवासी, गाढवही गेले आणि ब्रम्हचर्यही गेले, या तुकोबांच्या एका कटू उक्तीसारखी झाल्याशिवाय राहणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -