घरफिचर्समायमहानगर ब्लॉगचारित्र्यतपासणीचा चारित्र्यहीन मापदंड

चारित्र्यतपासणीचा चारित्र्यहीन मापदंड

Subscribe

महिलांच्या शारीरिक भागांना टाळेबंद करणारी लौसा पद्धती देशातील काही भागात पुरुषप्रधान समाज आणि कुटुंबपद्धतीत राबवली जात असल्याबाबत नियतकालिकांमध्ये लिहिले गेले होते. महिलांवरील म्हणजेच महिलांच्या मन आणि शरिरावरील पुरुषाचा हक्क आपल्याकडे अबाधित असतो. म्हणूनच जातीय उतरंडीत खालच्या थरातील आणि सामाजिकदृष्ठ्या मागास मानलेल्या समुदायात महिलांची नाणेपरीक्षा घेतली जाते, अशीच परीक्षा उस्मानाबादमध्ये नुकतीच घेण्यात आली. धगधगत्या चुलीवर उकळत्या तेलाने भरलेल्या भांड्यातून नाणे काढण्याची ही परीक्षा असते. खरे तर चारित्र्यतपासणीचा हा चारित्र्यहिन मापदंड आहे.

स्वच्छ चारित्र्य अस्वच्छ झाल्याचा आरोप ठेवल्यावर त्याची साफसफाई करण्याचा ठेका समाज समुदायांमधील काही ठेकेदारांचा असतो, चारित्र्यावरील शिंतोडे असा शब्दप्रयोग आपल्याकडे सर्रास केला जातो. असे शिंतोडे साफ करणारे कपड्यांच्या डागांची तपासणी करण्यात वाकबगार असतात. त्यासाठी त्यांची एक अशी यंत्रणा काम करत असते, एखाद्या मुलासाठी मुलगी पाहिल्यावर त्या मुलीच्या कौमार्य चाचणीसाठी असा समाज समुदाय नेहमी तयार असतो. हा समुदाय पुरुषप्रधान संस्कृती आणि समाजाचे अपत्य असते, मात्र अशा समाजाला मातृसत्ताक पद्धतीच्या कुटुंबरचनेच्या इतिहासाचा साळसूद असा बेगडी अभिमानही असतो. हा अभिमान इतिहासात असला तरी वर्तमानातील समाजरचनेत त्याला काहीही स्थान नसते. तिथं मुलीच्या आईलाच किंवा पंचायतीने ठरवलेल्या एखाद्या ज्येष्ठ वयाच्या महिला किंवा मुलीच्या कौमार्य चाचणीची तयारी करण्याची जबाबदारी दिली जाते. कौमार्य चाचणीचे मापदंड हे मानवी अवहेलनेचे प्रमाण असते. पण आपल्याकडे महिलांना माणूस समजणे हा पुरुषी मूर्खपणा असतो, स्त्रियांसाठी अनेकदा बाई माणूस असा शब्द आपण वापरतो, पण पुरुष माणूस असा शब्द आपल्या शब्दकोषात सापडत नसतो, असो…विषय कौमार्य अभंग आणि भंगतेचा असल्यावर त्यातूनच पुढे शुद्धता-अशुद्धता, पवित्र-अपवित्र, चारित्र्य आणि चारित्र्यहिनता असा त्याचा परिघ विस्तारत जातो.

खाप पंचायतींना समाजातील वर्णव्यवस्थेचे अधिष्ठान असते, आपल्याकडे सीतेच्या अग्नीपरीक्षेतून चारित्र्यतपासणीचा अभिमानास्पद पौराणिक इतिहास असतो. या पंचायतींच्या न्याय निवाड्यात महिलांच्या मतांना स्थान नसते, तसेच तरुणांच्या मतांनाही स्थान नसते. तरुणांनी पंचायतीसमोर आपलं मत मांडल्यास त्यांच्यावर मोठ्यांच्या मध्ये बोलू नये, हे वडिलधार्‍यांचे संस्कार नसल्याचे मानले जाते. अशा पंचायतींना समाजाचे अधिष्ठान असल्याने त्यात जातसंरचना, धर्म, परंपरा, रुढी आणि वर्णव्यवस्थेतील सामाजिक स्थानानुसार महत्व प्राप्त होते. म्हणूनच अशा पंचायतींनी दिलेला निर्णय त्या समाज समुदायासाठी बंधनकारक असतो, त्याविरोधात जाणार्‍यांनाही वाळीत टाकले जाऊ शकते. देशातील उत्तर भारतात आणि राजस्थान आणि महाराष्ट्रातील काही वर्णव्यवस्थेतील खालच्या जातीत आणि वर्णाबाहेरील तसेच गावकुसाबाहेरील जात जमाती समुदायांमध्ये जात पंचायतींचा निर्णय प्रमाण मानला जातो.

- Advertisement -

वरिष्ठ मानल्या जाणार्‍या जातींमध्येही जात पंचायती असतात. अनेकदा वरिष्ठ जात पंचायतींमध्येही कनिष्ठ जात पंचायतींच्या प्रकरणांचा निवाडा केल्याची उदाहरणे आहेत. वर्णव्यवस्थेतील जातीय उतरंडीमुळे वरिष्ठ जात पंचायतींच्या निर्णयांना कनिष्ठ जातपंचायतींना मान्यता द्यावी लागते. आपल्याकडे सत्र, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयासारखी ही स्थिती असते. सामाजिक मान्यता असल्यामुळे राजकीय स्वरुपाच्या कायद्याला इथं जुमानलं जात नाही. जात पंचायतींचा निर्णय हा त्या त्या समाजाच्या प्रतिष्ठेचा विषय असतो आणि सामाजिक प्रतिष्ठेला जातीय अहंकाराची चौकट असते, अशा अहंकाराला अभिमानाचे नाव दिल्यावर समाजाची दिशाभूल करणे सोपे होते. जात पंचायती जरी सामाजिक चौकटीत असल्या तरी त्यांचे निरंकुश सत्तेचे हेतू मात्र राजकीयच असतात. इथंही सत्तेचं राजकारण असतं, समुदायातील सर्वंकष सत्ता आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी जात पंचायतीतील प्रतिष्ठीत, सधन आणि प्रभावी लोकांमध्ये स्पर्धा सुरू असते.

निसर्गात कोणतीही वस्तू अशुद्ध स्वरुपात नसते, फार फार तर ती आपल्या मान्यता आणि संकल्पनांच्या कसोटीवर सदोष किंवा अस्वच्छ, भेसळयुक्त अशी सोयीची असू शकते. परंतु शुद्धतेचं आपल्याला अप्रूप असतंं म्हणूनच आपण शुद्ध देशी तूप, शुद्ध वनस्पती तेल, शुद्ध हवा घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपल्याकडे रक्तशुद्धीही केली जाते किंवा हृदय शुद्धीकरण उपचारही असतात. मुळात वस्तू अशुद्ध असते यावर आपला ठाम विश्वास असतो. एखादी स्त्री मासिक पाळीत अशुद्ध असते ही याच अशुद्ध संकल्पनेची अंतर्मनातील विकसित अवस्था असते. महिलांच्या शुद्धीकरणासाठी आपल्याकडे सामाजिक यंत्रणा काम करत असतात. संविधान किंवा कायद्यानुसार स्त्रीत्वापेक्षा व्यक्तीला नागरिक म्हणून असलेले महत्व अशा सामाजिक यंत्रणांच्या खिजगणतीत नसते. महिलांच्या शारीरिक भागांना टाळेबंद करणारी लौसा पद्धती देशातील काही भागात पुरुषप्रधान समाज आणि कुटुंबपद्धतीत राबवली जात असल्याबाबत नियतकालिकांमध्ये लिहिले गेले होते. महिलांवरील म्हणजेच महिलांच्या मन आणि शरिरावरील पुरुषाचा हक्क आपल्याकडे अबाधित असतो. म्हणूनच जातीय उतरंडीत खालच्या थरातील आणि सामाजिकदृष्ठ्या मागास मानलेल्या समुदायात महिलांची नाणेपरीक्षा घेतली जाते, अशीच परीक्षा उस्मानाबादमध्ये नुकतीच घेण्यात आली.

- Advertisement -

धगधगत्या चुलीवर उकळत्या तेलाने भरलेल्या भांड्यातून नाणे काढण्याची ही परीक्षा असते. ही परीक्षा घेणारा अनेकदा महिलेचा पतीच असतो. विषय बरेचदा चारित्र्याच्या शुद्धता तपासणीचा असल्यामुळे ही महत्वाची जबाबदारी महिलेच्या पतीवरच येते. चारित्र्य आणि स्त्रीत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटाव्यात इतकी भयावह स्थिती आपल्याकडे याबाबत झालेली असते. महिलांच्या तुलनेत पुरुषांना चारित्र्य नसते किंवा त्याला तेवढे साळसूद महत्व दिले जात नाही. आपल्याकडे मंगळसूत्र, जोडवी अशी आभूषणे स्त्रीवर पुरुषाची मालकी असल्याचे दर्शवत असल्याने तिच्या चारित्र्याचीही मालकीही पुरुषांकडे आपसूकच येते, त्या अनुषंगाने चारित्र्याची तपासणी करण्याचे अधिकारही पुरुषाला मिळतात, या अधिकारी अंमलबजावणी संपूर्ण समाजासमोर व्हावी असा अभिमान पुरुषामध्ये जागृत झाल्यावर तो पंचायतीला बोलणे धाडतो, अशा पंचायतींना चारित्र्यतपासणीच्या नावावर महिलांच्या चारित्र्यहननाचा हा अनिर्बंध अधिकार असतो. त्यासाठीचे निकषही संपूर्ण एकतर्फी असतात, त्यांना अन्यायकारक म्हणणे पंचायतींचा अवमान असतो, उकळत्या तेलातून नाणे काढल्यावर बोटांना इजा न झाल्यास महिलेला चारित्र्यवान समजले जाते. तापलेल्या आगीत किंवा तेलात हात घातल्यावर बोटं पोळणारच असतात….हे पोळणं महिलेला चारित्र्यहीन ठरवण्यासाठी पुरेसं असतं. म्हणजेच ही परीक्षा दिल्यावरही चारित्र्यहिनतेच्या आरोपातून महिलेची सुटका होत नसते.

धर्म, जात आणि सामाजिक सत्ता अनेकदा राजकीय सत्ता आणि कायद्यापेक्षा वरचढ ठरतात. पोरानं वरिष्ठ जातीतली पोरगी पळवली म्हणून गुन्हेगार ठरलेला सैराट चित्रपटात जात पंचायतीसमोर स्वतःच्या तोंडात हाणून घेणारा परशाचा बाप याच समाजव्यवस्थेतील परिणाम असतो. देशातील अविकसित भागात महिलांवरील अत्याचारांच्या घटना जगण्याच्या भाग झालेल्या असतात. अशा ठिकाणी शोषण झालेल्या मुलीच्या बाळाचा बाप ठरवण्यासाठीही जात पंचायती बोलावल्या जातात. जर त्या मुलीवर अत्याचार झालेला असेल तर समुह पंचायतींकडून अत्याचारी आरोपीला त्या मुलीशी लग्न करण्याची शिक्षा दिली जाते. देवदासी सोडलेल्या महिलांच्या बाबतीत झुलवा लावण्यासाठीचा दबाव समुह पंचायतींसारखे अधिकार असलेल्या संबंधितांकडून टाकला जातो.

परांडा तालुक्यातील चारित्र्यतपासणीच्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची राज्याच्या गृहविभागानेही दखल घेण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी सरकारी तपास यंत्रणांवरही आरोप होत आहेत. उकळत्या तेलातून नाणे काढण्याचा ही परीक्षा व्हायरल झाल्यावर हे प्रकरण समोर आले. अशी कित्येक प्रकरणे समोर येतही नाहीत किंवा सरकार दरबारी त्यांची नोंद होत नाही. एका मागास मानल्या जाणार्‍या समाज समुदायातील या महिलेला दिज नावाची प्रथा पाळण्याची सक्ती झाली होती. यातील महिलेच्या पतीने या वेळी विधान केले की, पारधी समाजातील लोकांना भाईयो आणि बहिणींनो आपल्याकडे दिज नावाची प्रथा आहे. मी माझ्या पत्नीसोबत आज दिज प्रथेचं पालन करत आहे. मी तिला मारणार नाही. तोडणार नाही. पण तिचं पावित्र्य तिला सिद्ध करावं लागेल. यात पतीने पत्नीवर आरोप केला की ती चार दिवस बेपत्ता होती. या चार दिवसात तिचे इतरांबरोबर शारीरिक संबंध आले किंवा नाही याची परीक्षा केली जाणार आहे. यानंतर पती पत्नीला विचारतो, तू असं काही (अनैतिक) केलं आहेस का, त्यावर पत्नी म्हणते, माझ्यासोबत असं काहीही (अनैतिक) घडलेलं नाही.

मग हे खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी तुला पावित्र्याची परीक्षा द्यावी लागेल. आपल्या प्रथेनुसार पाच रुपयाचं नाणं उकळत्या तेलात टाकलेलं आहे. हे नाणं काढताना तुझा हात भाजला नाही तर तू पवित्र आहेस असं मी समजेन, त्यानंतर या महिलेने उकळत्या तेलात हात घातला आणि तिचा हात भाजला. त्यावर पती म्हणाला- बघा तिचा हात भाजला म्हणजे ती अपवित्र आहे. या प्रकरणानंतर संबंधित महिलेला पतीकडून चारित्र्यभंग केल्याचा गुन्हेगार ठरवण्यात आला आहे. मात्र या प्रकरणानंतर पती आणि पत्नी फरार झाले होते, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील दुसरी बाजू अशीही आहे की पीडित महिला ज्या दिवशी बेपत्ता झाली होती त्या काळात या महिलेवर खरंच अत्याचार झाला का, जर तसं झालं असेल तर ते गुन्हेगार आहेतच, या महिलेची परीक्षा घेणारेही गुन्हेगार आहेत. महिलेवर कायदेशीर व्यवस्थेचे रखवालदार म्हणवून घेणार्‍या पुरुषांकडून जर खरोखरंच अत्याचार झाला असेल आणि त्या अत्याचाराला पावित्र्याची जोड देऊन महिलेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणार्‍या पुरुषांवर कारवाई व्हायलाच हवी. अत्याचारानंतरही महिलेच्या चारित्र्य पावित्र्याची होणारी परीक्षा ही अत्याचारापेक्षाही कमी नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -