घरफिचर्समायमहानगर ब्लॉगइमानदार माणसानं केलेली फसवणूक!

इमानदार माणसानं केलेली फसवणूक!

Subscribe

बुधवारी पहाटे पाच वाजता उठून पुरवणीसाठीचा लेख होता निराळा करताना फोनची बॅटरी डाऊन झाली. ( कारण मी लेख फोनवरच लिहीतो.) फोन चार्ज होत होता म्हणून डोळे झाकले तोच वालावल ग्रामपंचायतीतल्या समीर चौधरीचा फोन आला. इतक्या सकाळी तो कधीच फोन करत नाही म्हणून शंका डोक्यात घेऊनच फोन रिसिव्ह केला. तो फोन समीरचा होता तरी पलीकडचा आवाज दाजी कावळेंचा होता…कोचरेकर मी कावळे बोलतोय, दाजी… अहो, संतोष आहे ना…मी म्हटलं कोण संतोष? तर म्हणाले, अहो आपला संतोष मुणगेकर… मी म्हटलं, हा त्याचं काय? तर म्हणाले, अहो पहाटे झोपेतच तो…मी ओरडतच म्हटलं अहो, दाजी अहो काय बोलताय काय तुम्ही…तर म्हणाले, होय, अहो डॉक्टरांनी आताच चेक केला त्याला…दाजी फोनवर बोलत असतानाच डॉक्टर हर्षला शिंगटे- मोर्डेकरांचा फोन येतच होता. तो कॉल मिस्ड झाला. कारण मी वालावलला येऊ नये अशी दाजींची सूचना होती. ती समजून घेई पर्यंत काही क्षण गेले. मी लगेच पुन्हा डॉक्टर शिंगटे-मोर्डेकरांना फोन केला. त्यांनी संतोषच्या हृदयाला बसलेला धक्का किती भयंकर होता ते सांगितलं. माझ्यावर कोसळलेलं संकट किती भयावह याची मला त्याच क्षणी कल्पना आली. अख्खी बेडरूम माझ्या भोवती फिरतेय असं मला वाटायला लागलं.माझी अवस्था बघून समोर उभ्या असलेल्या सौ. समीधाला तर रडूच कोसळलं. मी तिला थांबवत आधी विमान मग हेलिकॉप्टरचा पर्याय वालावलकडे निघण्यासाठी तपासायला सुरुवात केली. हेलिकॉप्टरने पावसाळी दिवसांत मधेच अडकलो तर फसगत होणार होती. ती ही स्विकारुन एका कंपनीशी चर्चा करत प्रयत्न सुरु ठेवले. कारण विमापेक्षा तोच पर्याय खूप महाग असला तरी लवकर पोहचता येण्यासाठी योग्य होता.मात्र दाजी कावळेंनी कोविडच्या दिवसांत दिलेल्या अंत्यसंस्कारासाठीच्या ९.३०- १० च्या मर्यादेत काहीच बसत नव्हतं. ना विमान प्रवास की नाही हेलिकॉप्टर…मग स्वतःला कसंबसं सावरत काही मित्रांना बातमी कळवली. प्रत्येकजण धक्क्याने अवाक झाला… कारण जिथे मानवी जन्म आहे तिथे मृत्यू आहे…हे निसर्गचक्र आहे…पण ४ ऑगस्टला माझ्या गावात जे घडलं ते भयंकर अमानुष होतं… जुन्या जाणत्यांच्या माहिती नुसार वालावल गाव स्वातंत्र्यानंतरच्या सगळ्यात मोठ्या अंत्ययात्रेला खिन्न मनाने आणि चेहऱ्यानं सामोरं जायला तयार झालं होतं… प्रत्येकजण हळहळत होता…७७ वर्षाचे वयस्कर अति मधुमेहाने आजारी वडील आणि अंथरुणाला खिळलेली तिथेच सगळं करणारी आजारी म्हातारी आई यांच्या जीवघेण्या आक्रोशात संतोषचं पार्थिव शेवटच्या निरोपाच्या प्रतिक्षेत विसावलं होतं…

संतोष वसंत मुणगेकर. वय उणंपुरं ४५ वर्ष. शिक्षण बेताचंच. शरीरयष्टीही छोट्या चणीची. वडिलांच्या काही चुकलेल्या निर्णयांमुळे खिसा तसा फाटकाच. पण मनाची श्रीमंती कुठल्याही लाख्यासावकाराला लाजवेल अशीच. प्रामाणिकपणा तर विचारुच नका! त्यावर चर्चा न करता कुणीही जीव ओवाळून टाकावा… रात्री अपरात्री कुणाच्याही हाकेला धावून जाण्यातला परोपकार म्हणजे काय असतं ते संतोषकडून शिकावं.पण आता शिकवायला तो राह्यलाय कुठे? हे सगळं वाचताना आपल्याला एका सज्जन माणसाची ओळख होईल. पण सज्जन माणूसही फसवतो, गंडवतो… संतोष मुणगेकरनेही तेच केलंय. त्याने माझ्यासारख्या त्याच्यावर भावासारखं प्रेम करणाऱ्या माणसाला हातोहात फसवलंय… यातून माझं नुकसान कधीच भरुन निघणार नाही. कितीही काही केलं तरी… बहुधा तुम्हालाही ह्याच अनुभवातून जावं लागत असेल… कारण रिक्षावाला, शेतकरी, डॉक्टर, एजंट, दुकानदार, चाकरमानी, वकील, बिल्डर, हॉटेलवाला, मूर्तीकार, पुजारी, होडीवाला, रेती काढणारे आणि त्याचा व्यापार करणारे, दारु विकणारा, दवा-पाणी देणारा,सरपंच, आमदार, खासदार, एखादा तरुण खेळाडू किंवा वयस्कर ग्रामस्थ अहो इतकंच काय गावातला किंवा रस्त्यावर भेटलेला एखादा दारुडा या प्रत्येकाकडे बघण्याचा संतोषचा चष्मा एकच. प्रत्येका बरोबर वागण्याचा संतोषचा लहेजा एकच…त्यात बदल नाही. आपला- परका असं काहीच नाही… समोरच्या बरोबरचं त्याचं वागणं म्हणजे श्री देव लक्ष्मीनारायणच्या तलावातील पाण्यासारखं सात्विक आणि आरसपाणी…

- Advertisement -

संतोषचा आणि माझा परिचय झाला २०१२ साली.माझा व्यावसायिक मित्र कमलेश पाटकरने मला त्याला भेटून एका प्लॉट साठी संतोषचा संदर्भ दिला. याची जागा मला आजही लख्ख आठवतेय. माझा पत्रकार आणि हॉटेल व्यावसायिक मित्र राजन नाईक याचं कुडाळ मधल्या आरएसएन हॉटेलचा परिसर. त्यानंतर मी संतोषला भेटलो खरा घराच्या प्लॉटसाठी. त्याचा व्यवहार झाला पारदर्शक पद्धतीने. त्यानंतर मात्र अत्यंत निरभ्र स्वभावाच्या संतोष मला कधी ताब्यात घेतलं ते कळलंच नाही. तसं पाहिलं तर एक माध्यमकर्मी म्हणून किंवा अनेक राजकारण्यांना, खेळाडूंना आणि मान्यवरांना मित्र म्हणून जोपासताना जे त्यांच्या कडे त्यातलं काहीच संतोषकडे नसल्याचं लक्षात आलं. पण कदाचित जे संतोष मुणगेकर कडे आहे ते त्यातल्या अनेकांकडे नव्हतं. ते म्हणजे विलक्षण प्रामाणिक वागणं…

वालावल मध्ये मुणगेकर कुटुंबातीलच एक प्लॉट घेतला आणि माझ्या आईची तब्येत नाजूक झाली होती. प्लॉट घेण्याआधी पासूनही माझ्या डोक्यात बांधकाम व्यावसायिक पपू नाईक यांच्या कामाच्या दर्जाचं आणि शैलीचं वारं शिरलं होतं. माझ्यासारखं बेताचं बजेट असलेल्या माणसासाठी पपू नाईक हा पर्याय नव्हता. तरी राजन नाईकच्या मध्यस्थीने त्या शर्यतीत धावायचा प्रयत्न तर केला पण वेळेच्या चौकटीत पपूशेठना बसवणं महाकठीण काम. त्यांनी (माझ्या आणि राजनच्या) मैत्रीला जागत मला सगळं नीट समजावलं. कारण प्रत्यक्ष जागेपर्यंत रस्ता नसल्यानं आणि खिसाही तोकडा असल्यानं सगळंच फिस्कटलं. प्लॉट डेव्हलपिंग, कंपाऊंड, डेव्हलपरचा शोध या सगळ्या प्रकारात दोन वर्षे गेली. आणि १२ नोव्हेंबर २०१४ ला माझे बाबा गेले. मी कोलमडून गेलो. आपल्याला आता काहीही शक्य नाही असं स्वतःला समजावे पर्यंत २०१५ चा मार्च उजाडला. भूमीपूजन झालं… विहीर मारली, तारांचं कंपाऊंड, लेव्हलिंग पर्यंत संतोष एका सहकाऱ्याच्या भावनेतून मदत करत होता. पण त्यानंतर पायाभरणी सुरु झाली बंगल्याची आणि माझ्या आणि संतोष मधल्या जिव्हाळ्याचीही…

- Advertisement -

असाच जिव्हाळा, प्रेम, आपुलकी संतोषने अनेकांसह मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला दिला. माझी आई,पत्नी, बहीण, मुलगी, भावजय या बरोबरच त्याचं वागणं कौटुंबिक असताना त्यात विलक्षण सभ्यतेचे संस्कार मला अनुभवायला मिळाले. इतकंच काय गावातील कुणाही लेकी- सुनेवर त्याने कधी एखादी आक्षेपार्ह विधान ना कधी त्यानं केल्याचं माझ्या कानावर पडलं किंवा तसं करण्यासाठी त्याने कुणाला प्रोत्साहन दिल्याचं मी पाहिलं नाही. काही महिन्यांपूर्वी गावात एका तरुण मुलीच्या बाबतीत एक काहीसा आक्षेपार्ह प्रकार घडला. त्यावर काही तरुण चर्चा करताना आम्ही दोघांनी ऐकले. मला विषय माहिती नसल्यानं त्यावर व्यक्त झालो नाही. आणि तशीही चर्चेत आम्ही नव्हतो.बाईकला स्टार्ट मारेपर्यंत काही वाक्य कानात पडताच संतोष त्या तरुणांना झापलं. ‘तुमका काय करुचा हा! तुमचो विषय आसा तो मेल्यानू’?असं म्हणून दोन शिव्या हासडल्या. पण हे उत्स्फूर्तपणे करताना तोंडातल्या गुटख्यामुळे त्याला ठसका लागला. त्यावर मी त्याला काहीच बोललो नाही. फक्त एक खुन्नस दिली नजरेच्या कोनातून. काय समजायचं ते समजून त्यानं तोंडातला तोबरा फेकला खरा. पण आम्ही कुडाळच्या वाटेवर असताना त्याने पुन्हा तोंड कधी भरलं हे मलाही कळलं नाही. त्याला त्याच्या आई-वडिलांनंतर चार लोकांबद्दल खूपच आस्था होती असं मला जाणवलं. ते म्हणजे माझी आई, सीमा वहिनी चौधरी, साहिल आणि अभय मोर्डेकरांची चिमुकली पूर्वा…आता बघा ही सगळी मंडळी भिन्न वयाची आणि स्वभावाची…पण त्याला आस्था एकसमानच! मी गावी नसताना तो अघळपघळ रहायचा. कपड्यांपासून दाढीच्या खुंटा पर्यंत कशातच त्याला रुची नसायची. तो शिवसेनेचा शाखाप्रमुख होता पण त्याने पद इतरांसारखं मात्र मिरवलं नाही. ना कधी राजकीय फोटो आणि शेरेबाजी वायरल केली. हा पण त्याला आमदार वैभव नाईकांबद्दल अगदी अंतकरणापासून आपलेपणा वाटायचा. भिन्न राजकीय मतं असणाऱ्यांपासून तो लांब रहायचा पण कुणाचं तरी काम काढावं असा त्याचा कधीच प्रयत्न नसायचा. तरुण असोत की वयस्क. कुणाच्याही गप्पांच्या फडात रमायचा.पण स्वत: मात्र एखादं दुसरं वाक्यच उच्चारायचा. कारण त्याच्या तोंडातला गुटख्याचा तोबरा…याच गुटख्यानेच त्याचा विलक्षण घात केला. गुटख्यामुळे त्याच्या हृदयाकडे डाव्याबाजूने रक्त घेऊन जाणारी रक्तवाहिनी पूर्ण क्षमतेने काम करु शकत नव्हती. अर्थात ही गुटख्याची सवय त्याला बहुधा मुंबईतच लागली. २००८ ला त्याला सौदी अरेबिया मध्ये हृदयाचं दुखणं सुरु झालं. त्याला अस्थम्याचीही जोड मिळाली. साहजिकच तिथल्या व्यवस्थापनाने त्याला उपचार करुन औषधांसह परत पाठवलं. थोड्याच दिवसात ती औषधं संपली. ती इथे मिळेनाशी झाली. ह्यानेही त्याकडे पैश्यांची चणचण आणि तात्पुरत्या पडलेल्या आरामामुळे दुर्लक्ष केलं. त्यानंतर ६ वर्षांनी तो माझ्या अधिक संपर्कात आला. माझ्या अख्ख्या बंगल्याची बांधणी, माझा कामातला नेमकेपणा, अघळपघळ गजाली न करता एखादा राजकीय, सामाजिक विषय तटस्थाच्या भूमिकेतून माझ्या कानावर टाकणं आणि तो मार्गी लावणं, याच बरोबरीने आर्थिक व्यवहारातला प्रामाणिकपणा हा खूपच विलक्षण होता. त्याचं शिक्षण बेताचं असलं तरी त्याची समज विलक्षण होती. माझ्या नजरेतून कळायचं नेमकं माझ्या डोक्यात काय चाललंय, मला काय सांगायचं आहे. बंगला बांधताना त्याने प्रचंड लक्ष घातलं, खूप मेहनतीनं काम केलं. त्यावेळी अनेक अडचणी आल्या. त्यावर आम्ही दोघांनी मिळून मात केली. माझं स्वप्न पूर्ण झालं. ह्याचं मला समाधान होतं त्यापेक्षा त्याला अधिक आनंद होता. कारण पपू नाईक यांच्या सारख्या प्रतिष्ठीत आणि अनुभवी बिल्डरने न केलेलं काम थोड्याफार का होईना बऱ्यारितीने आपण करु शकलो याचा त्याला प्रचंड अभिमान होता. माझ्या परिचयातील ३/४ मंडळींनी त्याला कामंही देऊ केली होती. काम वगैरे सोडा, ”हा ईमानदार पोरगा आहे”. या माझ्या वाक्यानं त्याचं आयुष्य पलटत होतं. पण कौटुंबिक पातळीवर आई वडिलांच्या विशेषतः आईच्या आजारानं तो पुरता खंगला. माझ्यामते तो आधुनिक श्रावणबाळ होता. सकाळी साडेपाच वाजता घराची झाडलोट करून सुरु होणारा त्याचा दिवस रात्री १०.३०- ११ वाजता मित्रांच्या गप्पांनी संपायचा. आई-वडिलांच्या जेवणा औषधापासून त्यांच्या अंथरुणातील स्वच्छतेपर्यंत आणि तिथून पुढे बंगल्यावरची व्यवस्था, त्याची पोटापाण्याची छोटी मोठी कामं, सामाजिक – राजकीय कामं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परोपकार…यातं संतोष पुरता कावला होता ते पालकांचं आजारपण आणि आईची अंथरुणावरच करायची स्वच्छता आणि त्यानंतरची घराची साफसफाई. यासाठी त्याला एका कैफाची गरज भासायची. मला वाटतं गुटख्यानं गेल्या तीन चार वर्षात त्याची ही गरज भागवली. त्यामुळे तो अति गुटखा खायचा असं म्हणतात किंवा नाकं मुरडतात त्यांनी दुसरी बाजूच तपासली नाहीये…

७ जूनला मोठ्या हट्टाने त्याला सोनोग्राफी करायला लावली. हृदयावर येणाऱ्या ताणामुळे त्याच्या लिव्हरला सूज होती. त्यावर उपचारासाठी त्याला मुंबईत आणत होतो. पण आई वडिलांसाठी त्यानं ठाम नकार दिला. गावात कोरोना पेशंटही वाढत होते. त्यादरम्यान त्याने आमचा मित्र अभय मोर्डेकर आणि डॉ. हर्षला शिंगटे- मोर्डेकर यांची जीवावर उदार होऊन केलेली शुश्रुषा याच्यासाठी शब्दच अपुरे आहेत. त्याला अॅडमिट करुन उपचार करुन बाहेर आणला. डॉक्टरांनी त्याचं हृदय खूपच नाजूक झाल्याची माहिती दिली. हे फक्त उपचार करणाऱ्या डॉक्टरां व्यतिरिक्त फक्त मोर्डेकर दांपत्य आणि मलाच माहिती होते. मी तात्काळ त्याला बाईक चालवणं बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्याला म्हटलं तुझी बाईक बंद कर. मी गाडी पाठवतो. तर म्हणाला, वेरना नको, ती खालून लागेल ग्राउंड क्लीअरन्स मोठा असणारी गाडी बघितली पाहिजे. म्हटलं ठीक आहे तयारी कर. गाडी घेऊन टाकू. पण तू तब्येतीची काळजी घे… पण तो तब्येतीची काळजी घेईल असं वाटून काळ दबक्या पावलांनी बहुधा त्याच्या दिशेने येत होता. शेवटच्या तीन दिवसांतल्या त्याच्या घटना-घडामोडी तेच सांगतायत.

सोमवारी संध्याकाळी त्याने मला फोन केला. मी बाथरूममध्येच त्याचा फोन घेतला. म्हणाला, गावी आता पेशंट नाहीत. तर एक खूप दिवसांचं राहिलेलं काम करुन टाकूया. साहिल बेनकरच्या कामाचंही बघूया…मी म्हटलं आठ दिवसांत येतो. तू तयार रहा…पण आता सगळी तयारी अर्धवट स्थितीत टाकून तो अश्या प्रवासाला निघालाय जो कुणालाही टाळता येत नाही. पण त्या प्रवासाला संतोष सारख्या प्रत्येकाला जपणाऱ्या माणसानं शेवटच्या प्रवासाच्या वेळेच भान जपायला हवं होतं इतकं मात्र खरं! हे भान न जपणं ही एक शुध्द फसवणूक आहे तुमची आणि माझीही…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -