घरफिचर्समायमहानगर ब्लॉगपाटील झाले जोशीबुवा !

पाटील झाले जोशीबुवा !

Subscribe

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची अवस्था सध्या अतिशय केविलवाणी झालेली आहे, कारण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या आघाडीचे राज्यात स्थापन झालेले सरकार हे काही फार दिवस टिकणार नाही, ते लवकरच कोसळेल आणि शिवसेना मागील वेळेसारखी पुन्हा नाक धरून आपल्या मागे येईल आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आणि भाजपचा मुख्यमंत्री असेल, अशी आशा वाटत होती. भाजप नेत्यांची ही आशा फलद्रूप न होण्याला त्यांचे प्रेरणास्थान असलेले नरेंद्र मोदी हेच वेगळ्या अर्थाने जबाबदार आहेत. कारण मुळात राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आघाडीत काँग्रेस सहभागी होईल, याविषयी शंका होती.

कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. शिवसेनेला ते प्रांतीयवादी समजत असल्यामुळे त्याचा त्यांना राष्ट्रीय पातळीवर फटका बसण्याची शक्यता होती, तसेच काँग्रेसची जी सर्वधर्मसमभावाची प्रतिमा आहे, तिला धक्का लागण्याची शक्यता होती. पण राजकीय समीकरणे जुळवून सत्ता आणण्यात वाकबगार असलेले शरद पवार यांनी भाजपच्या हातून महाराष्ट्रासारखे राज्य काढून घेऊन नरेंद्र मोदींना शह देण्याची ही एक संधी आहे, हे पटवून दिल्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आघाडीत सहभागी होण्याची तयार दाखविली. त्यात पुन्हा काँग्रेसमुक्त भारत या मोदींच्या आवाहनाचा मोठा फटका काँग्रेसला बसला होता, त्यातून अजूनही काँग्रेस सावरलेली नाही. महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार अंतर्गत वादामुळे पडेल, असे ठाम विश्वास भाजप नेत्यांना होता.

- Advertisement -

ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्वधर्मसमभावाचा कायम पुरस्कार केला, ते दोन पक्ष किती काळ शिवसेनेला डोक्यावर घेतील आणि वाटचाल करतील, याची राजकीय पक्षांसोबतच राजकीय विश्लेषकांना शंका वाटत होती. पण या तीन पक्षांनी या सगळ्या शंकांना फोल ठरवले आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये एका पक्षाचे सरकार येणे अवघड होऊन बसले आहे. केंद्रात आघाडीचे युग सुरू झाले होते, अनेक वर्षे केंद्रात आपली निरंकुश सत्ता चालवणार्‍या काँग्रेस पक्षालाही प्रादेशिक पक्षांची मनधरणी करावी लागत असे, त्यामुळे प्रादेशिक पक्षांचे महत्व वाढलेले होते. त्यातूनच युपीए आणि पुढे एनडीए, समान किमान कार्यक्रम या संकल्पना पुढे आल्या आणि अनेक प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन आघाडीची सरकारे चालविण्याची कसरत काँग्रेस आणि भाजपला करावी लागली, पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार झाले आणि सगळे चित्रच पालटून गेले. मोदींनी भाजपला पहिल्यांदाच केंद्रात बहुमत मिळवून दिले आणि केंद्रातील आघाडीचे युग एक प्रकारे संपुष्टात आणले. त्यामुळे एनडीएमधील घटक पक्षांची भाजपला तशी गरजच राहिली नाही.

नरेंद्र मोदी यांनी दोन वेळा केंद्रात बहुमत मिळवल्यामुळे काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जो पराभव झाला, त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी त्या पदापासून दूर झाले, ते अजूनही त्या पदावर आरुढ व्हायला तयार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात मिळालेला सत्तेतील सहभाग काँग्रेसला गमवायचा नाही. परिणामी ते प्रादेशिक पक्ष असलेल्या आणि विचारसरणी जुळत नसलेल्या शिवसेनेच्या पालखीचे भोई झाले आहेत. खरे तर राष्ट्रीय पक्षाने फार काळ प्रादेशिक पक्षांना पाठिंबा दिला तर त्यांचा प्रभाव ओसरतो, त्यामुळे ते अल्पावधीत पाठिंबा काढून घेतात. आजवर काँग्रेसने तसेच केले आहे, पण महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळी काँग्रेसच्या असह्यतेमुळे महाराष्ट्रातील भाजपची कोंडी झाली आहे. कारण काँग्रेस बाहेर पडत नसल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार टिकून आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागत आहे, त्याची सल राज्यात भाजपच्या नेत्यांना सतत सतावते आहे. त्यामुळे ते सतत सरकार पडण्याच्या तारखा देत असतात.

- Advertisement -

या तारखा देण्यात भाजप खासदार आणि लघु, मध्यम, सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे आणि प्रदेशाध्यक्ष या नात्याने चंद्रकांत पाटील हे आघाडीवर आहेत. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी मी लवकरच सत्तेत मंत्री झालेला असेन, असे म्हटले. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या अडीच वर्षांत भाजपची नेते मंडळी सरकार पडण्याच्या तारखा देत राहिले, पण सरकार काही पडले नाही, उलट कोरोना महामारीच्या आव्हानात्मक काळात थेट राजकीय अनुभव नसलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्याने कुटुंबप्रमुखाप्रमाणे संयमाने जबाबदारी पार पाडली, त्यामुळे जनमनातील त्यांचे स्थान अधिक मजबूत झाले. परिणामी भाजपचे नेते अधिकच अस्वस्थ झाले. भाजपच्या नेत्यांनी राज्यातील सरकार पडण्याच्या कितीही तारखा दिल्या तरी त्या आजवर खोट्या ठरलेल्या आहेत, त्यामुळे त्यांची अवस्था ‘लांडगा आला रे आला’ अशी झालेली आहे. आता त्यांचे हे तारखा देणे लोकांसाठी विनोदाचा विषय झालेला आहे.

असे असतानाही चंद्रकांत पाटील यांनी सरकार पडण्याची १० मार्च ही तारीख दिली आहे. पाटील यांच्या वारंवार भविष्य सांगण्याच्या आशावादावर उपरोधिक टोमणा मारताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ओबीसी समाजाचा चेहरा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पाटील कधीपासून जोशीबुवा असे सुनावले. भविष्य सांगणार्‍यांना जोशी ही उपाधी असते. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. आम्ही जात पात धर्म मानत नाही, अशी त्यांची भूमिका असते, पण एखाद्या राजकीय नेत्याचा जातीवाचक उल्लेख करण्याची सवय ही छगन भुजबळांनी बहुतेक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडून घेतलेली असावी. कारण शिवसेना-भाजप युतीच्या काळात जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पसंतीने मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना मनोहरपंत असे संबोधायला शरद पवारांनी सुरुवात केली.

याचा उगम पंतप्रतिनिधी या उपाधीपासून झालेला होता. पुढे छत्रपती संभाजीराजे भाजपच्या समर्थनाने राज्यसभेवर खासदार झाले तेव्हा पवारांनी, आता फडणवीस म्हणजे पेशवे छत्रपतींची नियुक्ती करू लागले आहेत, अशी जातीयवाचक टिप्पणी केली होती. राजू शेट्टी यांच्यावरही पवारांनी अशीच जातीयवाचक टिपण्णी केली होती, तेव्हा शेट्टी म्हणाले होते की, जे पवारांच्या पोटात होते, ते त्यांच्या ओटात आले. सध्या महाराष्ट्रातील नेत्यांची अवस्था कुडमुड्या जोशीसारखी झालेली आहे, हे खरे आहे, पण पाटलाचा जोशी झाला, हा जातीयवाद समतावादी भुजबळांच्या डोक्यातून मोका साधून बाहेर आला, हेही लक्षवेधी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -