घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमोदींची धडाडी, उर्जेने भारलेली कार्यशैली हीच माझी प्रेरणा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मोदींची धडाडी, उर्जेने भारलेली कार्यशैली हीच माझी प्रेरणा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe
  • एकनाथ संभाजी शिंदे

आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस आहे. सुरवातीलाच मी त्यांना वाढदिवसानिमित्त आदरपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचे अभिष्टचिंतन करतो. आपण सर्वच मोदीजी यांच्या गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान या प्रवासाचे, वाटचालीचे साक्षीदार आहोत. त्यांची ही वाटचाल विलक्षण आहे. यात त्यांनी अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली असावी, असे वाटते.

माझा आणि मोदीजी यांचा तसा जुना परिचय आहे. युतीच्या सुरवातीच्या काळातही ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असत. अधेमधे भेट, बोलणे होत असे. शिवसेनाप्रमुख हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे स्नेहसंबंध होते. बाळासाहेब त्यांना आदरस्थानी आहेत. बाळासाहेबांविषयी ते आजही खूप भरभरून बोलतात, असा अनुभव आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी 2009मध्ये युतीच्या प्रचारार्थ केलेला महाराष्ट्र दौरा मला चांगलाच आठवतो. त्यांची कार्यशैली, ऊर्जावान, चैतन्यदायी व्यक्तिमत्वाचा माझ्यावर चांगलाच प्रभाव आहे, असे म्हणावे लागेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि माझे गुरू धर्मवीर आनंद दिघे आणि मोदीजी यांच्या व्यक्तिमत्वात अनेक साम्यस्थळं आहेत असेही वाटते. या दोघांच्या कार्यशैलीची चुणूकही मला मोदीजी यांच्या कामात जाणवते.

- Advertisement -

खरंतर आज बाळासाहेब असते, तर त्यांनी मोदीजींवर कौतुकाचा वर्षावच केला असता. बाळासाहेबांनी आपली हिंदुत्वाची विचारधारा प्रयत्नपूर्वक जतन केली आणि वाढवली. आम्ही सारे त्यांच्या या विचारधारेशी ठाम आहोत. अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरून तर बाळासाहेबांची प्रतिमा आणखी उजळून निघाली. राम मंदिर आज पूर्णत्वास जात आहे. त्यामागे मोदीजी यांची धोरणी भूमिका, मुत्सदेगिरी आहे, हे बाळासाहेबांनीही मान्य केले असते. ‘मी जर पंतप्रधान झालो तर काश्मिरसाठीचं कलम ३७० रद्द करेन’ असं बाळासाहेब बिनदिक्कत म्हणत. आता तर हे कलम रद्दही झाले आहे. ते रद्द करण्याची किमयाही मोदीजी यांनी लीलया करून दाखवली आहे. मग अशा या आपल्या पंतप्रधानाचे मुंबईतील स्वागत कसे झाले असते, याची कल्पना करा. मोदींजींच्या स्वागतासाठी बाळासाहेबांनी आपल्या खास पद्धतीनं अभिनंदन सोहळा केला असता, असेही राहून राहून वाटते.

मुख्यमंत्री म्हणून मोदीजी यांनी गुजरात राज्याच्या विकासाला दिशा दिली. आपल्या विशाल आणि व्यापक अशा विकास दृष्टीचा परिचय करून दिला आहे. आजचा समृद्ध गुजरात दिसतो आहे, त्याच्या उभारणीत त्यांचा निश्चितच मोठा वाटा आहे. गुजरातचे विकासाचे मॉडेल हे त्यांचे म्हणजे मोदीजी यांचे मॉडेल म्हणून ओळखले जाते. कृषी, औद्योगीक आणि अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी दिशादर्शक ठरतील अशा अनेक प्रकल्पांची उभारणी केली. हे प्रकल्प मोदीजी यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत उभे आहेत. पुढेही कित्येक पिढ्यांसाठी ते दिपस्तंभच ठरतील, याची खात्री आहे.

- Advertisement -

आपल्या संघर्षशील प्रवासाची आपल्याहून मोठ्या व्यक्तिमत्वांच्या प्रवासाशी तुलना करण्याची सवय असते. मलाही माझा संघर्षशील प्रवास आठवतो. मीही मोदीजी यांच्या प्रवासाशी तुलना करू लागतो. त्यावेळी मला काही साधर्म्य असल्याचे भासत राहते. संघर्षातूनच मोदीजी कणखर आणि दुर्दम्य आशावादी बनले असावेत. माझ्याही बाबतीत आघात आणि संघर्षच वाट्याला आले. पण धर्मवीर दिघे यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मीही डगमगलो नाही.

बाळासाहेब काय, धर्मवीर काय आणि पंतप्रधान मोदीजी या सगळ्यांकडून मी प्रेरणा घेत आलो आहे. या सर्वांची नजर नेहमीच भव्य-दिव्य गोष्टींकडे लागून राहीलेली असते, पण पाय जमिनीवरच असतात, हे मी त्यांच्याकडून शिकलो. उदाहरणच अनेक देता येतील. आता हेच पहा ना, अनेक मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी असो किंवा प्रकल्प पूर्णत्वानंतरचे लोकार्पण. पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पावर काम करणाऱ्या मजूर, कामगार-कष्टकऱ्यांची दखल घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना त्यांच्या कामाचं श्रेय दिल. त्यांना सोबत घेऊन त्यांचा सन्मानही केला. हे असं याआधी झालं नव्हतं. हेच मोदीजी यांचं वैशिष्ट्य आहे.

पंतप्रधान मोदी यांची वारंवार भेट व्हावे असे योग जुळून आले. ते कशामुळे तेही नव्याने सांगण्याची गरज नाही. आता तर थेट मोदीजी यांचेच मार्गदर्शन मिळते आहे. सोबतीला तितक्याच धडाडीचे आणि राजकारणापासून, प्रशासनातील अनुभवी अशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ आहे. त्यामुळे आमच्या दोघांच्या चर्चांमधूनही पंतप्रधान मोदींजी यांना अपेक्षित असलेल्या देश, राज्य आणि एकूणच सर्वच क्षेत्रातील विकास कामांची प्रकल्पांची नेहमीच चर्चा होते. पंतप्रधान मोदीजी यांच्यांशी काही ना काही निमित्तानं भेटी झाल्या. या मोजक्या क्षणातून, बातचीत, चर्चांमधून त्यांच्या ठायी देश, आणि तळागाळातील प्रत्येक घटकाविषयी असलेली तळमळ जाणवत राहीली आहे. त्यांच्या बोलण्यात देश, देश आणि देशातील प्रत्येक गोष्टीचा विकास याचाच ध्यास हाच होता. विशेषतः विकासाचा हा रथ आपल्या सर्वांनी सांघिक प्रयत्नांतून पुढे न्यायचा आहे, असं आग्रही सांगणंही लक्षात राहीले.

या सगळ्यात मला भावते ती मोदीजी यांची कार्यशैली. मला नेहमीच पत्रकार आणि जवळची मंडळी विचारतात, ‘तुम्ही रात्र-रात्र आणि पहाटेपर्यंत काम करता, त्यामागे रहस्य काय?’ तर यात पंतप्रधान मोदींजी यांच्या कार्यप्रवण, सदैव ऊर्जेने भारलेल्या कार्यशैलीची प्रेरणा हे एक कारण निश्चितच आहे, हे प्रांजळपणे सांगतो.

मोदीजी यांच्याकडे धडाडी तर आहेच. पण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची दृढनिश्चयी वृत्तीही आहे. लंब्याचौड्या बैठका, आढावा यापेक्षा त्यांची भिस्त फलनिष्पत्ती होऊ शकणाऱ्या गोष्टींवर असते. त्यामुळे बैठकांचे आणि चर्चा अघळपघळ न होता, त्यातून लगोलग निर्णय घेतले जातात. प्रभावी अशी अंमलबजावणी सुरु होते. या सगळ्या गोष्टीचं प्रतिबिंब आपण डिजिटल इंडिया, बुलेट ट्रेन, गंगा नदीची स्वच्छता अशा अनेक आणि कित्येक प्रकल्पांमध्ये पाहू शकतो. आत्मनिर्भर भारत असो की आपल्या संरक्षण दलाची सज्जता, या सगळ्या आघड्यांवर मोदीजी यांनी आपल्या नेतृत्वगुणाचा जगाला परिचय करून दिला आहे. जगभरातील अनेक बलाढ्य देशांना आणि त्यांच्या नेतृत्वाला, तेथील नागरिकांना मोदीजी यांच्याविषयी अप्रुप आहे, कुतूहल आहे आणि ते दिवसेंदिवस वाढते आहे, हे आपण पाहतोच.

एकविसाव्या शतकाच्या उदयाबरोबरच आपल्या देशाला पंतप्रधान मोदीजी यांच्यासारखे नेतृत्व लाभलं आहे. देश स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. अशा वेळी आपल्या सर्वांसाठी आणि खंडप्राय देशासाठी हा स्वर्णीम आणि अमृत योग आहे, असंच म्हणावं लागेल. उत्तरोत्तर मोदीजी यांचं नेतृत्व बहरत जाईल. त्यांच्या प्रखर देशाभिमान आणि संवेदनशील व्यक्तिमत्वातील पैलूंनी देश, जगाचे क्षितीजही उजळून निघेल असा विश्वास आहे. या शब्दांसह पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिष्टचिंतन करतो. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्यावतीने, माझ्यावतीने मोदींजींना वाढदिवसाच्या हृदयपूर्वक शुभेच्छा देतो.

(लेखक हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -