घरताज्या घडामोडीचीनला व्हायचेय जागतिक महासत्ता!

चीनला व्हायचेय जागतिक महासत्ता!

Subscribe

चीन ही एक सुपर पॉवर आहे असा मुद्दा जगाच्या गळ्यात बांधला तो अमेरिकन सरकारप्रणित थिंक टँकने. तो काळ होता जेव्हा तत्कालीन लाभ उठवण्यासाठी अमेरिकन सरकारलाही चीनशी चुंबाचुंबी करायची होती. तर दुसरीकडे अमेरिका पहिल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाची कोंडी करण्याच्या उद्योगात मग्न होती. मग चीनच्या मदतीने रशियाचा पाडाव करायचा म्हणून अमेरिकेने चीनशी हातमिळवणी केली होती. ह्या निर्णयाचे समर्थन अमेरिकन थिंक टँक्स करत होतो. चीन ही जगामधली सुपरपॉवर आहे म्हणत होतो.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंनपिंग यांनी अमेरिकेला धमकी दिली आहे. अमेरिकेने आमच्या प्रश्नांमध्ये नाक खुपसू नये असे चीनचे म्हणणे आहे. म्हणजे चीनला तैवानवर हक्क सांगून तो ताब्यात घ्यायचा आहे. इतकेच नव्हेतर जगभर चीनची जी दादागिरी चालली आहे, त्याबद्दल अमेरिकेने गप्प रहावे, अशी चीनची अपेक्षा आहे. त्यासाठी शीतयुद्धाची धमकी देण्यापर्यंत चीन उतरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीनच्या या धमकीला अद्याप तरी भीक घातलेली नाही. पण त्यामुळे चीनच्या उचापत्या कमी होणार नाहीत. आपले महाशक्ती बनायचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी चीन प्रयत्नांची कसूर सोडणार नाही हे उघड आहे. स्वतःसाठी सुपर पॉवर बनण्याच्या महत्वाकांक्षेने चीनला पछाडले आहे. आपल्या परराष्ट्र नीतीची सगळी व्यूहरचना तो त्याच पद्धतीने करत असतो. पहिल्या शीतयुद्धाचा जन्म दुसर्‍या महायुद्धाच्या अंती झाला. कारण त्या युद्धातून खरोखरच दोन ध्रुव जन्माला आले होते. एका अर्थाने ती एक सहज प्रक्रिया होती. अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा अंत झाल्यानंतर चीनने नव्या शीतयुद्धाला अकारण आरंभ केला आहे. हे शीतयुद्ध अर्थातच अमेरिकेच्या विरोधात आहे. त्याची पहिली पायरी म्हणून चीनने आशिया पॅसिफिक या प्रदेशात एक नंबरचे स्थान मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. याचाच दुसरा अर्थ असा की आज ज्या स्थानावर अमेरिका विराजमान आहे त्या स्थानावरून तिला हुसकावून लावून ते स्थान पटकावण्याचा चीन प्रयत्न करत आहे.

खरे तर आशिया पॅसिफिकमध्ये दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया तर गेली दोन दशके केवळ अमेरिकेचे वर्चस्व राहिले आहे. पण महासत्ता म्हणून उदयास यायचे तर सर्व प्रथम स्वतःच्या प्रदेशात एक नंबरवर असावे लागते. अमेरिकेला हुसकावून लावेपर्यंत हे स्थान आपल्याला मिळणार नाही हे चीन ओळखून आहे. मुळात चीन इतका बलवान कसा झाला हे आपल्याला आठवत असेल. पहिल्या शीतयुद्धामध्ये रशियाला पेच म्हणून अमेरिकेने चीनला पुढे आणायचे ठरवले. निक्सन किसिंजर जोडीने अमेरिकेतून पैशाच्या राशी चीनमध्ये ओतल्या. एवढ्या प्रमाणावर परकीय भांडवल मिळाल्यावर डोके शांत ठेवून चीनने व्यूहरचना आखली. अमेरिकेने सुरू केलेला हा डाव पुरेपूर वापरून चीनने अफाट धनसंपदा आपल्याकडे खेचून घेतली. तिचा उत्तम वापर करत आपले आर्थिक साम्राज्य आणि पर्यायाने लष्करी सामर्थ्य वाढवले आणि लष्कराचे आधुनिकीकरण केले. चीनच्या राक्षसी महत्वाकांक्षेला वेळोवेळी वेसण घालण्याचे पर्याय अमेरिकेकडे उपलब्ध होते पण त्याकडे अमेरिकेने तत्कालीन राजकारणाच्या फायद्यासाठी दुर्लक्ष केले.

- Advertisement -

लष्कराचे आधुनिकीकरण करताना त्याची व्याप्ती केवळ देशरक्षण ही न ठेवता आक्रमणे करता येतील एवढ्या प्रमाणावर चीनने लष्कर सामर्थ्यवान बनवले. पण तरीही चीन आजही इतकाही मोठा नाही की त्याने अमेरिकेला आशियामध्ये शड्डू ठोकून दाखवावा. तेव्हा लष्करीदृष्ठ्या अमेरिकेला आव्हान वाटेल अशा गोष्टी तो वरकरणी आणि थेट करत नाही. आपण महासत्ता असो नसो पण सध्या तरी चीन हीच आशियामधली महासत्ता आहे ह्या गोष्टीवर त्याला अमेरिकेचा ‘शिक्का’ हवा आहे. म्हणजेच अमेरिकेने स्वतःहून हे स्थान आपल्यासाठी सोडावे यासाठी चीन प्रयत्नशील आहे. इतकेच नव्हे तर आशियाची सुरक्षा अमेरिकेने आपल्या हाती सोपवावी अशी त्याची इच्छा आहे. ही दोन मोठी पावले अमेरिकेने उचलावीत म्हणून चीन अतिशय गुंतागुंतीचे सायकॉलॉजिकल गेम्स खेळत असतो.

चीनचे पसरलेले आर्थिक साम्राज्य आणि त्याचा महासत्ता होण्याच्या मार्गावरील उदय ही काही सामान्य घटना नाही. आशिया पॅसिफिक प्रदेशासाठी तो एक ताकदवान भूकंप आहे. अमेरिकेची सद्दी आशियामधून उखडून टाकण्याचे काम पहिल्या शीतयुद्धामध्ये रशियालाही जमले नाही. अशा अवघड कामाला चीन आता हात घालू बघत आहे. अमेरिकेचे वर्चस्व उखडून टाकण्याच्या स्वप्नाने रशियालाही एक काळ पछाडले होते. आणि तसे करत असतानाच रशियाने स्वतःचे विघटन आणि पर्यायाने सर्वनाश ओढवून घेतला. आपल्या लक्षात असेल की रशियाच्या विघटनाला सुरुवात झाली तेव्हा रशियाचे आर्थिक साम्राज्य खिळखिळे झाले नव्हते. पण तरीही सुदृढ अवस्थेतील आर्थिक साम्राज्य रशियाचे विघटन थांबवू शकले नाही. चीनची आजची अवस्था तीच आहे. नव्याने हाती आलेली ताकद त्याला स्वस्थ बसू देत नाही. शिवशिवणार्‍या हातांनी चीन आपले आर्थिक नव्हे तर राजकीय साम्राज्य उभारू पाहत आहे. इथे सांगण्याचा मुद्दा हा आहे की रशियाचे विघटन झाले ते साम्राज्यवादाचा अतिरेक करण्यातून आणि हाती असलेल्या सत्तेचा अवाजवी वापर करण्यातून.

- Advertisement -

दक्षिण चीन समुद्रामधले हे वर्तन महासागरावर सत्ता गाजवण्याची खुमखुमी बाळगणारे आहे तर तिबेटच्या बाजूने चीनपासून युरोपपर्यंत जगामधले शंभरहून अधिक देश जोडणार्‍या OBOR योजनेचे आयोजन ह्या महत्वाकांक्षा जगाच्या दुसर्‍या टोकापर्यंत नेणारे आहे. भारताला सतावणारा CPEC हा त्या योजनेचा एक हिस्सा आहे. OBOR च्या निमित्ताने चीन जे राजकारण जागतिक व्यासपीठावर खेळत आहे ते खरे तर राजकारण नसून एक जुगार आहे. हा मोठा जुगार खेळण्याइतकी आर्थिक कुवत चीनमध्ये अजून आलेली नाही आणि जो प्रदेश तो गिळंकृत करू पाहत आहे तो पुढे मुठीत ठेवण्याचे व्यवस्थापन त्याच्याकडे नाही. त्याचे संरक्षण करण्यासाठी लष्करी ताकदही त्याच्याकडे नाही. म्हणजेच आर्थिक महासत्ता बनण्याची स्वप्ने तर चीन बघत आहे, पण त्यासाठी आवश्यक असा पाया मात्र उपलब्ध नाही. अशी परिस्थिती आहे म्हणूनच थोडक्यात काय तर चीनने घेतलेल्या भूमिकांमुळे आणि आपल्या भूमिकेमागे उभ्या केलेल्या आर्थिक शक्तीमुळे चीनने जगामध्ये एकाच वेळी अनेक संघर्ष बीजे निर्माण केली आहेत.

वास्तविक चीन ही एक सुपर पॉवर आहे असा मुद्दा जगाच्या गळ्यात बांधला तो अमेरिकन सरकारप्रणित थिंक टँकने. तो काळ होता जेव्हा तत्कालीन लाभ उठवण्यासाठी अमेरिकन सरकारलाही चीनशी चुंबाचुंबी करायची होती. तर दुसरीकडे अमेरिका पहिल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाची कोंडी करण्याच्या उद्योगात मग्न होती. मग चीनच्या मदतीने रशियाचा पाडाव करायचा म्हणून अमेरिकेने चीनशी हातमिळवणी केली होती. या निर्णयाचे समर्थन अमेरिकन थिंक टँक्स करत होतो. चीन ही जगामधली सुपरपॉवर आहे म्हणत होता आणि त्यांचे हे प्रतिपादन आमच्या विद्वानांनी तसेच्या तसे स्वीकारले. एक महासत्ता म्हणून दावा करण्यासाठी अथवा युनोच्या सुरक्षा समितीचा कायम सभासद म्हणून काम करताना आपल्या स्थानाला साजेसे वर्तन चीनने ठेवले आहे का, ह्या प्रश्नाचे उत्तर नाही असे द्यावे लागते. ज्या जबाबदारीने जगाच्या व्यासपीठावर वावरावे ही अपेक्षा आहे तसा चीन आजतागायत वागलेला दिसून येत नाही. त्याचे वर्तन अरेरावीचे आणि उर्मटपणाचे राहिले आहे.

आपल्या ताकदीपेक्षा जास्त क्षमतेचे ठोसे प्रतिस्पर्ध्याला मारण्याचा मोह त्याला आवरत नाही. त्या तुलनेमध्ये पूर्वाश्रमीची महासत्ता म्हणून वावरलेल्या सोव्हिएत रशियाचे वर्तन अधिक भारदस्त-जबाबदारीचे राहिले आहे. अमेरिका व रशिया-दोघांमधील संघर्ष हा वैचारिक संघर्ष होता, ज्यामध्ये अमेरिकेला जगामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि साम्राज्यशाही स्थापित करायची होती तर रशियाला कम्युनिस्ट विचारसरणीवर आधारित जगाची रचना करायची होती. त्या दोघांमधले वैर विकोपाला गेले तरी अशा घटना कशा हाताळाव्यात याची चौकट उपलब्ध होती. एक प्रकारे स्वतःच आखून घेतलेल्या जबाबदारीच्या चौकटीमध्ये दोन्ही महासत्ता वावरत होत्या. सोव्हिएत रशिया क्षितिजावर होता तोवर जग अमेरिका आणि रशिया या दोन धु्रवांमध्ये विभागले गेले होते.

शीतयुद्धाचा अंत म्हणून सोव्हिएत रशियाचे विघटन झाले त्यानंतर काही काळ जगामध्ये एकच ध्रुव होता. ती पोकळी आपण भरून काढू शकतो हे हेरून चीनने आपल्या डावपेचांची आखणी गेली २५ वर्षे केली आहे. गेल्या साधारण दहा वर्षांपासून तर दुसर्‍या शीतयुद्धाला सुरुवात झाली आहे असे म्हणता येईल आणि त्याचा एक पार्टनर अर्थातच चीन आहे. दुसरा ध्रुव म्हणून वावरायची मनीषा बाळगणार्‍या चीनचे अमेरिकेशी कोणतेही तात्विक वाद नाहीत. भारतामधल्या लाल्यांनी कितीही दिवास्वप्ने पाहिली आणि आपले मनोरंजन करून घेतले तरी चीनला कोणत्याही प्रकारे कम्युनिस्ट म्हणणे वस्तुस्थितीला धरून नाही. त्यामुळे या दोघांमध्ये एक बांधीव चौकट नाही.

शीतयुद्ध संपले असे वाटते आहे तोवर चिनी ड्रॅगनने फुत्कार सोडायला सुरुवात केली. आणि अमेरिकेच्या बोटचेप्या भूमिकेचा पूर्ण फायदा उठवत स्वतःला एक आर्थिक महासत्ता पदापर्यंत खेचत नेले. असे करत असताना याला लाथ मार, त्याला सरळ करीन म्हणून धमक्या दे, असे उद्योग चालूच होते. प्रकरणे हातघाईवर आली तरी आपला हेका न सोडण्याचा चीनचा स्वभाव या काळामध्ये जगासमोर आला आहे. आता चीन अमेरिकेला धमकी देतो आहे. कारण स्पष्ट आहे. चीनला जागतिक महासत्ता व्हायचे आहे. त्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्यास चीन तयार आहे. मात्र अमेरिकेसाठी ही धोक्याची घंटा असून अमेरिका त्याला कसे प्रत्युत्तर देणार हे महत्वाचे ठरणार आहे.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -