शापित कॅलिफोर्निया

feature sampadkiy
संपादकीय

राज्यात 1995 साली शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यानंतर दोनच वर्षात म्हणजे 1997 साली पहिला पर्यटन जिल्हा होण्याचा मान सिंधुदुर्गला मिळाला. पुढच्या दोन वर्षात म्हणजे 1999 साली तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर तब्बल 21 वर्षं या विमानतळावर विमान उतरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. नाही म्हणायला दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर या विमानतळावर प्रायोगिक स्वरूपात एक विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, पण तो फारच तोकडा होता. पर्यटनासाठी महत्वाची असलेली विमान सेवा कधी सुरू होणार याकडे कोकणी माणसाचे डोळे लागले होते. राजकीय पुढारी वेगवेगळी कारणे सांगत हे उद्घाटन पुढे पुढे ढकलत होते.

शेवटी शनिवारी 9 ऑक्टोबरला या विमानतळाचं अधिकृत उद्घाटन झालं. केंद्रीय अन्न व नागरी वाहतूक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ऑनलाइन उद्घाटन केलं. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकाच व्यासपीठावर येऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणं पसंत केलं. जवळपास एका तपानंतर एकत्र येणारे हे नेते सिंधुदुर्गच्या लाल मातीत नेमका कोणता धुरळा उडवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. या राजकीय पक्षांना हवा देणार्‍या वाहिन्यांच्या गदारोळाचा अंदाज असल्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईकर माध्यमांची जत्रा भरवण्यापेक्षा स्थानिक वाहिन्यांच्या प्रतिनिधींमार्फत या उद्घाटनाचं वृत्तांकन करवणं योग्य मानलं. आणि तिथेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी पहिली बाजी मारली होती. उद्घाटनाच्या आदल्या दिवशी भाजपच्या अधिकृत व्यासपीठावरून नारायण राणे यांनी ‘मी’ चा राग आळवला. आणि दुसर्‍या दिवशी काय होणार आहे याचा ट्रेलरच जणू दाखवून दिला.

चिपी विमानतळ उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख नसल्यामुळे त्यांनी आणि त्यांचे शिष्योत्तम प्रवीण दरेकर यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. सिंधू भूमीत विमान उतरलं हा क्षण कोकणी माणसासाठी सुवर्णाक्षरांनी नोंद करण्याचाच आहे. हा क्षण या लाल मातीतील पुढार्‍यांनी आणि नागरिकांनी अक्षरशः घराला आकाश कंदील लावून नवरात्रीतच दिवाळी साजरा करण्याचा होता. पण या कार्यक्रमातील पुढार्‍यांची भाषणे ऐकल्यावर दसर्‍याला शिमगा होतोय की काय असं वाटण्याइतपत परिस्थिती आली होती. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आपलं विळ्या-भोपळ्याचं नातं जपताना एका गोष्टीचा विसर पाडून घेतला, तो म्हणजे राणेंचे हाडवैरी असलेले उद्धव ठाकरे आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते सर्वोच्च स्थानावर बसलेले आहेत, त्या पदाला एक वेगळा सन्मान आहे. याहीपेक्षा मुख्यमंत्री हे राणे यांचं होमपीच असलेल्या सिंधुदुर्गमध्ये जिल्ह्याचं आणि लोकमानसाचं आयुष्य बदलून टाकणार्‍या विमानतळाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोकणी माणूस आदरातिथ्यासाठी ओळखला जातो.

मात्र राणे यांनी या कार्यक्रमात केलेले भाषण म्हणजे आत्मस्तुतीने स्वतःभोवती घेतलेल्या गिरक्यांनी मोहरुन जाण्याचे उद्योग होते. सिंधुदुर्गच्या विकासाचं श्रेय स्वतःकडे घेताना नारायण राणे यांनी त्यासाठीच्या आशीर्वादाचं श्रेय मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलं. भाषणात लोकलज्जेस्तव मुख्यमंत्र्यांचा उल्लेख आदरार्थी करताना राणेंची चडफड समजून येत होती. तिथल्या विद्यमान लोकप्रतिनिधींवर राणेंचा असलेला कमालीचा द्वेष हा या मंगल समयीदेखील त्यांना लपवता आला नाही. ज्या गोष्टी चहापानाच्या दालनात बसून मुख्यमंत्र्यांसमोर मांडता आल्या असत्या त्या वाभाडे काढण्याच्या शैलीत उपस्थितांसमोर मांडल्या. गेली पन्नास वर्षं जरी आपण समाजकारण, राजकारणात असलो तरी आपल्या संयमाचा बांध कसा आणि किती लवकर फुटतो आणि आपण अपरिपक्वतेची कास धरतो हेच जणू माजी मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरी शैलीतच राणेंना गपगार करून टाकलं. आता काहीजण म्हणतील सिंधुदुर्ग किल्ला मीच बांधला, या उद्धव ठाकरे यांच्या विधानाने तर नारायण राणे यांचा स्वकेंद्रित्वाचा कैफ पार उतरुन गेला. या संपूर्ण कार्यक्रमात राणेंची देहबोली ही राज्याचा प्रमुख म्हणून उध्दव ठाकरे आपल्या जिल्ह्यात आले असताना आदरभावनेची नव्हती. हे कोकणी माणसाच्या स्वभावाचं कधीच वैशिष्ठ्य नव्हतं. नारायण राणे यांनी शिवसेनेशी फारकत घेतल्याला आता सोळा वर्षे झालीत. या काळात राणे केंद्रात मंत्री झालेत तर त्यांचे हाडवैरी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झालेत. राणे आणि ठाकरे या दोघांनी समजूतदारपणाची भावना आपल्यामध्ये जागृत करायला हवी कारण हे दोन्ही पुढारी भांडत असले तरी त्यामुळे जे नुकसान होणार आहे ते पर्यटन आणि फलोत्पादन यांच्या जोरावर जगू पाहणार्‍या कोकणी माणसाचं. जिल्ह्यात विमान आलं ही एक ऐतिहासिक गोष्ट असली तरी या विमानातून बाहेर पडणार्‍या प्रवाशांना ज्या दिव्यातून वाट काढत आपल्या घराकडे किंवा इच्छित पर्यटन स्थळाकडे जावं लागणार आहे ते पाहिल्यानंतर प्रश्न पडतो गेली तीस वर्षं या लोकप्रतिनिधींनी नेमकं काय केलं?

कोकणाला भारताचा कॅलिफोर्निया म्हटलं जातं. मात्र हा कॅलिफोर्निया शापित आहे की काय असं वाटावं अशी परिस्थिती कार्यक्रमात बघायला मिळाली. कोकणातील तिन्ही जिल्हे म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सागरी किनारे, देवादिकांची देवळं, फळफळावळ, खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारी पाकसंस्कृती आणि आयुर्वेदिक औषधी गुण असलेली वृक्षसंपदा या सगळ्याची रेलचेल असलेले आहेत. मात्र यातल्या कोणत्याही गोष्टीचा फायदा आपल्या कोकणी माणसाला होऊ देतील ते राजकारणी कसले, अशी परिस्थिती येथे बघायला मिळते. या संपूर्ण पट्ट्यामध्ये नारायण राणे हे एक बडे राजकीय प्रस्थ म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या बदलत्या राजकीय क्षितीजानुसार आपल्या वैचारिक कक्षा रुंदावण्याची गरज आहे. मात्र राणे तसं काही करताना दिसत नाहीत. गेली सोळा वर्षे ते ठाकरेद्वेषाने पछाडलेले आहेत, तो त्यांनी काळाच्या ओघात कमी करण्याऐवजी मिळणार्‍या नव्या संधीनुसार वाढवत नेतानाच बघायला मिळतंय. उद्धव ठाकरे हे मात्र राणेंच्या द्वेषाला दुर्लक्षित करण्याचं दुर्लक्षास्त्र वापरताना दिसतात.

मात्र हे करताना या दोघांनी आपल्या राजकीय फायद्यातोट्यापेक्षा कोकणी माणसाचे हित बघायला हवे. अन्यथा हा महाराष्ट्रातला सगळ्यात सुजलाम-सुफलाम असलेला भूप्रदेश राजकीय द्वेषाने दिवसागणिक अधिक शापित होईल. राणे-ठाकरे वादात या भारतीय कॅलिफोर्नियाचे नुकसान होऊ नये यासाठी आता इथल्या स्थानिक माणसानेच इथल्या देवस्थानांप्रमाणे जागृत रहायला हवे. पुढारी कुठल्याही पक्षाचा किंवा झेंड्याचा असो तो आपल्या स्वार्थासाठी कोकणाला आणि कोकणी माणसाला वेठीस धरणार नाही, असा अंकुश आता सिंधुदुर्गवासियांनी ठेवण्याची गरज आहे. अन्यथा आत्ताच सिंधुदुर्गामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांनी विशेषतः राजस्थानातील मारवाड्यांनी आपले हात पाय पसरायला सुरुवात केलेली आहे. राजस्थानपाठोपाठ बिहारी आणि उत्तर प्रदेशचे भय्ये या लाल मातीत शिरकाव करू लागले आहेत. ही मंडळी उद्या कोकणी माणसालाच प्रतिप्रश्न विचारू लागली तर त्याचं पाप जितकं पुढार्‍यांचं असेल तितकंच ते पाप या शापित भूमीतल्या कोकणी माणसाच्या माथीही येईल.