Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग विज्ञान, तंत्रज्ञानाशी जडले नाते !

विज्ञान, तंत्रज्ञानाशी जडले नाते !

नाशिक येथे होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय किर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाल्यानंतर काही जणांच्या चाकोरीबद्ध विचारसरणीला धक्का बसला, कारण नारळीकर हे रुढार्थाने साहित्यिक नाहीत. असाच धक्का भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्यावर काही जणांना धक्का बसला होता. पण कलामांनी त्यांची निवड सार्थ ठरवली, तशीच आता नारळीकरांची झालेली निवडही नवनिर्मितीला चालना देणारी ठरेल असे म्हणायला हरकत नाही.

Related Story

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय किर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची नाशिक येथे होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड आणि भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे अणूशास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी झालेली निवड हा खरे तर एक उत्तम योग म्हणावा लागेल. खरे तर या दोन्ही निवडींनी रुढ झालेल्या चाकोरीबद्ध विचारसरणीला आणि चौकटीला चांगल्यापैकी धक्का बसला. कारण या निवडी ऑऊट ऑफ बॉक्स अशा म्हणाव्या अशा आहेत. कारण अब्दुल कलाम यांची संपूर्ण कारकीर्द ही एक वैज्ञानिक म्हणून गेलेली होती. पुढे ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. तिथून निवृत्त झाल्यावर पुढील काळ हा अण्णा युनिव्हर्सिटीत आपण प्राध्यापक म्हणून काम करायचे, असे त्यांनी ठरवले.

पण कालगतीचा अंदाज कुणाला येत नाही. त्यांना भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घ्यावा लागला. कलाम भारताचे राष्ट्रपती झाल्यानंतर रुढ चाकोरीच्या विचारसरणीच्या लोकांना धक्का बसला, त्यांनी शंकाकुशंका व्यक्त करायला सुरूवात केली. अगदी त्यांच्या केशरचनेपासून ते त्यांच्या राजकीय अनभिज्ञतेविषयी बोलले जाऊ लागले. म्हणजे कलाम हे काही राजकीय व्यक्ती नाहीत. राष्ट्रपती म्हणून काम करताना आवश्यक असलेले संसदीय कामकाज आणि नियमांचे ज्ञान त्यांना नाही. त्यामुळे ते आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडू शकतील का, असे बोलले जात होते. कलाम राष्ट्रपती झाले. त्यानंतर त्यांनी जास्त राजकीय बाबतीत ढवळाढवळ केली नाही. त्यांनी आपल्या भेटीगाठीतून आणि दररोजच्या शासकीय कार्यक्रमांतून देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार कसा होईल, देश आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज कसा होईल, या संबंधी मार्गदर्शन केले.

- Advertisement -

भारताला हजारो वर्षांचा इतिहास असला तरी अलीकडच्या काही शतकांमध्ये भारतामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची हेळसांड झाल्यामुळे जगातील अमेरिका, रशिया आणि युरोपमधील देशांच्या तुलनेत भारत आर्थिक विकासात मागे पडला. अगदी पूर्वेकडचा जपानसारखा देश आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करून पुढे गेला. पण भारताकडे मोठी बौद्धिक परंपरा असताना हा देश विकसित राष्ट्र म्हणून उदयाला का येऊ शकत नाही, त्याची खंत अब्दुल कलामांना नेहमीच वाटत होती. त्यामुळेच त्यांनी देश विकासाचा विषय आपल्या दैंनदिन जीवनात लावून धरला. कलाम पंतप्रधानाचे वैज्ञानिक सल्लागार असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली टायफॅक या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. त्या माध्यमातून भारत आधुनिक तंत्रज्ञानात अधिक सक्षम कसा बनेल, यासाठी सूचना करण्यासाठी वैज्ञानिकांना आणि तंत्रज्ञांना एकत्र आणण्यात आले होते. त्यांना देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सूचना मिळवून विकसित भारतासाठी आराखडा तयार करण्यात आला. तो केंद्र सरकारला सादर करण्यात आला, त्याचे तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

याच आराखड्यावर आधारित कलामांनी ‘इंडिया २०२० : व्हिजन फॉर न्यू मिलेनियम’ हे पुस्तक लिहिले. त्या माध्यमातून विकसित भारताचा विचार आणि रुपरेषा सर्वसामान्य भारतीयांपर्यंत पोहोचवली. कलाम राष्ट्रपती झाल्यामुळे एक चांगली गोष्ट झाली, ती म्हणजे केवळ राजकारणाने वेढलेले हे पद एका वेगळ्या विचाराने झळाळून निघाले. कलामांचे मुख्य विषय विज्ञान, तंत्रज्ञान आणि देशविकास असल्यामुळे ते विषय मुख्य प्रवाहात आले. जेव्हा कलामांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा अर्ज भरला तेव्हा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन होेते. तेव्हा प्रमोद महाजन यांनी कलामांना विचारले, अनेक राजकीय नेते निवडणुकीचा अर्ज भरताना शुभ दिन, शुभ वेळ निवडतात, तुम्हाला तशी निवडायची आहे का, त्यावर कलाम म्हणाले, ‘नाही, एक लक्षात ठेवा जोपर्यंत पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे, तोपर्यंत प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण हा शुभ आहे. ती फिरायची थांबली की, मग सगळेच अशुभ असेल.’ त्यामुळे आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात कलामांनी अशा प्रकारे देशात वैज्ञानिक दृष्टीकोन आणि देशविकासाची भावना रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राष्ट्रपती होऊन कलामांसारखा बिगरराजकीय माणूस काय करणार, त्यांनी प्रयोगशाळेत बसून संशोधन करावे, असे म्हणणार्‍यांचा अंदाज चुकला. कलामांच्या हातून देशाच्या आणि समाजाच्या हिताची बरीच कामे पार पडली.

- Advertisement -

खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी इतर साहित्यिकांप्रमाणे कथा, कादंबर्‍या किंवा अन्य साहित्य प्रकार लिहिले नाही. आजवर जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले ते असे विविध साहित्य प्रकार हाताळणारे होते. नाशिकमध्ये ९४ वे साहित्य संमेलन होणार आहे. मागील ९३ वर्षांच्या इतिहासाकडे पाहिले तर कुणी वैज्ञानिक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालेला आहे, असे सापडणार नाही. अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलन दरवर्षी आयोजित करण्यात येते, त्याच्या अध्यक्षपदी वैज्ञानिकांची निवड होत असते. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वैज्ञानिकाची निवड होण्याची ही तशी पहिलीच वेळ आहे. डॉ. जयंत नारळीकर यांनी मराठीत अनेक विज्ञानकथा लिहिल्या आहेत. विज्ञानकथा हा साहित्याचाच एक प्रकार आहे, त्यामुळे नारळीकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकतात, असे निवड समितीला वाटले. नारळीकरांनी मराठीत विज्ञान कथांच्या लिहिलेल्या पुस्तकांची मोठी यादी आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी ठिकठिकाणी विज्ञानावर व्याख्याने दिलेली आहेत.

इंग्लंडमध्ये त्यांनी खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉईल यांच्यासोबत स्टेडी स्टेट म्हणजेच ‘अनादी अनंत’ या विश्व निर्मितीच्या सिद्धांतावर केलेल्या संशोधनामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली. लहान मुले जेव्हा नारळीकरांकडे स्वाक्षरी मागतात तेव्हा ते म्हणत की, ‘तुम्ही मला पोस्ट कार्ड पाठवा, त्यावर मला विज्ञान विषयक प्रश्न विचारा, त्याला मी पत्राने उत्तर देईन, त्याखाली माझी स्वाक्षरी असेल.’ नारळीकरांनी अशा प्रकारे लहान मुलांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल जागे करण्यासाठी प्रयत्न केले. कारण आजची मुले ही या देशाचे उद्याचे जबाबदार नागरिक असणार आहेत. त्यामुळे लहानपणापासून त्यांंच्या मनावर वैज्ञानिक संस्कार झाले, तर ते भाबड्या अंधश्रद्धेतून मुक्त होतील, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढेल. कुठल्याही गूढ वाटणार्‍या गोष्टीची वैज्ञानिक दृष्टीकोनातून उकल करतील, अशासाठी नारळीकर कायम प्रयत्नशील राहिले आहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर नारळीकरांमुळे मराठी समाजामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय केंद्रस्थानी येईल. नारळीकरांच्या विचारांमुळे गूढवादात अडकलेल्या अनेकांना त्यातून बाहेर पडण्यासाठी नवा प्रकाश दिसेल, अशी अपेक्षा करूया.

डॉ. एपीजे अब्दुल कमाल काय, किंवा डॉ. जयंत नारळीकर काय, जेव्हा अशी माणसे समाजाच्या केंद्रस्थानी येतात, तेव्हा त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरतो. त्यामुळे अनेकांची मने उजळून निघतात. जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण होतो. त्यातून समाजाचे आणि देशाचे हितच साधले जात असते. कलाम आणि नारळीकर हे दोघेही वैज्ञानिक असल्यामुळे त्यांच्याकडे फलज्योतिषाला थारा नाही. भारतीय समाजमनावर फलज्योतिषाचा मोठा प्रभाव आहे. आता तर त्यासाठी टीव्हीवरील काही वाहिन्या वाहिलेल्या आहेत. त्या पाहून बरीचशी मंडळी दिवसाची सुरुवात करतात.

भविष्य हा नेहमीच मानवासाठी कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे तो जाणून घ्यायला लोकांना आवडतो. पण भविष्य जाणून घेण्याच्या नादात अनेक लोक मानसिकदृष्ठ्या परावलंबी बनत जातात. फलज्योतिषी सांगतो, त्या साचात अडकून पडतात. त्यामुळे श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धा वाढत जाते. एकाद्या गोष्टीबद्दल प्रेम आणि श्रद्धा असण्यात गैर नाही. कारण मानवी मनातील पोकळी भरण्यासाठी त्याची गरज असते, पण ते करत असताना कलाम आणि नारळीकर हे समाजमनात रुजवत असलेला वैज्ञानिक दृष्टीकोन समाजाला विसरून चालणार नाही. कारण विज्ञान हे भावनेच्या पलीकडे जाऊन अंधारातून प्रकाशाची वाट दाखवत असते. अंधार हा निर्माण करावा लागत नसतो, तो निर्माण होत असतो. अंधार झाल्यावर प्रकाश निर्माण करावा लागतो. दिवा लावावा लागतो. कमाल आणि नारळीकर यांनी लावलेले विज्ञानाचे दिवे आपल्याला तमसो मा जोतिर्गमय या तत्वानुसार अंधारातून प्रकाशाकडे नेवोत.

- Advertisement -