घरफिचर्समायमहानगर ब्लॉगनाताळबाबाची जागतिक मोहिनी

नाताळबाबाची जागतिक मोहिनी

Subscribe

सध्या जगभरात सगळीकडे नाताळचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात असून त्यात ख्रिस्ती धर्मियांसोबत अन्य धर्मीय लोक सहभागी होत आहेत. कुठलाही सण असो त्यातून आनंद आणि उत्साह निर्माण होत असतो, त्यामुळे त्यात जगातील कुठलेही लोक सहभागी झाल्यास त्यात काही हरकत असण्याचे कारण नाही, कारण अशा सहभागामुळे परस्पर बंधूभाव वाढत असतो. भारतामध्ये प्रामुख्याने हिंदू धर्मीय लोक या नाताळच्या उत्सवामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेताना दिसतात. अगदी आपल्या घरी किंवा कार्यालयांमध्ये ख्रिसमस ट्री आणले जाते. त्यावर रंगीत दिव्यांची रोषणाई केली जाते. ख्रिसमसच्या टोप्या घातल्या जातात, काही लोक सांता क्लॉज म्हणजेच नाताळबाबा बनतात.

भारतामध्ये धार्मिक उत्सवाच्या काळात विविध धर्मीय लोक एकमेकांना त्या सणानिमित्त बनवले जाणारे पदार्थ देतात. एकमेकांना शुभेच्छा देतात. असे असले तरी अलीकडच्या काही वर्षांमध्ये ख्रिसमस हा सण ख्रिस्ती धर्मियांसोबत अन्य लोकही उत्साहाने साजरा करतात. मोठमोठ्या मॉल्स आणि शॉपिंग सेंटर्समध्ये इतकेच नव्हे तर छोट्या छोट्या दुकानांमध्ये ख्रिसमसनिमित्त नेत्रदीपक रोषणाई केली जाते. अर्थात, यामागे खरेदीसाठी लोकांना जास्तीत जास्त उत्साहित करण्याचा हेतू असतो. काही वर्षांपूर्वी खरेदीचे काही विशिष्ट पर्याय असायचे, पण आता अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. अनेक स्कीम्स उपलब्ध आहेत.

- Advertisement -

ऑनलाईन पेमेन्टची सोय आहे. क्रेडिट कार्ड आहेत, अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल फोनमुळे तर अनेक गोष्टी अगदी चुटकीसरशी होत आहेत. त्यामुळे अख्खं जग आपल्या हातात आलेलं आहे. ख्रिसमस हा सण वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आणि महिन्याच्या शेवटी येतो, त्याला लागूनच इंग्रजी नववर्षाचे आगमन होत असते. जुने वर्ष संपून नवे वर्ष सुरू होणार असते, त्यामुळे जुनं ते सोनं असलं तरी नवं ते हवं या न्यायाने नव्याच्या स्वागतासाठी सगळेजण आसुसलेले असतात. त्यामुळे नव्या वर्षाचे प्रचंड जल्लोषात आणि भरपूर पैसा खर्च करून स्वागत केले जाते. नव्या वर्षात आपल्या आयुष्यात काही तरी सकारात्मक घडेल, ही त्या आनंदोत्सवामागील इच्छा असते.

गेल्या वीस पंचवीस वर्षात आधुनिक संपर्क साधने आणि वेगवान वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाल्यामुळे अंतर हा घटक अंतर्धान पावलेला आहे. आपण व्हिडिओ कॉल लावून जगात कुठेही असलेल्या माणसांशी संपर्क साधून जणूकाही एका टेबलावर समोरासमोर बसून बोलत आहोत, असा अनुभव घेत असतो. अत्याधुनिक वेगवान संपर्क साधनांमुळे आता जगाचे रुपडे सातत्याने बदलत आहे. त्यात पुन्हा गेल्या दोन वर्षांमध्ये जगभरात जी कोरोना महामारी आली आहे, तिने जगाला एका वेगळ्या अर्थाने एकरुप केले आहे, कारण जेव्हा एखादी गोष्ट सामूहिक वेदना बनते तेव्हा सगळे लोक एकदिलाने त्या समस्येचे निर्दालन करण्यासाठी संघटित होतात आणि कामाला लागतात. कोरोना विषाणू आणि एकापोठोपाठ येणार्‍या त्यांच्या व्हेरिएंट्सनी जगाला जसे हैराण करून सोडले आहे, तसेच जगापुढे एक सामूहिक आव्हान उभे करून सगळ्यांना एक केले.

- Advertisement -

विशेष म्हणजे अमेरिका, रशिया, युरोपमधील अनेक देश ज्यांना जगातील प्रगत देश मानले जात आहे, ज्यांच्याकडे अत्याधुनिक आरोग्य सुविधा आहेत, प्रतिबंधात्मक वैद्यकीय औषधे आहेत, अशा देशांच्या कोरोनाने केवळ नाकी नऊ नव्हे तर नव्यान्नव आणले आहेत. लाटे मागून लाट धावते, तरी कोरोना संपेना असे म्हणायची त्यांच्यावर वेळ आलेली आहे. एका बाजूला जग अतियश आधुनिक होत असताना प्रामुख्याने ज्यांच्याकडे आधुनिकता जास्त आहे, अशा देशांना कोरोनाचा सगळ्यात जास्त उपद्रव झालेला आहे आणि होत आहे, इतकेच नव्हे तर या देशांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या कमी प्रगत असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी दिसतो. कोरोनावर जगभरातले शास्त्रज्ञ विविध लसी तयार करत आहेत, पण त्याचसोबत कोरोनाचे नवनवीन अवतार पुढे येत आहेत.

हे सगळे पाहिल्यावर त्याविषयी अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहेे. यामागे जैविक युद्धाचा भाग आहे का, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. जैविक युद्ध ही एकेकाळी एक कल्पना होती. त्यासाठी आवश्यक असणारी जैविक अस्त्रे काही प्रगत देश तयार करत होते. थेट शस्त्रांनी किंवा अस्त्रांनी लढल्या जाणार्‍या युद्धामध्ये मनुष्यहानीसोबत प्रचंड प्रमाणात मालमत्तेची हानी होते. अनेक चांगले प्रकल्प, इमारती उद्ध्वस्त होतात. प्रचंड आर्थिक नुकसान होते. हे टाळून केवळ माणसांना मारून टाकले तर बाकीच्या सगळ्या गोष्टी जो यात जिंकेल, त्याला मिळतील. अशा स्वरुपाचे जैविक युद्ध असते. जगातील काही देशांनी आपला वरचष्मा कायम ठेवण्यासाठी किंवा नव्याने वर्चस्व मिळवण्यासाठी हे विषाणू सोडण्याचे उद्योग केले नसतील ना, अशी शंका लोकांना आता येऊ लागली आहे. कारण पहिल्यांदा कोरोना आला, नंतर डेल्टा आला, त्यानंतर ओमायक्रॉन आला, आता डेल्मिक्रॉन आला म्हणजे ही मालिका संपायचे नाव घेत नाही, असे पूर्वी कधी झाले नाही.

आशिया, आफ्रिकेतील उच्चशिक्षण घेतलेल्या युवकयुवतींचा ओढा अमेरिका आणि युरोपीय देशांकडे असतो. भारतातीलही असे अनेकजण नव्या संधी शोधण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी या प्रगत देशांकडे जातात. इतकेच नव्हे तर भारतात ख्रिस्ती चर्चकडून चालवल्या जाणार्‍या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना घालण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. इंग्रजी ही आज जगाची भाषा बनत चालली आहे. त्यामुळे ती भाषा आपल्या मुलांना यायला हवी, प्रगत देशांमध्ये वावरण्याच्या पद्धती आपल्या मुलांना अवगत असायला हव्यात, ज्यामुळे आपल्या मुलांना प्रगत देशात जाणे सोपे जाईल. या कॉन्व्हेंट शाळा प्रामुख्याने ख्रिस्ती धर्मियांच्या असल्यामुळे तिथे जाणार्‍या मुलांवर ख्रिसमस सण आणि त्याला लागून येणारा जल्लोष याचा प्रभाव असतो. माणूस कुठल्याही धर्माचा असला तरी त्याला आर्थिक प्रगतीच्या वाटेने जायचे असते, माणसाला आपला गाव कितीही प्रिय असला तरी त्याला आर्थिक प्रगतीसाठी प्रगत शहरांची वाट धरावी लागते.

तसेच सध्या भारतातील पालकांचे झालेले आहे, आपल्या मुलांना आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्याच्या संधी मिळाव्यात यासाठी ते त्यांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवतात. ख्रिस्ती धर्मीय असलेल्या अमेरिका, युरोप यांची भूरळ जगभरातील तरुणाईला आहे. कारण आर्थिकदृष्ठ्या संपन्नतेशिवाय माणसाला किंमत नसते. त्यामुळे आर्थिक संपन्नतेची केंद्रे असणार्‍या या देशांचा जो ख्रिस्ती धर्म, त्यांचा नाताळ सण आणि नाताळबाबा यांची मोहिनी जगाला पडत आहे. नाताळबाबा त्याच्या पोतडीतून आपल्याला भेट वस्तू देतो आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतो, ही भावना अधिक व्यापक होताना दिसत आहे. कोरोनाच्या काळात अनेक उद्योग बंद पडले, अनेकांचे रोजगार गेले. भारतासारख्या देशांमधून जेव्हा प्रगत देशांमध्ये निर्यात केली जाते, तेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात विदेशी चलन मिळून आपल्या गंगाजळीत वाढ होत असते, पण कोरोनाने पाश्चिमात्य देशांच्या अर्थव्यवस्थांवर घाला घातलेला असल्यामुळे त्यांचीही पंचाईत झालेली आहे. त्यामुळे निदान पुढचे वर्ष तरी चांगले उजाडेल, कोरोनाचे संकट मिटेल, अशी सुप्त भावना लोकांच्या मनात आहे. हा नाताळबाबा काही तरी शुभ संकेत देईल, अशी आशा लोकांना वाटत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -