मदरशांमध्ये क्रांतीची पहाट

संपादकीय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातील सर्व मदरशांमध्ये सकाळच्या प्रार्थनेसोबत सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन अनिवार्य केले आहे. यात टाळाटाळ करता येणार नाही. राष्ट्रगीत दररोज गायले जाते की नाही यावर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. योगी यांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उत्तर प्रदेशात सध्या १६,४६१ मदरसे आहेत. त्यातील ५६० मदरशांना सरकारी अनुदान मिळते. मदरसा अनुदानित असो किंवा विनाअनुदानित असो कुठलीही सबब न सांगता त्यांना राष्ट्रगीताचे सामूहिक गायन हे बंधनकारक राहणार आहे, असे आदेश योगी सरकारने काढले आहेत. राष्ट्रगीत गायनाचे योगी सरकारने दिलेले आदेश पाळण्यात येतील, असे अनेक मदरशांच्या चालकांनी म्हटले आहे. मुस्लिमांकडून चालविले जाणारे मदरसे आणि त्या ठिकाणी दिले जाणारे शिक्षण हा नेहमीच अनेकांसाठी कुतूहलाचा आणि त्याचसोबत वादाचा विषय राहिला आहे. कारण त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिले जाते, इतकीच माहिती बाहेरच्या लोकांना असते. त्या धार्मिक शिक्षणातून धार्मिक कट्टरतावाद जोपासला जातो, मुलांना लहानपणापासून मुस्लीम धर्माविषयी कडवट अशा प्रकारची शिकवण दिली जाते, अशी चर्चा होत असते.

मदरशांमध्ये बाहेरच्या इतर धर्मीय लोकांना तसा सहजासहजी प्रवेश मिळत नसल्यामुळे त्याविषयी अधिकच शंकाकुशंका व्यक्त करण्यात येतात. भारतात कुठल्याही शाळा असू द्यात, मग त्या शासकीय असू द्यात किंवा खासगी असू द्यात, तिथे सकाळी प्रार्थनेसोबत सामूहिकरीत्या राष्ट्रगीत गायले जाते. मदरसेही मुलांना शिक्षण देणार्‍या शाळा आहेत. तिथे राष्ट्रगीत अनिवार्य नव्हते, पण यापुढे राष्ट्रगीत हे गावेच लागणार आहे. राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनामुळे आपण सगळे एक आहोत अशी भावना निर्माण होत असते. तसेच शाळांमध्ये भारता माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञाही म्हटली जाते. त्यातून लहानपणापासून मुलांच्या मनात राष्ट्रीय एकतेची भावना निर्माण केली जाते. या एकतेच्या भावनेचा प्रभाव त्या मुलांच्या पुढील आयुष्यावर पडत असतो. मदरशांमध्ये आधुनिक शिक्षणाचा समावेश करण्याजी गरज आहे. कारण तिथून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर मुलीला किंवा मुलाला उपजीविकेचे साधन उपलब्ध होणे आवश्यक असते.

योगी आदित्यनाथ हे दुसर्‍यांदा बहुमताने उत्तर प्रदेशात सत्तेवर आले आहेत. त्यामुळे त्यांनी काही गोष्टी नव्याने लागू केल्या आहेत. त्यातील मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचे आदेश आहेत. खरे तर भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्यावरही एखाद्या धर्माच्या शाळांना देशाचे राष्ट्रगीत गाण्यासाठी आदेश जारी करावा लागतो ही आश्चर्याची आणि तितकीच विचार करायला लावणारी बाब आहे. कारण देशाला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर सर्व पातळ्यांवर काही नियम करण्यात आले. त्यात राष्ट्रध्वज फडकवणे, सामूहिक राष्ट्रगीत गाणे या गोष्टींचा समावेश होतो, पण आपल्या देशातील अल्पसंख्याकांच्या विशेषत: मुस्लिमांच्या भावनांची आजवर केंद्रात किंवा राज्यांमध्ये सत्तेत आलेल्या सरकारांनी अधिक काळजी घेतली आहे.

कारण ते अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही गोष्टीची जोरजबरदस्ती होऊ नये असे पाहिले गेले आहे. संसद असो किंवा विधानसभा काही मुस्लीम खासदार किंवा आमदार वंदे मातरम सुरू झाले की सभात्याग करताना दिसून आले आहेत. त्यातून मग त्यांना शह देण्यासाठी काही हिंदुत्ववादी नेत्यांकडून अगर इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, अशा प्रतिघोषणा देण्यात येऊ लागल्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण सगळे धर्मीय एकत्रितपणे वाटचाल करीत आहोत याची आता सगळ्यांनीच नोंद घेण्याची गरज आहेे. योगी आदित्यनाथ यांनी मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला, पण इतर राज्ये असा निर्णय घेतील का, असाही प्रश्न आहे. कारण या देशामध्ये मुस्लिमांची एकगठ्ठा मते आणि त्यांच्या धार्मिक कट्टरतेमुळे सत्ताधार्‍यांना वाटणारी भीती यामुळे बरेचदा त्यांच्या सुधारणेपेक्षा त्यांच्या लांगुलचालनाची भूमिका घेतलेली दिसून येते. कारण बाबरी पतनानंतर मुंबईत झालेल्या दंगलींना मुंबईमध्ये ११ बॉम्बस्फोट घडवून उत्तर देण्यात आले. अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट घडवून तिथे उत्तर देण्यात आले.

कसाब टोळीने मुंबईवर हल्ला करून अनेकांची हत्या केली. भारतामध्ये जेव्हा असे हल्ले केले जातात, तेव्हा त्याचे केंद्र हे पाकिस्तानात असल्याचे दिसून आले आहे. आजही भारतात काही ठिकाणी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात, पण पाकिस्तान ही महमदअली जिनांची फसलेली कल्पना आहे हे आता सिद्ध झाले आहे. पाकिस्तानातील बरेच लोक क्या इसिलिए बना था पाकिस्तान असे म्हणून कपाळावर हात मारून घेत आहेत. आम्ही भारतात असतो, तर आमचीही प्रगती झाली असती, असे ते म्हणत आहेत. पकिस्तान आज जगभरातील अतिरेक्यांचा अड्डा बनलेला आहे. भारतद्वेष यावरच त्यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. भारतापासून वेगळे होऊन त्यांना स्वतंत्र आणि प्रगत राष्ट्र म्हणून उभे राहता आले नाही. अलीकडेच यूजीसीने भारतीय विद्यार्थ्यांना पाकिस्तानातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ नका, त्या पदव्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, असे सांगितले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात मशिदींवरील भोंगे उतरविण्यात यावेत यासाठी अल्टिमेटम देताना हनुमान चालीसा स्पीकरवर वाजवण्याचे आदेश दिले. मदरशांमध्ये काय चालते, तिथे कुठल्या प्रकारचे शिक्षण दिले जाते याचाही शोध घेण्यात यावा, असे पोलिसांना आवाहन केले होते. त्यावरून मनसेच्या काही पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले होते. मशिदींवरील भोंगे उतरवणे आणि मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करणे याची सुरुवात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींनी केली. मुस्लिमांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे एक पाऊल आहे, असेच मानावे लागेल. यापुढे योगींनी मदरशांमध्ये आधुनिक शिक्षण देणेही अनिवार्य केले, तर तिथे शिकणार्‍या मुला-मुलींचे भविष्य उज्ज्वल होईल. त्यांच्या जीवनात क्रांती होईल. राष्ट्रगीताच्या अनिवार्यतेतून त्या क्रांतीची पहाट उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये झालेली आहे. योगी आदित्यनाथ यांनी जे धाडस केले तसेच देशातील इतर राज्यांमधील सत्ताधार्‍यांनी केले, तर त्याचा उपयोग एकूणच देशाच्या चांगल्या भवितव्यासाठी होईल. कारण लांगुलचालनातून केवळ भावना गोंजारल्या जातात, पण सुधारणा दूर राहतात. आपल्या मुलांनी आधुनिक शिक्षण घेऊन जगात नवीन संधी मिळवाव्यात असे सगळ्याच मुस्लीम आईवडिलांना वाटत असते, याचा पक्षीय मतमतांतराच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा.