घरफिचर्समायमहानगर ब्लॉगसत्तेच्या लग्नात महापुरुषांचे धिंडवडे का?

सत्तेच्या लग्नात महापुरुषांचे धिंडवडे का?

Subscribe

दुसरा तानाजी अथवा दुसरे शिवाजी महाराज होणे नाही. जे स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन काहीच पाहू शकत नाहीत ते काय इतिहास घडवणार? मात्र ते इतिहासाबाबत संभ्रम मात्र नक्कीच निर्माण करू शकतात. अथवा इतिहासाचा वापर करून लोकांमध्ये दरी निर्माण करू शकतात. आज राज्यात तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील सर्व प्रश्न संपले असून आता काहीच समस्या नाहीत, अशा थाटात कधी तानाजी तर कधी शिवाजी महाराज यांच्या तुलना सुरू आहे.

‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’, नरवीर म्हणून मराठ्यांच्या इतिहासात ओळखला जाणारा तानाजी मालुसरे याचे हे वाक्य आहे. सध्या तान्हाजी हा चित्रपट गाजतोय. त्यामुळे प्रत्येकाला हे वाक्य परिचयाचे आहे. बालपणापासून प्रत्येक मराठी मुलाला कुठल्या तरी इतिहासाच्या पुस्तक वा धड्यात ते वाचनात आलेले आहे. तान्हाजी चित्रपटाच्या निमित्ताने तर ते घराघरात पोहचले आहे. पण, त्याचा अर्थ किती लोकांना समजलेला असतो याचीच अनेकदा शंका येते. कारण अशी वाक्ये पुस्तकात धड्यात कशासाठी आली, तेही त्यांना ठाऊक नसते. संदर्भाचा प्रश्न किंवा गाळलेले शब्द भरण्याचा प्रश्न, म्हणून तशी वाक्ये धड्यात पेरलेली असतात. पण, अशा वाक्यातून ही माणसे काही नवा बोध समाजाला देत असतात. ते शाळेतल्या मास्तरांना तरी उमजलेले असते काय? कौतुकाने जाहीर भाषणात वा व्याख्यानातही त्याचा सढळ वापर होत असतो. कारण आपल्या सोयीचे असेल तेव्हा अशी वाक्ये-उक्ती अगत्याच्या असतात. बाकीच्या वेळी त्याकडे साफ पाठ फिरवली जात असते. त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून आलेली ही वाक्ये आपल्यात अप्रूफ निर्माण करत असतात. पण, अशा वाक्यांचा आशय कोणाला समजून घेण्याची गरज वाटत नाही. प्रसंग काय होता? शिवरायांचा निकटचा सहकारी तानाजीने आपला पुत्र रायबाचे लगीन काढलेले असते आणि त्याचेच आमंत्रण देण्यासाठी तो गडावर गेलेला असतो. अशावेळी महाराज अस्वस्थ असल्याचे त्याला जाणवते आणि प्रश्न विचारून तो अस्वस्थतेचे कारण समजून घेतो. मग जेव्हा कारण समजते, तेव्हा त्याचा प्राधान्यक्रम बदलतो. लगीन बाजूला ठेवून कोंढाणा किल्ला काबीज करण्याची मोहीम आपल्यावर सोपवण्याचा अट्टाहास तानाजी मालुसरे महाराजांकडे करतो. पण, त्याक्षणी मुलाचे लग्न काढलेले असल्याने मोहीम नंतरही राबवता येईल, असे महाराज समजावू बघतात. पण, तेही नाकारून तानाजी आपला हट्ट धरून बसतो. तेव्हा तो म्हणतो, ‘आधी लगीन कोंढाण्याचे!’ म्हणजे स्वराज्याची गरज पहिली, मग आपल्या खाजगी जीवनातील इतर नित्याच्या बाबी. तो प्राधान्यक्रम सांगतो. म्हणूनच त्याच्या हट्टाला होकार मिळतो. पुढला इतिहास सर्वश्रूत आहे.

इतिहासातून काय शिकायचे असते, त्याचे दाखले अशा किरकोळ वाक्यातून उक्तीतून मिळत असतात. तानाजी एक सरदार लढवय्या असतो आणि त्याच्याच पुत्राचे लग्न म्हणजे घरातला मोठा सोहळा असतो. पण, खाजगी आयुष्यातला प्राधान्यक्रम स्वराज्य स्थापनेत आडवा आल्यावर, तो स्वराज्याला प्राधान्य देतो. बदल्यात त्याच्या घरातल्या कुटुंबातल्या किती लोकांचा हिरमोड झालेला असेल, त्याची आपण कल्पना करू शकतो. लग्न आधी उरकून कोंढाणा किल्ला नंतरही जिंकता आलाच असता. किल्ला कुठे पळून जाणार नव्हता, की दोनचार महिन्यांनंतर जिंकल्याने मोठा फ़रक पडला नसता. पण, स्वराज्याच्या स्थापनेत प्राधान्य कुटुंब वा व्यक्तीला नसते, तर व्यापक ध्येयाला असते. कुटुंबाच्या अडचणींना बाजूला सारून अशी सामान्य माणसे मोठ्या संख्येने त्यागाला सिद्ध होतात, त्यातून स्वराज्यच नव्हेतर साम्राज्य उभे राहात असते. त्याचे शेकड्यांनी लाभ समाजाला व पुढल्या पिढ्यांना मिळत असतात. त्याच लाभांचा पाया घालण्यासाठी आजच्या पिढ्यांना बलिदान द्यावे लागत असते. योगायोगाने त्या मोहिमेत तानाजी कामी आला आणि पुत्राच्या लग्नसोहळ्याला तोच वंचित राहिला. पण, त्याचे ते वाक्य आणि त्याचे कर्तृत्व, त्यामुळेच अजरामर होऊन गेले. त्याने आपल्या कृतीतून व उक्तीतून हजारो मराठ्यांना मावळ्यांना चालना दिली, प्रेरणा दिली. कोंढाणा हा स्वराज्यातल्या कित्येक गडांपैकी एक किल्ला आहे. पण, त्याचा इतिहास अनेक किल्ल्यांपेक्षा अजरामर होऊन गेला. त्याला तानाजीने दाखवलेले प्रसंगावधान कारणीभूत झाले आहे. तो तानाजी वा त्याचे तत्कालीन सवंगडी, स्वराज्यातून काय मिळवू शकले?

- Advertisement -

तानाजीचा तो अट्टाहास होता आणि तो व्यक्तिगत नव्हता. आपण एक महान स्वातंत्र्याची व स्वराज्याची प्रेरणा उभारत आहोत, याचे नेमके भान त्याला होते. म्हणून त्याने डोळसपणे बलिदानाला कवटाळले होते आणि त्याला रोखण्याचे बळ महाराजही जमा करू शकले नाहीत. भावनेच्या आहारी जाऊन त्याला रोखणार्‍या महाराजांनाही त्याने प्राधान्यक्रम मैत्री वा प्रेमापोटी विसरू दिला नाही, तर त्याचेच स्मरण करून दिले. चारशे वर्षांनंतर आपण तानाजीला विसरू शकत नाही, कारण तो महान योद्धा होता, इतकेच नाही तर त्याला व्यक्तीगत व सामाजिक जीवनातले प्राधान्यक्रम ठरवता आलेले होते. आपापल्या पोटापाण्याच्या व कुटुंबाच्या घरगुती समस्यांत गुरफ़टून पडला असता, तर त्याला शिवाजी नावाच्या अपूर्व इतिहासाला घडवण्याची संधीच साधता आली नसती. तानाजीकडून हे शिकण्यासारखे आहे. त्यामुळे दुसरा तानाजी अथवा दुसरे शिवाजी महाराज होणे नाही. जे स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन काहीच पाहू शकत नाहीत ते काय इतिहास घडवणार? मात्र, ते इतिहासाबाबत संभ्रम मात्र नक्कीच निर्माण करू शकतात. अथवा इतिहासाचा वापर करून लोकांमध्ये दरी निर्माण करू शकतात.

आज राज्यात तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील सर्व प्रश्न संपले असून आता काहीच समस्या नाहीत, अशा थाटात कधी तानाजी तर कधी शिवाजी महाराज यांच्या तुलना सुरू आहेत. त्यावरून वादविवाद रंगवण्यात येत आहेत. कोंढाण्याच्या लग्नाचे मुहूर्त नेहमी निघत नसतात. त्यातले हेतू कालातित असतात. शेकडो वर्षे आणि कित्येक पिढ्या गरिबीत घालवलेल्या लोकांना शून्यातून साम्राज्य उभारणारा कुणी एक राजा प्रेरणा देत असतो. अनुदानावर जगण्याच्या लाचारीतून मुक्त होऊन स्वयंभू व स्वावलंबी होण्याची प्रेरणा, ही कुठल्याही तत्कालीन लाभापेक्षा मोठी असते, दिर्घकालीन असते. मात्र, ज्यांना राजकारण करायचे असते त्यांच्यासाठी कुठली प्रेरणा आणि कुठले आदर्श? त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त सत्ता आणि त्यातून मिळणारे लाभच महत्त्वाचे असतात. छातीवर कवड्याची माळ मिरवणारे, स्वत:पेक्षा रयतेसाठी जगणारे जाणते राजे, शिवछत्रपती आणि त्यांच्यासाठी छातीचा कोट करून स्वराज्यासाठी प्रसंगी प्राणाची आहुती देणारे तानाजी, बाजी प्रभू देशपांडे, यसाजी कंक यांसारखे त्यांचे साथीदार खरं तर प्रत्येकाला जगण्याची प्रेरणा देतात. संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त करतात. मात्र, त्यांचा वापर राजकारणासाठी होतो तेव्हा जनता जरी गप्प असली तरी ती कायम गप्प राहू शकत नाही. वेळ येते तेव्हा ती जाब विचारते आणि बदलाही घेते.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -