घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकाँग्रेसच्या पंखात नवे बळ!

काँग्रेसच्या पंखात नवे बळ!

Subscribe

काँग्रेसशिवाय या देशात विरोधकांचे पानदेखील हलू शकत नाही. मग कुणी काहीही म्हटले तरी. काँग्रेस आजही गावागावात आहे. मग निवडणुकीत निकाल काही लागला तरी. हे वक्तव्य आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे. संजय राऊत यांचे हे वक्तव्य राज्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांच्या निकालावरुन दिसून येते. पंचायत समितीच्या १४४ जागांपैकी ७३ जागा महाविकास आघाडीच्या खात्यात गेल्या. त्यापैकी ३५ जागा जिंकत काँग्रेसने अव्वलस्थान मिळवले आहे. त्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या ८५ जागांपैकी १९ जागा जिंकत काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांमधील यशाने काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. या निकालांवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे, या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यांनी मेहनत घेतल्यानेच या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली, असे म्हटले आहे. जरी कार्यकर्त्यांच्या मेहनत असली तरी त्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्याचं काम नाना पटोले यांनी केले हे नाकारता येणार नाही.

नाना पटोले यांनी ४ फेब्रुवारीला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ५ फेब्रुवारीला त्यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष असताना शांत दिसणार्‍या नानांनी ज्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले त्या दिवसापासून त्यांचा आक्रमकपणा दाखवायला सुरुवात केली. नानांनी पहिलाच ट्रॅक्टर मार्च काढत आक्रमकपणा दाखवून दिला. त्यानंतर नानांनी राज्यातील जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा पेरण्याचे काम केले. ही सद्य:स्थिती झाली. पण काँग्रेसला चांगले दिवस तेव्हा आले जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.

- Advertisement -

राज्यात २०१४ नंतर काँग्रेस हा दुर्लक्षित पक्ष झाला होता. सर्व नेते शांत झालेले दिसले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ८२ जागा जिंकलेल्या असताना २०१४ च्या निवडणुकीत केवळ ४२ जागा जिंकता आल्या. तब्बल ४० जागा काँग्रेसला गमवाव्या लागल्या. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ४४ जागा जिंकल्या. यावेळीदेखील काँग्रेस सत्तेपासून दूर राहणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. मात्र, भाजप-शिवसेनेचे फिस्कटले आणि महाविकास आघाडीमध्ये सामील होऊन काँग्रेस सत्तेत बसला. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बरीच आक्रमक वक्तव्ये केली, ज्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका पोहोचण्याची शक्यता होती.

मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि प्रमुख नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. सत्तेत राहून पक्ष वाढेल. सत्तेच्या बाहेर बसून पक्ष वाढणार नाही याची कल्पना काँग्रेसला आली असावी. त्यामुळे नाना पटोलेंची आक्रमक वक्तव्ये बंद झाली. नानांनी त्यानंतर तळागाळात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम चालू ठेवला. त्याचे फळ आगामी निवडणुकांमध्ये नक्कीच मिळेल. पण हे सातत्य ठेवणे गरजेचे आहे. हे यासाठी कारण काँग्रेसमधील नेत्यांच्या नेतृत्वामध्ये गेली काही वर्षे सातत्य दिसले नाही. याचाच फायदा विरोधी पक्षांनी घेतला.

- Advertisement -

लखीमपूर खेरीमध्ये शेतकर्‍यांना चिरडल्याच्या घटनेनंतर काँग्रेसने ज्या पद्धतीने आंदोलन आयोजित केले किंवा ज्या पद्धतीने त्यांनी निषेध केला त्या प्रकाराने सर्वांना धक्का बसला. विशेषत: प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावरुन बर्‍याच चर्चा सुरू झाल्या. लखीमपूरमधील काँग्रेसचे आंदोलन हाथरस किंवा इतर आंदोलनांपेक्षा वेगळे आहे. कारण आतापर्यंत असे होत होते की राहुल किंवा प्रियांका किंवा कधी कधी दोघेही आंदोलन करायचे आणि पक्षातील बाकीचे नेते गैरहजर असायचे. पण यावेळी संपूर्ण काँग्रेस एकत्र दिसली. प्रियांका गांधी यांना सीतापूरमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा राहुल त्यांच्या दोन मुख्यमंत्र्यांसह लखनऊ विमानतळावर धरणे देऊन बसले होते. दुसरीकडे, सचिन पायलट यांना मोराबादमध्ये ताब्यात घेण्यात आले.

एवढेच नाही तर महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआयदेखील ठिकठिकाणी निषेध करत होते. दुसर्‍या दिवशी नवज्योत सिद्धू पंजाबहून त्यांच्या ताफ्यासह लखीमपूरला रवाना झाले. म्हणजेच, संपूर्ण काँग्रेस यावेळी एकजूट झालेली पाहायला मिळाली. या संपूर्ण आंदोलनातून जी-२३ चे नेते कुठेही दिसले नाहीत. जणू तुमची गरज नाही असेच काहीसे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले असे यातून दिसून येते. तसेच, कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाने तेच संकेत दिसत आहेत. याची सुरुवात पंजाबपासून झाली. आधी नवज्योतसिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष बनवणे आणि नंतर दलित नेते चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवणे हा एक राहुल गांधी यांचा मास्टरस्ट्रोक होता.

यावेळी काँग्रेस गांभीर्याने आणि नियोजनाने मैदानात उतरली आहे. पण राहुल गांधींना इथे पोहोचायला ३ वर्षे लागली. २०१९ मध्ये झालेल्या पराभवानंतर त्यांनी त्यांची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला, पण बाकीचे गप्प राहिले. विशेषतः त्या राज्यांचे मुख्यमंत्री किंवा नेते जिथे काँग्रेसने खराब कामगिरी केली होती. सत्ता कोणाला आवडत नाही? मग सोनिया गांधींना हंगामी अध्यक्ष व्हावे लागले आणि मग ते सर्व सुरू झाले जे राहुल गांधी यांना नको होते. राहुल गांधी कमलनाथ, गेहलोत आणि कॅप्टन यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या बाजूने नव्हते, पण त्यांचे सोनिया गांधी यांच्यासमोर काहीच चालले नाही. पण आता पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवण्याचे मान्य करून असे वाटते की, सोनिया गांधींनी काँग्रेसच्या चाव्या राहुल यांच्याकडे सोपवल्या आहेत. आता राहुल आणि प्रियांका गांधी एकत्र काम करत आहेत. दोन सत्ताकेंद्रांसारखे नाही आणि याचा पुरावा लखीमपूरमध्ये दिसला.

काँग्रेस पक्ष अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा उभारी घेताना दिसतोय. यात महाराष्ट्र काँग्रेस, तेलंगणा काँग्रेस, कर्नाटक काँग्रेस आणि आता उत्तर प्रदेश काँग्रेस. या राज्यांमध्ये काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा ऊर्जा निर्माण झाली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी, कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यासारखे नेते राहुल गांधी यांच्यासोबत हवे आहेत. नुकतेच कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कन्हैया कुमार जो त्याच्या भाषण शैलीसाठी ओळखला जातो, तोच आता काँग्रेसमध्ये आल्याने काँग्रेसची थोडी फार ताकद वाढली आहे. कन्हैयालादेखील एक व्यासपीठ मिळाले आहे. त्याचा त्याने आणि काँग्रेसने फायदा घ्यायला हवा.

काँग्रेस पक्षाने उसळी मारून उठावे, मैदानात उतरावे, नवचैतन्याची बहार राजकारणात आणावी अशी लोकभावना आहे. त्यासाठी काँग्रेसला आधी पूर्णवेळ अध्यक्ष हवाच. डोकेच नसेल तर शरीराचा काय फायदा? काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष द्या. पक्षाला सेनापतीच नाही तर लढायचे कसे? ही जुन्याजाणत्या काँग्रेसवाल्यांची मागणीही चुकीची नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी आता ती जबाबदारी घ्यावी. कारण गेले काही दिवस हेडलेस काँग्रेस आहे. त्यांना हेड कधी मिळणार अशा बातम्या माध्यमांमध्ये आहेत. काँग्रेस काहीच करत नाही. शांत बसली आहे, अशी टीका काँग्रेस पक्षावर होत होती. मात्र आता ही टीका कुठे तरी थांबताना दिसत आहे.

महागाईविरोधात, पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरताना दिसत आहे. लखीमपूर खेरी प्रकरणानंतर काँग्रेस एकत्र आलेली दिसली. केवळ राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे दोघेच मैदानात न उतरता त्यांच्यासोबत पक्षातील नेते आणि कार्यकर्तेदेखील मैदानात उतरलेले दिसले. यामुळे आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस एकत्र येणे ही काँग्रेससाठी चांगली गोष्ट आहे. देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष सक्रीय नसणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. आता हा पक्ष पुन्हा एकदा उभारी घेताना दिसत आहे. फक्त या काँग्रेसची पूर्णवेळ जबाबदारी राहुल गांधी यांनी घ्यावी. अन्यथा पुन्हा एकदा सक्रीय झालेला पक्ष निष्क्रिय होऊन जाईल.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -