काँग्रेस इतिहासाचे हास्यास्पद खोदकाम !

संपादकीय

मागच्या दोन-चार दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले आहे. देशात काँग्रेस नसती तर काय काय घडले, बिघडले नसते, याचा पाढाच पंतप्रधानांनी वाचून दाखवला. गेल्या वर्षभरात संसदेची जेवढी अधिवेशने झाली, त्या सगळ्या अधिवेशनात मिळून केला नसेल इतका काँग्रेसच्या नावाचा जप पंतप्रधानांनी या दोन-चार दिवसांत केलेला आहे. अर्थातच पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुका यामागचे मुख्य कारण आहे. काँग्रेसवर आवेशाने तुटून पडण्याची पंतप्रधानांची ही काही पहिली वेळ नाही. परंतु निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला झोडून काढण्याच्या नादात पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या तर्‍हेने वाहावत गेले आणि मुख्य म्हणजे यासाठी त्यांनी ज्या व्यासपीठाचा वापर केला, ते पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. संसदेत असे काय घडले होते की ज्यामुळे पंतप्रधान इतके चेतवले गेले? वर्षभरात केंद्र सरकारने केलेल्या कामांचे दाखले देताना पंतप्रधानांना काँग्रेसचा मागील 60 वर्षांचा इतिहास खोदून का काढावासा वाटला? सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.

या अधिवेशात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अत्यंत महत्वाच्या मुद्यांना हात घातला. हे मुद्दे होते देशाच्या सुरक्षेसंदर्भातील, गरीब-श्रीमंतांमधील वाढत्या दरीचे आणि बेरोजगारीचे. राहुल गांधींचे हे भाषण चांगलेच व्हायरल झाल्याने चर्चेत होते. गेल्या वर्षभरातच नव्हे, तर मागच्या 8 वर्षांमध्ये केंद्र सरकारने देशाच्या जनतेला अनेक आश्वासने दिली, रोजगारनिर्मितीची स्वप्ने दाखवली, प्रत्यक्षात मात्र ही स्वप्ने फसवीच निघाली. मागच्या दोन वर्षांत लाखो तरूणांनी आपले रोजगार गमावले आहेत. असंख्य उद्योगधंदे बंद पडलेत. सर्वसामान्यांच्या घरचे बजेट पुरते विस्कळीत झाले आहे. महत्वांच्या उद्योगधंद्यांवर काही ठराविक समुहाचाच वरचष्मा असल्याचे दिसून येते. पेट्रोकेमिकल्स, खाणी, दूरसंचार इ. क्षेत्रातील या उद्योगजगांची मक्तेदारी सर्वांनाच ठाउक आहे. एका दूरसंचार कंपनीने तर सुरूवातीच्या काळात ग्राहकांना मोफतची सेवा देऊन इतर कंपन्यांचे कंबरडे मोडून टाकले. सर्वसामान्य ग्राहकांसाठी ही नक्कीच धोक्याची घंटा आहे.

या सगळ्या परिस्थितीला नेमकेपणाने हेरत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर केलेली टीका पंतप्रधानांच्या चांगलीच जिव्हारी लागली आणि त्यातूनच त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. परंतु आपण जाहीर प्रचारसभेच्या व्यासपीठावर नाही, तर संसदेत उभे राहून बोलत असल्याचे भान राखण्यात मात्र पंतप्रधानांची गल्लत झाली. 5 राज्यांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या, त्यातच निवडणूक आयोगाकडून प्रचारसभा घेण्यासाठी आलेली बंधने याची पुरेपूर जाणीव पंतप्रधानांना होती. त्यातूनच त्यांनी संधी साधून आधी लोकसभा आणि नंतर राज्यसभेत जाऊन काँग्रेसवर एकापाठोपाठ एक हल्ले चढवले. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी परप्रांतीय मजुरांना रेल्वेची तिकीटे काढून देत प्रवास करण्यास भाग पाडले. यातूनच देशभरात कोरोनाचा प्रसार झाला हा कुठलाही तर्क वा आधार नसलेला दावा पंतप्रधानांनी केला. त्यापुढची कडी म्हणून त्यांनी काँग्रेस नसती, तर देशाला आणीबाणीचा कलंक लागला नसता, घराणेशाहीला आळा बसला असता, जातीयवाद संपला असता.

शिखांचा नरसंहार झाला नसता, काश्मिरी पंडितांना हद्दपार व्हावे लागले नसते. काँग्रेसने जाणीवपूर्वक डर्टी ट्रिक्स वापरून बाळासाहेब ठाकरेंची बदनामी केली. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी गोवा मुक्तीसंग्रामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच गोव्याला स्वातंत्र्यानंतर पुढची 15 वर्षे गुलामगिरीत खितपत पडावे लागले. काँग्रेसने गोव्याचे सुपुत्र असलेल्या हृदयनाथ मंगेशकरांचा अपमान केला. महात्मा गांधी यांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस विसर्जीत करण्याचा सल्ला दिला होता. ते जर ऐकले असते, तर देशाचे इतके नुकसान झाले नसते. असे एक ना अनेक सांधे जोडून निवडणूक प्रचाराची पायाभरणी केली. पंतप्रधानांनी ऑन द फ्लोअर केलेली ही वक्तव्ये संसदेच्या लायब्ररीत पुढची अनेक दशके जपली जातील. त्यातूनच एखाद्या नेत्या वा मंत्र्याला संसदेत नेहरू, पटेल, आंबेडकर, एस.एम.जोशी, अटलबिहारी वाजपेयी इ. नेत्यांप्रमाणे मुद्देसूद, अभ्यासपूर्ण भाषण करण्याऐवजी विरोधी पक्षावर त्वेषाने हल्ला कसा चढवायचा, याचा धडा किंवा आगामी काळात आणखी काही धडे पंतप्रधान मोदींकडून नक्कीच मिळू शकतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर टीका करताना पुढील 100 वर्षे काँग्रेस सत्तेत येणार नाही, असा दावा नेहमीच करत असतात. या दाव्यात इतकेच बळ असेल, तर पंतप्रधानांनी सध्याच्या परिस्थितीत संसदेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणण्याएवढीही संख्या नसलेल्या, गलितगात्र झालेल्या काँग्रेसवर इतकी ताकद खर्च करण्याचे कारण काय, असा प्रश्न सहाजिकच कुणालाही पडेल. मात्र काँग्रेसवर त्वेषाने टाकलेले फुत्कार, हेच भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोशाचा अंगार फुलवण्याचे तंत्र असल्याचे मोदी यांना चांगलेच ठाऊक झाले आहे. गांधी, नेहरुंच्या कारकिर्दीवर, धोरणांवर प्रश्न उपस्थित करायचे, काश्मीर, चीन सीमावादासाठी दोषी ठरवायचे, भष्टाचार, गरीबी, महागाईवरून आगपाखड करायची आणि स्वत:चे अपयश मात्र झाकून ठेवायचे. ही रणनीती त्यांनी यंदाही वापरल्याचे दिसते. त्यामुळेच उत्तर प्रदेशातील मतदानाआधी प्रायोजित केलेली विशेष मुलाखत, व्हिसीच्या माध्यमातून यूपी, गोव्यातील मतदारांशी साधलेला संवाद यामध्ये प्रामुख्याने त्यांचा काँग्रेसद्वेषच उफाळून आल्याचे दिसले.

मुस्लीम भगिनी माझे कौतुक करतात, त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखते, असे म्हणणार्‍या पंतप्रधानांनी हिजाबच्या मुद्यावरून एकट्या मुस्लीम युवतीला घेरून भगवी शालधारकांनी जो काही जाहीर धुमाकूळ घातला, याकडे मात्र हेतुपुरस्सर कानाडोळा केला. गोव्यातील मतदारांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची आठवण येत असल्याचे सांगणार्‍या पंतप्रधानांना पर्रिकर यांच्या मुलाला भाजपने तिकीट का नाकारले, हे सांगण्याचे धाडस झाले नाही. गोव्यात गेल्यावेळची सत्ता जुगाड करूनच भाजपला मिळाली होती. यंदाही गोव्यातील जनता एकहाती कमळ उचलून धरेल, अशी परिस्थिती नाही. उत्तर प्रदेशमध्ये सत्तेचा कल भाजपकडे असला, तरी बहुमतासाठी झुंजावे लागू शकते, याची पंतप्रधानांना जाणीव आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता असून इथे भाजपपेक्षा आम आमदी पक्षाचे वजन जास्त असल्याचे म्हटले जात आहे. यामुळेच केलेल्या कामांऐवजी मतदारांमध्ये काँग्रेसद्वेष निर्माण करून भावनेच्या चिखलात कमळ फुलवण्याचे पंतप्रधानांचे प्रयत्न किती यशस्वी ठरतात, हे लवकरच कळेल. पंतप्रधानांसोबतच भाजप नेते, पदाधिकार्‍यांची कोअर टीम निवडणुकीच्या आखाड्यात विरोधकांवर चिखल उडवतच राहतील, पण पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या इतिहासाचे इतके सखोल खोदकाम करून स्वत:चे हसे करून घेतले एवढे मात्र नक्की.