घरफिचर्समायमहानगर ब्लॉगगांधीचक्रात अडकलेली काँग्रेस !

गांधीचक्रात अडकलेली काँग्रेस !

Subscribe

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कदाचित मध्य प्रदेशची सत्ता काँग्रेसच्या हातून जाईल; पण प्रश्न इतक्या पुरता मर्यादित नाही. काँग्रेसमध्ये अशी हतबलता आणि उदासीनता कशामुळे आली आहे, हा आहे. काँग्रेसकडे सध्या केंद्रीय पातळीवर प्रभावी नेता नसल्यामुळे त्या पक्षाची देशभरातील संघटना विस्कळीत झालेली आहे. प्रादेशिक पातळीवर गटबाजी उफाळून आली आहे. गांधी घराण्यातील व्यक्तीच पुढे यावी, या अट्टाहासामुळे काँग्रेसचा प्रभाव ओसरत आहे; पण ती काँग्रेसची अपरिहार्यताही झालेली आहे. कारण गांधी नाही, तर काँग्रेस नाही, अशी बर्‍याच काँग्रेसजनांची मानसिकता बनून गेलेली आहे. त्यामुळे काँग्रेस गांधीचक्रात अडकली आहे. त्यातून तिची सुटका होणेही शक्य नाही.

नरेंद्र मोदी यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत ‘काँग्रेसमुक्त’ भारताचा नारा देऊन अच्छे दिन आने वाले हैं, असा आशावाद लोकांमध्ये निर्माण केल्यानंतर लोकांनी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारला बाजूला ठेवून भाजपला प्रथम केंद्रात बहुमत दिले. त्यानंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. दुसर्‍या बाजूला संसदेतील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्यासाठी लागणार्‍या किमान जागाही जिंकता आल्या नाहीत. त्यानंतर २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतही जनतेेने भाजपला पुन्हा बहुमत दिले, त्यामुळे नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधान झाले. मोदी २०१४ साली पंतप्रधान झाल्यानंतर मध्यंतरीच्या कालावधीत काँग्रेसने मोदींच्या विरोधात बरीच आंदोलने केली. मोदी कसे जातीयवादी आहेत. धर्मवादी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वधर्मसमभावाला कसा धोका आहे, अशा आरोपांची राळ उडवण्यात आली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. लोकांनी पुन्हा मोदींनाच पंतप्रधान म्हणून पसंती दिली. २०१४ नंतरच्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यातील भाजपची सत्ता गेली. पण केंद्रात मात्र मोदींना टक्कर देणे काँग्रेसला शक्य होत नाही, त्याचेच काँग्रेसला मोठे दु:ख आहे आणि ते त्यांच्यासमोरील आव्हान आहे.

काँग्रेसला सध्या राष्ट्रीय पातळीवर प्रभावी आणि सक्षम नेता नाही, त्यामुळे काँग्रेसला देशभरात आपला प्रभाव निर्माण करताना अडचणी येत आहेत. त्याचसोबत काँग्रेस एक विचित्र चक्रात अडकलेली आहे. त्याला गांधीचक्र म्हणावे लागेल. कारण गांधी घराण्यातला कुणी माणूस नसेल तर काँग्रेस चालतच नाही, अशी अवस्था होऊन बसली आहे. गांधी घराण्यात कुणी प्रभावी नेता नसेल तर दुसर्‍याला संधी देऊन त्याला पुढे आणले जात नाही. याला अपवाद नरसिंह राव आणि मनमोहन सिंग राहिले आहेत. पण हे नेते पंतप्रधान म्हणून काम करत असले तरी त्यांचे नियंत्रण हे गांधी घराण्याकडेच होते. म्हणजेच काय तर काँग्रेस पक्ष हा लोकशाही शासन व्यवस्था असलेल्या आपल्या देशात असला तरी ती एका घराण्याची जहागीर होऊन बसली आहे. जसे अनेक प्रादेशिक पक्षाचे होऊन बसले आहे, तशी काँग्रेसची अवस्था होऊन बसली आहे. जसे शिवसेना ही ठाकरे आडनावाशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस ही पवार आडनावाशिवाय, नॅशनल कॉन्फरन्स अब्दुल्ला आडनावाशिवाय हे प्रादेशिक पक्ष चालू शकणार नाहीत.

- Advertisement -

काँग्रेस आणि गांधी या दोन नावांचा पंडित नेहरू आणि त्यांच्या वारसदारांनी वापर करून घेतलेला आहे. भारताला ब्रिटिशांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून देणे हाच काँग्रेस पक्षाचा हेतू होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता सगळ्यांना समान संधी मिळावी, यासाठी काँग्रेस बरखास्त करण्यात यावी, अशी उदारमतवादी सूचना महात्मा गांधी यांनी केली होती; पण पंडित नेहरू यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा असल्यामुळे काँग्रेस बरखास्त करणे त्यांच्या सोयीचे नव्हते, त्यामुळे त्यांनी महात्मा गांधीजींच्या सगळ्यांना राजकीय समानसंधी देण्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून काँग्रेस कायम ठेवली. त्यातूनच पुढे जनमतावर अगोदरपासून पगडा असलेल्या काँग्रेसचा पंडित नेहरू यांनी सत्तारूढ होण्यासाठी उपयोग केला. पुढे नेहरूंची मुलगी इंदिरा यांनी गांधी आडनावाचा स्वीकार केला. त्याचा त्यांना आणि त्यांच्या मुलांना राजकीय फायदा झाला. कारण महात्मा गांधी यांच्या नावाला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठे वलय होते. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी प्राप्त झाली. त्याचाच उपयोग नेहरुंच्या वारसदारांनी करून घेतला. या माध्यमातून या मंडळींनी एक गोष्ट मात्र पक्की केली की, काँग्रेस नावाचा राजकीय पक्ष आपल्याशिवाय चालणार नाही, याची दक्षता घेतली. त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त कुणीही केंद्रीय पातळीवर पक्षाच्या मुख्य स्थानी आले नाही. पंतप्रधानपदासाठी फक्त आणि फक्त आपणच लायक आहोत, अशी त्यांनी स्वत:ची आणि इतरांची मानसिकता करून घेतली. त्यांची मर्जी सांभाळणारा एक वर्ग त्यांनी काँग्रेसमध्ये निर्माण केला. त्यामुळे जर कधी कुणी या गांधी मंडळींना आव्हान देऊन मुख्य स्थानी येण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना निष्प्रभ करण्याचे काम हा पाळीव वर्ग करत असे. आजही त्या परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हावे यासाठी छाती बडवून धायमोकलून रडणारा काँग्रेसमधील असाच एक वर्ग लोकांनी पाहिलेला आहे. पण आपल्याला हे आव्हान झेपणार नाही, तसेच आपण विदेशी वंशाच्या असल्यामुळे पुढे आपल्याला काही कायदेशीर समस्या निर्माण होऊ शकतात, याची जाण सोनियांना होती; पण गांधींची गुलामी रक्तात भिनलेल्यांना त्याची जाणीव नव्हती. त्यामुळे सोनिया गांधी यांनी अंतर्मनाचा आवाज ऐकून मनमोहन सिंग यांना पंतप्रधान बनविले आणि सूत्रे आपल्या हाती ठेवली.

सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्या माध्यमातून दहा वर्षे युपीएची केंद्रातील सत्ता चालवली, पण त्यानंतर मात्र परिस्थिती कठीण होऊन बसली. कारण मनमोहन सिंग यांचे वय झाले होते. सोनिया गांधी यांच्या प्रकृतीच्या समस्या डोके वर काढू लागल्या होत्या. त्यामुळे पुढे काय असा विषय आला तेव्हा सोनिया गांधी यांचे पुत्रप्रेम जागे झाले. त्यांनी राहुल गांधी यांना काँग्रेसचे उपाध्यक्ष बनवले. त्यातून त्यांनी राहुल गांधी हेच काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे काँग्रेसमध्ये गांधी सोडून अन्य कुणाला पंतप्रधानपदाची संधी मिळणार नाही, असे स्पष्ट झाले. त्यातही राहुल गांधींचा लोकमनावर फारसा प्रभाव पडत नाही, हे त्यापूर्वी झालेल्या विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून आले होते. राहुलपेक्षा त्यांची बहीण प्रियांका वडेरा यांचे व्यक्तिमत्व प्रभावी आहे, त्यांचा जनमनावर प्रभाव पडेल, असा सूर काँग्रेसमधून काही नेत्यांनी उठवला होता, त्यातूनच प्रियांका लाओ, काँग्रेस बचावोची घोषणा पुढे आली; पण असा आवाज काढणार्‍यांचा आवाज बंद करण्यात आल्या. सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्यासाठी आपला अट्टाहास कायम ठेवून प्रियांका यांना लांब का ठेवले हे एक गूढ आहे. काही जणांच्या मते त्याला काही कौटुंबिक कारण आहे.

- Advertisement -

काँग्रेसमध्ये इतर तरुण नेते आहेत. त्यांना पुढे येण्याची संधी दिली तर काँग्रेसमध्ये नवी ऊर्जा भरली जाऊ शकेल; पण ते शक्य होईल, असे वाटत नाही. कारण काँग्रेसजनांना गांधी घराण्याची गुलामी करण्याची सवय झालेली आहे. त्या मानसिकतेतून ते बाहेर पडू शकणार नाहीत. काँग्रेसने देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त केले आहे, पण स्वातंत्र्योत्तर भारतात काँग्रेसजन गांधींच्या गुलामगिरीत राहण्यात धन्यता मानत आलेले आहेत. जेव्हा काही लोक या गांधींना आव्हान देण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांची अशी काही कोंडी केली जाते की, ते आपणच बाहेरचा रस्ता धरतात, त्यातूनच ज्योतिरादित्य शिंदे बाहेर पडले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे भवितव्य हे गांधींशी निगडीत आहे. गांधींच्या गुलामगिरीतून काँग्रेस कधी मुक्त होईल, असे वाटत नाही. कारण काँग्रेसमध्ये असा एक वर्ग आहे, जो या गोरा गांधी मंडळींना निष्ठा वाहण्यात जीवनाची धन्यता मानतो. त्यामुळे काँग्रेस अशी गांधीचक्रात अडकलेली आहे. त्याचा फायदा भाजपला मिळत आहे. तो पुढेही मिळत राहील, अशीच सध्या तरी परिस्थिती आहे. कारण राष्ट्रीय प्रभाव निर्माण करेल, असा नेता सध्या काँग्रेसकडे नाही.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -