घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकाँग्रेसची महाराष्ट्रद्रोही परंपरा!

काँग्रेसची महाराष्ट्रद्रोही परंपरा!

Subscribe

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करावे, हा विषय गेली अनेक वर्षे गाजत आहे. विशेषत: औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक आली की, हा विषय अधिक जोराने गाजवला जातो. आता पुन्हा एकदा औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विषयाचा पुन्हा एकदा गाजावाजा सुरू झालेला आहे. मराठी अस्मिता आणि मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी स्थापना झालेेल्या शिवसेनेने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा विषय हाती घेऊन आता बरीच वर्षे लोटली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै.‘सामना’मध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच करण्यात येतो. इतकी वर्षे झाली तरी हा विषय राजकारणासाठी तापवत ठेवण्यात आलेला आहे. खरे तर औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर सर्व पक्षांनी मिळून करायला हवे, कारण तो सगळ्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांच्या अस्मितेचा विषय आहे. पण त्यावरून राजकारण केले जात आहे, ही खरोखरच खेदजनक अणि लाजीरवाणी बाब आहे. औरंगजेबाने दिल्लीत बसून आपले सरदार महाराष्ट्रात पाठवून मराठ्यांना आपल्या कह्यात आणण्याचा बराच प्रयत्न केला. इतकेच काय त्याने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दक्षिणेत पाठवून मराठ्यांचा बिमोड करायला सांगितले.

पण छत्रपती शिवरायांनी रात्रीच्या अंधारात लाल महालावर अचानक हल्ला केला. त्यात शाहिस्तेखानाची तीन बोटे छाटली गेली आणि तो थोडक्यात बचावला. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून निसटले. एकूणच काय तर दिल्लीतून भारतावर राज्य करत असाताना बाकीच्या प्रांतातील राज्यकर्त्यांना आपले मांडलिक बनवणे शक्य आहे, पण मराठ्यांना दिल्लीत बसून आपल्या दावणीला बांधणे सोपे नाही, असे औरंगजेबाच्या लक्षात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसान झाल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यकारभार हाती घेतला. सतत बारा वर्षे औरंगजेब दिल्लीतून फौजा पाठवत राहिला, पण मराठे त्यांना धुळीला मिळवत राहिले. शेवटी स्वत: औरंगजेब फौजफाटा घेऊन महाराष्ट्रात आला आणि इथेच तळ ठोकला. छत्रपती संभाजी महाराजांना थेट लढाईत हरवणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर त्यांना दगाफटका करून कैद करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांची त्याने अतिशय अमानुषपणे हत्या केली. महाराष्ट्राच्या छत्रपतींचे त्याने जे हाल हाल केले, ते वाचून आजही मराठी मने संतापाने पेटून उठतात. महाराष्ट्राच्या छत्रपतींना अशी निर्दयी आणि अमानुष वागणूक देणार्‍या औरंगजेबाबद्दल सगळ्याच मराठी माणसांच्या मनात चिड आहे. तर मग असे असताना त्या औरंगजेबाच्या नावावरून जे औरंगाबाद आहे, ते नाव बदलण्यावरून इतके राजकारण कशासाठी होत आहे, हाच सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे.

- Advertisement -

औरंगाबादच्या नामांतराचा विषय सध्या गाजत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्याला पहिला विरोध केला, त्यानंतर अशोक चव्हाण यांनी विरोध केला. महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा स्वाभिमान आणि अस्मिता याचे काँग्रेसला काही सोयरसुतक नाही, असेच वारंवार त्यांनी दाखवून दिलेले आहे. केंद्रातील काँग्रेसच्या नेत्यांना तर ते कधीही नव्हतेच. त्याची सुरुवात काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. त्यांनी आपल्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात छपत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख बँडिट किंग म्हणजे लुटारू राजा असा केला होता. त्यावरून महाराष्ट्रात मोठे वादळ उठले होते. महाराष्ट्रातील नामवंत इतिहास संशोधकांनी आणि इतिहासकारांनी पंंडित नेहरूंचे हे विधान सप्रमाण खोडून काढले होते. त्यामुळे नेहरूंना आपली चूक मान्य करावी लागली होती. त्यांच्या पुस्तकातून ते विधान काढून टाकावे लागले होते.

संपूर्ण देशात मोघली सत्तेचा कडवा अंमल असताना ज्या व्यक्तीने मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन शून्यातून स्वराज्य निर्माण केले, त्यांच्याबद्दल नेहरूंची ही भावना असेल तर मग इतर काँग्रेस नेत्यांचे काही बोलायलाच नको. ते तर नेहरू जे बोलतील ते झेलायला तयार होते. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते हे दिल्लीच्या तालावर माना डोलवत राहिलेले आहेत. राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेसची सत्ता ही नेहरू आणि गांधी घराण्याच्या व्यक्तींच्या कायम ताब्यात राहिलेली आहे. त्यामुळे त्यांना जे योग्य वाटते, तशी कृती महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते करत राहिले. संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी १०५ आंदोलक शहीद झाले. राज्यातील काँग्रेसच्या मोरारजी सरकारने त्यांना गोळ्या घातल्या. त्याच काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांच्या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी महाराष्ट्रासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले. पण त्यांनाही देशापेक्षा नेहरू मोठे वाटत होते. कारण त्यांच्या तशाच प्रकारच्या विधानामुळे मोठा गदारोळ उडाला होता. काँग्रेसचे राज्यपातळीवरील नेते मराठी माणसांची अस्मिता काय आहे, त्यांचा विचार करण्यापेक्षा केंद्रातील काँग्रेस नेत्यांना काय वाटेल याचाच विचार करत आले आहेत.

- Advertisement -

खरे तर भारताबाहेरून आलेल्या मुस्लीम आक्रमकांचे आणि इथल्या मुस्लिमांचा तसा थेट काही संबंध नाही. या देशातील बहुतांश मुस्लीम हे धर्मांतरित आहेत. पण त्यांच्या मनातील मुस्लीमपणा काँग्रेसकडून हेतुपुरस्सर चेतवत ठेवला जातो. त्यातून त्यांची एकगठ्ठा मते मिळवली जातात. मुस्लिमांमध्ये आधुनिक शिक्षणाचा प्रसार कसा होईल, त्यांच्यात सुधारणावाद कसा वाढीस लागेल. यासाठी काँग्रेसने फारसे लक्ष दिले नाही. सर्वोच्च न्यायालयाने तलाक देण्यात आलेल्या मुस्लीम महिलेला तिच्या पतीला पोटगी देणे बंधनकारक करण्याचा निर्णय दिला होता. पण मुस्लीम नेते आणि त्या समाजाची एकगठ्ठा मते यांचा विचार करून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी हा निर्णय संसदेतील बहुमताच्या जोरावर रद्द केला. मुंबईवर हल्ला करून अनेकांचा जीव घेणार्‍या कसाब टोळीतील जिंवत पकडला गेलेला अजमल कसाब आणि संसदेवर हल्ला घडवण्यामागील सूत्रधार अफजल गुरू याला काँग्रेसने काही वर्षे पोसून ठेवले होते. पण जेव्हा त्यांना कळले की, केवळ मतांच्या राजकारणासाठी आपल्याकडून सुरू असलेले मुस्लिमांचे लांगुलचालन आपल्याच अंगाशी येत आहे. कारण इथले जे खरे मुस्लीम बांधव आहेत, त्यांना या लांगुलचालनात मुळीच रुची नाही. नरेंद्र मोदी यांना पुढील काळात मोठा प्रतिसाद मिळणार आहे, तेव्हा काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी अफजल गुरू आणि कसाब यांना रातोरात फासावर लटकवले.

केंद्रातील काँग्रेसच्या नेत्यांच्या आदेशानुसार वागणार्‍या राज्यातील काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या न्यायहक्कांकडे दुर्लक्ष केले. आपण जर भूमिपुत्रांचे विषय उचलून धरले तर आपल्यावर प्रांतीयवादी असल्याचा ठपका बसतो, त्यामुळे ते मूग गिळून गप्प बसले. त्यामुळे इथला स्थानिक भूमिपुत्र आक्रोश करत होता, पण त्याची दखल कुणी घेत नव्हते. त्यातून शिवसेनेची निर्मिती झाली. स्थानिक भूमिपुत्रांना हक्काचे राजकीय व्यासपीठ मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आम्हाला आदर आहे, असे राज्यातील काँग्रेसचे नेते तोंडाने बोलत असले तरी त्यांच्या खर्‍या निष्ठा या दिल्लीत बसलेल्या काँग्रेसश्रेष्ठी म्हणजेच गांधी घराण्याशी वाहिलेल्या असतात. खरे तर हा महाराष्ट्रद्रोह आहे, पण तीच त्यांची परंपरा राहिलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -