Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग नो टेंशन ! गंभीर रुग्णसंख्या आटोक्यात

नो टेंशन ! गंभीर रुग्णसंख्या आटोक्यात

Subscribe

नवीन वर्षाला प्रारंभ कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या भीतीने झाला. जगभरातील कोरोनाची स्थिती बघता भारतात विशेषत: महाराष्ट्रात युद्धपातळीवर खबरदारीच्या उपाययोजना सुरू झाल्या आहेत. पण, हे करताना लोकांमध्ये भीती पसरणार नाही याचीही खबरदारी सरकारला घ्यावी लागेल. कारण जगभराची आकडेवारी बघता गंभीर रुग्णांची संख्या दुसर्‍या लाटेच्या तुलनेने अतिशय कमी आहे. असे असतानाही लोकांना शिस्त लागावी म्हणून भीती घालण्यात आली तर दुसर्‍या लाटेप्रमाणे लक्षणे नसलेले रुग्णही रुग्णालयांतील बेड अडवून बसतील आणि त्यावेळी ज्यांना खर्‍या अर्थाने रुग्णालयांत दाखल करण्याची गरज आहे त्यांना बेड मिळणार नाहीत.

जगभरातील कोरोना रुग्णसंख्येने एव्हाना ३९ कोटींचा टप्पा पार केला आहे. अमेरिकेत कोरोना नियंत्रणाबाहेर गेला होता. अगदी दोन दिवसांपर्यंत दररोज कोरोनाचे ४ लाख नवे रुग्ण आढळत होते. नववर्षाच्या पहिल्या दिवशी अमेरिकेत ३ लाख नवे रुग्ण आढळले होतेे. बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाल्यानंतरही येथे कोरोनाची रुग्णसंख्या कमालीची वाढल्याने चिंता व्यक्त केली गेली. मात्र, मृत्यू आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा खूपच कमी दिसून आले. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत अमेरिकेतील कोरोनाची रुग्णसंख्या घटायला लागली आहे. गेल्या शनिवारी २.३९ लाख रुग्ण आढळले होते. तर रविवारी १ लाख ८५ हजार रुग्ण आढळले. महत्वाचे म्हणजे डेल्टाच्या तुलनेत अमेरिकेत रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण ५० टक्के कमी आहे. ज्यांनी लसींचे दोन डोस घेतले आहेत, त्यांच्यात आजार गंभीर होण्याचे प्रमाण सुमारे ४० टक्क्यांपर्यंतच आहे. ज्यांनी तीन डोस घेतले त्यांची शक्यता २० टक्यांपेक्षाही कमी आहे.

दुसरीकडे इंग्लंडमध्ये कोरोनाचा हाहा:कार आहे. येथे एकाच दिवसात कोरोनाचे १ लाख ८९ हजार १२३ रुग्ण आढळून आलेत. ओमायक्रॉनच्या वेगवान प्रसारामुळे ब्रिटनमधील स्थिती बिकट झाली आहे. परंतु, विक्रमी प्रकरणे नोंदवली गेल्यानंतरही, देशात संसर्ग रोखण्यासाठी नवीन नियम लागू केले गेले नाहीत. इंग्लंडमध्ये नवीन निर्बंध लादणे हा शेवटचा उपाय असेल असे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी म्हटले आहे. म्हणजेच जेव्हा सर्व पद्धती अपयशी ठरतील, तेव्हाच नवीन निर्बंध (लॉकडाऊन) लादण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

- Advertisement -

इंग्लंडमध्ये रूग्णालयात रूग्णांची संख्या वाढत आहे, परंतु आयसीयूमध्ये दाखल रूग्णांची संख्या स्थिर आहे. तर स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्वेने निर्बंध कडक केले आहेत. येथे मर्यादित संख्येने लोक एकत्र येणे, नाईट क्लब यासंदर्भात आयर्लंडने नियम लागू केले आहेत. दुसरीकडे फ्रान्समध्ये दररोज २ लाख नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. युरोपातील कोणत्याही देशापेक्षा फ्रान्समध्ये दररोज सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. दर सेकंदाला दोन फ्रेंच नागरिक कोरोनाबाधित होत असल्याचे एक सर्वेक्षण सांगते. त्यामुळे कोरोनाची लस न घेणार्‍या नागरिकांना आता फ्रान्स सरकारच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाण्याचा विचार सुरू आहे.

बार आणि रेस्टॉरंटमध्येदेखील लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्पेनमध्ये दररोज एक लाखाहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. ओमायक्रॉनमुळे येेथे संसर्ग इतक्या वेगाने पसरत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. स्पेनमधील लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस देण्यात आले होते. तेथील ज्येष्ठ नागरिकांपैकी ८० टक्क्यांहून अधिक जणांना याआधीच बूस्टर डोस देण्यात आला आहे. दक्षिण अफ्रिेकत ओमायक्रॉनच्या लाटेने कळस गाठला होता. मात्र, आता ही लाट ओसरत आहे. परिणामी, या देशात रात्रीची संचारबंदी उठवण्यात आली आहे. दक्षिण अफ्रिकेत कोरोनाची ही चौथी लाट आहे. ओमायक्रॉनचा विषाणू सर्वप्रथम दक्षिण अफ्रिकेतच आढळून आला होता.

- Advertisement -

अरब देशांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढत आहे. या देशांत अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. तरीही कोरोना नियंत्रणात येण्याचे नाव घेताना दिसत नाही. सौदी अरबमध्ये गेल्या २४ तासाच एक हजारापेक्षा अधिक प्रकरणे समोर आलीत. दुसरीकडे युएईमध्ये अडीच हजारांहून अधिक रुग्ण दररोज आढळून येतात. अर्थात या दोन्ही देशांनी अजून हे जाहीरच केले नाही की या देशांत ओमायक्रॉनचे रुग्ण किती आहेत? ही लपवाछपवी बघता या दोन देशांना आगामी काळात मोठाच धोका असल्याचा अंदाज लावला जातो. जगभराचा असा आढावा घेण्याचे मुख्य कारण म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कानपूरच्या गणित आणि सांख्यिकी तज्ज्ञांनी भारतात तिसरी लाट कधी येईल आणि उच्चांक कधी गाठू शकेल, याबाबत आपला अहवाल महिन्याभरापूर्वी प्रसिद्ध केला होता. त्यात भारतात कोरोनाची तिसरी लाट डिसेंबरच्या मध्यापासून सुरु होईल आणि फेब्रुवारी २०२२ च्या सुरुवातील कोरोना संसर्गाचा उच्चांक गाठेल, असे या अहवालात म्हटले आहे.

पहिल्या आणि दुसर्‍या लाटेचा अभ्यास करून तिसर्‍या लाटेबाबत हा अंदाज बांधण्यात आला आहे. तिसर्‍या लाटेबाबत संशोधन करण्यासाठी अमेरिका, युके, जर्मनी, फ्रान्स, दक्षिण अफ्रिका, इस्राइल यांसारख्या दहा देशांचा अभ्यास करण्यात आला. महत्वाचे म्हणजे, अहवालात म्हटल्याप्रमाणे डिसेंबरच्या मध्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली आहे. रुग्णवाढ अशीच झाली तर जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात राज्यात २ लाख रुग्ण उपचाराधीन असतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेचे भाकीत हे खरे ठरते की काय अशी भयशंका डाचू लागली आहे. तिसर्‍या लाटेत ८० लाख रुग्णांची नोंद झाली आणि त्यातील १ टक्का रुग्णांचा मृत्यू झाला तरी एकूण मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ही ८० हजारांपर्यंत होऊ शकते, असा अंदाज सरकारी व्यवस्थेने वर्तवला आहे.

मात्र हे सर्व अंदाज कोरोनाचे अभ्यासक डॉ. रवी गोडसे यांनी फोल ठरवले आहेत. गोडसे यांच्या मते, भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर आहे. जगभरात कोरोना बाधित होण्याचे प्रमाण जरी अधिक असले तरी रुग्णाची प्रकृती गंभीर होण्याची शक्यता ८१ टक्यांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे केवळ रुग्णसंख्येकडे बघण्यापेक्षा रुग्णालयात दाखल होणार्‍यांचीच संख्या मोजल्यास कथित लाट येणारच नाही हे स्पष्ट होते. तरीही मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे गरजेचेच आहे. परंतु, तिसर्‍या लाटेची भीतीच पसरवण्यात आली तर लोक लक्षणे नसतानाही रुग्णालयात दाखल होतील. त्यामुळे जे गंभीर रुग्ण आहेत, त्यांनाही बेड मिळण्याची शक्यता कमी होईल. त्यामुळे घाबरुन न जाता काळजी घेणे गरजेचे आहे.

दुसरी एक दिलासादायक बाब म्हणजे भारतात सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तसेच ६० वर्षांपुढील ज्येष्ठांना लसींचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. त्यामुळे हा मोठा घटक कोरोनाच्या जीवघेण्या आजारापासून वाचू शकतो. आता १५ वर्षांआतील बालकांचेही लसीकरण सुरू झाल्यास मोठा धोका कमी होऊ शकतो. अर्थात भारतात आजारापेक्षा रोजगाराची चिंता सर्वसामान्यांना अधिक आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यास जगायचे कसे असा यक्ष प्रश्न पुन्हा एकदा सर्वसामान्यांपुढे उभा राहिला आहे. म्हणूनच आतापासूनच लॉकडाऊनला विरोध सुरू झाला आहे. कारण गेल्या दोन वर्षांत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे लोकांचे आर्थिक चक्र पार बिघडून गेलेे, काहींचे तर ठप्प झाले. त्यामुळे लोकांचे फार हाल झाले. उलाढाल कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेची गमी मंदावली. त्यातून आता कुठे माणसे सावरायला लागली असताना, कोरोना दुसरे रुप घेऊन पुन्हा आला आहे.

एकीकडे लॉकडाऊनला विरोध करायचा आणि दुुसरीकडे शासनाचे निर्बंधही पाळायचे नाही, असा उफराटा प्रकार सध्या सुरू आहे. अर्थात, राजकारण्यांचे कौटुंबिक सोहळे, राजकीय सभा आणि समारंभ यांतून सर्वसामान्य तरी काय आदर्श घेणार? परिणामी, गर्दीचे नियम मोडणार्‍या राजकारण्यांवर कठोरात कठोर कारवाई झाल्यास सर्वसामान्यही वठणीवर येतील. पण अजूनही राजकीय नेते मंडळी याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाहीत. आपल्या मुलामुलींचे जंगी लग्न सोहळे मोठ्या गर्दीत पार पाडत आहेत. कोरोना काही दिवसांपूर्वी हिंदी चित्रपट सृष्टीतील सिने नटनट्यांच्या मागे लागला होता, आता तो राजकीय नेत्यांच्या मागे लागला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील अनेक नेते कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार याचा अपवाद सोडला तर बहुतांश नेते तोंडावर मास्कही लावत नाहीत. पण आता तरी या राजकीय नेत्यांनी धडा घेऊन मास्क लावावे आणि आपल्या कृतीतून जनतेला निमय पाळण्याचा संदेश द्यावा.

नो टेंशन ! गंभीर रुग्णसंख्या आटोक्यात
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -