एन्काऊंटर….!

mantralaya bmc

कुशाभाऊ भगतचंद डाव्या हातात धोतराचा सोगा पकडत अरबी समुद्राचा खारा वारा मागे सारत लगबगीनं हॉलमध्ये आले. त्यांच्या मागेच सावलीसारखा असलेल्या कमांडरने खुर्ची मागे खेचली. कुशाभाऊ विसावले. त्यांनी बारमाही पांढऱ्या शुभ्र गणवेशात असलेल्या दाढीवाल्या नाथाभाई ठाणावालांकडे पाहिलं आणि पुढच्याच क्षणाला त्यांच्या लक्षात आलं चाणक्य मालंडकरपण सोबत आलेत. हेतू कुशाभाऊंच्या लक्षात आला होता. नाथाभाई आणि चाणक्यानं एक फडतूस्सा कागूद कुशाभाऊंच्या हाती दिला आणि फोटू फॉर्मलिटी झाली. कुशाभाऊंनी उत्तराखंडी आवंढा गिळला…तिरपा कटाक्ष मागच्या प्रोटोकॉलवाल्याकडे टाकला…तो काही पावलं मागे सरकला. त्यानंही खास शिकवलेलं दुर्लक्ष केलं…ठाणावाल्यांनी स्वत:ला सावरत ‘गार्ड’ घ्यायचा प्रयत्न केला…

त्यांच्यावर उठाभाऊ वांद्रेकरांचा निरोप कमीत कमी शब्दात न चुकता द्यायची जबाबदारी होती. ठाणावालांनी आपल्या अनाकलनीय चेहऱ्यावर कुठलेच भाव न आणता निर्विकारपणे लॉकडाऊनमुळे झालेल्या झुपकेदार मिश्यांवरुन आणि करामती दाढी वरुन हात फिरवला…कुशाभाऊं ची सरावलेली नजर ठाणावाल्यांच्या उजव्या हातातील बोटातल्या महागड्या तेजस्वी पुष्कराजवर जाऊन स्थिरवली आणि काही क्षणातच खडबडून जागं झाल्यासारखं करत ते पुटपुटले, “उठाभाऊ को बोलो, सीधा फोन उठाओ और मोटाभाई को फोन लगावो, (हातातलं पत्र दाखवत) ये खोत बगेरा क्या काम का? उडरसे झंडी डिकी इडर काम फीनीश|” चाणक्य आणि नाथाभाईंनी एकमेकाकडे पाहिलं..त्यांच्या लक्षात मामला आला होता..

कुशाभाऊंच्या सांगण्यानुसार मोठाभाईंना फोन लावण्याचा प्रोग्राम ठरला…उठाभाऊंनी आपल्या खोलीतल्या स्वामीसमर्थांच्या तसबिरीकडे एकटक पाहिलं… त्यावरचा ‘भिऊ नकोस…’ हे आशिर्वचन वाचून घेतलं… बाहेरच्या ऑपरेटरने फोन जोडून दिला…पलिकडून आवाज आला,कैसे हो मेरे छोटेभाई? ठीक हूं मोटाभाई…संवाद सुरु झाला आणि …काही मिनिटांतच संपला… सगळ्यांचा जीव भांड्यात पडला…

दुसऱ्या दिवशी साडेनौच्या ठोक्याला बसून इलेक्शनवाल्यांना फॉर्मलिटी संपवायचे मोटा भाईचे आदेश गेले…त्याआधी मोटाभाईंनी छोटाभाई गोदरावालांना फोन करुन आपलं नागपूरी संत्र रसदार नसल्याची मन की बात ऐकवून टाकली…सगळ्याच नैशनल च्यायनलांवर फ्लैश चालले…उठाभाऊंची खुर्ची त्यांच्याकडेच राहणार…झालं तुताऱ्या वाजल्या.

सुभाषिश वांदेकरांनी देवाभाऊंची गोची झाल्याबरोबर संवादाची महती सांगून साडेचार वर्षात दाबून ठेवलेल्या वेदनेलाही हुंकार मिळवून दिला…

उठाभाऊ निर्धास्त झाले पण मोटाभाईला मुंबैच्या कोरोनाची चिंता सतावत होती. कारण मुंबैकर म्हणजे मोटाभाईसाठी कमावता पोरगा. तो आजारी खितपत पडून कसं चालणारं? राज्याचा गाडा अजीज मोहतांकडे…गडी एकदम तय्यारीचा… काकासाहेब बारामतीकरांपासून ते छोटाभाई गोदरावालांचा फूल टू फेवरेट! इतके पावसाळे बघून पण मोहताजींचे पाय जमिनीवर. त्याला आयुष्याच्या संध्याकाळी उल्ट सुल्ट नडायला सुरुवात केली बीएमसी वाल्या प्रदीपसिंह सोलापूरकरांनी… देवाभाऊ नागपूरकरांच्या काळात मंत्रालयाच्या चेंबरात बसून प्रदीपसिंहानी शान्या शान्यांच्या खाटा टाकल्या. कैकांना तर दे माय धरणी ठाय केलं…

तख्तं पलटलं… मंत्रालयातल्या साव्या माळ्यावरुन बीएमशीत आल्यावर प्रचंड लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त निघाले. दादर चौपाटीवरचे सॉल्टीवारे, कोल्डकॉफी आणि गार्लीक ब्रेडचा खुराक सुरु झाला. तब्येतीनं बाळसं धरलं…शंभर, अडीजशे , पाचशे खोक्यांची टेंड्रांची ‘नोट-टेकन’ व्हायला लागली…मेवण्या- शेवण्यांची पण व्यवस्था लागली…
देवाक काळजी, दुसरं काय!

शिंच्या कोरोना टपकला…अख्खी दुनिया हादरली. सवयीप्रमाणे मोटाभाईने मन मानी की बात करत, वाटेल तश्या घोषणा करायला सुरुवात केली…उठाभाऊ “डोंबिवलीची साडी” सारखे इमोशनल फेबु लाइव्ह दयायला लागले. त्यांचं बघून काकासाहेब पण फेबु वर यायला लागले…प्रियाताईं त्यांना बक्रा भट्ट असल्यासाखे गावोगावचे सवाल विचारु लागल्या. एव्हाना काकासाहेबांनी मोर्चा हातात घेतला अन् हेल्थवाले राजन अकोलेकर आपसूकच गपगार्र पडले…

सगळा मामला इमोशनल आणि लॉकडाऊन मात्र ‘नॅशनल’…त्यात इंटरनॅशनल मुंबैचे तीन तेरा वाजले…मजूर पळाले, कोरोना पिसाळला… गुरुवारी तर आक्रीतच घडलं, कोरोनाच्या पेशंटांच्या कुशीतच दोन मुडदे झोपवले…क्लीप किलीत बोबडेंच्या हाती लागली. त्यांनी मिडीयाच्या पोराबाळांना घेऊन सायन ते मुलुंड डांडिया केला… हे सगळं बीजेपी माझावर बघून ‘रिपब्लिकन’ भारताचे मोटाभाई- छोटाभाई फूल टू इमोशनल झाले.

कोरोना, पीपीइ कीट, नालेसफाई सगळं सुस्साट सुरु होतं. बीएमशीतले प्रदीपसिंहाचे ‘फेलो’ कागदं तांबडी, पिवळी, निळी रंगवून प्रेझेंटेशन करत होते. एमसी साहेब आलिशान चेंबरात बसून ‘झुम’त होता. पण प्रत्यक्षात काहीच जमतं नव्हतं… गुरुवारी छोटाभाईचा फोन आला…उठाभौ केम छो..? इकडून काही जवाब जायच्या आधीच पलीकडूनच आदेशी सुरात निर्देश आला… मझा नथी! सुनो काले शाम तक फेसला करो… एमसी बदलो…बद्दा ढप्पर छे… या वाक्यांनी उठाभाऊ हादरलेच…शेजारी उभ्या असलेल्या चाणक्य मालंडकरांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून उठाभाऊंवर फार ताण येऊ नये म्हणून छोट्या थापाला कोमट पाण्याचा चांदीचा ग्लास तयार ठेवायला सांगितलं…

उठाभाऊंनी फोन ठेवला. पावणे सहा फुटी चाणक्य बाकदारपणे ओणवला…शीएम साहेबांच्या ओठांसमोर कान न्हेता झाला. लागलीच चाणक्यानं चीफ सेक्रेटरी मोहता सायबांना उठाभाऊंना कनेक्ट करुन दिलं…दिल्लीचा निरोप त्यांना सांगण्यात आला. तो त्यांच्या मनपसंतच होता…मोहता साहेबांनी यस सर…सर…सर..यस सर…असं समाधानात्मक उच्चारलेले शब्द चाणक्य आपल्या कानात साठवत होता… जोडीला शीएम साहेबांच्या भांबावल्या चेहऱ्यावरचे भाव लिटमस पेपरसारखे टिपत होता…त्याचीही स्वतंत्र गोळाबेरीज सुरु झाली होती. कोरोनात खंगलेल्या मुंबै नग्रीसाठी स्लीम फीट गडी निवडण्यात आला…अर्थात मोहता साहेबांनी नव्या गड्याचे गुण जुळवून ठेवलेच होते. कारण टोळीयुद्धासारखंच प्रदीपसिंह दहा दिवसांपूर्वी त्यांच्याशी कचकचला होता. त्यांना ते बिल्कुल रुचलं नव्हतं…त्यांनीच छोटाभाईंकरवी प्रदीपसिंहाचा शुक्रवारीच गेम केला होता…पडत्या फळाची आज्ञा मानत जीएडी वाल्यांनी सगळं चोख तैयार ठेवलं होतं. कारण प्रदीपसिंहाने टाकलेल्या अनेकांच्या खाटांची संख्या पाहता शुभ कामात कुणालाच देरी नको होती. प्रदीपसिंहाची घरवाली गोऱ्यासायबाच्या इंग्लडातून माणशी दोन लाखाचं तिकीट काढून मायदेशी येत होती. ती हवेत असतानाच एमशी साहेब गॅसवर गेले… बुबळं एक्स्ट्रा बाहेर आलेले डोळे जास्तच पाणावले…न राहवून त्यांनी उठाभाऊंना खूप सारे फोन लावले. ते तर रेस्ट घेत होते… कंटाळून प्रदीपसिंहांनी दीड तासाने चाणक्याला फोन केला. उठाभाऊंचा निरोप त्यानेच दिला, ‘प्रदीपभाई, तकलीफ वाले माहौल में ऐसे निर्णय लेने पडते है’… कंठ दाटून कधीही हुंदका फुटण्याच्या वाटेवर असलेल्या प्रदीपसिंहाने सगळं बळ एकवटून चाणक्यालाच सांगून टाकलं, कुछ भी करो चाणक्या वो सिर्फ युडी और एरिगेशन देखना! तिसरा फोन वाजला…दिल्लीत प्रतिक्षा होती गल्लीत नेमकं काय झालं याची? तिथल्या सांगकाम्याला चाणक्याने निरोप दिला, छोटाभाई को बताओ जो बोला वो शीएम साबने कर दिया, और कुछ और है तो बताओ…

– बातमीवाला…!