कोरोनाने चुकवला सगळ्यांचा अंदाज

During the Corona period Inconvenience to citizens in Kasara; MLA Daulat Dacoity visits health centre

भारतामध्ये सध्या कोरोनाचा मोठ्या प्रमाणात कहर सुरू आहे. मागील वर्षी हा कोरोना विशेषत: मोठ्या शहरांमध्ये आपले रंग उधळत होता, पण या वर्षी म्हणजे २०२१ साली त्याने आपला मोर्चा गावखेड्यांमध्येही वळवला आणि आपला इंगा दाखला. त्यात पुन्हा गावखेड्यांमध्ये वैद्यकीय सुविधा चांगल्या प्रकारच्या नसल्यामुळे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी तिथली अवस्था झाली. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यातही पुन्हा गेल्यावर्षी कोरोना रुग्णांना फार ऑक्सिजनची गरज पडत नव्हती, त्यामुळे ऑक्सिजनसाठी आज जशी धावपळ करावी लागते, तशी करावी लागत नव्हती. कोरोना हा सर्दी खोकल्याचाच मोठा भाऊ आहे, असे सुरुवातीला सगळ्यांना वाटत होते. काही वैद्यकीय तज्ज्ञांचे तर असे मत होेते की, कोरोना हा भारतीयांचे काही बिघडवू शकणार नाही. कोरोना हा थंडीत वाढतो. भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे, त्यामुळे भारतात कोरोनाचा टिकाव लागणार नाही.

तो आपल्याकडील उन्हाळ्यात मरून जाईल, पण तसे काही झाले नाही. पुढे असे दिसून आले की, कोरोना हा हवेतून पसरतो, त्यामुळे तो कुणालाही होऊ शकतो. अगदी ज्यांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले, अशांनाही झाला. त्यामुळे कोरोना हा कसा आणि कुठून घुसखोरी करेल हे काही सांगता येत नाही. त्यातही पुन्हा कोरोना शहरी भागातील उंच इमारतींमध्ये शिरताना दिसला, तो बैठ्या वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये शिरला, पण तिथे त्याने फार काळ वस्ती केली नाही. तिथून तो अल्पावधीत नियंत्रणात आला. धारावी, वरळी कोळीवाडा यासारख्या गच्च लोकवस्त्यांमध्ये कोरोनाची लागण झाली होती. पण तिथे त्याला नियंत्रणात आणण्यात यश आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या गर्दीच्या भागात फारशी लागण झालेली नाही.

झोपडपट्टीभागात कोरोनाचा फारसा प्रसार होताना दिसत नाही. त्यामागे असे कारण शोधण्यात आले की, अशा लोकवस्त्यांमध्ये राहणार्‍या लोकांची प्रतिकारशक्ती जास्त असते. म्हणजे ही मंडळी जास्त जंक फूड खात नाहीत. ते भात, भाकरी, चपाती, भाजी या घरात बनवलेल्या वस्तू खातात, त्यामुळे त्यांना कोरोनाची सहजासहजी लागण होत नाही. आणि झाली तर कोरोना त्यांच्या शरीरात फार काळ टिकत नाही. काही लोकांनी तर कोरोनाला प्रतिबंध करणारे काढे इतक्या मोठ्या प्रमाणात घेतले की, ते गरम पडून त्यांना पोटाचा त्रास होऊ लागला. कोरोना हा अदृश्य विषाणू नेमका कसा आहे, आणि त्याला प्रतिबंध कसा करायचा हेच कुणाला कळत नव्हते. सुरूवातीला काही वैद्यकीय तज्ज्ञ सांगत होते की, कोरोना रोखण्यासाठी तोंडावर मास्क लावण्याची गरज नाही. जे आजारी आहेत, त्यांनीच लावावा.

आता तर मास्क हा बंधनकारक करण्यात आलेला आहे, तो लावणार नाही, त्याला दंड आकारण्यात येतो. त्यावरून रस्त्यावर भांडणे होतात, तो भाग आणखी वेगळा. सोशल मीडियाच्या जागतिक विद्यापीठावर तर कोरोना हा एक जागतिक औषध विक्री करणार्‍या कंपन्यांकडून पसरवलेला भ्रम आहे. त्यांना आपली औषधे मोठ्या प्रमाणात विकायची आहेत, लोकांची लूट करायची आहे, म्हणून हे सगळे चालले आहे, असे काही ठिकाणी म्हटले जात होते. तर दुसर्‍या बाजूला कोरोनाला रोखण्यासाठी विविध पद्धतींचे उपाय सुचवले जात होते. थोडक्यात, काय तर कोरोनाची अवस्था ही हत्ती आणि पाच अंध व्यक्ती या कथेप्रमाणे झालेली आहे. ज्याच्या हाताला जो भाग लागेल, त्याप्रमाणे कोरोना असा आहे, अशी कल्पना लोक करत आहेत. या सगळ्यात जात प्रभावी उपाय आहे तो म्हणजे कोरोनाचा प्रतिकार करणार्‍या लसींचा शोध आणि त्यांची निर्मिती. त्यानंतर त्यांचे वेगाने होणारे लसीकरण.

चीन आणि भारत या देशांची जगात पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकांची लोकसंख्या आहे. २०१९ या वर्षांच्या शेवटी चीनमधील वुहान प्रांतात कोरोनाचा उद्भव झाला, त्यानंतर तो जगभर पसरला. चीनने कोरोनाला रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या, हे समजायला मार्ग नाही. आमच्याकडचा कोरोना संपला असे चीन म्हणत असले तरी नेमकी तेथील स्थिती काय आहे हे कळत नाही. दुसर्‍या बाजूला जगात दुसरी मोठी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये वेगाने लसीकरण सुरू आहे, पण आता लसींचाच तुटवडा पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा शहरांसोबत गावांना फटका बसल्यामुळे लोक खडबडून जागे झाले आहेत. त्यात पुन्हा केंद्र सरकार आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी भारतात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली आहे.

तिसर्‍या लाटेसाठी आपल्याला सज्ज राहावे लागेल, असे म्हटल्यामुळे तर लस घेण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे. लसीकरण केंद्रावर लसच नाही, तर तेथील डॉक्टर तिथे गेलेल्यांना देणार कुठून, अशी अवस्था सध्या झालेली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठ्या संख्येने गेलेले लोक आणि तेथील वैद्यकीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्यात प्रचंड वादावादी होताना दिसत आहे. त्यामुळे केंद्रावर थेट न येता, कोविन अ‍ॅपवर नोंदणी करून मग या, असे सांगण्यात आले. ४५ वर्षांवरील माणसांसोबत १८ वयांवरील लोकांना लसीकरण सुरू केले. पण अगोदर लसींचा तुटवडा त्यात पुन्हा नव्यांने लस घेणार्‍यांची भर त्यातून लसींचा अधिकच दुष्काळ पडला आहे.

भारतातील सिरमने कोविशिल्ड आणि भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन या लसी सुुरुवातीला मोठ्या प्रमाणात तयार केल्या. कोरोनावर लस आल्यानंतर त्याला खर्‍या अर्थाने चाप बसेल, असे लोकांना वाटत होते. पण भारतात जेव्हा लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली, तो २०२० सालाचा उत्तरार्ध होता. तेव्हा कोरोनाचा प्रभाव भारतात कमी झालेला होता. त्यामुळे जिल्ह्यांच्या सीमा उघडण्यात आल्या होत्या. राज्यांच्या सीमाही उघडून रेल्वेगाड्या सुरू झाल्या. त्यामुळे आता कोरोना गेला असे लोकांना वाटू लागले होेते. त्यामुळे आता आपल्याला लस घेण्याची गरज काय, असे लोकांना वाटू लागले होते. खरे तर जे कोरोना काळात प्रत्यक्ष आघाडीवर काम करणारे वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, पालिकेचे कर्मचारी होते त्यांना ही लस देण्यात यावी, असे ठरलेले होते. पण याचवेळी कोरोनावरील लसींबाबत गैरसमज पसरू लागले होते. त्यामुळे लोक लस घेण्यासाठी पुढे येत नव्हते.

लोकांना लस घेण्याला प्रोत्साहित करण्यासाठी स्वत: मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी लस घेऊन लोकांच्या मनातील भीती घालविण्याचा प्रयत्न केला. पण लोक फारसे तयार नव्हते. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भारतीय कंपन्यांनी आपल्याकडील लसी जगभरात जिथे मागणी होती, त्यांना विकल्या. दुसर्‍या लाटेचा जास्त प्रभाव हा महाराष्ट्रात होता. कारण तोपर्यंत इतर राज्यांमध्ये दुसरी लाट जाणवत नव्हती. त्यामुळे इतर राज्ये गाफिल होती. त्यावेळी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. कुंभमेळाही सुरू होता. आता लसींचा तुटवडा आणि देशभर पसरलेला कोरोना याबद्दल देशाचे प्रमुख म्हणून पंतप्रधान मोदींना सर्व बाजूंनी दोष देण्यात येत आहे. श्रेयाला अनेक वाटेकरी असतात, पण अपश्रेयाला कुणी वाटेकरी नसतो, तशीच अवस्था सध्या मोदींची झालेली आहे. कारण एकूणच परिस्थितीचा विचार केला तर कोरोनाने सगळ्यांचाच अंदाज चुकवला आहे. त्यामुळे सगळ्यांची फजिती झालेली आहे. त्यातून मोदींही सुटलेले नाहीत.