कोरोनालढ्यातून नवनेतृत्वाचा उदय

संपादकीय

आज अवघ्या जगाला कोरोना व्हायरसने भेडसावलेले असून त्यावरील उपचारांना व उपाययोजनांना कोरोनाविरोधी जागतिक युद्ध मानले जात आहे. अशावेळी जे कोणी आपापल्या देशाचे व समाजाचे नेतृत्व त्यात करत आहेत, त्यांना सेनापती मानणे भाग आहे. अशा युद्धात सेनापती जसा वागतो आणि जसे निर्णय घेतो, तसेच प्रत्येक देशाच्या नेत्याला वागणे भाग आहे. जे जगाचे नेतृत्व करण्याचा टेंभा मिरवतात, त्यांनाही तसेच संयमाने वागले पाहिजे व निर्णय घेतले पाहिजेत. दुर्दैव असे आहे, की यातला शत्रू अदृश्य आहे आणि त्याची सेनाही नजरेत चटकन येणारी नाही. त्यामुळे माणसाच्या बाजूने ती लढाई लढणारे सैनिक व सेनापती यांनाही स्वत:पुरता विचार न करता सार्वत्रिक हिताचा विचार करूनच पुढे येणे भाग आहे. जगासाठी म्हणून उपकारक निर्णय घेणे भाग आहे. पण तिथेही दुर्दैव आहे. बहुतांश देशाचे नेते आपापल्या देशापुरते निर्णय घेत आहेत आणि प्रसंगी आपापसात भांडतही आहेत. त्यामुळेच अल्पावधीतच कोरोनाचा व्हायरस सोकावत गेला आणि बघता बघता त्याने अवघ्या जगाला विळखा घातला आहे.

अशा वेळी सेनापतीने कसे नेतृत्व दिले पाहिजे आणि युद्धामध्ये कसे जिंकता येते, त्याचे मार्गदर्शन शेकडो वर्षापूर्वी ख्यातनाम सेनापती नेपोलियन बोनापार्ट याने करून ठेवलेले आहे. त्याचे तेच विधान म्हणून सर्वात आधी उधृत केलेले आहे. काय म्हणतो नेपोलियन? कुठलेही युद्धक्षेत्र हे व्यवहारी पातळीवर सलग चाललेले अराजक असते. त्यात आपल्या बाजूचे वा समोरच्या बाजूचे अराजक असो, दोन्हीवर नियंत्रण मिळवू शकतो, तोच ते युद्ध जिंकत असतो. आपल्याला त्या पद्धतीने कोरोनाच्या संकटाला सामोरा जाणारा कोणी जागतिक नेता आज दिसतो आहे काय? दुसरे महायुद्ध संपल्यावर अस्तित्वात आलेला अमेरिका हा महाशक्ती देश आहे आणि मागल्या आठ दशकात त्याने जगाला नेतृत्वही दिलेले आहे. कुठल्या देशातली समस्या असो किंवा दोनतीन देशातले वादविवाद असोत, अमेरिकेने त्यात हस्तक्षेप केला आहे किंवा त्यांना मदतही केलेली आहे. आरंभी सोवियत युनियनशी अमेरिकेची स्पर्धा चालायची. पुढल्या काळात मुक्त अर्थव्यवस्था आली आणि जागतिकीकरणाने जग एकत्र आले. त्यानंतर सोवियत युनियन ढासळले आणि अमेरिका एकमुखी जागतिक नेता ठरली.

चीन त्याला आव्हान देण्याइतका संपन्न देश झालेला आहे आणि अजून त्याला जगाला नेतृत्व देण्याची दृष्टीही लाभलेली नाही. अशा काळात कोरोनाने घातलेला घाव मानव जातीच्या जिव्हारी बसला आहे. त्यातून सावरायचे कसे ही मोठी चिंता होऊन बसली आहे. पुढारलेले श्रीमंत पाश्चात्य देश अगतिक झालेत, रुग्णशय्येवर पडलेले आहेत. पण कोणीही जागतिक चिंतन करणारा नेता जबाबदारी घेऊन संयुक्त प्रयत्नांसाठी पुढाकार घेताना दिसलेला नाही. अशावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जागतिक प्रतिमा नवा चेहरा समोर आणते आहे. प्रचंड लोकसंख्येचा देश असूनही भारतात अजून कोरोनाला बेताल मुसंडी मारता आलेली नाही आणि मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही नगण्य आहे. साधनांचा तुटवडा किंवा सुविधांची मारामार असतानाही मोदींनी भारताला त्या संकटातून सावरून धरलेले आहे.

कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन केलेली कारवाई भारताच्या पथ्यावर पडली आहे आणि त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेही मोदींचे गुणगान केलेले आहे. योग्यवेळीच नव्हेतर नेमक्या वेळी लॉकडाऊनचा निर्णय अंमलात आणण्याचा धोका पुढारलेल्या देशांना घेता आला नाही. पण लोकसंख्येचा प्रचंड पसारा असूनही मोदींनी भारतात लॉकडाऊन हाच आजच्या काळातला निर्णायक उपाय असल्याचेच सिद्ध केलेले आहे. त्याचे कौतुक व अनुकरण सुरू झाले आहेच. अमेरिकेसारखा महाशक्ती देश भारताने उपयोगी औषधे पाठवण्यास मान्यता दिली म्हणून जाहीरपणे आभार मानतो आहे. ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनी तर रामायणाचा हवाला देऊन मोदींना संजीवनी बुट्टी देणारा संकटमोचक हनुमान ठरवलेले आहे.

जेव्हा कोरोनाचा उद्भव जागतिक होण्याची शक्यता दिसली, त्याची चाहुल सर्वात आधी भारताला लागली म्हणावे लागेल. कारण त्याचा जागतिक परिणाम ओळखून भारताने मोठ्या हालचाली सुरू केल्या. जागतिक आरोग्य संघटनेने त्याला महामारी जाहीर करण्यापूर्वीच मोदींनी सार्क देशांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सचा प्रस्ताव पुढे केलेला होता आणि त्यानंतर लगेच जी-२० देशांच्या नेत्यांना तशाच पद्धतीने विचार करायला प्रवृत्त केलेले होते. म्हणजेच जगाने एकत्रितपणे कोरोनाच्या बंदोबस्ताला सामोरे गेले पाहिजे ही भूमिका भारताकडून मांडली गेली. मोदींच्या दूरदृष्टीने या संकाटाचा पल्ला प्रथम ओळखला आणि देशाच्या सीमांपलिकडे या युद्धाची व्याप्ती जगाला समजून घ्यायला भाग पाडले.

प्रत्येक देशाला आपल्यापुरती लढाई लढून कोरोनाला हरवता येणार नाही, हे समजावणारा दुसरा कोणी नेता जगात आहे काय? एका बाजूला मोदी आपल्या देशांतर्गत कठोर उपाय योजत होते व त्यासाठी सामान्य जनतेलाही विश्वासात घेऊन पावले टाकत होते. दुसरीकडे त्यांनी आशिया व संपूर्ण जगाला त्यापासून वाचवण्यासाठी काय करायला हवे, त्याची भूमिका मांडायला सुरूवात महिनाभर आधीच सुरू केली होती. प्रत्येक देशात त्याविषयी अराजकच होते आणि भारतातही त्याचे नको तितके हिडीस राजकारण चालूच होते. पण सगळ्या अराजकाला नियंत्रणाखाली ठेवण्याची क्षमता दाखवणारा नेता फक्त भारतात होता आणि हळूहळू त्याला आता जगाची मान्यताही मिळू लागलेली आहे.

थोडक्यात कोरोनाचा पुढल्या काळात पराभव होऊन मानवजात त्यातून सावरून उभी राहील यात शंकाच नाही. पण तेव्हाचे जग कालच्या जगासारखेच तंतोतंत असणार नाही. त्याचा चेहरामोहरा आमूलाग्र बदललेला असेल. त्याचे नेतृत्व करणारे चेहरे साफ बदलून गेलेले असतील. त्या नेतृत्वाचे स्वरूपही आजच्यापेक्षा बदललेले असेल. श्रीमंत वा शस्त्रसज्ज असलेले देश वा त्यांच्या बळाचा वापर करून पुढाकार घेणारे नेतृत्व मागे पडलेले असेल. मानवी जगाला संकटातून वाचवणारा व मदतीचा हात निर्भेळ मनाने देणारा समाज वा नेता, जगाचे नेतृत्व करायला पुढे आलेला असेल. जगाचे नेतृत्व कसे हवे त्याची आज कठोर परीक्षा चालू आहे आणि त्यात ब्राझिल आणि अमेरिकेने भारताला मान्यता दिलेली आहे. जपान, इस्रायल आधीच भारताचे समर्थक झालेले आहेत.

पण कोरोना विरुद्धच्या युद्धात जगभरच्या देशांना भारताने योग्य उदाहरण घालून दिलेले आहे. अर्थव्यवस्था, उद्योग वा व्यापारापेक्षाही माणूस आधी जगवला पाहिजे आणि तो जगला तर नवी अर्थव्यवस्था उभारता येईल. चीन असो वा अमेरिका व पाश्चात्य देश असोत, त्यांना माणूस व अर्थकारण यातून योग्य निर्णय घेता आले नाहीत किंवा समतोल राखता आलेला नाही. त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागत असताना कोट्यवधी लोकांना जगवण्याचा मोदींनी घेतलेला वसा, कोरोनानंतरच्या जगासाठी उद्धाराचा नवा मार्ग असणार आहे. तो जगाची राजकीय भौगोलिक आर्थिक रचना बदलून टाकणार आहे. जनतेचा नेता कसा असावा आणि संकटकाळात सेनापती कसा असावा, त्याचा वस्तुपाठच भारताकडून जगाला दिला जातो आहे.