घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकरोना संशोधने : चाचणी, लस अन् औषधनिर्मिती!

करोना संशोधने : चाचणी, लस अन् औषधनिर्मिती!

Subscribe

सिगारेटमध्ये असणारे निकोटिन करोना विषाणूवर प्रभावी ठरू शकते का? यादृष्टीने फ्रान्समध्ये संशोधन सुरू आहे. निकोटिन पेशींना चिकटून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे पेशींमध्ये विषाणूच्या प्रवेशाचा मार्ग बंद होतो आणि करोना शरीरात फैलावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही थिअरी निकोटिनचा वापर करण्यामागे आहे. क्लिनिकल ट्रायलनंतर या संशोधनाचा फैसला होईल.

आजवर जगभरात सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक लोकांचा बळी घेणार्‍या आणि करोडो लोकांना लागण झालेल्या करोना विषाणू (कोविड-१९)ने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लहान-मोठी राष्ट्र युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे त्या राष्ट्रांंमधील वैज्ञानिकांचे चमूही करोनाची लस शोधण्यात व्यस्त आहेत. एकदा ही लस सापडली की, जगावरच्या या मोठ्या संकटावर मात करणे सुकर होणार आहे. खरंतर, कोणत्याही आजारावरील संशोधन तीन पातळ्यांवर केले जाते. आजाराचे निदान होण्यासाठीचे संशोधन, आजार उद्भवू नये म्हणून लसींची निर्मिती करणे आणि आजार झाल्यावर तो नाहीसा करण्यासाठी औषधांची निर्मिती करणे. या तीन घटकांमध्ये पहिला जो घटक आहे त्यावर आजवर यशस्वी संशोधने झाली आहेत. आजाराचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या वेगवेगळ्या देशांनी शोधून काढल्या आहेत. अँटिबॉडी टेस्टमार्फत एखाद्या व्यक्तीला करोना विषाणूची बाधा झाली होती किंवा नाही हे समजते. तर, स्वॅब टेस्टमार्फत एखाद्या व्यक्तीला आता करोना विषाणू संसर्ग आहे की नाही आणि तो करोना संक्रमित असेल तर त्याला सेल्फ आयसोलेट असण्याची गरज आहे की नाही हे समजते.

इंग्लंडच्या शास्त्रज्ञांनी इन्स्टंट टेस्टही शोधून काढली आहे. ही टेस्ट लॅबमध्ये करण्याची गरज नसते. याद्वारे जागेवरच चाचणी करून केवळ २० मिनिटांतच त्याचे निकाल येतात. असे असले तरी आजही अनेक संस्था करोना विषाणूच्या जनुकीय रचनेचा शोध घेत आहेत. या संशोधनाअंती निदानाची अधिक अचूक पद्धती समोर येईल. यापुढील काळात सर्वात मोठे आव्हान असेल तर ते म्हणजे, लस शोधणे आणि औषधांच्या निर्मितीचे. या दोन्ही पातळ्यांवर जगभरात व्यापक प्रमाणात संशोधने सुरू आहेत. भारतही या संशोधनात अग्रेसर आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफीक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर)च्या वतीने देशभरात ३७ प्रयोगशाळांमध्ये संशोधन सुरू आहेत. याशिवाय सीएसआयआरसारख्या देशभरातील ३० संस्थांमध्ये असे संशोधन सुरू आहे. दिलासादायक बाब म्हणजे, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने करोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. त्या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांना प्रारंभही झाला आहे.

- Advertisement -

चाचण्यांमध्ये पहिल्या टप्प्यात समाजातील उच्च जोखीम गटात मोडणार्‍या म्हणजेच आरोग्य कर्मचारी, पोलीस, सुरक्षा रक्षक, भाजीपाला व फळ विक्रेते, किराणा माल विक्रेते यांचा अभ्यास केला जात आहे. करोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी या लसीचा मोठा उपयोग होणार आहे. त्याचप्रमाणे प्लाझ्मा थेरपीवरही भारतात काम सुरू आहे. करोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा काढून तो करोनाबाधिताच्या उपचारासाठी वापरला जातो. म्हणजे करोनाला हरवून जी व्यक्ती बरी झाली, तिचे रक्तघटक अन्य रुग्णाचा जीव वाचवू शकणार आहे. चीनमध्ये या थेरपीच्या सहायाने प्रभावीपणे उपचार झाले आहेत. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानेही या थेरपीला मान्यता दिली आहे. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर प्लाझ्मा थेरपीनुसार उपचार करण्यात आले. ते आता ठणठणीत आहेत. क्लिनिकल ट्रायल्सनंतर या थेरपीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड (आयआयएल) या आघाडीच्या लस उत्पादक कंपनीने करोनावर लस शोधण्यास प्रारंभ केला आहे. भारतात हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीने ऑस्ट्रेलियातील ग्रिफीथ विद्यापीठासोबत यासंदर्भातील करार केला आहे. मानवी शरीरात करोना विषाणूंशी लढण्यासाठीची लस तयार करण्यासाठी या वैज्ञानिकांचे तंत्रज्ञान आश्वासक आहे. संशोधन पूर्ण झाल्यानंतर या लसीचे अंश इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेडला हस्तांतरित केले जातील आणि लस बनवणार्‍या कंपन्या देशातील सीडीएससीओ (द सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन)च्या नियमनानुसार टप्प्याटप्प्याने पुढील क्लिनिकल चाचण्या घेतील.

- Advertisement -

इस्रायलने करोना विषाणूचा नायनाट करेल अशा अँटीबॉडी विकसित केल्या आहेत. या देशातील प्रमुख बायोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे.अँटीबॉडी विषाणूवर आक्रमण करतात आणि त्यांना शरीरात निष्क्रिय करतात. या लसीचा शोध लावणारी ही संघटना आता पेटंट मिळवण्याच्या प्रक्रियेत आहे. ते मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर याचे उत्पादन घेतले जाईल.

अमेरिकास्थित पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी जी लस शोधून काढली आहे तिचे प्रयोग प्राण्यांवर यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आता माणसांवर प्रयोग सुरू झाले आहेत. लसीसाठी या शास्त्रज्ञांनी एसएआरएस आणि एमईआरएसचा करोना विषाणू तयार केला होता. सार्स आणि मार्स विषाणू हे कोविड -१९ या नव्याने जन्मलेल्या करोना विषाणूंसारखेच आहेत. त्यामुळे लस शोधताना पिटसबर्गच्या शास्त्रज्ञांनी या विषाणूंचा आधार घेतला. या लसीने माणसाची विषाणूपासून मुक्तता होईलच; शिवाय त्याविरुद्ध लढण्याचे बळदेखील मिळेल, असा दावा संबंधित संशोधकांनी केला आहे.
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधित केलेल्या लसीचे सहा माकडांवर परीक्षण केले. काही माकडांमध्ये एका डोसमध्येच विषाणूविरुद्धची रोगप्रतिकारशक्ती वाढायला सुरुवात झाल्याचे १४ दिवसात दिसून आले. तर इतरांना सर्वसाधारण २८ दिवसांचा कालावधी लागला.त्यानंतर आता साधारणत: ८०० लोकांवर हे प्रयोग करण्यात येत आहेत. यातील ५० टक्के लोकांना लस दिली जाईल आणि उर्वरित ५० टक्के लोकांना मेनिंजायटिस या मेंदूशी निगडीत आजारावर काम करणारी लस दिली जाणार आहे. त्यानंतर या दोन्ही लसींचा तुलनात्मक परिणाम बघितला जाणार आहे. या संशोधकांनी इंग्लंडमध्ये सुमारे १० हजार २६० स्वयंसेवकांसह अनेकांवर या चाचण्या घेतल्या आहेत. संशोधन सुरू असलेली ही लस ChAdOx१ nCoV-१९ या नावाने ओळखली जातेय. कॅनडाच्या नॅशनल कौन्सिलने करोना विषाणूवर लस तयार करण्यासाठी चीनसोबत हातमिळवणी केली आहे. चीनची कंपनी आणि कॅनडाने संयुक्त पद्धतीने तयार केलेल्या Ad५-nCov लसीचे प्रयोग कॅनडामध्ये होत आहेत. सोनाफी आणि जीएसके या औषधनिर्माण करणार्‍या कंपन्यांनीही लस शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिवाय ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी प्राण्यांवर दोन लसींचे प्रयोग सुरू केले आहेत. त्यानंतर आता ते माणसांवर चाचणी घेणार आहेत.

सिगारेटमध्ये असणारे निकोटिन करोना विषाणूवर प्रभावी ठरू शकते का? यादृष्टीने फ्रान्समध्ये संशोधन सुरू आहे. निकोटिन पेशींना चिकटून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे पेशींमध्ये विषाणूच्या प्रवेशाचा मार्ग बंद होतो आणि करोना शरीरात फैलावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही थिअरी निकोटिनचा वापर करण्यामागे आहे. क्लिनिकल ट्रायलनंतर या संशोधनाचा फैसला होईल.

औषधनिर्मितीतही जगभरात संशोधने सुरू आहेत. विद्यमान औषधांच्या पुनरुत्थानावर प्रारंभीच्या पातळीत जोर देण्यात आला. त्यानंतर आता करोनाशी संबंधित स्वतंत्र औषध निर्मितीसाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. तसेच, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि युनानी या पॅथीही संशोधनात अग्रेसर आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या तिन्ही पॅथींची औषधे सध्या परिणामकारक ठरत आहेत. बांग्लादेशातील बेक्सिमको फार्मास्युटिकल्स कंपनीने करोना विषाणूला आळा घालणारे औषध बनवल्याचा दावा केला आहे. केवळ दाव्यावरच ही कंपनी थांबली नाही तर या औषधाच्या विक्रीला सुरुवातही केली आहे.

जगभरात करोनाची लस आणि औषधनिर्मितीसाठी संशोधने सुरू असताना भारतातील विविध विद्यापीठे, कॉलेज, शैक्षणिक संस्था यांनीदेखील यासाठी कंबर कसली आहे. करोनासंदर्भातील महत्त्वाचे संशोधन सर्वांना एकाच छताखाली उपलब्ध व्हावे आणि आपल्या अभ्यासाची दिशा ठरवण्यास मदत व्हावी यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाने नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आणि आयआयटी खरगपूरच्या सहकार्याने देशातील सर्व कॉलेज, विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांनी केलेले संशोधन एकत्र करण्यासाठी ‘करोना आऊटब्रेक : स्टडी फ्रॉम होम’ हे व्यासपीठ विकसित केले आहे. एकूणच आजवरची संशोधने बघता येत्या काही महिन्यात करोनाच्या प्रगत टेस्ट, लस आणि औषधे बाजारात उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे!

करोना संशोधने : चाचणी, लस अन् औषधनिर्मिती!
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -