घरफिचर्समायमहानगर ब्लॉगसेल्फ टेस्ट किटची तापदायक किटकिट!

सेल्फ टेस्ट किटची तापदायक किटकिट!

Subscribe

प्रशासनाने कोरोनाच्या घरगुती चाचणी संचांच्या (सेल्फ टेस्ट किट) विक्रीची माहिती ठेवणे आता उत्पादक कंपनी, मुख्य वितरक, वितरक, ठोक, किरकोळ औषध विक्रेते तसेच रुग्णालयांना बंधनकारक केले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) यासंबंधीचे आदेश सर्व वितरक आणि औषध विक्रेत्यांना दिले आहेत. सोबतच अशा किटची खरेदी करताना ग्राहकांना आधार कार्ड दाखवणंही बंधनकारक केलं आहे. कारण जे लोक अशा प्रकारे टेस्टिंग करतात ते त्याविषयीची माहिती लपवून ठेवतात. त्यामुळे सरकारसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. आता लोकांनी कोरोनाची सेल्फ टेस्ट करून लपवून ठेवणे टाळून रुग्णालयात जाऊन सेफ टेस्ट करावी. त्यामुळे स्वत:सोबत इतरांच्याही जीवाला धोका निर्माण होणार नाही.

मागच्या दोन वर्षांहून अधिक काळापासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातलंय. कोरोनाविषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर तरी कोरोनाचा प्रकोप थंडावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र ही महामारी अजूनही नवनव्या व्हेरियंटच्या रुपात समोर येऊन सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील करत आहे. आधी डेल्टा आणि आता ओमायक्रॉन व्हेरियंटच्या नावाने पसरत असलेल्या या संसर्गाला काबूत ठेवण्यासाठी आरोग्य व्यवस्था, स्थानिक प्रशासन अजूनही धडपडत असताना रॅपिड अँटिजेन टेस्ट किटच्या माध्यमातून घरच्या घरी कोरोना चाचणी करून आजार दाबून ठेवण्याकडे सर्वसामान्यांचा कल वाढत असल्याचं पुढं येत आहे. यामुळे कोरोना संसर्ग आणखी वेगात पसरण्याची भीती आहे. त्यामुळे अशा चाचण्यांना आवर घालण्याचं नवं आव्हान स्थानिक प्रशासनापुढं उभं राहिलं आहे.

गेल्या दोन वर्षांत कोरोनाने सर्वच स्तरातील लोकांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम केलेत. कित्येकांनी या महामारीच्या तडाख्यात आपले आप्तस्वकीय गमावलेत. तर असंख्य जण आर्थिक संकटाच्या खाईत लोटले गेलेत. त्यातही मध्यमवर्गींच्या हालाला तर पारावारच उरलेला नाही. एकापाठोपाठ एक लावण्यात आलेल्या लॉकडाऊन, जाचक अटी-निर्बंधांमुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागलाय. उत्पन्नावर कमालीच्या मर्यादा आल्याने घरचं बजेटही कोलमडून गेलंय. रोजच्या जगण्यासाठीही तारेवरची कसरत करावी लागतेय. कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागताच सगळं काही पूर्वपदावर येईल, अशी आशा मनात ठेवून प्रत्येकाने नव्या उमेदीने कामधंदा सुरू केला. मात्र ओमायक्रॉनने आपल्याकडेही धडक दिल्यावर राज्य सरकारने तात्काळ पावलं उचलत नव्याने निर्बंध लागू केले. त्यात जमावबंदीच्या निर्बंधांचाही समावेश आहे.

- Advertisement -

ओमायक्रॉन हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक वेगाने पसरत असला, तरी तुलनेने कमी घातक असल्याचे निष्कर्ष काही तज्ज्ञांनी अभ्यासाअंती काढलेत. त्यातच आपल्याकडे बहुतांश लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले नसले, तरी किमान एक डोस तरी घेऊन झालेला असल्याने सर्वसामान्यांमध्ये आता या संक्रमणाचे भय उरलेले दिसून येत नाही. याचाच प्रत्येक ठिकठिकाणच्या बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणं, पर्यटनस्थळांवर होत असलेल्या गर्दीकडे पाहून येतोय. निर्बंध घालूनही दर शनिवारी-रविवारी मुंबईतील चौपाट्यांवर इतकी गर्दी होत होती की अखेर प्रशासनाला इथे पोलिसांना तैनात करून लोकांना हटवावं लागलं. मात्र अजूनही बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणांवरील लोकांचा विनामास्क वावर सुरूच आहे. परिणामी राज्यात दरदिवशी 30 ते 40 हजारांच्या घरात नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यात ओमायक्रॉन व्हेरियंटने बाधित रुग्णांचं प्रमाणही लक्षणीय आहे.

कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढू लागताच त्याचा ताण आरोग्य व्यवस्थेवर पडतो. रुग्णालयातील खाटा अनावश्यकरित्या अडवल्याने गरजूंवर उपचार करण्यास अडचण येते. मागच्या दोन वर्षांत प्रशासनाला याची चांगलीच प्रचिती आली आहे. त्यामुळे लोकांना घरच्या घरी कोरोना चाचणी करता यावी यासाठी वर्षभरापूर्वी रॅपिड अँटिजेन टेस्ट किट (सेल्फ टेस्ट किट) विक्रीला मंजुरी देण्यात आली. या किटच्या माध्यमातून कोरोनाबाधितांची आकडेवारी कळावी, संसर्ग न पसरता रुग्णांवर योग्य वेळेत उपचार करता यावा, अशी माफक अपेक्षा प्रशासनाला आहे. परंतु या किटच्या माध्यमातून घरच्या घरी कोरोना चाचणी करून अहवाल दाबून ठेवण्याकडे सर्वसामान्यांचा कल असल्याचं दिसून येत आहे.

- Advertisement -

कुठल्याही औषध दुकानात रॅपिड अँटिजेन टेस्ट किट दोनशे ते अडीचशे रुपयांना अतिशय सहजपणे उपलब्ध होते. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनासदृश्य सौम्य लक्षणे आढळून आली की, लगेच घरच्या घरीच रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घ्यायची आणि फॅमिली डॉक्टरकडून औषधोपचार करून घ्यायचे आणि कोरोना निगेटिव्ह असा रिपोर्ट आल्यास सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त फिरारचे, अशी मानसिकता लोकांमध्ये बळावतेय. लसीचे दोन डोस घेऊनही कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यास पुन्हा एकदा घरी बसावे लागेल, कामधंद्यात अडचणी निर्माण होतील, प्रशासनाचे क्वारंटाईनचे निर्बंध पाळावे लागतील तसंच आपल्यामुळे इतरांनाही त्रास होईल, असा विचार यामागे आहे.

वातावरण बदलामुळे घरातील एकापाठोपाठ एक सदस्य आजारी पडत आहेत. आपल्याला नक्की कोरोनाची लागण झालीय की व्हायरल फिव्हर अशा संभ्रमातही अनेकजण आहे. अशा परिस्थितीत घाबरूनही अनेकजण घरच्या घरी टेस्ट करून खातरजमा करून कोरोनासंबंधी सुरक्षेचे नियम धुडकावून लावत आहेत. मात्र या होम टेस्ट किटचा दर्जा, त्यातील अचूकता यावर अजूनही प्रश्नचिन्ह असल्याने आपण कळत न कळतपणे कोरोनाचा संसर्ग पसरवत आहोत, याची जाणीव यापैकी अनेकांना नाही. असेलच तर ते जाणीवपूर्वक कित्येकांच्या आयुष्याशी खेळत आहेत. खरे तर राज्य सरकारने कोरोना आरटीपीसीआर चाचणीचे दर 350 रुपयांपर्यंत खाली आणून ठेवलेत.

राज्यातील कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला यापेक्षा जास्त दर आकारता येणार नाही अशी तरतूददेखील सरकारने करून ठेवली आहे. जेणेकरून कोरोना चाचणी करून घेताना कुणावरही आर्थिक ताण येऊ नये. शिवाय या चाचण्यांचे नमुने घरी येऊनदेखील गोळा करण्याची सुविधा करून देण्यात आलेली आहे. फरक फक्त एवढाच की या चाचणीचे अहवाल हाती यायला एक किंवा दोन दिवसांचा वेळ लागतो. अशा स्थितीत घरच्या घरी कोरोना चाचणी करून स्वत:सोबत दुसर्‍यांचा जीव धोक्यात घालणे नक्कीच चुकीचे आहे. कारण आपल्याकडून नकळतपणे लसीचे डोस पूर्ण न झालेल्या, वृद्ध, सहव्याधी असणार्‍या किंवा प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो, याची जाणीव अशी टेस्ट करून घेणार्‍याने ठेवली पाहिजे.

काही महिन्यांपूर्वी उल्हासनगरात निकृष्ट दर्जाच्या सेल्फ टेस्ट किटचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. लहान मुलांच्या हातून या सेल्फ टेस्ट किटचं पॅकेजिंग होत असल्याचं या व्हिडिओत दिसून येत होतं. या व्हिडिओने एकच खळबळ उडाली. प्रशासनाने तात्काळ ते ठिकाण शोधून काढत संबंधितांवर कारवाई केली. त्यात सांगण्यासारखी गोष्ट हीच की या होम टेस्ट किट कशा पद्धतीने तयार होतात. अशा किट बनवणार्‍या कंपन्यांनी अधिकृतरित्या परवाना घेतलेला आहे किंवा नाही, याची आपल्याला काही माहिती नसल्याने अशा किटचा वापर करून जर आपण चाचणी करत असू तर ती किती धोकादायक ठरू शकते, याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा. खरे तर सेल्फ टेस्टिंग हे लोकांच्या सोयीसाठी होते, पण त्याची दुसरी बाजू समोर आल्यावर त्याला आवरण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. आपल्या देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता दोन वर्षे उलटून गेलेली आहेत. अनेक लोकांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. इतकेच काय अनेकांना कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना असलेल्या आजारांवर योग्यरित्या उपचार करता आले नाहीत. त्यामुळे त्यांना आपले जीव गमवावे लागले आहेत.

भारताची लोकसंख्या जगातील दुसर्‍या क्रमांकाची आहे, इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात लसीकरणची प्रक्रिया राबवणे म्हणजे मोठे आव्हान आहे. तरीही आपल्या देशातील केंद्र आणि राज्य सरकारे तसेच इथल्या लोकांच्या समजुतदारपणाला जाते. कारण अनेक प्रगत देशांमध्ये लोकांनी लसीकरणाच्या विरोधात आंदोलन केला. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने होत असलेल्या या विरोधामुळे त्या देशांमध्ये कोरोनाच्या लाटेमागून लाटा येताना दिसत आहेत. खरे तर त्या देशात साक्षरतेचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे अशा लोकांनी जेव्हा सरकार अशा जीव वाचवणार्‍या लसीकरणाची प्रक्रिया राबवते, त्याला प्रतिसाद देणे आवश्यक होते. पण तसे होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेविकांचे आणि भारतीय जनतेचे कौतुक करायला हवे. कारण बहुसंख्य लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. भारतातही लसीला विरोध करणारे काही लोक आहेत. पण त्यांचे प्रमाण फारच कमी आहे. त्या उलट लोक मोठ्या प्रमाणात लस घेताना दिसत आहे. आता लोक बुस्टर डोसही पुढे घेऊन येत आहेत. लहान मुलांचेही लसीकरण होत आहे. अशा वेळी लोकांनी सेल्फ टेस्टिंग एक तर काळजीपूर्वक करावे किंवा संबधीत शासकीय रुग्णालयांकडे जाऊन आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.

सद्य:स्थितीत तरी प्रशासनाने कोरोनाच्या घरगुती चाचणी संचांच्या (सेल्फ टेस्ट किट) विक्रीची माहिती ठेवणे आता उत्पादक कंपनी, मुख्य वितरक, वितरक, ठोक, किरकोळ औषध विक्रेते तसेच रुग्णालयांना बंधनकारक केले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) यासंबंधीचे आदेश सर्व वितरक आणि औषध विक्रेत्यांना दिले आहेत. सोबतच अशा किटची खरेदी करताना ग्राहकांना आधार कार्ड दाखवणंही बंधनकारक केलं आहे. औषध विक्रेते, वितरक वा रुग्णालयाकडून संच विकत घेणार्‍यांची माहिती आल्यानंतर नियंत्रण कक्ष, तसेच आरोग्य अधिकार्‍यांकडून संच खरेदी करणार्‍या संबंधित व्यक्तीला फोन करून त्याच्याकडून माहिती घेण्याची पद्धत ठरवलेली आहे. राज्यातील इतर भागातही यासंबंधीची पद्धत ठरवण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याची खातरजमा करून घेण्यासाठी घरच्या घरी चाचणी करण्याऐवजी शासनमान्य प्रयोगशाळांनाच प्राधान्य द्यावे. जेणेकरून आपल्यासोबतच आपल्या संपर्कात येणारेही या संक्रमणापासून सुरक्षित राहतील.

–निलेश अहिरे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -