घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकोरोना प्रतिबंधाला तिसरा बूस्टर...

कोरोना प्रतिबंधाला तिसरा बूस्टर…

Subscribe

उच्चांक गाठणार्‍या गर्दीचे दोन आठवडे संपले. दिवाळीच्या निमित्ताने बाजाराला झळाळी मिळाली, पण दुसरीकडे हीच गर्दी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला निमंत्रण देते की काय अशी भयशंका अनेकांना डाचून गेली. अर्थात गेल्या महिन्याभराचा आढावा घेतला तर कोरोना प्रतिबंधासाठी ज्या बाबी पुढे आल्यात त्या निश्चितच संभावित तिसर्‍या लाटेला रोखण्यात परिणामकारक ठरतील किंवा तिसरी लाट आली तरी तिची तीव्रता कमी करण्यास याच बाबी उपयुक्त ठरतील. त्यात विशेषत: तिसरा बूस्टर डोस देण्याविषयी सुरू असलेल्या हालचाली, लहान मुलांना देण्यात येणारे डोस आणि इंग्लंडमध्ये पहिल्या अँटीव्हायरल गोळीच्या सशर्त वापरास मिळालेली मान्यता यांचा समावेश आहे.

दिवाळीचा सण यंदा जोरदारपणे साजरा झाला. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना या वैश्विक महामारीमुळे या सणाला जणू गालबोट लागले होते. यंदा मात्र बहुतांश नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक डोस घेतलेले असल्याने निर्धोकपणे त्यांनी बाजारात गर्दी केली. दिवाळीची मनसोक्त खरेदी केली. त्यामुळे आपसूकच सर्वत्र गर्दीचा महापूर होता. अर्थात निर्धोकपणे घरातून बाहेर पडलेल्या प्रत्येकाच्या मनात गर्दी बघून संभावित तिसर्‍या लाटेची शंका दाटली. त्यातच दिवाळीच्या काही दिवस आधी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोविडची लागण झाल्याने कोरोनाची चर्चा पुन्हा झडू लागली. दिवाळीच्या काळातही नवीन रुग्ण आढळून येतच होते. तुरळक प्रमाणात का होईना पण मृत्यूदेखील होत होते. गेल्या रविवारी राज्यात ८९२ नवे रुग्ण आढळून आलेत. तर १६ जणांचा मृत्यूही झाला. ही आकडेवारी कोरोना संपलेला नाही हीच बाब अधोरेखित करते. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वत्र प्रतिबंधात्मक डोसचे प्रमाण वाढवले आहे.

परंतु ज्यांना कोरोना होऊन गेला आणि त्यानंतर त्यांनी डोसही घेतला त्या लोकांना कोविड पश्चात गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन महिन्यात अशा आजारांनी मृत्यूमुखी पडलेल्यांचे प्रमाणही लक्षवेधी आहे. त्यामुळेच आता तिसर्‍या बूस्टर डोसची गरज व्यक्त होत आहे. म्युटेशन नंतर दररोज कोविड-१९ ची नवनवीन रूपे उदयास येत असल्याने व्हायरोलॉजिस्ट आणि रोग विशेषज्ञ बूस्टर डोससाठी जोर देत आहेत. जेणेकरुन लसीकरणाद्वारे नेहमीच शरीरात अँटीबॉडीज टिकून राहाव्यात. अधिकाधिक लोकांना बुस्टर डोस मिळवून दिल्यास रोगप्रतिकारक शक्तीदेखील कायम टिकून राहील आणि प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती घातक विषाणूविरूद्ध आक्रमण करण्यास सक्षम असेल.

- Advertisement -

शास्त्रज्ञांचा मते, बुस्टर डोसमुळे आपण बर्‍याच काळासाठी कोरोना संक्रमणापासून सुरक्षित राहू शकतो. कोरोना प्रतिबंधित लसीचे सुरुवातीचे दोनही डोस घेतल्यानंतर भविष्यात तिसरा डोस घेण्याची आवश्यकता आहे का, असा सवाल काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला केला होता. दोन्ही डोस घेतले असले तरी नागरिकांना कोरोना विषाणूच्या विविध घातक प्रकारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लसीच्या तिसर्‍या किंवा बूस्टर डोसची आवश्यकता भासू शकते असे सरकारने स्पष्ट केले. अर्थात बूस्टर डोसबाबत अद्याप केंद्र सरकारने काही ठोस निर्णय घेतलेला नाही. तथापि, ज्यांच्यात अँटिबॉडीजची पातळी कमी आहे, अशांनाच तिसरा डोस म्हणजे बूस्टर डोस देण्याबाबत भारतीय तज्ज्ञ जोर देत आहेत. भुवनेश्वरमधील इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सचे (आयएलएस) संचालक डॉ. अजय परिदा सांगतात की, देशात लसीकरण झालेल्यांपैकी २० टक्के लोकसंख्येमध्ये ‘सार्स कोव्ह-२’ या विषाणूविरोधात अँटिबॉडी विकसित झालेली नाही.

अशा लोकांनाच तिसर्‍या डोसची म्हणजेच बूस्टर डोसची गरज असेल.आयएलएसच्या २५ टक्के फॅकल्टी सदस्यांमध्ये अँटिबॉडीज निगेटिव्ह असल्याचे ताज्या संशोधनातून समोर आले. लसीकरणानंतर चौथ्या ते सहाव्या महिन्यांपर्यंतच्या काळात अँटिबॉडीजची पातळी कमी झाल्याचे दिसून आले. अनेकांमध्ये अँटिबॉडीजची ही संख्या ५० च्याही खाली आहे. अँटिबॉडीजची संख्या ६० ते १०० असणे म्हणजे ती व्यक्ती अँटिबॉडीज पॉझिटिव्ह असणे. म्हणजेच त्याच्यात पुरेशा अँटिबॉडीज आहेत, असे समजले जाते. कोव्हिशिल्डची परिणामकारकता ७० टक्के आहे तर कोव्हॅक्सिनची ८० टक्के. म्हणजेच लसीकरण झालेल्या २० ते ३० टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज विकसित झालेल्या असतीलच असे नाही. याबाबतचा वैद्यकीय अभ्यास अंतिम टप्प्यात असून, त्यावरच बूस्टर डोसची मान्यता ठरू शकेल. अर्थात कुणाला वैयक्तिक स्तरावर बूस्टर डोस घ्यायचे असतील तर त्याला कोणतेही सरकार हरकत घेऊ शकत नाही. सरकारचे प्राधान्य मात्र पहिल्या आणि दुसर्‍या डोसलाच आहे. हे दोन्ही डोस घेणार्‍यांचे प्रमाण वाढेल तेव्हाच सरकार बूस्टर डोसचा विचार करेल.

- Advertisement -

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे सांगितले जात आहे. तरीही अद्याप लहान मुले, म्हणजेच १२ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही. येत्या काही दिवसात झायडस कॅडिलाची कोरोना व्हॅक्सीन १२ ते १८ वयोगटातील मुलांना दिली जाऊ शकते. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनदेखील लवकरच उपलब्ध होऊ शकते. कोव्हॅक्सिनच्या फेज ३ चाचण्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच २ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण देशात सुरू होऊ शकते. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. चीन आणि रशियामध्ये कोरोना विषाणूने पुन्हा उचल खाल्ली आहे. त्यामुळे इतर देशांमधील लोकांच्या मनात भयशंका निर्माण होऊ लागली आहे. भारतात १०० कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

कोरोनाची लागण होणार्‍या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे, ही चांगली गोष्ट असली तरी त्याचसोबत लोकांची कोरोना नियमांविषयीची बेफिकीरी वाढताना दिसत आहे. कारण गेल्या वर्षी याच वेळी आता कोरोना गेला असे लोकांना वाटल्यामुळे गावोगावच्या जत्रा सुरू झाल्या होत्या, शहरातही लोक बेफिकीरीने गर्दी करू लागले होते. लस घेण्याविषयी उदासीन झाले होते. आताही कोरोनाचा प्रभाव बर्‍यापैकी ओसरल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्याबाबत लोक टाळाटाळ करत आहेत. सरकार लोकांना दोन्ही डोस घेण्याचे आवाहन करत आहे, पण बरेच लोक त्याकडे आता कोरोना गेला म्हणून दुर्लक्ष करत आहेत. सरकारच्या प्रयत्नांना लोकांचे सहकार्य मिळण्याची गरज असते, तरच कुठलीही उपाययोजना यशस्वी होेऊ शकते.

कोविड उपचार पद्धतीत आणखी एक महत्वाची उपलब्धी म्हणजे अंँटीव्हायरल गोळ्यांची निर्मिती. इंग्लंडने कोरोनाच्या यशस्वी उपचारासाठी उपयुक्त मानल्या जाणार्‍या जगातील पहिल्या अँटीव्हायरल गोळीच्या सशर्त वापरास मान्यता दिली आहे. ही गोळी किती लवकर उपलब्ध होईल हे स्पष्ट नसले तरी या गोळीने उपचार करणे योग्य असल्याचे ओळखणारा इंग्लंड हा पहिला देश आहे. १८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या कोरोना संक्रमित लोकांना ही गोळी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही गोळी त्या एन्झाईम्सला लक्ष्य बनवते जे व्हायरस आपलं पुरुत्पादन करण्यासाठी वापरतो. या गोळीमुळे त्या व्हायरसच्याच जेनेटिक कोडमध्ये गडबड होते आणि त्याला स्वतःच्या प्रतिकृती बनवता येत नाहीत. त्यामुळे शरीरातली व्हायरसची संख्या मर्यादित राहते आणि रोगाची तीव्रता कमी होते. ज्यामध्ये किमान एक घटक दिसून येतो ज्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते. या गोळीचे नाव ‘मोल्नुपिरावीर’ आहे. कोविडचा सौम्य संसर्ग असलेल्या लोकांना ही गोळी दिवसातून दोनदा घ्यावी लागेल. ही अँटीव्हायरल गोळी कोरोनाची लक्षणे कमी करते आणि लवकर बरे होण्यास मदत करते. रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी आणि गरीब देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. ही गोळी साथीच्या रोगाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन पद्धती, औषधोपचार आणि प्रतिबंध यासाठी उपयुक्त ठरेल.

अमेरिका, युरोप आणि इतर काही देशांतील संबंधित या औषधाचा आढावा घेत आहेत. कोविडवर उपचार म्हणून निर्माण करण्यात आलेली ही पहिली अँटी-व्हायरल गोळी आहे जी इंजेक्शनच्या स्वरुपात न देता तोंडावाटे घेता येते. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने गेल्या महिन्यात सांगितले की ते गोळीची सुरक्षा आणि परिणामकारकता शोधण्यासाठी नोव्हेंबरच्या अखेरीस पॅनेलची बैठक बोलावतील. औषध निर्माता कंपनी ‘मर्क’ने हे औषध विकसित केले आहे. ऑक्टोबरमध्ये इंग्लंडच्या अधिकार्‍यांनी जाहीर केले होते की त्यांनी ‘मोल्नुपिरावीर’चे ४ लाख ८० हजार डोस मिळवले आहेत आणि या हिवाळ्यात आणखी हजारो लोकांवर उपचार करण्यात मदत होण्याची अपेक्षा त्यांना आहे. एकूणच कोरोनाचा कालखंड जसा वाढत आहे तसतशा नवनवीन उपचार पद्धतीही पुढे येत आहेत. त्यातून कोरोना प्रतिबंधाला निश्चितच बूस्टर मिळेल अशी अपेक्षा!

कोरोना प्रतिबंधाला तिसरा बूस्टर…
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -