घरफिचर्समायमहानगर ब्लॉगगर्दीत माणसांच्या चेंगरला कोरोना !

गर्दीत माणसांच्या चेंगरला कोरोना !

Subscribe

ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नागपूर, पुणे या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या भागात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेत आहेत. नागपूरच्या काही भागात अंशतः लॉकडाऊन लागू करण्यातही आला आहे. प्रशासकीय आणि महापालिका यंत्रणांनीही याबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा, विरोधक आणि स्वतः नागरिकही कोरोनाच्या इशार्‍यांना आता गांभीर्याने घेत नाहीत. लोकल, बसेसच्या गर्दीत कोरोना चेंगरून मेल्याचा भ्रम अंगवळणी पडलेला आहे.

विधिमंडळाचे अधिवेशन नुकतेच संपले. कोरोनाच्या विषयावर सभागृहात ज्या (गांभीर्याने) चर्चा झाली, ती पाहता सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही कोरोनाचे गांभीर्य संपल्यात जमा असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा धोका, उपाययोजना हा आता राजकीय विषय राहिलेला नाही. त्याचे राजकीय उपद्रवमूल्य संपलेले असले तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. मागील वर्षी याच काळात कोरोनाच्या लॉकडाऊनच्या चर्चेला सुरुवात झाली होती. आणखी दहा दिवसांनी म्हणजेच 22 मार्च रोजी एक दिवसाची कडक संचारबंदी लागू झाली. त्याच दिवशी थाळी बडवणे कार्यक्रम झाला. पुढे आपण सर्वांनी मिळून दिवेही लावले. पण त्याने कोरोना काही पळून गेला नाही. ठाणे, पुण्यात आणि मुंबईतील धारावी, कुर्ला अशा जादा लोकसंख्येची घनता असलेल्या भागात कोरोना पसरण्याचा धोका असताना महापालिका, सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनाने केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने कोरोनाला नियंत्रणात ठेवल्याचा अनुभव सुखद होता.

कोरोनाने रोजगार हिरावल्याने कामगारांचे जत्थेच्या जत्थे पायपीट करत गावी निघाल्यावर ज्या घटना घडल्या त्या कोरोनाच्या प्रत्यक्ष आजारापेक्षा कमी हानीकारक नव्हत्या. मागील वर्षात रोजगार हिरावल्याने आत्महत्येच्या घटना वाढल्या. ताणतणाव आणि नैराश्याने भवताल झाकोळला होता. बाजारपेठा, दुकाने बंद त्यातच रस्त्यावरच्या शुकशुकाटाने भीतीत भर घातली. रस्त्यावर उगाचच फिरणार्‍यांवर पोलिसांच्या कारवाईचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. या परिस्थितीत माध्यमांवर सातत्याने कोरोना रुग्णवाढीचा चढता आलेख दाखवल्यानंतर घराघरात कोविड 19 ची धास्ती होती. माणूस माणसांपासून दुरावत असताना कोरोनाने इथल्या माणसांच्या जगण्यावर नक्की कितपत परिणाम केला, याचा ताळेबंद लॉकडाऊनच्या जवळपास वर्षभरानंतर आता लक्षात येऊ लागला आहे.

- Advertisement -

देशात थाळ्या वाजवल्यानंतर आणि दिवे लावल्यानंतरही कोरोना काही पळून गेला नाही. मागील वर्षी याच काळात लोकल ट्रेन बंद होण्यासोबत अनेकांचे रोजगारही बंद झाले. त्यातून कुटुंब आणि घर चालवण्याच्या, दैनंदिन गरजा भागवताना होणारी कसरत वर्षभरानंतरही संपलेली नाही. सेवा, उद्योग, उत्पादन, कारखानदारी, कौशल्यविकास, माध्यमक्षेत्रे, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रे मागील वर्षभरात कर्जाच्या बोजाखाली दबलेली असल्याने झालेली नोकरकपात अजूनही सुरूच आहे. लॉकडाऊन लागू होण्याला लवकरच वर्ष होईल, या काळात अनेकांनी नोकर्‍या उद्योगधंदे गमावले, मात्र त्याहून मोठे दुःख हे माणसे गमावल्याचे होते. अजूनही कोरोनाचा कहर सुरूच आहे. मात्र वर्षभरात आपल्याला त्याची सवय झालेली आहे. भारतीय त्यातही मुंबईकर परिस्थितीशी अगदी सहज तडजोड करतो. ही दैनंदिन अडजस्टमेंटच त्याचं जगणं झालेलं असतं. या हतबलतेला स्पिरीटचं नाव देऊन आपण आपल्या नामुष्कीवर पांघरूण घालत असतो. त्यामुळेच वर्षभरानंतही आपल्याला कोरोनाने धडा शिकवलेला नसतो. आता आपण कोरोनालाही निर्ढावलेलो असतो. त्यामुळेच लोकल ट्रेन सुरू झाल्यावर खिडकीतून पचापच थुंकण्याचा अधिकार आपण त्याच जबाबदारी बजावत असतो.

कोरोना काळात मास्कचा झालेला काळाबाजार आपल्या अंगवळणी पडलेला असतो. वर्ष 2020 मध्ये हातोहात दिसणारे सॅनिटायझरच्या रिकाम्या बाटल्या आता कचर्‍यात गेलेल्या असतात. मास्क काढून बसलेल्यांनी कोरोनाला लोकलच्या गर्दीत चेंगरून संपवलेलं असतं. मूर्खांचा मेंदू गुडघ्यात असल्याचं म्हटलं जातं, परंतु मूर्खांची तोंडे हनुवटीत असल्याचं कोरोनाच्या मुखपट्टीने दाखवलेलं असतं. त्यामुळेच असे मूर्ख शिरोमणी आपली हनुवटीतली तोंडे लपवून लोकल, बसेसच्या डब्यात बेजबाबदारीने बसलेली असतात. सातत्याने मास्क लावल्याने श्वास घुसमटतो हे जरी खरं असलं तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क काढण्याची निष्काळजी जीवघेणी ठरू शकते, हे वर्षभरानंतरही आपल्याला लक्षात आलेलं नसतं. दुसरीकडे कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या रेल्वे स्टेशन, मोबाईल कॉलरवर वाजणार्‍या सूचना आपल्या अंगवळणी पडलेल्या असतात.

- Advertisement -

कोरोना आता जगण्याचा सहज भाग झालेला असतो. मागील वर्षी एप्रिल मे महिन्यात एखाद्या इमारतीत कोरोना रुग्ण आढळल्यावर त्या इमारतीकडे येणारा जाणारा रस्ता नाकाबंदी करून बंद केल्यावर होणार्‍या चर्चा वर्षभरात पूर्ण थांबलेल्या असतात. परिस्थिती आता सामान्य असते. एखाद्या नगरात, गावात, इमारतीत एखादी व्यक्ती पॉझिटीव्ह आढळली मागील वर्षी निर्माण झालेली कुतूहल, भीती वर्षभरानंतर आता संपलेली असते. आता कोरोना पॉझिटीव्ह होणं ही सामान्य बाब झालेली असते. नक्की यात आपण कोरोना या आजारावर खरोखरोच मात केलीय की, या आजारासोबत जगण्याची आपण स्वतःला सवय लावली आहे. या दोन प्रश्नांच्या उत्तरात आपला वर्षभरानंतरही उडालेला गोंधळ कायम असतो.

कोरोना झाल्याने होणारी माणसाच्या शरीराची हानी मोठी असते, परंतु त्याहून मोठे त्याचे सामाजिक, कौटुंबिक आणि राजकीय परिणाम आपण वर्षभरात भोगलेले असतात. कोरोना काळात थांबलेल्या अर्थार्जनामुळे प्रपंचाचा गाडा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. कोरोना काळात उदरनिर्वाहासाठी केलेल्या आर्थिक तडजोडींचा बोजा खांद्यावर वाढलेला असतो. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत आयुष्य जगण्याची कला आपण शिकलेलो असतो. देशाचा जीडीपी, महागाई, इंधन दरवाढ आदी प्रश्न पुन्हा आपल्या जगण्याचा भाग झालेल्या असतात. वर्षभरानंतर कोरोनाने आपल्याला काय शिकवले, तर केवळ आपल्या तडजोडीत भर टाकण्याचा धडाच आपण कोरोनाकडून शिकलेलो असतो.

सार्वजनिक स्वच्छता, हिरावलेल्या रोजगाराचा दोष कोरोनावर ढकलून आपण सत्तेला आणि यंत्रणांना माफ केलेलं असतं. हे असंच झालेलं असतं, सुरू असतं आणि पुढेही होणार असतं. कोरोना काळातील शेती, कारखानदारीचीही झालेली हानी आपल्याला कोरोनाचाच परिणाम वाटत असते. हे प्रशासन आणि सरकारी धोरणाचे अपयश असल्याचे आपल्याला पटत नसते. कोविड काळात झालेला भ्रष्टाचार आणि वैद्यकीय क्षेत्रातील संकटातून संधी शोधणार्‍या संधीसाधूंचा कोविड भीतीचा वर्षभरात झालेल्या बिझनेसबद्दल सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही चर्चा होत नाही. वर्षभरात कोरोनाकाळात माणसांनी माणसांना केलेल्या मदतीच्या आख्यायिका आता इतिहासजमा झालेल्या असतात. हे असं असताना कोविडची लस बाजारात आलेली असते.

कोरोना रुग्णांची आकडेवारी पेपरातून आणि माध्यमांच्या पडद्यांवरून कमी झालेली असते. लस देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना धोरणांची घोषणा केली जाते. प्रत्यक्ष लसीकरणही सुरू होते. लस घेताना, देतानाची छायाचित्रे थम्स अप करून समाजमाध्यमांवर टाकली जातात. वर्षभरानंतर कोरोना इतका अंगवळणी पडलेला असतो की त्याच कुणालाच सोयरंसुतक नसतं. कोरोना काळात ज्यांचे जीव गेले त्या पोलीस, वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या कुटुंबांना सरकारी मदतीचा धनादेश देऊन आपण आपण आपल्या जबाबदारीतून सुटका करून घेतलेली असते. कोरोना काळात उन्हातान्हात पायपीट करत आपल्या परराज्यातील गावी जाताना रस्त्यावरच भुकेने मेलेल्या गरीब कामगार विस्मृतीत गेलेले असतात. कोरोनाकाळात उदरनिर्वाहाचे साधन बंद झाल्याने झालेल्या आत्महत्या कधीच मागे पडलेल्या असतात. कोरोनाने बदलेली माणसांची आर्थिक, सामाजिक स्थिती हे आपलं भूतकाळातलं प्रारब्ध समजून आपण कोरोनाशी केव्हाच तडजोड केलेली असते.

खरंतरं आपल्यातील सुरक्षा यंत्रणा वगळता आपण कोरोनाविरोधात लढा दिलेलाच नसतो. आपण वाट पाहत असतो ती कोरोना काळातील संकटाशी तडजोड करून जगण्याची संधी कधी मिळते याचीच. त्यालाही आपला कौटुंबिक नाईलाज असतो, संकटाशी लढण्याची व्यवस्था संस्था, संघटना, राजकीय पक्ष, नेते आणि सरकारने करावी, ते आपले काम नाही, यावर आपला ठाम विश्वास असतो. त्यामुळेच कोरोनाचे दाट धुके काहीसे विरळ होताच, पुन्हा आपण बेपर्वा होतो, आपल्या मूळ वागण्यावर येतो. प्रतिबंधात्मक नियम मोडण्याला आपला अधिकार समजू लागतो, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणारा आपल्याला मूर्ख वाटू लागतो. सॅनिटायझर बाळगणारा आणि वारंवार हात धुणारा वर्ष लोटलेल्या काळाच्या स्पर्धेत खूपच मागे असल्यासारखा मागास वाटू लागतो, मात्र कोविडचा विषाणू संपलेला नसतो. माणसं कधी चुकत आहेत याची वाट पाहत तो सापळा लावून बसलेला असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -