किळसवाण्या राजकारणाचा कुटिल कळसाध्याय!

२८८ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत उद्या कदाचित आकड्यांचा खेळ यशस्वी झाला तर भाजप आणि शिंदेसेनेचे सरकार अपक्षांच्या मदतीने विराजमान होईल. यात भाजपचे १०२ हून अधिक आमदार असल्याने सरकारमध्ये सब कूछ भाजपच असणार आहे. बंड केले म्हणून शिंदे कदाचित उपमुख्यमंत्री होतील आणि वाट्याला ७-८ कॅबिनेट मंत्रिपदे येतील. भाजपची कार्यशैली पाहता पुन्हा घुसमट होणार नाही याची शिंदे यांना मनातून नक्कीच खात्री नसेल. यदाकदाचित घुसमट झालीच तर ते पुन्हा बंड करणार काय, असा सवाल कुणीही उपस्थित करेल. सत्तेसाठी सर्व नीतीमूल्ये पायदळी तुडवून सर्वसामान्य माणसाला गृहीत धरले जात आहे.

गेल्या सोमवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक पार पडली. शिमगा सरला तरी कवित्व उरते या उक्तीप्रमाणे या निवडणुकीतील ‘चमत्कारा’ची चर्चा काही दिवस झाल्यानंतर पुन्हा सर्व काही सुरळीत होईल असेच अनेकांना वाटत होते. प्रत्यक्षात वेगळच घडलं. शिवसेनेचे गटनेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही सहकारी आमदार बंडाचा झेंडा हाती घेत सोमवारी रात्रीच सुरतकडे निघाले. मंगळवारचा दिवस उजाडलाच तो मुळी या सनसनाटी वृत्ताने! तिथपासून महाराष्ट्राचे राजकारण महाविकास आघाडी, भाजप आणि शिंदेसेना यांच्याभोवती फिरत आहे. सुरत असुरक्षित वाटू लागले म्हणून सर्व बंडखोरांना आसामच्या गुवाहाटीमध्ये हलविण्यात आले. शिंदे यांना सामील असलेले मुंबईहून गुवाहाटीत पोहचले. भाजप नेत्यांच्याही गुवाहाटी वार्‍या सुरू झाल्या. (Crooked keys of disgusting politics!)

मुंबईपासून रस्तामार्गे गुवाहाटी जवळपास २८०० किलोमीटर दूर आहे. तरीही दादर-पुणे या शिवनेरी बसच्या फेर्‍या सतत सुरू असतात तशी गुवाहाटी-मुंबई विमानसेवा सुरू ठेवण्यात आली की काय, ते समजलेले नाही. शिंदे यांनी या बंडाला कुणाचे बळ मिळाले याचा गौप्यस्फोट (!) केला असला तरी आसामात भाजपचे सरकार असताना तेथे या महाराष्ट्रवीरांची बडदास्त अन्य कोण ठेवणार? स्वाभाविक या बंडामागे भाजप आहे, हे उघड गुपित होते. शिंदे यांनी स्वतः त्यांना एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे बळ असल्याचे सांगितले आणि लगेचच शिवसेनेतील बंडामागे भाजपचा हात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगून टाकले. या एकंदरीत सर्व घडामोडींवरून भाजप महाराष्ट्राची सत्ता ताब्यात घेण्यासाठी किती आसुसलेली आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले.

हेही वाचा – स्क्रिप्टेड राजकारण की भोळा विश्वास?

शिंदे यांचे बंड ठरवून झाल्याचे अगदी पहिल्या दिवसापासून बोलले गेले. मात्र अद्याप तरी या बोलण्याला बळकटी मिळेल असे शिवसेनेतून काही घडलेले नाही. ठाकरे यांना उघड आव्हान देणारे शिंदे यांच्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. ज्या पक्षाने मोठे केले, ज्या पक्षाने सन्मान दिला त्याच पक्षावर उलटण्याचा डाव अनेकांना आवडलेला नाही. कट्टर शिवसैनिक तर रस्त्यावर उतरून याचा जाहीर निषेध करीत आहेत. पक्षशिस्त पाळावी अशी प्रत्येक पक्षाची आचारसंहिता असली तरी मोठं होण्याच्या ईर्षेने पेटलेले नेते कुरघोडीचे राजकारण करण्याची संधी कधी सोडत नसतात. यातूनच बंडखोरी होते. प्रत्येक पक्षाला बंडखोरीला सामोरे जावे लागतेय. काँग्रेससारखा जुना पक्षही बंडखोरीच्या समस्येने ग्रासला आहे. शिवसेनेला बंडखोरी नवीन नाही. ज्यांच्या शब्दात दरारा होता त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच चार तगड्या नेत्यांनी बंड केले. एक नेता तर त्यांच्याच घरातील होता.

१९९१ मध्ये छगन भुजबळ यांनी बंड केले. १९९९ मध्ये नवी मुंबईचे गणेश नाईक, २००५ मध्ये नारायण राणे, तर त्याच वर्षात दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी बंड करीत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर शिवसेनेतील प्रबळ नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेत थेट नेतृत्वालाच आव्हान देण्याचे धाडस केले आहे. या बंडाची तयारी एका रात्रीत झालेली नाही, तर दोन महिन्यांपासून या बंडाची तयारी सुरू होती. शिंदे यांनी त्यांच्या विश्वासू सहकार्‍यांकडे तशी वाच्यताही केली होती. बंड करा पण हिंदुत्वाचा मुद्दा सोडू नका, असा सल्ला काहींनी शिंदे यांना तेव्हा दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याची शिवसेना नेतृत्त्वाला कुणकुण लागली नाही, की त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. शिंदे यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे कुटुंबावर निःस्सीम प्रेम करणारे शिवसैनिक संभ्रमावस्थेत सापडणे सहाजिक आहे.

हेही वाचा – अफगाणिस्तानात सांस्कृतिक संहार, भारतासाठी धोक्याची घंटा!

राजकारण हे खेळीमेळीचे असावे किंवा जय-पराजय खिलाडूवृत्तीने घ्यावा, असे सर्वसाधारण संकेत आहेत. अलिकडे याला तिलांजली देत (हसत-खेळत) सुडाचे राजकारण सुरू झाले आहे. ज्या ठिकाणची सत्ता आपल्याला पाहिजे ती कशीही, काहीही करून मिळवायची, असे किळसवाणे राजकारण सुरू झाले आहे. एका पक्षातून निवडून यायचे आणि विकास कामांचे कारण देऊन दुसर्‍या पक्षात जायचे हे या बोटावरची थुंकी त्या बोटावर झेलण्यासारखे झाले आहे. महत्वाकांक्षा असावी, पण ती इतकीही असू नये की आपल्याच पक्षाला खिंडीत गाठून हवे ते पदरात पाडून घ्यावे. राजकारण कोळून प्यायलेल्या ठाकरे घराण्यातील उद्धव यांना प्रशासकीय कामाचा अनुभव नसताना त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची धुरा खांद्यावर घेतली. त्यांच्या दुर्दैवाने कोविडमध्ये दोन वर्षे गेली. तरीही राज्याचा प्रमुख म्हणून त्यांनी संयमाने कारभार केला हे नाकारता येणार नाही. एकेकाळच्या हाडवैरी असलेल्या काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्या अगोदर शिवसेना भाजपसोबत ५ वर्षे सत्तेत होती. दोन्ही वेळेला एकनाथ शिंदे मंत्री होते आणि चांगली खातीही त्यांच्या वाट्याला आली. यावेळी तर नेहमी मुख्यमंत्र्यांकडे राहिलेले अतिशय महत्त्वाचे नगरविकास खाते शिंदेंना देण्यात आले होते.

अडीच वर्षे शिंदे या सरकारमध्ये असताना त्यांना हिंदुत्व आठवले नाही किंवा त्यांनी कधी जाहीर नाराजीही व्यक्त केल्याचे ऐकीवात नाही. असे अचानक काय झाले की शिंदे यांना अचानक दोन्ही काँग्रेस नकोश्या झाल्या? याचे उत्तर सरळ आहे, ‘मोठ्या’ पक्षाने काही तरी मोठे आमिष दाखविले असणार! युती सरकार असताना आमची ५ वर्षे सडली, असे हेच शिंदे सांगत होते. त्यावेळी आणि नंतर अडीच वर्षे नकोसा असणारा भाजप त्यांना एकाएकी हवाहवासा वाटतो यातील ‘अंदर की बात’ आता सर्वसामान्यालाही कळू लागली आहे. इथे लक्षात घ्यायला पाहिजे की शिंदे ज्या हिंदुत्वाचा मुद्दा आता वारंवार पुढे करीत आहेत तो शिवसेनेने कधीच सोडलेला नाही, किंबहुना मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा-समारंभातून, महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून जाहीररित्या त्याची शिवसैनिकांना ग्वाही दिली आहे.

आता शिंदे यांना भाजपचा हिंदुत्व मुद्दा बावनकशी सोन्यासारखा वाटत असेल तर भाग वेगळा! खर तर शिंदे हे मंत्रिमंडळात ज्येष्ठ मंत्री आणि शिवसेनेतही ज्येष्ठ नेते आहेत. सरकारचे प्रमुख आणि पक्षाचेही प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढचे पाऊल उचलले असते तर त्यांना अधिक सहानुभूती मिळाली असती. त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची या राज्याला गरज असताना त्यांनी कुणा तरी ‘मोठ्यां’च्या आहारी जाऊन टोकाचे पाऊल उचलणे अनेकांना पटलेले नाही. राजकारणात आता ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावरून शिंदे बंड मागे घेण्याच्या मनःस्थितीत दिसत नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्यासाठी पक्षाचे दोर कापून टाकल्यात जमा आहेत.

२८८ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत उद्या कदाचित आकड्यांचा खेळ यशस्वी झाला तर भाजप आणि शिंदेसेनेचे सरकार अपक्षांच्या मदतीने विराजमान होईल. यात भाजपचे १०२ हून अधिक आमदार असल्याने सरकारमध्ये सब कूछ भाजपच असणार आहे. बंड केले म्हणून शिंदे कदाचित उपमुख्यमंत्री होतील आणि वाट्याला ७-८ कॅबिनेट मंत्रिपदे येतील. भाजपची कार्यशैली पाहता पुन्हा घुसमट होणार नाही याची शिंदे यांना मनातून नक्कीच खात्री नसेल. यदाकदाचित घुसमट झालीच तर ते पुन्हा बंड करणार काय, असा सवाल कुणीही उपस्थित करेल. सत्तेसाठी सर्व नीतीमूल्ये पायदळी तुडवून सर्वसामान्य माणसाला गृहीत धरले जात आहे. शिंदे आणि त्यांना जाऊन मिळालेले शिवसेनेतील आमदार शिवसैनिकांनी घाम गाळल्यामुळे निवडून आले आहेत. सर्वच शिवसैनिकांना त्यांची ही भूमिका मान्य आहे अशातला भाग नाही. पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जिल्हा पदाधिकार्‍यांना संबोधित करताना शिंदे आणि त्यांना जाऊन मिळालेल्यांना खडे बोल सुनावले आहेत. पक्षाची मुळं आपल्यासोबत असल्याचे सूचक वक्तव्य करून शिवसैनिकांत सुरू असलेली चलबिचल थोपविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

शिंदे यांनी आकडेवारीचा खेळ मांडताना शिवसेना पक्षच ताब्यात घेण्याची तयारी चालविली आहे. उठता-बसता ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जप करता तोच पक्ष आकड्यांचा खेळ करून थेट ताब्यात घेण्याचा मनसुबा आम्हाला मान्य नाही, हे ठाकरे यांना मानणारे शिवसैनिक सांगत आहेत. भविष्यात शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडे गेले तरी ते टिकून राहील, याची शाश्वती शिंदे यांनाही नसेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. या एकूणच घडामोडीनंतर कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्राचे राजकारण, असे वाटत आहे. एकीकडे सत्तेसाठी आसुसलेल्यांची धडपड आणि दुसरीकडे सत्ता टिकविण्यासाठी धडपड सुरू आहे.

कोविडचा भयावह काळ संपत नाही तोच राजकारण ढवळून निघाले आहे. याकडे पाहिल्यानंतर राज्यात एकही प्रश्न उरलेला नसावा असेच जणू वातावरण आहे. जनतेच्या पैशांतून चाललेली ही राजकीय झोंबाझोंबी उबग आणणारी आहे. किळसवाण्या राजकारणाचा कळसाध्याय सुरू झाल्यासारखे वाटते. सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवर आज कुणीही बोलत नाही. खुर्चीच्या खेळात या जनतेची कुतरओढ सुरू आहे. प्रगत महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ सुरू आहे तो महाराष्ट्रापेक्षा कैकपटीने मागे असलेल्या आसामच्या गुवाहाटीमध्ये! तेथे पुराची परिस्थिती भयावह असताना शिंदेसेनेची बडदास्त ठेवण्यात त्या राज्याचे मुख्यमंत्री गुंतल्याने आसाम काँग्रेसने निदर्शने करीत निषेध केला. अर्थात कुणाच्या निषेधामुळे काही फरक पडेल इतके राजकारणी बिलकूल संवेदनशील राहिलेले नाहीत.

काहीही करून सत्ता मिळवायची हेच ध्येय गेल्या काही वर्षांत सर्वश्रेष्ठ ठरले आहे. निवडून एकीकडे यायचे आणि निष्ठा दुसरीकडे वाहायच्या हा प्रकार थांबण्यातला नाही. जनताही आता हे चाळे पाहून बधीर झाली आहे. चाललेल्या प्रकाराबद्दल कुणीही बोलायची हिंमत करू शकणार नाही. शिंदे आणि त्यांचे शिलेदार जेव्हा निवडणुकीला सामोरे जातील तेव्हा ते जनतेला काय सांगणार, हा औत्सुक्याचा विषय राहील. राजकीय कुरघोड्या असाव्यात, त्याच्याशिवाय राजकारणात रंगतही नाही, असे घटकाभर मान्य केले तरी त्या उबग आणण्याइतपत नसाव्यात हे नक्की आहे. शिवसेना विरुद्ध शिंदेसेनेत कोण बाजी मारणार, हे लवकरच समजेल. तोपर्यंत हा खेळ फुकटात पाहणे इतकेच आपल्या हाती आहे. या सत्ताखेळात आपले पंढरीच्या वारीकडेही दुर्लक्ष झाले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चर्चाही नाही.