घरफिचर्समायमहानगर ब्लॉगशाहरुख खानला सहानुभूती कशासाठी?

शाहरुख खानला सहानुभूती कशासाठी?

Subscribe

व्यसनमुक्तीचा संदेश देणारे महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबरला संपूर्ण देश साजरी करत असताना त्याच दिवशी एका मोठ्या ड्रग्ज पार्टीचा भांडाफोड नाकोर्र्टिक्स कंट्रोल ब्युरोने केला. क्रूझवर पार्टी करण्यासाठी अमलीपदार्थ घेऊन गेल्यावरून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली. अनेक सेलिब्रिटींनी निर्लज्जपणे शाहरुख खानला पाठिंबा दिला. त्यात राजकारण्यांचाही समावेश होता. इतकेच नव्हे तर शाहरुखचे चाहते म्हणवणारे अनेकजण ‘मन्नत’ बंगल्याबाहेर उभे राहून सहानुभूती व्यक्त करत होते. थोडक्यात काय, तर आपण लाज कोळून प्यायलोय.

नीती-अनितीशी आपला काहीही संबंध नसल्यागत आपण वागत आहोत. शाहरुख खानने आजवर असे कोणते काम केले आहे की, त्याला आपण आदर्श मानले पाहिजे? त्याने देशाचा गौरव वाढवणारी अशी कोणती एक गोष्ट केली, ज्यामुळे आपलीही मान अभिनानाने उंचावली. त्याने जे चित्रपट केलेत, तो त्याच्या कामाचा भाग होता. तो कलाकार म्हणून उत्तम असू शकतो. माणूस म्हणून मात्र साशंकता आहे. ‘शाहरुख एक बाप आहे आणि अशा बिकट परिस्थितीत बापाच्या भावविश्वातही डोकावून बघायला हवे की, तो सध्या किती व्यथित असेल’ वगैरे वगैरे ‘महान’ विचार काही मंडळी समाजमाध्यमांवर मांडताहेत. शाहरुख खानने ज्या कष्टातून त्याचे नाव कमावले त्याला जागून तो जमिनीवर राहिला असता तर कदाचित तो आदर्श ठरू शकला असता. त्याने मोठ्या संघर्षातून नाव कमवले, हे मान्य करावेच लागेल. पण नाव कमावल्यानंतर त्याने समाजासाठी फार काही योगदान दिले नाही.

कोरोनाकाळात दिलेले रेमडेसिवीर, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निधीत दिलेली मदत वगैरेंसारख्या गोष्टी त्या-त्या वेळी माध्यमांनी उचलून धरल्या. पण त्याच्याकडे असलेली संपत्ती, समाजाप्रती तो निभावत असलेले दायित्व यात मोठी तफावत जाणवते. आज भारतातील सर्वात श्रीमंत सुपरस्टारच्या यादीत त्याचा समावेश होतो. तो कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक आहे, ज्याच्या वाहनांच्या यादीत एकापेक्षा अधिक अलिशान वाहनांची नावे समाविष्ट आहेत. फोर्ब्स मॅगझिनने शाहरुखचे नाव गडगंज श्रीमंत कलाकारांच्या यादीमध्ये नमूद केले आहे. त्याची एकूण मालमत्ता जवळपास ६०० मिलियन डॉलर इतकी आहे. त्याच्या बंगल्याची किंमतही २०० कोटींच्या आसपास सांगितली जाते. अशी पार्श्वभूमी असलेल्या कलाकाराकडून खरेतर मोठे सामाजिक काम उभे राहू शकते. पण दानतच नसेल तर त्यापुढे कुणी काही करू शकत नाही. त्यामुळेच शाहरूख प्रत्येक वादाच्या वेळी टीकेचा धनी होताना दिसतो. त्याची चांगली बाजू जाणीवपूर्वक समोर आणायची ठरवली तरीही ती सापडू शकत नाही.

- Advertisement -

शाहरुखच्या मुलाने ड्रग्ज घेतले. त्यात बापाचा दोष तो काय, असा प्रश्न काहींना पडला आहे. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’, असे म्हटले जात असले तरी शाहरुखनेच त्याच्या बाळाचे पाय पाळण्यात असतानाच भरकटवले. त्याला नादी लावले. ही गोष्ट त्यानेच २४ वर्षांपूर्वी केलेल्या विधानावरुन लक्षात येईल. १९९७ साली शाहरुख त्याची पत्नी गौरी खानसोबत सिमी गरेवालच्या कार्यक्रमात पोहोचला होता. या मुलाखतीच्या काही दिवसांपूर्वीच गौरीने आर्यनला जन्म दिला होता. या मुलाखतीत सिमी यांनी शाहरुख आणि गौरीला ‘तुम्ही आर्यनचं पालन पोषण कसं करणार आहात,’ असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला, ‘आर्यनने ते सर्व करावं जे मला माझ्या बालपणी आणि तरुणपणी करावसं वाटत होतं. अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्या मला करायच्या होत्या.

पण मी त्या नाही करू शकलो. कारण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते किंवा सुविधा नव्हत्या.’ शाहरुख पुढे म्हणाला, ‘जेव्हा आर्यन ३ ते ४ वर्षांचा होईल तेव्हा मी त्याला सांगेन की त्याने मुलींच्या मागे जावं. तो मुली फिरवू शकतो, सेक्स करू शकतो, अमली पदार्थांचं सेवन करू शकतो आणि त्याच्या मनाला येईल ते करू शकतो. मला वाटतं की माझ्यासोबत काम करणारे लोक ज्यांच्या मुली आहेत, त्यांनी माझ्याकडे येऊन आर्यनची तक्रार करावी.’ शाहरुखचे हे वक्तव्य कोणत्याही सभ्य बापाचे प्रतिनिधीत्व करत नाही. त्यामुळे आता सहानुभूती मिळवण्याचा नैतिक अधिकार त्याला उरलेला नाही. मुलाने वाया जावे अशी बापाचीच जर इच्छा असेल तर त्याला कोण रोखू शकतो?

- Advertisement -

चुका आपण करायच्या आणि दोष भारतीयांना द्यायचा हीच नीती आजवर शाहरुख खानची राहिली आहे. त्याला कधी देशात असहिष्णुता वाढलेली दिसते तर कधी तो भारतीय ध्वजाचाच अपमान करताना दिसतो. आयपीएल सामन्यानंतर तो कधी सुरक्षा रक्षकाशी हुज्जत घालताना दिसतो तर कधी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना दिसतो. अवगुणांचा समुच्चय असलेल्या या अभिनेत्याविषयी सहानुभूती वाटावी, असे काहीच नाही. असे असतानाही असंख्य सामान्य कुटूंबांमधील लोक त्याच्या चित्रपटांवर फिदा होऊन त्यालाच आदर्श मानत आहेत. अनेकांच्या गळ्यातील तो ताईत आहे. आज शाहरूख ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत काही वर्षापूर्वी फिरोज खान होता. त्याने ८० च्या दशकात अमली पदार्थांच्या विषयावरील अनेक सिनेमे आणले. मात्र, त्याचा मुलगा फरदीनवर कोकेन सेवनाचे आरोप झाले तेव्हा त्याला त्यातून बाहेर काढताना फिरोजची दमछाक झाली होती. त्यावेळीही त्याने सहानुभूतीच्या कार्डचा वापर करुन झालेल्या घटनेवर पडदा टाकला होता.

अशीच सहानुभूती संजय दत्तने मिळवली होती. खरेतर संजय दत्त हा त्याला असलेल्या व्यसनांमुळेच ओळखला जातो. त्याला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी वडील सुनील दत्त यांनी अमेरिकेतील एका पुनर्वसन केंद्रात पाठवले होते. या ठिकाणी जाऊन त्याने उपचार घेतल्यानंतर संजय दत्त पूर्णपणे बरा झाला आणि पुन्हा भारतात परत आला. परंतु, अजूनही तो ‘फुल टू टुंग’ असतो. इतकेच नाही तर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. तो जेलमध्ये असताना अनेकांनी त्याविषयी सहानुभूती व्यक्त केली होती. त्याच्या निर्दोषत्वाचे मोठमोठे रकाने भरले होते. इतकेच नव्हे तर सर्वसामान्य मराठी माणसांचे कैवारी असलेल्या नेत्यांच्या मध्यस्थीने त्याची जामिनावर सुटका झाली होती.

जणू देशासाठी लढाई करताना त्याला तुरुंगवास झाला होता, अशा थाटात संजय दत्तला डोक्यावर उचलून धरण्यात आले होते. तुरुंगातून आल्यावर आजही तो दिसताच लोक सेल्फी काढण्यासाठी त्याकडे धाव घेतात. त्याच्या ‘इमेज मेकिंग’साठी तयार केलेला ‘संजू’ चित्रपट बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली, तेव्हाच भारतातील लोकशाहीने हात टेकवले असे मानायला हवे. देशाची शोकांतिका हिच तर आहे. काही दिवसांपूर्वी विनोदी अभिनेत्री भारती सिंगला ड्रग्स तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पण त्यानंतर भारतीचा वावर टीव्ही स्क्रीनवर इतका मोकळेपणाचा आहे की जणू काही घडलेच नाही. किंबहुना एका कार्यक्रमात तर तिने तिच्यावरील कारवाईवरही विनोद केला होता. इतके धाडस कुठून येते या कलाकारांमध्ये? कुणाच्या बॅकिंगमुळे ते निर्ढावतात?

नाशिकजवळील इगतपुरीतील रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्टी करताना अभिनेत्री हिना पांचाळसह तिच्या सहकार्‍यांना नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी अलीकडेच रंगेहाथ पकडले. खरेतर अशी प्रकरणे दाबली जाण्याचीच अधिक शक्यता असते. मात्र, कोणत्याही दबावाला बळी न पडता नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (एसपी) सचिन पाटील यांनी छापा टाकून संबंधितांवर गुन्हा दाखल केला. एसपींना या कामगिरीचे ‘बक्षीस’ काय मिळाले? पुढच्याच महिन्यात त्यांची बदली करण्यात आली. नाशिकमध्ये अवघ्या एक वर्षाचाच कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांची अचानकपणे बदली करण्यात आली. या बदलीला त्यांनी न्यायालयातून स्थगिती मिळवली ही बाब अलहिदा. मात्र, अशा ‘शापित शिलेदारांची’ संख्या देशात वाढत असल्याने आपण स्वत:लाच संकटाच्या खाईत लोटत आहोत की काय, अशी भयशंका डाचू लागतेय.

चित्रपटसृष्टीत नियंत्रणाबाहेर जाणारी ड्रग्स संस्कृती ही निषेधाहर्र्च आहे. समाजात सर्वाधिक आकर्षण सिनेकलाकारांचे असते. त्यांचे अनुकरण केले जाते. त्यामुळे हा धोका बॉलीवूडपुरता मर्यादित नसून संपूर्ण समाजाला आहे, हे विसरता येणार नाही. दुर्दैवाने सर्वसामान्य माणसे या ‘गंजडींना’ आदर्श मानतात. मात्र, आपल्यासमोर जे खरे आदर्श आहेत, त्यांची किंमत आपल्याला समजलेलीच नाही. आपले प्राण तळहातावर घेऊन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सज्ज असणार्‍या जवानांमुळे आपण निर्धास्त जगू शकतो. त्या सैनिकांना आपण योग्य तो मानसन्मान देतो का याचा एकदा तरी विचार व्हावा. खरेतर आपले सुपरहिरो, आदर्श हेच सैनिक असायला हवेत. पण ड्रग्स न घेताही आपली मती गुंग झाली आहे. ती केवळ आणि केवळ चित्रपटांच्या अतिरेकी गारुडामुळेच!

शाहरुख खानला सहानुभूती कशासाठी?
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -