स्क्रिप्टेड राजकारण की भोळा विश्वास?

वसंतदादा पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे सरकार पाडून पवारांनी पाडले होते. नारायण राणे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली होती तेव्हा १० आमदारांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता. १९९९ साली सोनिया गांधींच्या परदेशी मुळाच्या विषयावरुन शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. २००५ मध्ये ठाकरे कुटुंबातीलच राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. २००४ मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेना सोडली होती.

संपादकीय

राजकारणात छोटे-मोठे चमत्कार होत असतात, याचा महाराष्ट्राला पूर्वानुभव आहे. मात्र, एकाच वेळी तब्बल ५० आमदार घेऊन एखादा मंत्री वेगवेगळी राज्य फिरतो. विशेषत: शिवसेनेसारख्या एकाच पक्षाचे तब्बल ७७ टक्के आमदार पक्षाच्या नेतृत्वाला सोडून अन्यत्र निघून जातात, यावर विश्वास ठेवणे सर्वसामान्यांना अवघड जात आहे. म्हणूनच सध्या राजकारणात जे घडत आहे त्यावर किती टक्के सर्वसामान्यांचा विश्वास आहे हे बघणेही गरजेचे आहे. ज्यांचा राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही अशा नागरिकांनाही सध्याचे राजकारण ‘स्क्रिप्टेड ’ वाटावे. त्यांचा हा समज वास्तववादी आहे की राजकारणाकडे पाहण्याची भोळी दृष्टी यावर चर्वितचर्वण करण्यापेक्षा त्यांना असे का वाटत असावे हेदेखील समजून घेणे गरजेचे आहे. पवारांनी महाराष्ट्रात काँग्रेसमधून बाहेर पडून विरोधकांची मोट बांधत मुख्यमंत्रीपद मिळवले होते. याला पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोदचा प्रयोग म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखले गेले. पुलोदची स्थापना करून शरद पवारांनी राज्यातले पहिले आघाडी सरकार स्थापन केले होते.

वसंतदादा पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे सरकार पाडून पवारांनी पाडले होते. नारायण राणे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली होती तेव्हा १० आमदारांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता. १९९९ साली सोनिया गांधींच्या परदेशी मुळाच्या विषयावरुन शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. २००५ मध्ये ठाकरे कुटुंबातीलच राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. २००४ मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेना सोडली होती. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, उदय सामंत यांच्याशी वितुष्ट निर्माण झाल्यामुळे जाधव यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. गणेश नाईकांनी २०१४ च्या सुमारास पुत्र आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. संजय निरुपम, बाळा नांदगावकर, सुरेश प्रभू, कालिदास कोळंबकर आदी पक्ष सोडून अन्यत्र गेलेल्यांची यादी लांबलचक आहे. त्यामुळे महाराष्ट्राला बंडाळीचा अनुभव नवा नाही, असे म्हणता येणार नाही. बंडखोरीचा इतका दांडगा अनुभव पाठीशी असतानाही सद्य:स्थितीत महाराष्ट्रात जे काही होत आहे त्यावर विश्वास ठेवायला सर्वसामान्य तयार नाहीत. त्याचे कारण म्हणजे सध्या ज्या वेगवान पद्धतीने घडामोडी घडत आहेत त्या चित्रपटाला शोभेशा आहेत. अन्य पक्षाच्या बाबतीत असे काही घडले असते तर कदाचित त्यावर विश्वासही बसला असता. परंतु जेथे हिंदुत्व, भगवे रक्त अशा भावनिक बंधांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बांधून ठेवलेले असते तेथे हे बंध सहजपणे सुटणे शक्य नसते.

विशेषत: शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या दरारा असलेल्या नेत्याने ज्यांच्यावर संस्कार रुजवले ते शिवसैनिक बाळासाहेबांच्या पुत्राविरोधात असे बंड कसे करू शकतात? खरे तर बाळासाहेबांच्या निधनानंतर २०१४ मध्ये स्वबळावर लढूनही विधानसभेत शिवसेनेने ६६ आमदार निवडून आणले होते. त्यानंतरच्या आठच वर्षात आणि सरकारचे नेतृत्व स्वत:कडे असताना पक्षाची अशी केविलवाणी अवस्था कशी होऊ शकते? जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यनाश होवो, अशी गर्जना गेल्या महिन्यात करणारे गुलाबराव पाटील जेव्हा उद्धव ठाकरेंना एकाकी सोडून जातात त्यावर जनता सहजपणे विश्वास तरी कशी ठेवणार? दोन दिवसांपूर्वी बंडखोरांविरुद्ध घोषणाबाजी करणारे सदा सरवणकर हे बंडखोरांच्याच गोटात कसे जाऊन बसले? शंभूराजे देसाई, भरत गोगावले, सुहास कांदे, प्रताप सरनाईक, सदा सरवणकर, दीपक केसरकर, दादा भुसे, संजय राठोड यांच्यासारखे उद्धव भक्त अशी एकाएकी आपल्या नेत्याशी प्रतारणा कशी करू शकतात? ही प्रतारणा आहे की ठरवून केलेले नियोजन यावर आता काथ्याकूट सुरु आहे. तसे पाहता सध्या कुणाचे नुकसान झाले आहे, असा हिशोब करायचा झाल्यास कोणत्याही पक्षाचे नावही पुढे येत नाही.

एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वाच्या मुद्यावर एका गटाला बाजूला केल्याचा दावा केला आहे. परंतु शिंदे यांचा कट्टर हिंदुत्ववाद गेल्या काही वर्षात कोणत्याही व्यासपीठावर दिसून आलेला नाही. राज्यातील त्यांचा एकूणच वावर हा मुरलेल्या राजकारण्यासारखाच असतो. धर्मकारणात त्यांनी एकाएकी कधीपासून रस घ्यायला सुरुवात केली असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. अधिकार्‍यांच्या बदल्या, निविदा, ठेकेदार आणि नगरविकास संबंधित सोयीचे निर्णय या पलिकडे शिंदे यांनी फार चमकदार कामगिरी केलेली नाही. या सर्व ‘व्यवहारात’ हिंदुत्व फॉरेव्हर बघायला कधी मिळाले नाही. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन आपला गट वेगळा झाल्याचा दावा शिंदेंकडून केला जाणे आणि त्याला साद देत आमदारांनी त्यांच्या गोटात प्रवेशित होणे म्हणजे ही मंडळीही हिंदुत्वाच्याच मुद्यावर एकत्र आली, असे समजावे. परंतु, याच गोटात अब्दुल सत्तारांचाही समावेश आहे. अब्दुल सत्तार हे मूळचे काँग्रेस पक्षातील. ते आयत्यावेळी शिवसेनेत आले आणि राज्यमंत्री झाले होते. त्यावर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. मात्र, एकनाथ शिंदेंनी बंडखोरीचे कारण सांगताना सर्व आमदारांचा हिंदुत्वासाठी हट्टी असल्याचे म्हटले आणि त्याच क्षणी अनेकांना अब्दुल सत्तार यांचाच चेहरा समोर आला. अब्दुल सत्तार हे हिंदुत्ववादी कधीही नव्हते. त्यामुळे हिंदुत्वाच्या हट्टासाठी शिंदेंच्या गोटात ते सामील झाले आहेत असे म्हणणेच हास्यास्पद आहे.

उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडण्याचा निर्णय ज्या फेसबुक लाईव्हमध्ये केला त्यात ठाकरेंची देहबोली अजिबातच तणावग्रस्त दिसत नव्हती. ते अगदी ताज्यातवाण्या मूडमध्ये संवाद साधत होते. वास्तविक, उद्धव ठाकरे यांचा चेहरा अतिशय बोलका आहे. ते न बोलताही बरचसं बोलून जातात. त्यांचा चेहरा सहजपणे वाचला जातो. मात्र, बुधवारच्या फेसबुक लाईव्हमध्ये तसे काही दिसले नाही. तेच नाही तर वर्षावरुन मातोश्री निवासस्थानावर ज्या विजयी थाटात आदित्य ठाकरे निघाले ते बघून ठाकरे कुटुंबियांच्या मनाविरुद्ध हे सारं सुरु आहे हे पचवणं सर्वसामान्यांना कठीण जातंय. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या विरोधात टोकाचे न बोलणे, ठाकरेंनीही कोणतेही वादग्रस्त वक्तव्य न करणे, अडीच वर्षे भाजपवर तुटून पडणार्‍यांनी अचानक तोंडावर बोट ठेवणे, भाजपच्या नेत्यांचे सूचक मौन, अचानक अज्ञातवासात गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांची अलिप्तवादी भूमिका या बाबी बघता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाजूला सारुन पुन्हा युतीचा संसार सुरु करण्यासाठीच हा खटाटोप आहे असा समज सर्वसामान्य करुन बसलाय. त्याचा हा समज दूर करण्यासाठी आजवर कोणताही प्रस्थापित नेता पुढे आलेला नाही यातच सारे काही आले!