घरफिचर्समायमहानगर ब्लॉग...काय भुललासी वरलिया रंगा!

…काय भुललासी वरलिया रंगा!

Subscribe

मंदिराचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून शिर्डी संस्थानने वस्त्रसंहितेचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण दिले जात आहे. पण कुणाच्या पोषाखातून मंदिराचे पावित्र्य कसे भंग पावू शकते? आणि अशा प्रकारांतून पावित्र्य ठरवण्याचा अधिकार यांना दिला तरी कुणी? पेहरावावरुन जर पावित्र्य आणि चारित्र्याचे दाखले दिले जात असतील तर असे दाखले देणार्‍यांच्या बुद्धीची तपासणी आधी होणे गरजेचे आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणार्‍या साईबाबांच्या दाराशी तर अशा भंपक कल्पनांना जराही थारा मिळायला नको.

‘ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥ चोखा डोंगापरी भाव नोहे डोंगा’ असे म्हणणार्‍या संत चोखा मेळा यांच्या अंत:करणातील भावाचे सौंदर्य शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानला जाणवलेलेच दिसत नाही. त्यामुळेच वस्त्रसंहितेचा फलक त्यांनी मंदिर परिसरात लावून नवा वाद ओढवून घेतला आहे. मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा, असे आवाहन या फलकाद्वारे करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून काही भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार मिळाल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थानकडून स्पष्टीकरण देण्यात आले. अर्थात, संस्थानच्या भूमिकेला बहुतांश भाविकांचे समर्थन असेल. तशा प्रतिक्रियाही ऐकायला मिळत आहेत.

पण बहुमत हे नेहमीच वास्तवतेला अधोरेखित करते असेही नाही. बर्‍याचशा समाजशास्त्रज्ञांच्या मते बहुमत हे असहिष्णु बनून अल्पसंख्याकांच्या वेगळ्या मतांना, मूल्यांना खच्ची करण्याचा प्रयत्न करते. समाजात वेगळेपणा चालणार नाही, ही शक्यता गृहीत धरून बहुमताची जुलूमशाही हा व्यक्तीस्वातंत्र्याला आणि आविष्कार स्वातंत्र्याला एक धोका आहे. म्हणून बहुमताचा विचार करण्यापेक्षा संस्थानच्या भूमिकेचा तार्किक अंगाने विचार करणे महत्वाचे ठरते. प्रचंड सहिष्णु असलेल्या हिंदू धर्मात अशा प्रकारच्या चर्चांचे नेहमीच स्वागत होते. धर्माच्या नावाने पेरल्या जाणार्‍या बेगडी संकल्पनांना मूठमाती देण्याचे काम या धर्मात प्रामाणिकपणे, सातत्याने आणि अतिशय खुलेपणाने होते हेदेखील मान्य करावे लागेल. अशीच मीमांसा शिर्डी संस्थानच्या निर्णयाची होणे क्रमप्राप्त आहे.

- Advertisement -

मंदिराचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून संस्थानने हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण दिले जात आहे. पण कुणाच्या पोषाखातून मंदिराचे पावित्र्य कसे भंग पावू शकते? आणि अशा प्रकारांतून पावित्र्य ठरवण्याचा अधिकार यांना दिला तरी कुणी? पेहरावावरुन जर पावित्र्य आणि चारित्र्याचे दाखले दिले जात असतील तर असे दाखले देणार्‍यांच्या बुद्धीची तपासणी आधी होणे गरजेचे आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणार्‍या साईबाबांच्या दाराशी तर अशा भंपक कल्पनांना जराही थारा मिळायला नको. ‘सबका मालिक एक’ म्हणत जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणार्‍या साईबाबांच्या मंदिराला हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक मानले जाते. याच मंदिरात स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला जातो. अशा ठिकाणी वस्त्रांवरुन माणसांची किंमत करणे हा मूर्खपणा म्हणावा लागेल.

काही जुन्या संदर्भानुसार, साईबाबा शिर्डीत आले तेव्हा गावातील मुले त्यांना दगड मारत. त्याच शिर्डीत चांदीची मूठ असलेली छत्री त्यांच्या डोईवर धरून त्यांची चावडी ते मशीद अशी मिरवणूक निघे. तेव्हाही लोकांच्या आनंदात ते सहभागी होत. ना त्यांना दगडांचे दु:ख झाले ना छत्रचामरांचा आनंद झाला. अशा साध्या-सरळ बाबांच्या मंदिरी वस्त्रसंहिता लादून त्यांच्या विचारांचे वस्त्रहरण करण्याचा जो प्रयत्न होतोय तो सर्वप्रथम हाणून पाडायला हवा.

- Advertisement -

साईबाबांनी कधी कुणासाठी आपली वर्तणूक बदलली नाही. कुणी श्रीमंत आहे म्हणून ते कुणाशी सलगीने वागले नाहीत की गरीब आहे म्हणून कुणाला झिडकारले नाही. कुणाला फटकारताना त्याच्या श्रीमंतीला त्यांनी काडीची किंमत दिली नाही. कोण कसे आहे, याच्याशी त्यांना काहीच देणेघेणे नव्हते. त्यांनी कुणाच्याच धर्मावर आक्रमण केले नाही. आयुष्यभर ते आपल्या विचारांशी प्रामाणिक राहिले. म्हणूनच त्यांना देवत्व बहाल झाले. अशा बाबांच्या चरणी नतमस्तक होऊ इच्छिणार्‍यांचा पेहराव बघून त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार असेल तर ही बाबांच्या विचारांशीच प्रतारणा होईल. खरेतर, मंदिरात अंगभर कपडे असावे इतकीच आमची अपेक्षा आहे, असे स्पष्टीकरण संस्थानकडून दिले जाते आहे. हा न्याय महिलांना आहे, तसाच पुरुषांनाही असल्याचे सांगितले जाते. अशी संहिता महिलांसाठी असो वा पुरुषांसाठी, ती अयोग्यच आहे. पण या आडून महिलांच्या वस्त्रांनाच लक्ष्य केले जाते आहे, हे लपून राहणार नाही. खरे तर, महिलांचा ड्रेसकोड ठरवणे हे पुरुषी विकृतीचे द्योतक मानायला हवे. समाजात वावरताना ज्या वस्त्रांत सहजता असते ती वस्त्रे सामान्यपणे परिधान केली जातात. परंतु, ती कोणती परिधान करायची याचेही स्वातंत्र्य जर हिरावून घेतले जात असेल तर तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घालाच म्हणावा लागेल. सभ्य पेहराव करण्याची अपेक्षा बाळगणार्‍या संस्थानने एकदाची सभ्यतेची व्याख्या तरी जाहीर करावी. अंगभर कपडे घालण्यातून सभ्यतेचे दर्शन होणार असेल तर बहुतांश देवतांवरही अंगभर कपडे दिसत नाहीत. मग या देवतांनाही संस्थान वस्त्र संहितेचे धडे देणार का? पुजारीही अंगभर कपड्यांमध्ये दिसत नाहीत. मग पुजार्‍यांना झब्बा, धोतर सक्तीचे केले जाणार का?

शिर्डी संस्थानने लावलेला हा फलक राज्याच्या महिलाविषयक धोरणालाही वाकुल्या दाखवतोय. या धोरणात पुरुषप्रधान मानसिकता बदलणे, महिलांना त्यांच्या अग्रक्रमानुसार आयुष्य जगता यावे यासाठी समान संधी मिळवून देणे, महिलांच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देऊन आधुनिक व स्वबळावर उभी असलेली स्त्री अशी नवी प्रतिमा उभी करणे या प्रमुख तरतुदींचा समावेश होतो. या तरतुदींनाच छेद देण्याचा प्रयत्न संस्थानने केला आहे. शिर्डी संस्थानचे कार्य ज्या पद्धतीने चालू आहे ते अनमोल असेच म्हणावे लागेल. श्री साईनाथ रुग्णालयात असंख्य गोरगरीबांवर केले जाणारे उपचार, सातत्याने होणारे रक्तदान आणि वैद्यकीय उपचार शिबिरे, शैक्षणिक संस्था, अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा केला जाणारा वापर, कोरोना काळात केलेली रुग्णसेवा हे आणि अशा असंख्य उपक्रमांमुळे संस्थानचे नाव सर्वदूर घेतले जात आहे. इतकी उल्लेखनीय कामे सुरु असताना संस्थानमधील काहींना मध्येच उबळ येते आणि ड्रेसकोडसारख्या बिनबुडाच्या संकल्पनांचे उदात्तीकरण केले जाते. अशा संकल्पनातून संस्थांच्या आंतरराष्ट्रीय किर्तीला बाधा निर्माण होऊ शकते हे निश्चित.

अर्थात वस्त्रसंहितेचा प्रयोग हा शिर्डीतच झाला असेही म्हणता येणार नाही. देशातील सर्वाधिक श्रीमंत धार्मिकस्थळ म्हणून लौकीक असलेल्या केरळमधील पदम्नाभस्वामी मंदिरात सलवार किंवा चुडीदार परिधान करुन आलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. गेल्या जानेवारीत वाराणसीच्या जगप्रसिध्द काशी विश्वनाथ मंदिरात स्पर्श दर्शन करू इच्छिणार्‍या भाविकांना दर्शनासाठी पेहराव सक्ती अर्थात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय काशी विद्वत परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला होता. ज्योतिर्लिंगाला स्पर्श करायचा असेल तर शिलाई न केलेले वस्त्र परिधान करुन गाभार्‍यात येणे गरजेचे करण्यात आले होते. पुरुष पारंपरिक वस्त्र जसे धोतर आणि न शिवलेले अंगवस्त्र तसेच महिला साडी परिधान करुन गर्भगृहात स्पर्श दर्शन करु शकतील. जीन्स, पॅन्ट, शर्ट, सूट, कोट आदी वस्त्र परिधान करुन जाणार्‍या भाविकांना स्पर्श दर्शनाला परवानगी नाकारण्यात आली होती. या निर्णयास विविध पातळ्यांवरुन विरोध झाल्यानंतर तो बदलण्यात आला.

उज्जैन येथील महाकाळ मंदिरातही या प्रकारची पेहराव सक्ती पूर्वीच लागू करण्यात आली आहे. शनी शिंगणापूरमध्ये येणार्‍या भाविकांसाठी काही वर्षांपूर्वी पोशाखाचा नियम होता. जे भक्त शनिदेवाला तेल अर्पण करु इच्छित होते, त्यांच्यासाठी शरीराच्या खालच्या भागात केशरी लुंगी किंवा धोती परिधान करणे आवश्यक होते. यासोबतच दर्शन आणि अभिषेक ओल्या वस्त्रात केले जात होते. या नियमांचे पालन सर्व पुरुषांना करायचे होते. तर महिलांना शनिदेवाच्या पूजेची परवानगी नव्हती. परंतु आता हा नियम बदलला आहे. थोडक्यात वेगवेगळ्या मंदिरांच्या गाभार्‍यात लिंगभेद हा पाचवीला पुजलेला आहे. वास्तविक, धर्मांतील परंपरांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते की, प्राचीन काळात हे धर्म व्यापक आणि सर्वसमावेशक होते. आधुनिक काळात मात्र ते अधिकाधिक संकुचित, असहिष्णु आणि असंवेदनशील होत आहेत. त्याला केवळ पुरुषी मानसिकताच कारणीभूत ठरत आहे हे देखील विसरायला नको.

देशातच नव्हे तर विदेशातही अशा प्रकारच्या वस्त्रसंहिता तयार करण्यात आल्याची उदाहरणे आहेत. मुस्लीम समाजातही अशा अनिष्ठ प्रथांची कमतरता नाही. त्यावरही जाहीरपणे चर्चा होणे आवश्यक आहे. अन्यथा या समाजातील महिलांमध्ये अनेक गुण असूनही ते बुरख्याआड दबले जातात. त्यांना बाहेर येऊच न देण्याची भूमिका घेतली जाते. अर्थात येथेही व्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा येतो. ज्यांना बुरख्यात सुरक्षित वाटते त्यांना कुणीही आडकाठी आणू शकत नाही. पण ज्यांना बुरख्यातून बाहेर पडण्याची इच्छा आहे त्यांचेही मार्ग प्रशस्त होणे गरजेचे आहेत. ‘अंत:करण शुद्ध असावे कपड्यात काय ठेवले आहे’ असे धर्मशास्त्रच सांगते.’ &काय भुललासी वरलिया रंगा’ असे म्हणूनच संत चोखा मेळा यांनी म्हणून ठेवलेय. याचा विचार आता शिर्डी संस्थानसह सर्वांनीच करावा आणि तूर्तास शिर्डीतील मंदिराबाहेर लावलेला बुरसटलेल्या विचारांचा फलक कायमस्वरुपी उखडावा इतकेच!

…काय भुललासी वरलिया रंगा!
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -