Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग भारत-पाकमधील मराठीची नाळ

भारत-पाकमधील मराठीची नाळ

Related Story

- Advertisement -

मराठी भाषा हा मराठी माणसासाठी जिव्हाळ्याचा आणि आत्मियतेचा विषय आहे, अलीकडच्या काळामध्ये इंग्रजी माध्यमांचा प्रसार केवळ शहरांमध्येच नव्हेत तर गावोगावी होत असल्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांकडे मराठी माणसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे मराठी भाषेचे काय होणार यावर सभा संमेलनांमध्ये सातत्याने काथ्याकूट होताना दिसत असतो. काही लोकांच्या मते सध्या आपण जागतिक होत असून जगात वावरताना तुम्हाला आता इंग्रजीचा अवलंब अपरिहार्य आहे, असा अलीकडच्या काळात अनेकांचा अट्टाहास असल्यामुळे बहुतांश पालकांचा कल आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याकडे असतो. त्यामुळे एका बाजूला आपण ग्लोबल सिटिझन होत असल्यामुळे आपल्या मुलांनी जगातील संधी मिळवण्यासाठी इंग्रजी शिकले पाहिजे, तर दुसर्‍या बाजूला आपली संस्कृती राखली जावी, यासाठी आपली भाषा मराठी आली पाहिजे, त्याचसोबत अगदी विज्ञान आणि भाषाशास्त्रही हेच सांगते की, मातृभाषेतून शिकल्यास मुलांना विषयांचे चांगले आकलन होते. पण अलीकडच्या काळात मुलांना शाळांमध्येसुद्धा त्यांच्या मातृभाषेला बाजूला सारून थेट इंग्रजीत शिकवण्याची पद्धत अवलंबली जाते. म्हणजे ते मूल मातृभाषेपासून पूर्णता तुटते.

शाळेत त्याला मून असे सांगून चंद्र दाखवला जातो. म्हणजे त्या मुलाला मराठीत चंद्र म्हणजे काय हे विचारले तर कळत नाही. त्याला मून असे विचारावे लागते. इंग्रजी शिकताना अशा प्रकारे मराठी मुलांच्या मनातील मराठी भाषेची मुळेच खुडून टाकण्याची पद्धत अवलंबण्यात येत आहे. एका बाजूला मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पंधरवडा साजरा करण्यात येतो. विश्व मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासोबतच अनेक साहित्य संमेलने ठिकठिकाणी भरविली जात असतात. अनेक ठिकाणी मराठी कवी संमेलने भरत असतात. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले साहित्यिक वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारीला दरवर्षी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. हे सगळे आपण करत असलो तरी सध्या मराठी माणसाची द्धिधा अवस्था झाली आहे.

- Advertisement -

भावनेसाठी मराठी हवी आहे, पण त्याचसोबर व्यवहारासाठी इंग्रजी भाषा हवी आहे. म्हणजे ऑफिसमध्ये इंग्रजी आणि घरात मराठी, साधारण असा प्रकार आहे. अलीकडच्या काळात मराठी भाषेच्या शाळा अधिकाधिक अध्ययावत करण्यात येत आहेत, पण तरीही इंग्रजी माध्यमातील शिक्षण लोकांना अधिक भावते आहे. आपला मुलगा फाडफाड इंग्रजी बोलायला लागला किंवा तसे बोलताना ऐकले की, आईवडिलांना खूप मानसिक समाधान मिळते. मध्यमवर्गीय मराठी पालकांची ही अवस्था आहे. आपण मराठी माध्यमात शिकलो, पण आत्मविश्वासाने आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही, ते इंग्रजी माध्यमात शिकलेल्या आपल्या मुलांना येत आहे. हिच मानसिकता अधिकाधिक पालकांना मुलांना इंग्रजी माध्यमात घालण्यास प्रवृत्त करत आहे. मराठी लोकांमध्येच मराठी विषयी उदासीनता वाढू लागलेली असताना एक अनपेक्षित आणि आश्चर्यकारक बातमी कानावर आली.

भारत आणि पाकिस्तान हे जसे जमिनीच्या विभाजनामुळे दुभंगलेले देश आहेत, तसेच ते मानसिकतेने दुभंगलेले आहेत, असे मानले जाते. कारण दोन्ही देशांमध्ये चार मोठी युद्धे झाली आहेत. सीमेवर नेहमीच दोन्ही देशांमधील सैनिकांमध्ये चकमकी उडत असतात. त्यात दोन्ही बाजूंच्या सैनिकांना आपला जीव गमवावा लागतो. परिणामी एकमेकांविषयी राग असतो. गुप्तहेर म्हणून अनेक लोकांना डांबून ठेवण्यात येते. अशा स्थितीत पाकिस्तानात मागील अनेक वर्षे राहणार्‍या मराठी माणसांना मात्र आपल्या मातृभाषेची आठवण येत आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील काही मराठी लोकांच्या माध्यमातून ऑनलाईन मराठी भाषा शिकायला सुरूवात केली. मराठी भाषा शिकण्याच्या तळमळीतून त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून सीमा पार केल्या आहेत. भाषेची ओढ ही माणसांना कशी भौगोलिक आणि भौतिक सीमांच्या पलीकडे घेऊन जाते हेच यातून दिसून आले आहे. फाळणीच्या वेळी अनेक मराठी कुटुंबे पाकिस्तानच्या कराचीत स्थायिक झाली. तेथे आजही भोसले, जाधव, गायकवाड, कांबळे, सांडेकर, प्रकाश, राजपूत अशी दीडशेच्या वर मराठी कुटुंबे आहेत. त्यांनी मराठी संस्कृती आणि भाषा प्राणपणाने जपली आहे.

- Advertisement -

मागील दोन महिन्यांपासून सातार्‍यातील दिलीप पुराणिक व त्यांचे कुटुंबीय तेथील मराठी कुटुंबीयांना मराठीचे धडे देत आहेत. जागतिक मातृभाषा दिनानिमित्त मूळ मराठी असलेल्या पार्वती गायकवाड मराठी भाषा आणि संस्कृती याविषयी भरभरून बोलतात. त्या पाकिस्तानात असल्या तरी भारत अन् महाराष्ट्राशी त्यांची नाळ कायम जुळलेली आहे. त्या मुळच्या महाराष्ट्रातल्या आहेत. त्यांचे आई-वडील मराठी. त्यामुळे मराठी भाषेबद्दल आणि संस्कृतीबद्दल त्यांच्या मनात कायमच आपलेपणाची भावना आहे. त्यांच्यासारखी कराचीत अनेक मराठी कुटुंबे आहेत. या सगळ्यांनी मराठी शिकणे सुरू केल्यानंतर सातार्‍यातील दिलीप पुराणिक सरांकडून मराठीचे धडे घ्यायला सुरूवात केली. त्यामुळे पार्वतीना हरवलेले माहेरपण मिळाल्यासारखे वाटत आहे. ऑनलाइन मीटिंगमध्ये एकदा दिलीप पुराणिक यांनी पार्वतीना मराठी गाणं म्हणायला सांगितले, तेव्हा त्या ‘मेंदीच्या पानावर मनं अजून झुलतंय गं…’ हे गाणं गायल्या. महाराष्ट्रातील अनेक मराठी कुटुंबांशी त्यांचे आजही नाते कायम आहे. पंढरपूरची विठ्ठल-रखुमाई, जेजुरीचा खंडोबा, शिर्डीचे साईबाबा यांच्याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आस्था आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचाही त्यांना खूप अभिमान आहे. पुढच्या पिढ्यांचे संस्कृती आणि मराठी भाषेशी नाते कायम राहावे म्हणून ही मंडळी दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, होळी, मकरसंक्रांती आणि गुढीपाडवा असे सर्व मराठी सण एकत्र येऊन साजरे करतात. मुद्दा असा आहे की, मराठी भाषेच्या नावाने महाराष्ट्रात अनेक सभा आणि संमेलने भरविली जात असली तरी पिढीगणिक मराठी शिकणार्‍यांची संख्या कमी होऊ लागली आहे. कारण सध्या नवीन मुले केवळ नावाला एक विषय म्हणून शाळेत मराठी शिकतात, बाकी सगळे विषय इंग्रजीत शिकतात. जगातील उच्च शिक्षणाचे अनेक विषय शिकण्यासाठी आपल्या चांगले इंग्रजी यायला हवे, यात शंकाच नाही. पण त्यासाठी इंग्रजी विषयाची चांगली तयारी करून घेणे अपेक्षित आहे. पण त्यासाठी मातृभाषेलाच शिकण्यातून बाजूला करण्यात येत आहे. यावर आता जगभर पसरलेल्या सगळ्या मराठी माणसांनी व्यापक विचार करायची गरज आहे.

कारण केवळ ‘मराठी बोला’ म्हणून चालणार नाही,तर ती आपल्या व्यवहारात कशी येईल ते पहावे लागेल. पाकिस्तानात असलेल्या आपल्या मराठी बांधवांना मराठी शिकण्याची किती ओढ लागलेली आहे, हे पाहिल्यावर आपल्याला हे दिसून येईल की, आपली मातृभाषा ही माणसाची भावनिक गरज आहे. पाकिस्तानमधील त्या मराठी बांधवांना म्हणूनच मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, म्हणजेच भारतीय मातीत मन अजून रमते ग,असे वाटत आहे. यावरून आपली मातृभाषा ही कशी मानसिक गरज आहे, हे आपल्या लक्षात येईल. आपल्या मातृभाषेशी आपले धार्मिक सणसमारंभ, अनेक सांस्कृतिक गोष्टी, नाटक, चित्रपट, संगीत हे जोडलेले असते. आणि या गोष्टी आपल्या जीवनाच्या अविभाज्य अटक असतात. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना आपण या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. पु.ल.देशपांडे एका भाषणात म्हणाले होते, जो माणूस आपल्या भाषेवर प्रेम करतो, तोच दुसर्‍या भाषेवर प्रेम करतो. मराठीला धरून आपल्याला बहुभाषिक व्हायचे आहे. मराठीला सोडून नव्हे.

- Advertisement -