घरफिचर्समायमहानगर ब्लॉगसेनेत उपर्‍यांचे मौन नको, हवे फायरब्रँड नेते

सेनेत उपर्‍यांचे मौन नको, हवे फायरब्रँड नेते

Subscribe

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार राज्यात मागील 23 महिन्यांपासून सत्तेवर आहे. मात्र शिवसैनिकांना हे आपले सरकार वाटत नाही. कारण सत्तेत असूनही कामेच होत नसल्याच्या तक्रारी वाढल्यात. सामान्य शिवसैनिकांना, गटप्रमुखांना आपले सरकार वाटण्यासाठी निष्ठावंतांना न्याय दिला पाहिजे त्याच वेळी उपर्‍यांसाठी स्वागत कक्ष उघडायला नको, अशी भावना शिवसेनेतून व्यक्त होत आहे. भाजपचे सर्व नेते मिळून महाविकास आघाडी सरकारवर आक्रमण करत आहेत. त्यासाठी शिवसेनेला सध्या उपर्‍यांच्या मौनाची नाही तर भाजपवर आक्रमक प्रतिहल्ला करणार्‍या फायरब्रँड निष्ठावान नेत्यांची गरज आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा चार दिवसांपूर्वीच झाला. शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे भाषण करत विरोधीपक्ष असलेल्या भाजपवर टीका केली. दिल्ली ते गल्लीतील नेत्यांचा खरपूस समाचार घेताना ठाकरे यांनी त्यांच्या आडनावाला साजेसे भाषण केल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला. राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो तसा कायमचा शत्रूही नसतो. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकल्यावर लक्षात येईल की, आता शिवसेना आणि भाजपमध्ये पॅचअप होणे शक्य नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केल्याने भाजपनेही दिल्लीश्वरांना भाषणाची कॅसेट पाठवून दिली असणार यात शंका नाही. शिवसेना आणि भाजपत आता आरपारची लढाई सुरू झाली असून ठाकरे सरकारच्या 28 नोव्हेंबरच्या दुसर्‍या वर्धापनदिनापर्यंत शाद्बिक हल्ले सुरूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रवक्ते आणि सोशल मीडियावरील बोलघेवडे नेते सर्वांचेच मनोरंजन करतील यात वाद नाही.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील मंत्री, तीनही पक्षांचे पदाधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांनांवर विविध सरकारी यंत्रणांचे पडत असलेले छापे पाहता त्यांचा गैरवापर होत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच केला. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करण्याची पावले सातत्याने टाकते. त्यात सीबीआय, आयकर विभाग, ईडी, एनसीबी आहे. हा आरोप वारंवार सत्ताधार्‍यांकडून केला जात असताना आता नवीन वादाने सुरूवात केली आहे. दसरा मेळाव्यात भाषण करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपमध्ये 2019 पासून दुसर्‍या पक्षातून येणार्‍यांची संख्या वाढली आहे. हा धागा पकडून ठाकरे यांनी जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे उमेदवार नाहीत, उपरे आणावे लागतात, अशी जहरी टीका भाजपवर केली. त्यामुळे निष्ठावान आणि उपरे असा नवा वाद सुरू झाला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांची पोलखोल सुरू झाली.

- Advertisement -

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्रात मागील 23 महिन्यांपासून सत्तेवर असूनही शिवसैनिकांना हे आपले सरकार वाटत नाही. कारण सत्तेत असूनही कामेच होत नसल्याच्या तक्रारी ते उपनेते आणि नेत्यांकडे करीत असतात. सामान्य शिवसैनिकांना, गटप्रमुखांना आपले सरकार वाटण्यासाठी निष्ठावंतांना न्याय दिला पाहिजे त्याच वेळी उपर्‍यांसाठी स्वागत कक्ष उघडायला नको, अशी भावना शिवसेनेतून व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिमंडळात असलेले उदय सामंत किंवा अब्दुल्ल सत्तार हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आले आणि थेट मंत्री झाले. हे कमी म्हणून की काय अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख, राजेंद्र यड्रावकर आणि बच्चू कडू हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झाले. यापैकी कुणीही मंत्री होईपर्यंत शिवसेनेत नव्हता, अपवाद केवळ उदय सामंत यांचा.

मात्र असे असले तरी व्यापारी वृत्ती घेऊन शिवसेनेत आलेल्या आणि थेट मंत्रीपदी बसलेल्या या उपर्‍या मंत्र्यांबाबत शिवसेनेत कमालीची नाराजी आहे. तसेच काँग्रेसमधून थेट शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी या राज्यसभेवर गेल्या तर भाजपमधून शिवसेनेत येऊन विधान परिषदेत वर्णी लागलेल्या मनिषा कायंदे, ही प्रतिनिधीक उदाहरणे आहेत. तसेच काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या हातावर शिवसेनेने केवळ केवळ शिवबंधन बांधले नाही तर संभाव्य राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत त्यांचे नाव असेल याची पुरेपुर काळजी पक्षप्रमुख ठाकरे यांनी घेतली. त्यामुळे सहाजिकच शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता वाढली.भाजपने केंद्रीय चौकशी यंत्रणांना हाताशी धरून शिवसेनेच्या काही लोकप्रतिनिधी, मंत्री यांना टार्गेट केल्याने इतर मंडळी गळपटलेत असेच चित्र सध्या सेनेत आहे.

- Advertisement -

शिवसेनेकडून आपल्यावर अन्याय झाला असे वाटणार्‍यांमध्ये शिवसेना नेते दिवाकर रावते, रामदास कदम, तानाजी सावंत, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, सुनील शिंदे, प्रताप सरनाईक, सुनील राऊत, मीना कांबळी, रवींद्र मिर्लेकर, अरविंद नेरकर, नरेश म्हस्के यांची नावे घेता येतील. शिवसेनेत उघडपणे नाराजी बोलून दाखवण्याची प्रथा नसली तरी जेव्हा केव्हा भाजपच्या विरोधात किंवा केंद्रीय चौकशी यंत्रणांविरोधात बोलण्याची वेळ येते तेव्हा यातील काही लोकप्रतिनिधी हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन बसतात. यापैकी आमदार प्रताप सरनाईक आणि रवींद्र वायकर यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागलेला असल्याने त्यांची बाजू तेच मांडत असतात. पक्षाकडून दुसरा कोणताही नेता सरनाईक, वायकर यांच्या बाजूने बोलत नाही. सध्या शिवसेनेत ईडी, आयकर खाते यांच्याकडून परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब, खासदार भावना गवळी आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची चौकशी सुरू आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी प्राध्यापक वर्षा यांनाही ईडीच्या कार्यालयात एकदा चौकशीसाठी जावे लागले होते. यापैकी काहींनी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे तर काहींना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स येत आहेत.

तर काहीजणांचा भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी पिच्छा पुरवला असल्यामुळे बरेचजण त्यांच्या रडारवर आपण येणार नाही याची काळजी घेत असतात. शिवसेनेच्या ज्या लोकप्रतिनिधींना आपल्यावर पक्षाकडून किंवा एका विशिष्ट गटाकडून अन्याय झाला असे वाटते, असे आमदार, खासदार हे मीडियापासून चार हात लांबच असतात. त्यात मातोश्रीच्या जवळ असलेल्यांपैकी केवळ संजय राऊत हेच सर्वांना अंगावर घेत असतात. मात्र मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळ असलेले नेते कातडी बचावू धोरण अवलंबताना दिसतात. मातोश्रीच्या निकटवर्तीयांपैकी असलेले अ‍ॅड. अनिल परब यांच्यावर सध्या सर्वच चौकशी यंत्रणांची नजर आहे. त्यामुळे अनिल परब यांनाच त्यांचा बचाव करावा लागतोय. इतर नेते लांबून मजा बघण्याचे प्रकार करीत असून रामदास कदम यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे पक्षात सारं काही आलबेल आहे असे दिसत नाही. मातोश्रीच्या जवळ जाण्याच्या इर्ष्येतून एकामेकांचा पत्ता कापणे, विरोधी पक्षाला पेपर पुरवणे ते सिक्रेट गोष्टी उघड करणे, असे कार्यक्रम सध्या शिवसेनेत सुरू आहेत.भाजपकडून आघाडीतील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यातील सर्वच मंत्र्यांनी खुर्च्या उबवू नये. भाजपला प्रत्युत्तर दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

भाजपच्या आरोपांना सध्या तरी प्रत्युत्तर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देताना दिसतात. राऊतांप्रमाणे मलिकही दररोज पत्रकार परिषदा घेत भाजप कशाप्रकारे केंद्रीय एजन्सींना हाताशी धरून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, आमदार आणि खासदार यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावत आहे याचा पाढा वाचत असतात. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील इतर मंत्री मग ते शिवसेनेच्या कोट्यातील असूदे वा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील सारेच चिडीचूप असतात. त्यामुळे राऊत यांना आघाडीच्या मंत्र्यांनी केवळ खुर्च्या न उबवता भाजपला प्रत्युत्तर द्यावे, असे सांगावे लागले.

कारण भाजप दररोज एकेका मंत्र्यांवर, त्यांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचार केल्याचा केवळ आरोप करीत असल्याने आपणही भाजपच्या नेत्यांची प्रकरणे बाहेर काढायला हवीत. गप्प बसता कामा नये, असे शिवसेनेच्या नेत्यांना, मंत्र्यांना सांगावे लागते. राऊतांपाठोपाठ शिवसेना नेते भास्कर जाधव यांनीही भाजपला सर्वच मंत्र्यांनी प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्याचे म्हटलं आहे. सर्व मंत्र्यांनी आता प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. कारण केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहेत. धक्कादायक म्हणजे या होऊ घातलेल्या धाडी आणि त्यांच्या तारखा भाजपचे नेते आधी सांगतात. त्यामुळे या यंत्रणा भाजपसाठी काम करतात की काय, असा संशय येतोे.

मुळात केवळ शिवसेनेतच उपर्‍यांचा भरणा आहे असे नाही, कारण ऑक्टोबर 2019 पूर्वी दुसर्‍या पक्षातून भाजपत आलेले डॉ. विजयकुमार गावीत, बबनराव पाचपुते, जयकुमार गोरे, रणजीत सिंह मोहिते पाटील, अमरिश पटेल, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील अशी लांबच लांब नावांची यादी आहे. उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले हे दोन्ही राजे तर त्यापूर्वी भाजपवासी झालेले प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हेही दुसर्‍या पक्षातून भाजपत आले आहेत. भाजपने 2014 ची निवडणूक असो वा 2019 ची निवडणूक असो, जिंकून येणार्‍या उमेदवाराच्या गळ्यात भाजपचा गमछा घालून त्या उमेदवाराला कमळाच्या चिन्हावर निवडून आणले आणि आमदार, नगरसेवकांची संख्या वाढवली.

केवळ निवडणुकीत नाही तर पोटनिवडणुकीतही हे सुरू ठेवले. भाजपने पंढरपूर पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांना शिवसेनेतून भाजपात आणून विजयी केले. या महिनाअखेरीस होणार्‍या देगलारू विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही सुभाष साबणेंना उमेदवारी देत भाजपने शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे केवळ शिवसेनेतच उपर्‍यांचा भरणा आहे असे नाही तर भाजपचा सक्सेस रेट हा उपर्‍यांवरच आधारलेला आहे हे प्रकर्षाने जाणवते. शिवसेनेत बाहेरून आलेले गप्प आहेत, शिवसेनेच्या मंत्र्यांवर कितीही आरोप झाले तरी आपण काही ऐकलंच नाही अशा आविर्भावात वावरत आहेत. भाजपत मात्र पक्षातील मूळचे आणि बाहेरून आलेले सर्वच एकत्रितपणे शिवसेनेच्या नेत्यांवर तुटून पडतात, तसा सांघिक प्रतिहल्ला सेनेकडून होत नाही.

महाविकास आघाडी सरकारला येत्या सव्वा महिन्यात दोन वर्षे पूर्ण होतील. आतापर्यंत ठाकरे सरकार पडण्याचे अर्धा डझन मुहुर्त हुकलेले आहेत. आता मात्र अजून एक संधी माजी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना दिली जाईल, असे दिसतेय. भाजपकडून त्याची रंगीत तालीमही केली जात आहे. त्यामुळेच मी पुन्हा येणारच्या ऐवजी मी अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटतेय, हे विधान करण्याचे धाडस फडणवीस करतात. शिवसेनेला अपेक्षित असलेला भाजपविरोध अथवा प्रतिहल्ला हा एकनिष्ठ किंवा उपर्‍यांकडून होण्यासाठी सरकार अजून मजबूत होणे आवश्यक आहे. बाहेरून आलेल्यांनी आपण शिवसेनेचे असल्यासारखं वागायला हवं आणि निष्ठावान नेत्यांनी या पक्षाने मला वेळोवेळी संधी दिल्यानेच मी नेता झालो याची जाणीव मनात कायम ठेवायला हवी, तरच ठाकरे सरकार पुढील तीन वर्षे निर्धोक वाटचाल करू शकेल.

कारण भाजपकडून सरकार पाडण्याची कारस्थाने होणार आणि त्यात नुकसान शिवसेनेचे होणार. निष्ठावान किंवा उपर्‍यांचे नाही. नुकसान मातोश्रीचे होणार हे मात्र नक्की. त्यामुळे सत्तेत असणार्‍यांनी मुख्यमंत्र्यांची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी चारही बाजूंनी कडे करणे आवश्यक आहे. त्यामुळे शिवसेनेला सध्या उपर्‍यांच्या मौनाची नाही तर भाजपवर आक्रमक प्रतिहल्ला करणार्‍या फायरब्रँड निष्ठावान नेत्यांची गरज आहे.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -