घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीतील सुंदोपसुंदी...

राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदी…

Subscribe

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील एक कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. कितीही खडतर आणि प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्यामध्येदेखील मानसिक संतुलन ढळू न देता प्रतिकूल परिस्थिती अनुकूल होईपर्यंत वाटचाल कशी करायची आणि पक्षाला संकटमुक्त कसे करायचे याचे शिक्षण खरे तर देशातील सर्वच प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याकडून घेण्याची गरज आहे. गल्ली सांभाळत असतानाच दिल्लीतील घडामोडींवर ही बारीक लक्ष ठेवायचे आणि त्यावरही राजकीय व्यूहरचना आखायच्या आणि त्या देखील कशा यशस्वी करून दाखवायच्या ते शरद पवार यांच्याकडून शिकावे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पातळीवर सत्तापरिवर्तन झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेवर आले. त्यानंतर लगेचच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि भाजप शिवसेना या पंचवीस वर्षांच्या मित्रपक्षांमध्ये निवडणुकीपूर्वीच दरी निर्माण होऊन दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. मात्र निकालानंतर जेव्हा भाजप आणि शिवसेना यांची युती होणार त्याआधीच शरद पवार यांनी महाराष्ट्रातील भाजप सरकारला राष्ट्रवादीचा बाहेरून बिनशर्त पाठिंबा जाहीर करून महाराष्ट्राबरोबरच राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवून दिली होती.

शरद पवार यांच्या भूमिकेमुळे भाजपने त्यांना शिवसेनेशी सत्तेची बोलणी करणे अत्यंत सुलभ गेले तसेच भाजपबरोबर सत्तेत सामील झालेल्या शिवसेनेला पुढील पाच वर्षे भाजप नेत्यांकडून सातत्याने अवहेलना सहन करावी लागली. या अवहेलना करण्यामागे भाजपा नेतृत्वाला राष्ट्रवादीने दिलेला बिनशर्त पाठिंबा हा त्या वेळी अधिक कारणीभूत होता. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेने मोठी कलाटणी घेतली आणि केवळ शरद पवार यांच्या भक्कम पाठबळावरच महाराष्ट्रात त्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस असल्या तीन परस्पर विरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांची आघाडी होत महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले.

- Advertisement -

शरद पवार यांच्यासारख्या राष्ट्रीय राजकारणात मुरलेल्या मुत्सद्दी राजकीय नेत्यांनी राज्यपातळीवर शिवसेनेसारख्या परंपरागत राजकीय शत्रूशी आघाडी करण्याचा आणि त्यातही राज्याचे मुख्यमंत्रीपद पाच वर्षांसाठी शिवसेनेला बहाल करण्याचा त्यावेळी जो निर्णय घेतला तो भल्याभल्या राजकीय अभ्यासकांना कोड्यात टाकणारा होता. मात्र असा निर्णय घेण्यामागे शरद पवार यांची राजकीय दूरदृष्टी ही प्रमुख कारणीभूत होती. या परिस्थितीमध्ये शरद पवार यांना शिवसेनेबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घ्यावा लागला ती परिस्थिती राज्यात राष्ट्रवादीच्या एकूणच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्र राष्ट्रवादी मुक्त करण्याचा विडाच जणू उचलला होता आणि त्यातून राष्ट्रवादीचे बडे बडे नेते भाजपामध्ये डेरेदाखल केले जात होते. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या ज्यांनी शरद पवार यांच्याबरोबर संपूर्ण राजकीय हयात व्यतीत केली होती, त्यांनीदेखील शरद पवार अडचणीत असल्याचे पाहून त्यांची साथ सोडून भाजपची वाट धरल्याने शरद पवार यांच्या नेतृत्वात समोरच मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते.

भाजपपासून दुरावलेली शिवसेना आणि ठाकरे कुटुंब एकवेळ परवडले, मात्र भाजपचे नेतृत्व नको या भूमिकेतूनच शरद पवार यांनी महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद बळकट करण्यासाठी शिवसेनेला बरोबर घेत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. राज्यात सरकार आल्यानंतर जे नेते राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले आहेत ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परततील आणि राज्यात पुन्हा एकदा सत्तेच्या बळावर राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त होईल अशी व्यूहरचना शरद पवार यांची हे सरकार स्थापन करण्यामागे आणि त्याचबरोबर ते पाच वर्षे टिकवण्यामागे आहे. त्यादृष्टीने भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग देखील सुरू झाले आहे, त्यामुळे शरद पवार यांचा सत्तेचा हा अनोखा पॅटर्न महाराष्ट्रात यशस्वी ठरतो आहे असेच आजपर्यंतचे चित्र होते. मात्र एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळीने गेल्या काही दिवसांपासून अचानक डोके वर काढले आहे. ही बंडाळी होण्यामागे जिल्हा बँकेच्या निवडणुका तसेच स्थानिक जिल्हा पातळीवरील राजकारणात मिळणारी दुय्यम वागणूक हे प्रामुख्याने कारणीभूत आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे हे अवघ्या एका मताच्या फरकाने पराभूत झाले आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच शाई फेकली. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीतून शशिकांत शिंदे यांना जिल्हा बँकेत पराभूत व्हावे लागले. त्यांचा एका मताने पराभव झाला. त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. परिणामी त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली. ही घटना धक्कादायक होती, कारण त्यामुळे पक्षातील नाराजी उघड झाली होती. त्यामुळे शिंदे यांनी झाल्याप्रकाराबद्दल दिलगिरी वक्त केली आहे. कार्यकर्त्यांना संयम राखण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

शरद पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना त्यांनी या घटनेची गंभीरपणे दखल घेतल्यानंतर सांगितलेच, मात्र त्याच बरोबर जिल्हा बँकेची निवडणूक शशिकांत शिंदे यांनी गांभीर्याने घेतली नाही, गाफील राहिले आणि त्यामुळेच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले हे सांगण्याचादेखील पवार विसरले नाहीत. दुसरीकडे रायगड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष व कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनीही काल प्रकृती अस्वस्थाचे कारण देत रायगड जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. सुरेश लाड हे जरी रायगड जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष असले तरी रायगड जिल्ह्यावर खासदार सुनील तटकरे व आता त्यांची कन्या अदिती तटकरे या राज्य मंत्रिमंडळात असल्याने व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री असल्याने एक हाती सत्ता आहे.

तटकरे आणि लाड यांचेही संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत आणि त्यातच रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या आगामी निवडणुकांमध्ये तटकरेंनी जर शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतला तर स्वतःच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे महिंद्र थोरवे आमदार असल्यामुळे त्यांचे अधिकार ऐकले जाईल आणि त्याचा परिणाम हा थेट आपल्यावर होईल हे लक्षात घेऊन लाड यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रायगड जिल्ह्यात आहे. तिसरी घटना परभणी जिल्ह्यातील असून परभणीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्गानी यांनीदेखील राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आजच जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

या तिन्ही घटकांचा एकत्रित विचार करता राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. राष्ट्रवादीची पाळेमुळे महाराष्ट्रात बळकट आणि भक्कम करण्यासाठी एकीकडे आपले वाढते वय, आजार अंगावर झेलत शरद पवार हे महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून सतत राज्यभर पायपीट करत असताना राष्ट्रवादीचे बालेकिल्ले असलेल्या तीन जिल्ह्यांमध्ये असे प्रकार व्हावेत हे निश्चितच राष्ट्रवादीसाठी चिंताजनक बाब आहे. अर्थात स्वपक्षातील या बंडाळीवर तसेच नेत्यांच्या नाराजी नाट्यावर उतारा काढण्यात शरद पवार ही निष्णात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदी संपवण्यासाठी शरद पवार आता कोणती पावले उचलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -