घरफिचर्समायमहानगर ब्लॉगममता, ममता विसरल्या काय?

ममता, ममता विसरल्या काय?

Subscribe

त्रागा करण्याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खूपच प्रसिद्ध आहेत. त्यांचा चेहरा नेहमतीच त्रासलेला का दिसतो, असा प्रश्न प्रत्येकाला सतावत असतो. एखाद्यावर टीका करताना असून देत किंवा त्याची प्रशंसा करताना ममतांच्या चेहर्‍यावर हास्य अभवानेच दिसते. काल परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक बोलावली होती. त्या बैठकीनंतर ममतांचा पारा चढला. आपल्याला बोलूच दिले नाही. बोलायला दिले जात नसेल तर आपण बैठकीला हजर का रहायचे, असे ममतांनी बैठकीनंतर तावातावात पत्रकारांना सांगितले. मात्र बैठकीत नेमके काय सांगायचे होते, हे त्यांनी काही सांगितले नाही.

भाजपने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना सशक्त पर्याय उभा केल्यानंतर ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे जितके होईल तितके तावातावाने त्या भाजप, मोदी आणि शहा यांच्याविरोधात बोलत असतात. आठ वर्षांपूर्वी सागरिका घोष या पत्रकार महिलेने जाधवपुर विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांशी ममतांचा संवाद घडवून आणणारा कार्यक्रम योजला होता. तेव्हा लागोपाठ बंगालच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न विचारले गेले. तर उपस्थित सगळे विद्यार्थी माओवादी किंवा मार्क्सवादी असल्याचा गदारोळ करून ममता त्या कार्यक्रमातून हातपाय आपटून निघून गेलेल्या होत्या. आज तेच व तसेच आरोप ममता भाजपाविषयी करत असतात. दहा वर्षांपूर्वी ममतांना प्रश्न विचारणारा माओवादी असायचा, आजकाल तसे करणारा भाजपावाला किंवा संघाचा हस्तक असतो. अगदी राजदीप सरदेसाई या कट्टर मोदी विरोधकाला ममतांनी भाजपाचा दलाल संबोधले होते.

- Advertisement -

ह्या प्रकारचे वागणे हे भयगंडाचे लक्षण असते. 2009 सालात ममता बानर्जींनी प्रथम बंगालमध्ये डाव्या आघाडीला राजकीय शह देऊन काँग्रेसच्या मदतीने मोठे यश मिळवले. तेव्हापासून त्यांना अशा भयगंडाने पछाडलेले आहे. त्यामुळे त्यांच्याशी मतभेद व्यक्त करणारा किंवा त्यांच्या कुठल्याही कृतीवर प्रश्न विचारणारा त्यांना शत्रू वाटत असतो. कुठल्याही घटनेत त्यांना शत्रू वा कारस्थान दिसू शकत असते. अडीच वर्षांपूर्वी देशात नोटबंदी झालेली असतानाच्या कालखंडात बंगालमध्ये एका ठिकाणी लष्कराच्या तुकड्या आपला नेहमीचा सराव करीत होत्या आणि त्याविषयी स्थानिक नागरी प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात आलेल्या होत्या. पण नोटबंदीच्या विरोधामध्ये कंबर कसून उतरलेल्या ममतांना त्यामागे बंगालचे सरकार बरखास्त करण्याची मोदींची चाल दिसलेली होती. कधीकाळी त्यांच्या विरोधात बोललेले मार्क्सवादी असायचे, आता तेच शब्द त्यांना संघाचे वाटतात.

कालपरवा कुठल्या तरी सभेला कार्यक्रमाला त्या निघाल्या असताना एका गावातल्या जमावाने ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. तर गाड्यांचा ताफा थांबवून मुख्यमंत्री रस्त्यावर उतरल्या आणि गावकर्‍यांशी हुज्जत घालून भांडू लागल्या. भारताच्या इतिहासात अशा रितीने गावकर्‍यांशी किंवा गर्दीशी वाद घालणारा हा पहिलावहिला मुख्यमंत्री आहे. पण त्यातून त्यांना बाहेर काढायचे कोणी, असा प्रश्न आहे. कारण मानसिक संतुलन बिघडले असेल, तर त्यावर उपचार करणार्‍यालाही आरोग्याविषयी प्रश्न विचारावे लागणारच. पण तसा प्रश्न विचारणार्‍या डॉक्टरलाही ममता संघवाला किंवा माओवादी ठरवून मोकळ्या होण्याचा धोका असतोच ना? सबब त्यांच्या सहकार्‍यांना किंवा निकटवर्तियांनाही ममतांचे दोष वा दुर्दशा दिसत असली, तरी सल्ला देण्याची हिंमत होत नाही. परिणामी त्यांचे मानसिक संतुलन पूर्णपणे हरवलेले आहे आणि आता त्यांना निवडणूक आयोग किंवा सुप्रीम कोर्टही संघाच्या आदेशानुसार चालते, असा संभ्रम व्हायला लागला आहे.

- Advertisement -

ममतांच्या बंगालमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा निवडणुकीच्या काळात कोलकात्यामध्ये रोडशो ठरलेला होता अशा कुठल्याही कार्यक्रमाला ममता मुद्दाम अडवणूक करतात. हा तमाशा मागली दोन वर्षे अखंड चालू आहे. कुठल्याही सभागृहात किंवा खुल्या मैदानात भाजपने सभा समारंभाचे आयोजन केल्यावर त्याला वेळीच परवानगी द्यायची नाही. उशीर केल्यावर त्यात पुन्हा नवे आक्षेप घेऊन आयोजनामध्ये गोंधळ घालायचा, असाच बंगालच्या प्रशासनाचा खाक्या राहिलेला आहे. तो अर्थातच ममतांच्या पक्षीय भूमिकेतून आलेला असतो. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. यापैकी अनेक कार्यक्रम भाजपा किंवा त्यांच्या विविध संघटनांना कोर्टामध्ये दाद मागून साजरे करावे लागलेले आहेत. कधी भाजपा नेत्यांच्या हेलिकॉप्टरला उतरण्यास परवानगी नाकारली जाते, तर कधी त्यांचे प्रमुख कार्यकर्ते ऐन सभेच्या आधी अटक करून रोखले जातात. मंगळवारीही ज्या रस्त्याने अमित शहांचा रोडशो व्हायचा होता, तिथल्या ठिकठिकाणी लावलेले फलक झेंडे पोलिसांच्या मदतीने उध्वस्त करण्यात आले.

नियमात बसत नसेल म्हणून मालमत्तेची वा प्रचार साहित्याची नासधूस करण्याचा अधिकार पोलिसांना कुठला कायदा देत असतो? पण हा प्रकार राजरोस चालू होता आणि संध्याकाळी त्याच रोडशोच्या दरम्यान विद्यासागर कॉलेजनजिक हिंसाचार झाला. तिथे ममतांच्या पक्षाचे टोळीने जमलेले काही कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन थांबलेले होते, तर त्यांचा बंदोबस्त करून रोडशो शांततेत पार पाडणे, ही कोलकाता पोलिसांची जबाबदारी होती. पण तिथेच ममतांच्या पोलीस खात्याने बघ्याची भूमिका घेतली आणि हिंसेचे थैमान झाले. मिरवणुकीवर मूठभर लोक हल्ला करणार असतात, तेव्हा त्यांच्या मुसक्या बांधणे ही पोलीस कारवाई असते. तसे न करणे म्हणजे हिंसेला पोलिसांनीच प्रोत्साहन देणे असते. ममतांनी नेमके तेच घडवून आणलेले आहे. ममता एक गोष्ट साफ विसरून गेल्यात की, त्यांना बंगाली मतदाराने ज्या कारणास्तव सत्तेत आणून बसवले, ते तिथली प्रशासन व गुंडांची मिलीभगत मोडून काढली जावी म्हणून.

आज जितका धिंगाणा तृणमूलचे गुंड घालीत असतात, तितकीच दहशत अशा गुंडांनी डाव्या आघाडीची सत्ता असताना जनतेच्या मनात बसवली होती. त्या दहशतीचा सामना करायची हिंमत काँग्रेसने दाखवली नाही म्हणून वैतागून ममतांनी त्या पक्षाला रामराम ठोकून आपल्यासारख्या निराश काँग्रेसजनांच्या सोबतीने तृणमूल काँग्रेस हा वेगळा प्रादेशिक पक्ष स्थापन केला. त्यांनी थेट मार्क्सवादी व डाव्या गुंडगिरीच्या विरोधात विरोधाचे निशाण खांद्यावर घेतले आणि हळुहळू विविध समाज घटकातले असे भयभीत लोक ममतांच्या पाठीशी उभे रहात गेले. आरंभी डाव्यांच्या गुंडगिरीला पाठीशी घालणारे बुद्धीमंतही ममताच्या मागे येऊन उभे राहिले आणि डाव्यांची दहशत संपुष्टात आली. जेव्हा सामान्य जनता एकजुटीने गुंडगिरीचा सामना करायला समोर येते, तेव्हा गुन्हेगारांचे अवसान गळून पडत असते.

दुर्दैव इतकेच, की सत्ता हाती आल्यावर खुद्द ममतांनाच ह्या सत्याचा विसर पडला. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कार्यक्रम अगोदर ठरला असताना त्यानंतर त्यावर आक्षेप घेण्यात काहीच अर्थ नव्हता. मात्र ममतांना आपला मोदीविरोध दाखवून द्यायचा होता. त्यामुळे यावेळीही त्यांनी आकांडतांडव केले. अर्थात हे सर्व ममतांमध्ये भयगंडाने आलेले आहे हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे अनेकवेळा ते आपल्या समर्थकांवरही त्याच भावातून टीका करत असतात. समोर पाठीराखा असला तरी त्यांना तो मोदी समर्थक दिसतो आणि त्यामुळे ममता कोणताही विचार न करता त्याच्यावर तुटून पडतात. गुंडगिरीमुळे पश्चिम बंगालमधील आपले सरकार पंतप्रधान मोदींकडून पाडले जाण्याची भीती आज ममतांना वाटत आहे. त्यामुळे ममता आपली सर्व ममता विसरून जितका जमेल तितका मोदींना विरोध करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -