घरफिचर्समायमहानगर ब्लॉगयंग इंडिया, टीम इंडिया !

यंग इंडिया, टीम इंडिया !

Subscribe

पहिल्या कसोटीतील मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली मायदेशी परतला होता. हे कमी म्हणून की काय राहुल, मोहम्मद शमी, उमेश यादव, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, अश्विन, जसप्रीत बुमराह असे एकापेक्षा एक सरस खेळाडू जखमी होऊन संघाबाहेर गेले असताना अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 4-0 असा सपाटून मार खाणार असे चित्र रंगवले जात होते. विशेष म्हणजे यात रिकी पॉन्टिंगपासून कांगारूंच्या अनेक माजी दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. पण, मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा संघाने कमाल केली आणि कांगारूंना त्यांच्या मायदेशात 2-1 असे नमवून भारताला ‘अजिंक्य’ राखत विजयाचा गुलाल उधळला.

सर्व आव्हानांवर मात करत भारताच्या युवा टीमने हे यश मिळवले. आयपीएलपासून भारताचे बरेचसे खेळाडू जवळपास सहा महिने कुटूंबापासून दूर आहेत. त्यातच कोरोनामुळे त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले. सोबत दुखापती घेऊन खेळताना प्रत्येक टप्प्यावर मानसिकदृष्ठ्या कणखर राहत या संघाने कधीही झुंज देणे थांबवले नाही आणि हेच त्यांच्या विजयाचे मुख्य वैशिष्ठ्य म्हणता येईल. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला अजिंक्यच्या संघाविषयी अभिमान वाटतो. म्हणूनच या विजयानंतर क्रिकेट समीक्षक आणि समालोचक हर्ष भोगले यांची प्रतिक्रिया खूप महत्वाची वाटते. ‘हा युवा भारत आहे. त्यांना संधी द्या आणि सोडून द्या. आमची पिढी विचार करायची- पराभूत होऊ नका. पण, या युवा पिढीचे आकाश वेगळे आहे. ते विजय पाहतात. त्यासाठी पाऊल टाकतात’.

- Advertisement -

गुलाबी चेंडूने खेळलेल्या अ‍ॅडलेडच्या पहिल्याच कसोटी सामन्यात कमिन्स, स्टार्क, हेजलवूडने अवघ्या 36 धावांवर गुंडाळल्यानंतर भारतीय संघानं फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली त्याला तोड नव्हती. 36 ही भारताच्या कसोटी इतिहासातील नीचांकी धावसंख्या होतीच; पण अलीकडच्या काळात कोणताही संघ अशा प्रकारे कोसळला नव्हता. या पराभवामुळे बसलेल्या मानसिक धक्क्यातून उभे राहणे हेच प्रमुख आव्हान होते. परंतु अजिंक्य रहाणे आणि त्याच्या जिगरबाज सहकार्‍यांनी ते पेलले.

दुसर्‍या कसोटीत कर्णधारपदाची सूत्रे हाती घेत अजिंक्यने शतकी खेळी करत तुम्हीही करु शकता असा विश्वास तरुण खेळाडूंना दिला. मेलबर्नवरील दुसर्‍या कसोटीत कांगारूंना लोळवत 1-1 बरोबरीनंतर भारतीय संघानं मागे वळून पाहिले नाही. सिडनी कसोटी अनिर्णित राहिली तरी गाबावरील चौथ्या कसोटीत युवा खेळाडूंनी जिगरबाज खेळ करत कांगारूंच्या भूमीवर तिरंगा फडकवला. ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणा किंवा तेथील नागरिक यांना भारतीय लोकांबद्दल कायम असूया वाटत आली आहे. यामुळे क्रिकेटचे मैदान असो किंवा बाहेर भारतीयांना नेहमीच आव्हानांना सामोरे जावे लागते. मैदानावर स्लेजिंग, वर्णभेदी शेरेबाजी करून खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण करणारे कांगारू नोकरी व्यवसायानिमित्त ऑस्ट्रेलियात राहणार्‍या भारतीय नागरिकांना टार्गेट करत असतात.

- Advertisement -

याचा मोठा परिणाम म्हणा स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रलिया सामना बघायला भारतीय मोठ्या संख्यने गर्दी करतात. टीम इंडियाने क्रिकेटच्या मैदानावर कांगारूंचे नाक ठेचावे अशीच त्यांची अपेक्षा असते. कोरोनामुळे यावेळी या संख्येवर मर्यादा आली असली तरी गाबावर जे काही भारतीय प्रेषक आले होते, त्यांना आपल्या संघाचा जिगरबाज खेळ बघता आला. यातून परदेशी भूमीवर जिद्दीने टिकून राहण्याचे एक मानसिक बळ त्यांना मिळाले आहे. कसोटी मालिका जिंकल्यावर अजिंक्यच्या टीमने हाती तिरंगा घेऊन मैदानावर मारलेली विजयी फेरी हे या मानसिक धैर्याचे प्रतिक म्हणायला हवे…

या मालिका विजयात कोणा एका खेळाडूचा वाटा नाही. सांघिक कामगिरीच्या बळावर भारतीय संघानं विजय मिळवला आहे. तुम्ही तिन्ही कसोटींवर नजर फिरवल्यास याची प्रचिती येईल. प्रत्येक कसोटी सामन्यातील प्रत्येक सत्रात भारतीय संघाला नवा हिरो मिळाला. अजिंक्यच्या शतकापासून सुरू झालेला प्रवास ऋषभ पंतच्या विजयी अर्धशतकापर्यंत येऊन थांबला आहे. रवींद्र जाडेजा, अश्विन आणि विहारी यांनी दुखापतीनंतरही अनुभवातून जिगर दाखवली. तर शार्दुल-सुंदर यांनी नवख्या खेळाडूंची जिद्द दाखवून दिली. बुमराहला दुखापत झाल्यानंतर सिराजने गोलंदाजीचे नेतृत्व केले. अवघ्या दोन सामन्यांचा अनुभव असणारा गोलंदाज नेतृत्व करत होता. विचार करा त्याच्यावर किती दडपण आले असेल पण, त्याने पाच बळी घेत ऑस्ट्रेलियाची घमेंड उतरवली. गाबावर पाचव्या दिवशी सलामीवीर शुभमन गिलने केलेली 91 धावांची अप्रतिम खेळी आणि ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ म्हणत जणू अंगावर तलवारीचे वार झेलल्यासारखे शरीराचा वेध घेणार्‍या उसळत्या चेंडूचा असह्य मार सहन करत लढणार्‍या चेतेश्वर पुजाराची संयमी फलंदाजी प्रदीर्घ काळ विसरता येणार नाही.

गाबावरील विजय आणखी एका कारणासाठी खास म्हणावा लागेल आणि तो म्हणजे या मैदानावर मागील 32 वर्षांपासून अपराजित असणार्‍या ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव भारताने चाखायला लावली आहे. याशिवाय धावांचा यशस्वी पाठलाग करताना चौथ्या डावांत गाबाच्या या मैदानावर भारतीय संघाने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. याआधी चौथ्या डावात 236 ही सर्वोत्तम धावसंख्या होती. भारताने हा विक्रम मोडीत काढताना तीनशे प्लस धावांचे आव्हान पार केले. काही विजय हे विक्रमासाठी जन्माला येतात. तसे या मालिका विजयाने झाले आहे. अजिंक्य नेतृत्वात भारतीय संघाला आतापर्यंत एकदाही पराभव पाहावा लागला नाही. अजिंक्यने 2018 मध्ये अफगाणिस्तान विरोधात पहिल्यांदा भारतीय संघाचे विजयी नेतृत्व केले होते. त्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात एका सामन्यात भारताला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व केले असून रहाणेच्या नेतृत्वातील पाचही सामन्यात भारतीय संघ अजिंक्य आहे.

यापूर्वी बोर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियामध्ये 2018-19 साली खेळवण्यात आली होती. ही चार कसोटी सामन्यांची मालिका होती. या मालिकेत भारताने 2-1 असा विजय मिळवला होता. त्यापूर्वी म्हणजेच 2016-17 साली भारतामध्ये बोर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात आली होती. यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2-1 असा विजय मिळवला होता. त्यामुळे भारतासाठी ही बोर्डर-गावस्कर ट्रॉफीची हॅट्रीक ठरली आहे. कारण भारताने 2016-17 साली बोर्डर-गावस्कर ट्रॉफी पहिल्यांदा जिंकली होती. त्यानंतर भारतामध्ये 2018-19 साली भारतामध्ये बोर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात आली होती आणि ती भारताने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलग तीन मालिका भारताला याआधी कधीच जिंकता आल्या नव्हत्या.

हे या मालिका विजयाचे आणखी एक विशेष म्हणता येईल. तसेच ही कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत चांगलीच चुरस रंगली होती. भारतीय संघाचे सर्वात जास्त गुण असले तरी विजयाच्या टक्केवारीमुळे त्यांना दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले होते, तर ऑस्ट्रेलियाचा संघ हा अव्लल स्थानावर होता. पण या विजयानंतर भारतीय संघ या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. ‘अजिंक्य भारत’चे श्रीमंत बीसीसीआयकडून कौतुक अपेक्षित होते आणि तसेच ते झाले. या संघाला 5 कोटींचे घसघशीत इनाम जाहीर करण्यात आले आहे. टीम इंडियाने भविष्यातही अशीच विजयाची कोटी कोटी उड्डाणे घ्यावी… अभिनंदन टीम इंडिया!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -