स्वबळाची बेडकी : वास्तव की आभास !

काँग्रेसचे मुंबई महापालिकेतील संख्याबळ आहे 33 नगरसेवकांचे तर राष्ट्रवादीचे आहेत 9 नगरसेवक. 2002 च्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ घटताना दिसत आहे. असे असूनही काँग्रेस स्वबळाचा नारा देते यावरून हे लक्षात येते की स्वबळाची बेडकी फुगवण्यासाठी हायकमांडकडूनच सांगण्यात आले असावे. अन्यथा नवनियुक्त मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनाही काँग्रेसच्या हाताचा करिष्मा मुंबईत नसताना स्वबळाचा नारा दिला नसता. यावरून काँग्रेस राष्ट्रीय पातळीवरून चुकीचे निर्णय घेत आहे याची प्रचिती येत आहे. यावरून राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत असूनही मुंबई महापालिकेत काँग्रेस आपल्याच पायावर धोंडा मारण्याच्या स्थितीत आहे असेच दिसते.

संजय सावंत


राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीने भाजपचा गड मानला जाणार्‍या नागपूर पुण्यासह औरंगाबादची जागाही आपल्या खिशात घातली. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. तर भाजपच्या गोटात आत्मपरीक्षणांचं बैठक सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील 5 मोठ्या महापालिका निवडणुकीचे रणशिंग पुढील दोन महिन्यात म्हणजेच एप्रिलअखेर होण्याची दाट शक्यता आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. पण आता या पाच महापालिकांसाठी एप्रिल अखेरीस निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगात याबाबत तयारी जोरात सुरू आहे. तसेच पाच महापालिकांसोबत राज्यातील 96 नगरपालिकांसाठीही फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा एप्रिलपूर्वी निवडणूक पार पडतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे पुढील महिन्यापासून राज्यात पुन्हा एकदा राजकीय धुमशान अनुभवायला मिळेल यात वाद नाही.

पुढील 100 दिवसांत होणार्‍या पाच महापालिकांच्या निवडणुकांनंतर मार्च 2022 पूर्वी मुंबई, ठाणे, भिवंडी निजामपूर, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिकसह 10 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेची पुढील निवडणूक ऑक्टोबर 2024 रोजी होणार असल्याने 10 महानगपालिकांच्या निवडणुका या मिनी विधानसभा असल्याने सर्वच राजकीय पक्ष कंबर कसताना पहायला मिळतील. मात्र त्याअगोदरच काँग्रेसला स्वबळाची आठवण झाली आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा पडल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईपुरते बोलायचे झाले तर मुंबईत 2017 पर्यंत मुंबईत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष आहे. 2007 साली दोन्ही काँग्रेसची महापालिकेत आघाडी झाली होती तरीही काँग्रेस 71 आणि राष्ट्रवादी 14 असे मिळून 85 नगसेवक निवडून आले तर शिवसेना 83 आणि भाजप 29 जागांवर विजयी होत 112 जागांवर विजय मिळवला. 227 नगरसेवकांच्या मुंबई महापालिकेत बहुमतासाठी 114 नगरसेवकांची आवश्यकता असल्याने मागील दोन दशके मुंबई महापालिकेवर शिवसेना आणि भाजप युतीचा भगवा फडकलेला आहे.

मात्र 2017 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असूनही महापालिकेत वेगवेगळे लढले. त्यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांनीही एकला चलोचा नारा दिला. पाचही महत्वाचे पक्ष वेगवेगळे लढूनही 2017 च्या निवडणुकीत शिवसेना 84, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9 आणि मनसेला 7 जागा मिळाल्या. असे असले तरी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी 2019 च्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून वेगवेगळे लढूनही शिवसेनेचा महापौर होण्यास ग्रीन सिग्नल दिला. दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असूनही भाजपने विरोधीपक्षावर दावा केला नाही. त्यामुळे काँग्रेसला विरोधीपक्ष नेते पद मिळाले.

काँग्रेसचे मुंबई महापालिकेतील संख्याबळ आहे 33 नगरसेवकांचे तर राष्ट्रवादीचे आहेत 9 नगरसेवक. 2002 च्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ घटताना दिसत आहे. असे असूनही काँग्रेस स्वबळाचा नारा देते यावरून हे लक्षात येते की स्वबळाची बेडकी फुगवण्यासाठी हायकमांडकडूनच सांगण्यात आले असावे. अन्यथा नवनियुक्त मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनाही काँग्रेसच्या हाताचा करिष्मा मुंबईत नाही, गटातटाच्या राजकारणात काँग्रेसचा हात कुठेच दिसत नाही, असे असतानाही जगताप स्वबळाचा नारा देतात यावरून काँग्रेस राष्ट्रीय पातळीवरून चुकीचे निर्णय घेत आहे याची सर्वांना प्रचिती येत आहे. मात्र राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत असूनही मुंबई महापालिकेत काँग्रेस आपल्याच पायावर धोंडा मारण्याच्या स्थितीत आहे असेच दिसते.

मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावरच लढण्याची घोषणा काँग्रेसचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी नुकतीच केली. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थिरावल्यानंतर आता महापालिकाही तिन्ही पक्ष एकत्र लढतील का, याची चर्चा होती. मात्र भाई जगतापांनी स्वबळाचा नारा देत या चर्चेला सुरूंग लावला आहे. गेल्या काही वर्षात मुंबई महापालिकेत पक्षाच्या सदस्यांची संख्या कमी झाली आहे, ही वस्तुस्थिती असली तरी एक चांगली टीम काम करेल. आगामी निवडणुकीत मुंबई महापालिकेत एक वेगळं चित्र पाहायला मिळेल, असा विश्वास भाई जगताप यांना वाटतो. काँग्रेस मुंबई महापालिकेसाठी 227 जागांची तयारी करतेय. याआधीही आम्ही आघाडीत होतो पण जिथे शक्य नव्हतं, तिथे वेगवेगळे लढलो आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही 227 जागांची तयारी करतोय, असा युक्तिवाद काँग्रेसकडून केला जातोय.

मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिन्ही पक्षांनी महापालिका निवडणूक एकत्र लढली पाहिजे यावर जोर दिला जात आहे. मुंबईचे अध्यक्ष राहिलेले नवाब मलिक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महापालिका निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रच लढल्या पाहिजेत असे वाटते. कारण राष्ट्रवादीचा आलेख 2007 च्या निवडणुकीत 14 नगरसेवक, 2012 च्या निवडणुकीत 11 तर 2017 च्या निवडणुकीत केवळ 9 नगरसेवक असा राहिला आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकदच नसल्याने राष्ट्रवादीला शिवसेनेसोबत युती करायची आहे. कारण वेगवेगळे लढूनही राष्ट्रवादीचे घड्याळ मुंबई महापालिकेत वेळेवर चालले नाही हा अनुभव आहे.

यापैकी देशातली सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणार्‍या मुंबई महापालिकेची निवडणूक मार्च 2022 मध्ये होणार आहे. या निवडणुकांचे पडघम आतापासून वाजायला सुरुवात झाली आहे. राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीच्या रूपाने एकत्र असताना पुढच्या निवडणुकांची गणितं कशी जुळणार हा प्रश्न वर्षभरापासून विचारला जातोय. महाविकास आघाडी एकत्र लढल्यास दुसर्‍या कोणत्याच पक्षाला राज्यात जागा राहणार नाही, अशी आकडेमोड शिवसेनेतून केली जात आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेना सत्ताधारी पक्ष आहे तर काँग्रेस विरोधी पक्षात आहे. 2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला 93 जागा, भाजपला 82 जागा, काँग्रेसला 31 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा मिळाल्या. त्यावेळी शिवसेना आणि भाजप ही निवडणूक वेगवेगळी लढले असले तरी राज्यात असलेल्या युतीमुळे ते निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेच्या सत्तेत एकत्र आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई महापालिकेत फक्त 9 नगरसेवक आहेत. जर राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेबरोबर लढली तर त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो.

यापूर्वी जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांची ताकद आहे तिथे दोघं एकमेकांच्या विरोधात लढायचो आणि आम्ही विरोधात लढून विरोधकाचं फावणार असेल तिथे विरोधात लढायचो नाही. मी उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलेन. जास्तीत जास्त एकत्रित येऊन आघाडी करण्याचा प्रयत्न करू. कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना मात्र अजित पवार हे ‘स्थानिक पातळीवर शिवसेनेशी जुळवून घ्या’ असं सांगत असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

मुंबई महापालिकेत जसा शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढल्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे तसाच फायदा नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आणि काँग्रेसची महाविकास आघाडी झाल्यामुळे होऊ शकतो. लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला अजून तीन वर्षांहून अधिक काळ आहे. येत्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील पाच महापालिका आणि 96 नगर परिषदांच्या निवडणुका होणार असून त्या निमित्ताने पाचही प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या तलवारी परजायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नेहमीपेक्षा वेगळी राजकीय समीकरणे उदयास आल्याने आता काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत काहीसे बंद पडलेले घड्याळ शिवसेनेच्या मदतीने वेळेवर आणण्यासाठी धडपडत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या ज्यांची सत्ता आहे त्यांना ती सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील तर सध्या विरोधी बाकावर बसले आहेत त्यांना सत्ता मिळवण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करावा लागेल. राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असल्यानेच सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मित्र कोण आणि विरोधक कोण, या विषयावरून राजकीय गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसते आहे.

विशेषत: मुंबई महापालिकेच्या बाबतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना जवळ करून शिवसेना आपली एकहाती सत्ता हातातून जाऊ देईल, असे वाटत नाही. अर्थात, गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते आणि भाजपने या निवडणुकीमध्ये शिवसेनेला चांगलेच आव्हान दिले होते. 31 जागांवरून भाजपने 82 जागांवर जोरदार मुसंंडी मारली होती.

त्यामानाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महापालिका निवडणुकीतील कामगिरी अत्यंत खराब होती, अशा परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना बरोबर घेऊन शिवसेनेने महापालिका निवडणूक लढवली, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कामगिरीत सुधारणा होईल; पण ते शिवसेनेच्या राजकारणाला परवडणार आहे का? हेसुद्धा पाहावे लागणार आहे. गेल्या महापालिका निवडणुकीनंतर भाजपला मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची संधी असतानाही राज्यातील विधानसभा राजकारणाचा विचार करून भाजपने शिवसेनेच्या हातात मुंबई महापालिकेची सत्ता सोपवली होती.

साहजिकच यावेळीही शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप हाच प्रमुख स्पर्धक राहणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील अंतर्गत विरोधाचा आपल्याला कशा प्रकारे फायदा होईल यादृष्टीने भाजपचे चाणक्य रणनीती आखत आहेत. शिवसेनेने मुंबईतील गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी जे विविध प्रयोग सुरू केले आहेत, त्याची दखल भाजपने घेतली आहे. मात्र असे असले तरी शिवसेनेने भाजपसोबत मुंबई महापालिकेत मागील 20 वर्षे युती करुन आपलाच फायदा करून घेतला आणि प्रत्येकवेळी शिवसेनेचाच महापौर झाला. आता मात्र शिवसेने पुढे मुख्य विरोधी पक्ष म्हणून भाजप आहे. त्यामुळे आता जर का शिवसेनेने दोन्ही काँग्रेसशी युती केली तर शिवसेनेचेच नुकसान होणार हे निश्चित आहे.

कारण शिवसेनेने मागील निवडणुकीत 220 हून अधिक जागा लढवल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक वार्डात शिवसेनेचे उमेदवार आतापासूनच कामाला लागल्याने आयत्यावेळी तो वॉर्ड काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला सोडावा लागल्यास त्याचा फटका शिवसेनेला बसणार आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिकेवर मात्र भाजपचे कमळ फुलवायचे नसेल तर शिवसेनेनेही पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अजून चार वर्षे मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल आहे, मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत पुन्हा तिन्ही पक्षांची मोट बांधण्यात कुणी स्वारस्य घेईल असे आता तरी दिसत नाही. त्यामुळे मुंबई महापालिका आणि शिवसेना असे समीकरण असल्याने शिवसेना पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील. नाहीतर मुख्यमंत्रीपदही जाईल आणि मुंबई महापालिकाही. तेव्हा यापुढे शिवसेनेला सांभाळूनच पावले टाकावी लागतील. अन्यथा…