घरफिचर्समायमहानगर ब्लॉगभय कागदाचे संपत नाही...

भय कागदाचे संपत नाही…

Subscribe

सकाळी उठल्यावर माणूस पहिल्यांदा एका मोठ्या उत्सुकतेेने आणि अपेक्षेने दरवाजा उघडतो, तो दरवाजाच्या बाहेर अडकवलेले वर्तमानपत्र आतमध्ये घेण्यासाठी. कागदावर छापून येणारे वर्तमानपत्र हा साक्षर मानवाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनून गेला आहे; पण कोरोना विषाणूने भारतात प्रवेश केल्यानंतर माणसांचे जीव वाचवण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी भारतात जो लॉकडाऊन लागू करण्यात आला, त्यामुळे वर्तमानपत्रांवर लोकांनी एक प्रकारे बहिष्कार टाकला. त्यामुळे हा व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असणार्‍या अनेक जणांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पेपरमधून किंवा आपल्या घरी पेपर आणणार्‍यांकडून कोरोना आपल्यापर्यंत येईल, अशी भीती लोकांना वाटते; पण आता सहा महिन्यांनंतर सुरक्षेची साधने वापरून या भीतीतून वाचकांनी बाहेर येणे अपेक्षित आहे.

जगात कोरोना महामारी आल्यावर लोकांचे जीव वाचवण्यासाठी जे लॉकडाऊन करण्यात आले, त्यामुळे सगळीच क्षेत्रे पार डबघाईला आलेली आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे लोकांनी संपर्क टाळावा, गर्दी टाळावी, यासाठी मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आला. भारतात तीन महिन्यांनंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. ती सुरू झाली तरी कोरोनाचे सावट अजून दूर झालेले नाही. अर्थात, या कोरोनाच्या संकटातही अनेकांनी आपली चांदी करून घेतली, हा भागही आहे. कारण काहींना मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्यातही काही लाज आणि खंत वाटत नाही. कोरोनामुळे अनेक क्षेत्रे डबघाईला आलेली असताना सगळ्यात मोठा फटका छापील वर्तमानपत्रांना आणि एकूणच पुस्तक निर्मितीच्या व्यवसायाला बसला आहे. कागदातून कोरोना पसरतो, अशी भीती लोकांच्या आणि सरकारच्या मनात निर्माण झाली आणि मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर कागदच बहिष्कृत झाला.

कागदावर लोकांनी भीतीने बहिष्कारच घातला. वीज कंपन्यांनी ग्राहकांना बिले पाठवली नाहीत. त्याचसोबत मीटर रिडिंग घेण्यास बाहेरचा माणूस इमारतीमध्ये येतो, त्याच्या माध्यमातून कोरोना आपल्या इमारतीत शिरकाव करेल, याची भीती लोकांना वाटत होती. घरोघरी वर्तमानपत्रे टाकणारी मुलं इमारतीत येतात, त्यामुळे कोरोना आपल्या दाराशी येईल, अशी लोकांना भीती वाटत होती. त्यामुळे निवासी इमारतींमधील लोकांनी पेपर टाकणार्‍या मुलांना येण्याला बंदी घातली. पेपर छापला तर भीतीमुळे वितरक तो उचलत नाहीत, त्यामुळे तो छापायचा कशासाठी असा प्रश्न वर्तमानपत्रांच्या मालकांना पडला. कारण छापलेला पेपर वितरकांनी उचलला नाही, तर त्याचे गठ्ठे पडून राहणार, त्यामुळे नुकसान होणार, असा विचार ही मंडळी करू लागली. तीन महिन्यांनंतर राज्य सरकारने वृत्तपत्र छपाई आणि वितरणाला परवानगी दिली. पण ती घरोघरी नव्हे तर पेपर स्टॉलवर. पण पुन्हा पेपर स्टॉलवर जाणार कोण, तो पेपर घेऊन तो माणूस घरी येणार. त्यामुळे त्या पेपरची घरच्यांना भीती. सध्या आपल्या घरी टीव्हीवर आठशे चॅनेल दिसत असले आणि वृत्तवाहिन्या बातम्यांचा भडीमार करत असल्या तरी वर्तमानपत्र हातात घेऊन बातम्या वाचण्यात जे मनाला समाधान मिळते ते खूपच वेगळे असते. वर्तमानपत्र हातात घेऊन चाळणे, वाचणे हे आपल्या केवळ वाचन संस्कृतीचाच नव्हे तर संस्कृतीचाही भाग होऊन बसला आहे. पण कोरोना या संसर्गजन्य विषाणूने वर्तमानपत्र व्यवसायाला अभूतपूर्व असा धक्का दिला, त्यामुळे हे क्षेत्र पार हादरून गेले. आजवर अनेक उत्पात झाले, अनेक संकटे आली; पण वर्तमानपत्रांवर लोकांनी बहिष्कार टाकण्याची वेळ यापूर्वी अशी कधीच आली नव्हती.

- Advertisement -

वर्तमानपत्र म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ, वर्तमानपत्र म्हणजे समाजाचा आरसा, वर्तमानपत्र म्हणजे समाजातील दुष्प्रवृत्तींवर वचक, वर्तमानपत्र म्हणजे वैचारिक वाचन, पण हे सगळे असतानाही कोरोना महामारीने अशी काही लोकांच्या मनावर दहशत बसवली की, या व्यवसायाचे कंबरडे मोडले. त्याचसोबत वर्तमानपत्रांना सरकारकडून येणे असलेली सहा महिन्यांची जाहिरातींची देणी देण्यात आली नाहीत. खरे तर ही वर्तमानपत्रांची हक्काची देणी आहेत, पण सरकार ती द्यायला तयार नाही, त्यामुळे या क्षेत्रावर मोठेच संकट आलेले आहे. अगोदरच सरकारने थकवलेली देणी आणि त्यात कोरोना काळात लोकांनी छापील वर्तमानपत्रांवर भीतीपोटी टाकलेला बहिष्कार, यामुळे वर्तमानपत्रांची परिस्थिती आगीतून फुफाट्यात अशी झालेली आहे. त्यामुळे वर्तमानपत्र चालवायचं कसं, असा प्रश्न अनेक वर्तमानपत्र चालकांसमोर पडलेला आहे. याचा फटका अनेक पत्रकारांना जसा बसला आहे, तसाच तो या व्यवसायाशी संबंधित असणार्‍या अनेकांना बसला आहे. वर्तमानपत्रांना छपाईसाठी कागद आणि शाई पुरवणार्‍यांपासून ते वर्तमानपत्रांची रद्दी विकत घेणार्‍यांपर्यंत सगळ्यांचेच व्यवसाय कोलमडले आहेत. यात सगळ्यात मोठा फटका घरोघरी पेपर टाकणार्‍या वितरकांना आणि त्यांच्या हाताखाली काम करणार्‍या मुलांना बसला आहे. ही गरीब मुले सकाळच्या वेळी वृत्तपत्रे घरोघरी टाकून काही पैसे मिळवत असत; पण आता घरोघरी वर्तमानपत्रे टाकणेच बंद झाल्यामुळे त्यांना मिळणारे पैसेही बंद झाले आहेत.

वर्तमानपत्रांची छपाई सुरू झाली असली तरी त्यांचा खप पूर्ववत झालेला नाही. स्टॉलवर काही प्रमाणात पेपर विकले जातात; पण बर्‍याच निवासी सोसायट्यांमध्ये पेपर टाकणार्‍या मुलांना प्रवेश नाही, त्यामुळे ही मुले पेपर गेटवर वॉचमनजवळ ठेवतात. ज्यांचे पेपर असतील त्यांनी ते घेऊन जायचे असतात. बरेच वेळा लोक आपले पेपर घेऊन जातही नाहीत, ते तसेच पडलेले असतात. कोरोनाच्या भीतीमुळे वर्तमानपत्रांविषयी लोकांच्या मनात एकप्रकारे उदासीनता आलेली आहे. त्यात पुन्हा बातम्या टीव्हीवर दिसत असतात, त्यात कोरोनाच्या सतत आदळत राहणार्‍या बातम्यांमुळे हृदयाची धडधड वाढत जाते, त्यात पुन्हा बातम्या देणार पेपर नकोरे बाबा, अशा विचित्र कोंडीत लोक सापडलेले आहेत. कोरोना आता दीर्घकाळाचा साथीदार आहेत, काळजी घेऊन त्याच्यासोबतच आपल्याला जगावे लागणार आहे, हे आता आरोग्य विषयातील तज्ज्ञांनीही मान्य केले आहे. कारण जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी लस शोधण्यासाठी अहोरात्र संशोधन आणि चाचण्या सुरू आहेत; पण अजूनही प्रभावी लस तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आलेले नाही. पुढील काळात कोरोनावर मात करणारी लस मिळेल; पण त्याला अजून वेळ लागेल. किती वेळ लागेल हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळे आवश्यक असलेली काळजी घेऊन आपल्याला कोरोनासोबत जगावे लागेल, आपले कामकाज सुरू करावे लागेल.

- Advertisement -

छापील वृत्तपत्रांची कोरोनाने कोंडी केल्यामुळे अनेक वर्तमानपत्रांनी वर्तमानपत्रांच्या ई पेपरच्या पीडीएफ आवृत्या ऑनलाईन प्रसिद्ध करायला सुरुवात केली. त्यातून बातम्या समजतात हे खरे आहे; पण त्यातून वर्तमानपत्र वाचल्याचे समाधान मिळत नाही. विशेषत: घरात जी वृद्ध मंडळी आहेत, त्यांना छापील वर्तमानपत्रांचीच सवय आहे, पण कोरोनाचा जास्त धोका वृद्धांना आहे, असे जाहीर झाल्यावर त्या बिचार्‍यांचे तर वांदेच झाले. कारण त्यांना मोबाईल, लॅपटॉपवर पेपर वाचण्याची सवय नाही. त्यांना कागदी वर्तमानपत्रांची सवय असते. पण नेमकी कोरोनाने त्यांची कोंडी केली आहे. तंत्रज्ञान आधुनिक होत गेल्यानंतर अनेक कार्यालये आता पेपरलेस झाली आहेत. एकेकाळी लिखाणासाठी पेनचा वापर होत असे, आता तो फक्त सही करण्यापुरता उरला आहे.

एकेकाळी एका खोलीच्या आकाराचा असणार संगणक पुढे छोटा होत गेला, पुढे तो टेबलटॉप झाला, पुढे लॅपटॉप झाला, आता तो मोबाईलच्या स्वरुपात पामटॉप म्हणजे हाताच्या तळव्यावर आला आहे. संगणकाने कागदावर लिहिण्याची गरज संपवून टाकली, कार्यालये पेपरलेस झाली, पण कोरोनासारखी महामारी येऊन वर्तमानपत्रांनाच पेपरलेस करून टाकेल, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. काळाची कूस बदलत असते, त्यामुळे परिस्थिती बदलत असते, त्यामुळे हेही दिवस जातील आणि कोरोना दूर होऊन वाचक पुन्हा छापील वर्तमानपत्रांना जवळ घेतील, अशी आशा करूया. जॉर्ज रोडेनबॅच या महान लेखकाने असे म्हटले आहे, ‘अक्षरे ही कागदात अगोदरच दडलेली असतात, पेनातील शाईने आपण ती रंगवत असतो.’ पण ज्या कागदात अक्षरे दडलेली असतात, त्या कागदाचीच भीती लोकांना वाटू लागली आहे. भय कागदाचे संपत नाही, या मनोवस्थेतून वाचक लवकरच बाहेर पडतील अशी अपेक्षा करूया.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -