घरफिचर्समायमहानगर ब्लॉगPushpa Bhave : एक निर्भिड व्यक्तिमत्त्व

Pushpa Bhave : एक निर्भिड व्यक्तिमत्त्व

Subscribe

बाणेदार व्यक्तिमत्त्व, स्वच्छ धारदार वाणी, पुस्तकी ज्ञानापेक्षा समाजात वावरत मिळणारा आकाशी दृष्टिकोन हे प्रा. पुष्पा भावे यांच्याकडून ज्याला शिकायला मिळाले, ते विद्यार्थी खरोखर भाग्यवान होत. सुरुवातीला सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झालेल्या पुष्पाबाईंनी नंतर डहाणूकर, महर्षि दयानंद, चिणॉय, या महाविद्यालयात अध्यापन केले आणि शेवटी रुईया महाविद्यालयातून त्या निवृत्त झाल्या. या आपल्या शिकवण्याच्या मोठ्या प्रदीर्घ काळात बाई फक्त प्राध्यापकी करून थांबल्या नाहीत तर त्यांनी सामाजिक बांधिलकी मानणारे विद्यार्थी कार्यकर्ते घडवले. याच मुलामुलींनी पुढे जाऊन देशात परदेशात नाव कमावले.

बाईंवर गांधीवादाचा संस्कार होता. पुष्पा भावे या माहेरच्या सरकार. बाईंचे आजोबा गजानन सरकार हे प्रार्थना समजाचे पुरस्कर्ते होते. माहिमला सरकारांचा वाडा होतो, पण तत्त्वांमुळे आजोबांनी वाडा सोडला आणि दादरच्या दोन खोल्यांच्या घरात ते राहिले. आजी सरस्वती. वडील प्रभाकर आणि आई सुनंदा, भाऊ रमेश्चंद्र, बहीण तिलोत्तमा यांच्यासह बाईंनी दादरच्या या घरात आपलं कर्तृत्व खुलवलं. वडिलांना पप्पा म्हणूनच मुले संबोधत. तिन्ही भावंडे हुशार व उच्चशिक्षित. बाईंनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात असताना नाटकांतून कामे केली, शिवाय महाविद्यालयाच्या मासिकातून कविताही लिहिल्या आहेत. सुरक्षित आयुष्याच्या मध्यमवर्गीय विचाराने बाईंनी नाटकांत काम करण्याकडे पाठ फिरवली. तरीही पुढे नाट्यक्षेत्राशी संबंधीत राहिल्या. १९६७-६८च्या दरम्यान मराठवाडा, नंदूरबार भागाशी त्यांचा संबंध आला. मराठवाडा विद्यापीठात नाटक विभाग सुरू करण्याचा आग्रह बाईंनी धरला होता. माणूसमध्ये नाट्यसमीक्षणाचं सदर बाई लिहू लागल्या. व्यावसायिक नाट्यकर्मीही बाईंचे लेखन गंभीरपणे घेत बाई म्हणत. डॉ. श्रीराम लागूंचा अभिनय आमच्या पिढीवर संस्कार करून गेला, असे त्या सांगत.

- Advertisement -

सामाजिक कृतज्ञता निधीत बाईंसोबत डॉ. लागूही सक्रिय होते. डॉ. बाबा आढाव, डॉ. राम आपटे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, गजानन खातू, सदाशिव अमरापूरकर, ताहेर, पुनावाला, सुभाष लोमटे या विश्वस्तांसोबत बाईही क्रियाशील होत्या. सामाजिक कृतज्ञता निधीला राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातून सादर केलेल्या लग्नाची बेडी नाटकातून २५ लाखांपेक्षा जास्त निधी उभा राहिला. या निधी संकलनाचे वैशिष्ट्य म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रात ठसा उमटवून सामाजिक क्षेत्रात स्वारस्य दाखवत कलाकारांनी हा निधी उभा केला.

मृणाल गोरे यांच्या महागाईविरोधी लढ्यामुळे बाई मृणाल गोरे आणि अहिल्या रांगणेकर यांच्याजवळ आल्या. आणीबाणीत मात्र दोघींनी तसे एकत्र काम केले. आणीबाणीत भूमिगत असताना मृणाल गोरे पुष्पा ताईंच्या घरी राहिल्या होत्या. पन्नालाल सुराणा, नानासाहेब गोरे, सदानंद वर्दे आदी लढ्यातील नेते पुष्पाताईंकडे येत जात असत. लेखनावर एकदा बंधन आले की, लेखन मरते, लेखन मेले की विचार मरतात, विचार मेले की संस्कृती धोक्यात येते, पुढे विकृतीला आरंभ होतो, असे म्हणत दुर्गा भागवत यांनी आणीबाणीला विरोध केला, तेव्हा हा आवाज बुलंद करण्यात बाई आघाडीवर होत्या. १९७६-७७ दरम्यान दुर्गाबाईंना जेव्हा अटक झाली तेव्हा पुष्पाताईही आणीबाणीविरोधी रणांगणात निर्भिडपणे उतरल्या. रुईयासमोर महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थी जमले होते. या विद्यार्थ्यांना त्यांनी लढ्याची दिशा त्या चौकात त्यांनी रणरागिणीप्रमाणे दिली. त्यांच्या शब्दांनी प्रेरित होऊन असंख्य विद्यार्थी लढ्यात उतरले. कित्येकांना अटकही झाली.

- Advertisement -

मृणालताईंच्या नागरी निवारा उभारणीचा बाईंना अभिमान होता. मृणाल गोरे यांच्या नावाचे केंद्र पुष्पा भावे यांच्या पुढाकाराने सुरू झाले. मृणाल गोरे Interactive सेंटर फॉर सोशल जस्टिस आणि पीस इन साऊथ एशिया असे त्या केंद्राचे नाव. आणीबाणीनंतरही राजकारणातही बाईंचा दबदबा निर्माण झाला. कारण त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये बाईंनी महाराष्ट्र पालथा घातला तो प्रचार सभांनी. मध्य मुंबईतून Ad. बी. सी. कांबळे उभे होते. बाईंनी आपला घणाघातील विचारांनी हा मतदारसंघ पिंजून काढला. बी. सी. यांच्या विजयानंतर अभ्युदय नगर मैदानात प्रचंड मोठी सभा झाली. त्या सभेत प्रा. मधु दंडवते बोलत असताना सभा मैदानात बाईंचा प्रवेश झाला, तेव्हा श्रोत्यांतून आवाज आला, वुई वाँट पुष्पा भावे. दंडवते यांनी बाईंना माइक देऊन श्रोत्यांचा मान राखला. हे दृश्य पाहून बाईंचा विद्यार्थी म्हणून माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू नकळत कधी वाहू लागले हे मलाच कळले नाही. मात्र निर्भिड स्वभाव, तत्त्वाशी एकनिष्ठ म्हणून राजकारणापेक्षा समाजकारणात बाई अधिकच कार्यरत झाल्या.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत बाईंनी २५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी काम केले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत विद्यार्थी असलेल्या बाईंच्या मते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अनेक दृष्टीने महत्त्वाची होती. त्या चळवळीचा प्रभाव पुढील काळात महाराष्ट्राच्या संस्कृती आणि राजकारणावर राहिला. बाई निर्भिड असल्याची महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने ओळख झाली, ती रमेश किणी प्रकरणाने. जिद्दीने निर्भयपणे त्या शीला किणी यांच्यासोबत राहिल्या, लढल्या. रमेश किणी प्रकरणाची दहशत एवढी होती की, मुंबईमध्ये कित्येक वकील केस हाती घेण्यासाठी बिथरले होते. पण सांगलीचे स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब लाड यांचा मुलगा Ad. प्रकाश लाड यांनी केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे केस पुढे जाऊ शकली. अशाच प्रकरणामुळे एकदा काही शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या वसईच्या जागा बळकावण्याच्या प्रकरणात बाईंच्या घरात घुसल्या. बाईंनी न डगमगता त्यांना आपली भूमिका पटवून देऊन त्यांना परत पाठवले.

सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत राहूनही कौटुंबिक वात्सल्य जोपासणारे आणि पती-पत्नी प्रेमाचा आदर्श जोपासणारी जी कुटुंबे आहेत, त्यात अनंत भावे आणि पुष्पा भावे यांचा उल्लेख करावा लागेल. प्रा. अनंत भावे यांनी बाईंच्या आजारपणात जी सेवा केली आहे, त्याला तोड नाही. सद्यस्थितीत सभोवतालची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती माणसाला अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे आपण आपली मूल्ये हरवत चाललो आहोत, अशा स्थितीत निर्भयपणे विचार देणाऱ्या, योग्य मार्गाने दिशा दर्शवणाऱ्या पुष्पा भावे यांच्यासारख्या विचारवंतांची गरज आहे.

– भास्कर सावंत
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -