संजय ‘उवाच’

Subscribe

महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या सत्ता परिवर्तनाच्या समयी अत्यंत मोलाची भूमिका बजावत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीनही परस्परविरोधी किंवा अगदी भिन्न विचारसरणीच्या तीन पक्षांची आघाडी करत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा मोठा वाटा होता आणि आहे. भाजपची स्वबळावर 105 आमदार निवडून आलेले असतानादेखील आणि राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष जाहीर झालेला असतानादेखील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि शिवसेना नेते संजय राऊत या दोघांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या काही राजकीय खेळ्या केल्या त्यामुळेच महाराष्ट्रात 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात रोवली गेली आणि राज्याच्या सर्वोच्च सत्तापदाची अर्थात मुख्यमंत्रीपदाची माळ शरद पवार यांच्या आग्रहामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात पडली.

महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकूनदेखील आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांचे भक्कम सरकार पाठीशी असतानादेखील राज्यात भाजपची सत्ता येऊ शकली नाही आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होता आले नाही आणि याला कारणीभूत ज्याप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ठरले होते त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सत्ता परिवर्तनाच्या या नाट्यात जी काही मोलाची भूमिका बजावली त्याची सल म्हणा अथवा राजकीय राग म्हणा तो महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या मनामध्ये ठसठसत आहे, असं संजय राऊत यांनीच अनेक वेळा जाहीररीत्या सांगितले आहे. बुधवारी सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केंद्र सरकार महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कमकुवत करण्यासाठी करत असल्याचा आरोप केला आहे. कालच त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवून केंद्र सरकारच्या या पद्धत विरोधात तक्रार केली होती.

- Advertisement -

व्यंकय्या नायडू यांच्याकडून या संदर्भात त्यांना विचारणा झाल्याचीदेखील माहिती त्यांनी स्वतः दिली आणि एकूणच आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर आणि त्याचबरोबर ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर जी काही टीका केली आहे ती पहाता उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुका येत्या 3 मार्च रोजी संपत आहेत आणि 10 मार्चला त्याचे निकाल अपेक्षित आहेत. या पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल काहीही लागले तरी त्यानंतर अर्थात 10 मार्चनंतर महाराष्ट्रातील राजकीय सारीपाटावर काही महत्वपूर्ण उलथापालथी घडण्याची शक्यता आहे. महाभारतातील संजयप्रमाणे शिवसेना नेते संजय राऊत यांना भविष्यात ज्या काही संभाव्य राजकीय घडामोडी घडू शकतात याची कुणकुण आधीच लागलेली असावी.

त्यामुळे ते दिवस-रात्र अलर्ट मोडवर असतात. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्या कारवाईचा फास हा महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील काही मंत्री तसेच शिवसेना नेत्यांच्या विरोधात अधिक आवळू शकते. परिवहन मंत्री अनिल परब आणि त्याचबरोबर खासदार संजय राऊत हे भाजप नेत्यांच्या प्रमुख रडारवर आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि त्यांच्याशी संबंधित काही मंडळींविरोधात यापूर्वीच ईडीकडे तक्रारी केल्या आहेत. त्यासंदर्भात चौकशीदेखील सुरू केलेली आहे आणि १० मार्चनंतर याबाबतच्या कारवायांना अधिक वेग येण्याची शक्यता आहे. परवाच पुण्यामध्ये शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केली होती त्यामुळे सहाजिकच राज्यातील भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध हे कमालीचे कटू झाले आहेत.

- Advertisement -

राऊत यांनी यापूर्वी काही वर्षांपूर्वी केलेल्या जमीन व्यवहार आवरून त्यांना ईडीकडून नाहक त्रास देण्यात येत असल्याची तक्रार त्यांनी उपराष्ट्रपतींकडे केली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या कन्येच्या विवाह सोहळ्यातील मंडप डेकोरेटरलादेखील ईडीकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आणि सर्वात शेवटी म्हणजे तुम्ही जर आमच्या घरात घुसलात तर तुम्ही नागपूरलादेखील जाऊ शकणार नाहीत, असा गर्भित इशारादेखील त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार तसेच किरीट सोमय्या आणि अतुल भातखळकर अशा मंडळींनी संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. कर नाही त्याला डर कशाला असा एकूण सूर राज्यातील भाजप नेत्यांचा आहे.

तर वरिष्ठ भाजप नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी तर संजय राऊत यांची आजची पत्रकार परिषद म्हणजे शिवसेना संपवणारी पत्रकार परिषद होती अशी जहरी टीका त्यांच्यावर केली आहे. एकूणच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये महापालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होणार आहे आणि त्याच वेळेला केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षातील नेत्यांच्या मागे डीडीच्या कारवायांचा ससेमिरा लावून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आणण्याचे डावपेच भाजप नेत्यांकडून सुरू आहेत. पर्यटनमंत्री व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीदेखील संजय राऊत यांचे उपराष्ट्रपती यांना पाठवलेले पत्र बरेच बोलके आहे, अशी भावना व्यक्त करून भाजपकडून ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जात आहे हेच सांगण्याचा त्यानेदेखील प्रयत्न केला आहे.

संसदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातून थेट महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाला कोरोना देशभर पसरवण्यासाठी जबाबदार ठरवलेले आहे, त्यामुळे मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. संजय राऊत यांनी विरोधकांना उत्तर द्यायचा मी काही एकट्यानेच ठेका घेतला आहे का, सरकारमध्ये अन्य लोकही आहेत, त्यांनीही उत्तर द्यावे, असे म्हटले आहे. त्यांच्या बोलण्यातून वेगळे संकेत मिळत आहेत, ते नेमके काय आहेत, ते येत्या काही दिवसात उघड होण्याची दाट शक्यता आहे.

त्याचबरोबर आणखी एका गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यसभेत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची जाहीरपणे केलेली प्रशंसा ही दिल्लीत आणि महाराष्ट्रातही वेगळा राजकीय संदेश देणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्व एकीकडे काँग्रेसवर यथेच्छ तोंडसुख घेत असताना दुसरीकडे तब्बल 1999 पर्यंत काँग्रेसमध्ये प्रमुख नेते राहिलेल्या शरद पवार यांची उघडपणे पाठराखण करत असतील तर सर्वसामान्यांनी त्यापासून नेमका कोणता अर्थबोध घ्यायचा हादेखील एक संभ्रमच आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्व घडामोडींकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात हेदेखील आगामी काळात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत वेट अँड वॉच करणे एवढेच सर्वसामान्यांच्या हातात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -