Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai

फ्लॅशबॅक

नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवताना महत्त्वाची साथ देणार्‍या सेनेला ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही, असा निर्धार भाजपने केलेला दिसतो. पण ही तीच भाजप आहे जिने जम्मू-काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीबरोबर, उत्तर प्रदेशात मायावतीबरोबर (जून १९९५, मार्च १९९७) तर बिहारमध्ये आपल्या जागा जास्त असताना जनता दलाच्या नितीशकुमार यांना राज्याच्या प्रमुखपदी बसवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. गोवा, मणिपूरमध्ये पक्षफोडीने सरकार स्थापन करण्याचे काम भाजपने केले आहे. तसे मात्र महाराष्ट्रात लागू पडणे कठीण वाटत आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यभरात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यातील ६३ टक्केे शेती पावसाने पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे तेथील शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापनेची बोलणी दूर सारून थेट मराठवाडा गाठला. त्यानंतर त्यांनी अचानक गोपीनाथ गडावर जाऊन डोके टेकवले. उद्धव यांच्या अचानक भेटीने सगळ्यांचीच धावपळ झाली. मुंडे भक्तांची आणि समाधीवर रांगोळी काढणार्‍या कलाकारांचीही…सध्याच्या राजकीय स्थितीचे चित्र गोपीनाथ गडावरच्या रांगोळीत बघायला मिळाले. धनुष्यबाणाच्या टोकावर कमळ चितारण्यात आले होते. तर कमळाची पाने दाखवण्याऐवजी ती गुलाबाची काटेरी पाने दाखवण्यात आली होती. सध्या सेनेने भाजपला बाणाच्या टोकावरच धरून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर धनुष्याची प्रत्यंच्या खेचून कमळाच्या पाकळ्या कोण विखरून टाकणार हाच खरा मुद्दा आहे. हे काम स्वतः पक्षप्रमुख करणार, एखादा राऊतांसारखा ‘बोलंदाज’ करणार की एखादा नवा खडसे सेनेमध्ये ‘कामी’ येणार की हे सगळं घडवायला काही अदृश्य हात उपयोगात येणार, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. नाही तरी कमळाला आता आयारामांची खूप सारी काटेरी पाने आलेलीच आहेत. त्या सार्‍या पानांमुळे कमळाच्या स्व:त्वावरच सवाल उठले आहेत.

नव्वदच्या दशकात युतीच्या संसारात भांड्याला भांडे आदळले की, आधी महाजन, मग नंतरच्या काळात मुंडे मातोश्रीवर जात ठाकरेंची समजूत काढत आणि पुन्हा संसार सुरू होई. भाजपच्या क्षितिजावर मोदी सुर्याचा उदय झाला, आणि मातोश्रीतील भाजप प्रेमाची सूर्यकिरणे लोप पावली. विशेषतः अमित शहा यांनी भाजप नेत्यांनी ठाकरेंच्या नाकदुर्‍या काढण्यासाठी मातोश्रीवर न जाण्याच्या सूचनाच देऊन टाकल्या. आता मोदी लाट देशभर उतरणीला लागली आहे. आणि नेमकी राज्यातील सत्तेची सूत्रं ठाकरेंच्या हाती आली आहेत. त्यात ठाकरेकुळातला ‘आदित्योदय’ भविष्यात तळपवायचा असेल तर भाजपला चेपायची ‘हीच ती वेळ आहे’ याची सेनेला नेमकी कल्पना आली आहे.

- Advertisement -

दुसरीकडे ज्या पवारांचे बोट पकडून मोदी राजकारणात आले (असे पंतप्रधान स्वतःच सांगतात) त्या पवारांना इडी कार्यालयाची वारी करवून राष्ट्रवादीचा रोष ओढवून घेणार्‍या भाजप विरुद्ध सगळेच एक झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत भाषणातच आपण परत येण्याची घोषणा केली. त्यावर राष्ट्रीय अध्यक्षांनी सर्वोच्च मोहोर उमटवली. त्यानंतर सगळे चित्रच जणू बदलून गेले. राज्यात भाजपसाठी ‘देवेंद्र बोले ओ सही’ अशी स्थिती झाली. उमेदवारी यादीतून पाच जण आणि प्रत्यक्ष निवडणुकीत पंकजा मुंडे आणि खडसे कन्या रोहिणी पराभूत झाल्यावर फडणवीसांना रान मोकळे झाले. त्याच कैफात बहुधा २८नोव्हेंबर रोजी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना एरव्ही जपून बोलणारे मुख्यमंत्री चुकले आणि राज्यात सत्तेचा खेळखंडोबा सुरू झाला. भाऊबीजेच्या दिवशी मी एका मराठी वृत्त वाहिनीवरील चर्चेत सहभागी होताना पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि दुसरे ब्राह्मण मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील काही योगायोगावर प्रकाश टाकला होता. तेव्हा स्वर्गीय प्रमोद नवलकरांच्या षष्ठब्दीपूर्ती सोहळ्यात मनोहर जोशी म्हणाले होते, ‘माझ्यावर व्यक्तीश: काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत.’ ही गोष्ट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जिव्हारी लागली. त्याच कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख म्हणाले ‘जे काही डाग आहेत ते मातोश्रीवरच आहेत. पंत स्वच्छ आहेत.’ त्यानंतर जोशींना खर्‍या अर्थाने उतरण लागली. जोशींना गिरीश व्यास या आपल्या जावयाच्या पुण्यातील भूखंडाचे भ्रष्टचार प्रकरण निमित्ताने पदावरून दूर जावे लागले. तेव्हा व्यवसायाने केमिस्ट असलेल्या रवी कामत यांनी पुण्याच्या काही नगरसेवकांना हाताशी घेऊन राणेंसाठी काम करत जोशींना घरी बसवले. आणि मुख्यमंत्रीपदी नारायण राणे बसलेे. राणेंनी कामत यांना या ऑपरेशनसाठी डोळे दिपवणारा प्रचंड मेहनताना दिलाच, जोडीला त्यांना आपला राजकीय सल्लागारही बनवले. आता राणे मुख्यमंत्रांच्या पक्षात आहेत आणि फडणवीसांच्या सत्तेचे सूत्रधार चेंबूरच्याच सांडूबागेजवळील आलिशान टॉवरमधून सत्तेच्या गुंतागुंतीचे ‘गुंडे’ सोडवताहेत. हे काम कठीण झाल्यामुळे फडणवीसांच्या सत्तेचे ‘नीरज’ (कमळ) खुलणे कठीण झाले आहे.

महसूल मंत्री पदावर असणारी चंद्रकांत पाटलांसारखी व्यक्ती पक्ष, जात आणि दिल्लीश्वर या पातळ्यांवर मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहू शकते. त्यात पक्षातले ६/७ दुखावलेले बडे नेते शांत का बसतील? त्यातच फडणवीस यांनी ऐन दिवाळीतच शहा-ठाकरे यांच्यात मुख्यमंत्री पदाबाबत काही ठरलेच नाही, असे पत्रकारांना सांगून सेनेच्या पक्षप्रमुखांना खोटे पाडले. याचा रोष भाजपने ओढवून घेतला आहे त्याची काळी छटा त्यांच्या चेहर्‍यावर भाजप आमदारांच्या बैठकीत साफ दिसत होती. जोडीला देवेंद्र यांची सपशेल खराब कामगिरी जबाबदार ठरली आहे. ‘मी पुन्हा येईन’ असे ओरडून सांगणारे मुख्यमंत्री मी रडतखडत येईन असे तर म्हणाले नव्हते ना, असा प्रश्न पडण्याइतपत स्थिती वाईट आहे. आपण आशिष देशमुखांना दीड लाख मताधिक्क्याने हरवू, असे म्हणणारे फडणवीस ५० हजार मतांची आघाडीही घेऊ शकले नाहीत. फडणवीस यांना नागपूर दक्षिण मतदारसंघात ३००० नोटा मते पडलीत. त्यामुळे पक्षातील विरोधक म्हणतात, तुम्ही होमपीचवर इतक्या लोकांना नको आहात तर राज्यातील लोकांना का वेठीला धरताय. नागपूर शहरात नितीन राऊत आणि विकास ठाकरे या काँग्रेसच्या उमेदवारांनी आपापले विजय मिळवून मुख्यमंत्र्यांच्या जखमेवर मीठ चोळले. नागपूर जिल्ह्यातील १२ पैकी ११ जागा मागल्या खेपेस युतीकडे होत्या. आता ती संख्या घटून सातवर आली. या अशा अनेक गोष्टींनी मुख्यमंत्री घेरले गेलेत. त्यामुळे पाच वर्षांत निष्कलंक असलेल्या मुख्यमंत्र्यांना नामोहरम करण्याची ‘हीच ती वेळ आहे’ हे शिवसेना ओळखून आहे. हा रेटा वाढला तर फडणवीसांना किरीट सोमय्यांचा अनुभव देण्याची संधीही सेना दवडणार नाही.

- Advertisement -

नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवताना महत्त्वाची साथ देणार्‍या सेनेला ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही, असा निर्धार भाजपने केलेला दिसतो. पण ही तीच भाजप आहे जिने जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीबरोबर ,उत्तर प्रदेशात मायावतीबरोबर (जून १९९५, मार्च १९९७) तर बिहारमध्ये आपल्या जागा जास्त असताना जनता दलाच्या नितीशकुमार यांना राज्याच्या प्रमुखपदी बसवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. गोवा, मणिपूरमध्ये पक्षफोडीने सरकार स्थापन करण्याचे काम भाजपने केले आहे. तसे मात्र महाराष्ट्रामध्ये लागू पडणे कठीण वाटत आहे.

१९९९ साली सेना-भाजप युतीला १२५ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसकडे १३३ जागांचे बळ होते. पण मुख्यमंत्री राणे होणार की मुंडे या गोंधळात सत्ता गेली आणि त्यानंतर सुमारे १५ वर्षे युतीला विरोधी बाकावर बसावे लागले. आताही ज्यांना मुख्यमंत्री पदाची लालसा झालीय आणि युतीतल्या ज्यांची पवारश्रद्धा असीम झाली, असे दोघेही १९९९ च्या वाटेनेच जाणार नाहीत ना, हे बघणे उत्कंटावर्धक असेल. भाजपला ते होऊ द्यायचे नसेल तर हा मराठमोळा गड राखायला ताकदीचा, मातोश्रीला ‘आपलंसं’ करणारा नितीन गडकरींसारखा सेनापतीच लागेल. नाहीतर ‘फ्लॅशबॅक’ अटळ आहे.

- Advertisement -