सुशेगात गोव्यावर भायल्यांची नजर !

गोव्याच्या मतदारांचा विचार केला तर गोव्यात 33 टक्के मतदार ख्रिश्चन आहेत. 3 टक्के मतदार हे मुस्लीम आहेत. आणि उर्वरित मतदारांमध्ये हिंदू आणि इतर असा या राज्याचा तोंडवळा आहे. यापैकी काँग्रेसची भिस्त प्रामुख्याने ख्रिस्ती मतदारांवर आहे. इथल्या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेस आणि आप यांची भूमिका ही महत्वाची असणार आहे. गोयंकरांना ‘गोयातले आणि भायले’ असा उभा भेद करायची सवय आहे. त्यामुळे आता गोव्याच्या विधानसभा निवडणूक मैदानात प्रचारासाठी उतरणार्‍या शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना गोयंकार किती प्रतिसाद देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गोवा हे आपल्या सगळ्यांना सागरी पर्यटनासाठी माहीत असलेले राज्य आहे. त्यामुळेच गोवा म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतात ताजे फडफडीत मासे, फेणी आणि कॅसिनोमधली धम्माल मस्ती… याच गोव्याला भाजप ओळखतो ते मात्र पंतप्रधान मोदींचे लॉन्चिंग पॅड म्हणून. सप्टेंबर 2013 मध्ये याच गोमंतकात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत कौल मिळाला. तेव्हापासून तर गोवा हा मोदींसाठी एक प्राइम अजेंडाच ठरला आहे. त्यामुळे 2017 च्या विधानसभेनंतर भाजपने खास नितीन गडकरी यांना पाठवून सरकार स्थापनेची फतेह करुन घेतली. आता हीच जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे. तर शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी गोव्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. यातील देवेंद्र हे मोदींचे खास तर राऊत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे राष्ट्रीय चाणक्य. सध्यातरी सुशेगात गोव्यात या दोन नेत्यांमधला कलगीतुरा रंगला आहे.

गोव्यात विधानसभा निवडणूक 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 40 जागांच्या विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी 21 जागांची गरज असते. मागच्या निवडणुकीत काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या. बाकीच्या चारजणांची जुळवाजुळव करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी जो वेळ खर्ची घातला तितक्या वेळात जाऊन नितीन गडकरी यांनी सत्तेचा तुकडाच पाडला. आणि काँग्रेस नेते हात चोळत बसले. पुढे दोन वर्षांनी भाजपची विद्या भाजपलाच देऊन टाकण्याचं काम सेना नेते संजय राऊत यांनी शरद पवारांच्या आशीर्वादाने केले. आणि फडणवीस यांना शतकी मजल मारुनही हात चोळत बसावं लागलंय.
युरोपमध्ये जितक्या सहजतेने आपण पार्टनर बदलू शकतो त्याहीपेक्षा सहजगत्या गोव्यामध्ये राजकीय नेते आपली पार्टी बदलू शकतात, याचा अनुभव गोयंकरांनी गेल्या अनेक वर्षात घेतलेला आहे. आणि आताही बहुदा तसंच काहीसं होण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत. कारण 21 जानेवारीपासून निवडणुकांचे अर्ज दाखल करायला सुरुवात होईल.

या दरम्यान अनेकजण इकडून तिकडे उड्या मारतील. यंदाच्या निवडणुकीतही भाजपला आव्हान असणार आहे ते काँग्रेसचं. गोव्याच्या मतदारांचा विचार केला तर गोव्यात 33 टक्के मतदार ख्रिश्चन आहेत. 3 टक्के मतदार हे मुस्लीम आहेत. आणि उर्वरित मतदारांमध्ये हिंदू आणि इतर असा राज्याचा तोंडवळा आहे. यापैकी काँग्रेसची भिस्त प्रामुख्याने ख्रिस्ती मतदारांवर आहे. इथल्या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेस आणि आप यांची भूमिका ही महत्वाची असणार आहे. पण गोव्याच्या बाबतीत एक गोष्ट नमूद करायला हवी ती म्हणजे इथल्या गोयंकरांना आतले गोयंकर सोडले तर ‘गोयातले आणि भायले’ असा उभा भेद करायची सवय आहे. मग अगदी एखादा गोव्यातला तरुण किंवा तरुणी कामानिमित्त बाहेर असली तरी तिचं गोव्याबाहेर असण्याचा ते आवर्जून उल्लेख करतात आणि त्या व्यक्तीचं वेगळेपण अधोरेखित करतात.

गेल्या पाच वर्षांत भाजपने गोव्यात केलेला कारभार हा खूपच निकृष्ट दर्जाचा होता. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत संघाच्या आणि भाजपच्या मुशीतले असले आणि वैद्यकीय क्षेत्रात असूनही त्यांनी कोविडच्या दुसर्‍या लाटेमध्ये केलेली कामगिरी ही खूपच सुमार दर्जाची होती. पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेमध्ये ऑक्सिजनची गोवेकरांना भासलेली चणचण आणि त्यासाठी नागरिकांकडून एका सिलेंडरसाठी पाच-दहा हजार रुपये वसूल करून झालेली लूट यामुळे प्रमोद सावंतांच्या सरकारबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. मुंबईच्या पातळीवरील जंबो कोविड सेंटरही इथे उभारता आले नाही. त्याचप्रमाणे इथे वेरणावरून जाणार्‍या डबल ट्रॅकिंगचा मुद्दा खूपच तापलाय. कारण यात गोयंकरापेक्षा भाजपला अदानींचं भलं करायचं आहे. खाणींची समस्या, अवैध वाहतूक, परप्रांतीयांच्या घुसखोरी आणि रोजगाराचे प्रश्न यासारख्या मुद्यांवर ही निवडणूक होणार आहे. आणि नेमक्या याच मुद्यांवर भाजप सरकारबद्दल मोठ्या प्रमाणात रोष आहे. पण निर्बुध्द काँग्रेस नेते भलत्याच मुद्यांचं राजकारण करतायत.

गोव्यात राहणारा गोयंकर आणि कोकणी बोलणारा हाच गोयंकरांना आपला वाटतो अशा परिस्थितीत सध्या गोव्याच्या निवडणुकीचा जर विचार केला तर तृणमूल काँग्रेस पार्टी आणि आप हे मोठ्या प्रमाणात गोव्याच्या ख्रिश्चन मतांमध्ये फूट पाडू शकतात. अशी सध्या तरी स्थिती आहे. यातही उल्लेख करावा लागेल तो ‘आरजी’ अर्थात रिव्होल्युशनरी गोवन पार्टीचा. 2017 मध्ये ‘आप’ला विशेष प्रभाव पाडता आला नव्हता. गोव्यामध्ये एल्विस गोम्स या डेप्युटी कलेक्टर असलेल्या अधिकार्‍याने ‘आप’ची बाजू सांभाळली होती. ‘आप’चं काम करण्याच्या प्रयत्नात एल्विस गोम्स यांनी आपल्या आयएएस होण्याच्या प्रयत्नांवरही पाणी सोडलं होतं. मात्र ‘आप’ मध्ये आणि गोम्स यांच्यामध्ये जे काही मतभेद झाले, त्यामुळे गोम्स काँग्रेसवासी झाले. आता पक्षाची धुरा वाल्मिकी नाईक सांभाळत आहेत. 40 जागा पैकी 2-3 जागांवर ‘आप’ण नक्की प्रभाव पडेल अशी सध्या स्थिती आहे. तर मूळच्या गोयंकरांच्या समस्या घेऊन मनोज परब हा युवक इथे चमकदार कामगिरी करतोय. तो आपल्याकडच्या राज ठाकरेंची भाषा करतोय त्याला विदेशात स्थायिक गोवेकर मदत करतायत. मात्र या पाठिंब्याच्या जोरावर तो प्रत्यक्ष निवडणुकीत किती जागा जिंकू शकेल हा येणार्‍या काळासाठीचा प्रश्न आहे.

बुधवारी सकाळी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेचा गोव्याशी संबंध काय असा प्रश्न उपस्थित केला. वरकरणी पाहता शिवसेनेसाठी गोव्याचे प्रभारी असलेल्या संजय राऊत यांना आणि शिवसेनेलाही शेलारांचा हा प्रश्न कदाचित आवडणार नाही. पण हे आशिष शेलार ज्या मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व करतात तो मतदारसंघ वांद्रे पश्चिम आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव वास्तव्याला आहेत. त्यांचा गोव्याशी खूपच घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे या ख्रिस्ती बांधवांचं फुटबॉल प्रेम, त्यांचा नाताळ, नववर्ष स्वागत यासारख्या गोष्टींमध्ये आशिष शेलार हे समरस झालेले असतात.पण तीच गोष्ट जर आपण संजय राऊत यांच्या बाबतीत बोलायची म्हटले तर संजय राऊत हे फक्त प्रासंगिक निमित्तानंच गोव्यामध्ये पोहोचत असतात. मग ते एखाद्या नेत्याच्या घरचं लग्न असो किंवा कौटुंबिक पर्यटन… मागच्या निवडणुकीत शिवसेनेला येथे भोपळाही फोडता आला नव्हता.

उत्तर गोव्याच्या तिन्ही जागांवर सेनेनं डिपॉझिट गमावलं. शिवसेनेमध्ये काही मोजकी मंडळी ही गोव्यातील आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो राज्यसभा सदस्य, सचिव अनिल देसाई यांचा. ते मूळचे गोव्यातल्या कोला या भागातले आहेत. एखाद्या गोयंकरासारखं उत्तम कोकणी तासनतास बोलतात. गोव्यातल्या ‘मी गोयंकार’ला सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सढळ हस्ते मदत करतात. पण निवडणुकीच्या रणधुमाळीत गायब असतात. चेंबूरचे आमदार प्रकाश फातरपेकर हे फाथरप्याचे आहेत. कालिन्याचे आमदार संजय पोतनीस हे पणजीचे आहेत. गिरगावच्या महिला नेत्या जयश्री बळ्ळीकर या बळ्ळीच्या आहेत. जोगेश्वरीचे नगरसेवक राजू पेडणेकर पेडण्याचे तर अंधेरी पूर्वेचे माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत शिवोलीमचे या सगळ्यांना उत्तम कोकणी येतं तिकडच्या मतदारांची मानसिकता कळते. पण या मंडळींना ना निवडणुकीपूर्वी विचारात घेतलं जातं ना प्रचारात सहभागी केलं जात. पाच वर्षं योजनाबध्द मतदारसंघ बांधण्यात राऊतांना स्वारस्य नसल्यानेच मागच्या वेळी सेनेच्या उमेदवारांचं डिपॉझिट गायब झालं.

खरंतर संजय राऊत यांसारखे नेते या निवडणुकांच्या वेळेस गोव्यात उगवतात त्यांनी ‘आप’चा आदर्श नजरेसमोर ठेवण्याची गरज आहे. मागच्या वेळेस ‘आप’ला फारसं यश मिळालं नव्हतं तरीही ‘आप’ने गोव्यातील प्रश्नांवर सातत्याने काम करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ‘आप’ला दोन ते तीन जागांवर चांगले यश मिळू शकेल. याची शक्यता इथल्या राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेने 3-5 उमेदवार उभे करून पाच वर्षांतून एकदाच त्यांच्या निवडणुकीच्या काळात खर्च करण्यापेक्षा एखादा किंवा दुसरा मतदारसंघ निवडून पाच वर्षे जर त्या मतदारसंघाची नीट मशागत केली. तर शिवसेनेला यश मिळू शकतो. गोव्याच्या राजकारणात एक किंवा दोन जागा सत्तेचा शकट हलवू शकतात. उदाहरणच द्यायचं झालं तर अपक्ष असलेल्या बाबूश मोन्सेरात यांचं देता येईल.

आज बाबूश मोन्सेरात आणि उत्पल पर्रिकर यांची पणजी या प्रतिष्ठेच्या एकाच मतदारसंघासाठी खेचाखेची सुरू आहे. अशा परिस्थितीत भाजप नेतृत्वाचा कल बाबूश मोन्सेरात यांच्याकडे आहे. उत्पल पर्रिकर यांनी वडील स्व. मनोहर पर्रिकर यांच्या पुण्याईपलीकडे फार विशेष छाप गोव्याच्या राजकारणात आणि समाजकारणात पाडलेली नाही. त्यामुळे भाजपचे नेते त्यांच्या यशाबद्दल साशंक आहेत. गोव्याच्या राजकारणात शिवसेनेला विशेष भूमिका नाही. राऊत आणि फडणवीस ज्या हिंदू मतांवर डोळा ठेवून इथल्या राजकीय आडाख्यांवर काम करतायत ती हिंदू मतं शिवसेनेला मिळणं खूपच दुरापास्त वाटतंय. याचं कारण इथला गोयंकर हा शिवसेनेला आपलं मानायला तयार नाही. त्यातच संजय राऊत हे कथा, पटकथा, दिग्दर्शन, निर्मिती हे सबकुछ आपणच करणार्‍या ‘शोमन’ सुभाष घई यांच्यासारखे गोव्यात वावरत असल्यामुळे सेनेच्या यशाला प्रचंड मोठ्या मर्यादा पडलेल्या आहेत.

भाजपची गेल्या पाच वर्षांत ही कामगिरी खूपच सुमार असली तरी केंद्रातली सत्ता, मोदींचं लॉन्चिंग पॅड असल्यानं वेगळी भावना, फडणवीसांची उपस्थिती आणि गांभीर्यपूर्वक रणनीती यामुळे भाजप सगळ्याच सर्वेमध्ये आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. इथल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या दुसर्‍या पिढीला स्थिरस्थावर व्हायचं आहे, त्यात उत्पल मनोहर पर्रिकर, विश्वजित प्रतापसिंह राणे आणि वलंका चर्चिल आलेमाव यांना सत्तेच्या वारीत वारकरी व्हायचंय. तोपर्यंत फडणवीस-राऊत हे एकमेकांना किती घायाळ करणार हाच सुशेगात गोयंकरांना पडलेला प्रश्न आहे.