घरफिचर्समायमहानगर ब्लॉगपुन्हा लॉकडाऊन नको रे बाबा!

पुन्हा लॉकडाऊन नको रे बाबा!

Subscribe

2020, कोरोना आणि लॉकडाऊन. आयुष्यात कधीही न विसरता येणार्‍या तीन घटना. ज्यांनी तुमचं माझंच नाही तर जगभरातल्या सजिवांचचं आयुष्य बदलून टाकलं. सर्दी, खोकला, ताप, सोसायट्यांच्या गेटवर अडकवण्यात आलेलं कोरोनाग्रस्तंच पोस्टर्स, अ‍ॅम्ब्युलन्स, सायरन ते थेट व्हेंटीलेटर आणि नंतर जळण्यासाठी स्मशानाबाहेर ताटकळत असलेले प्लास्टीकमध्ये गुंडाळलेले मृतदेह, नातलगांचे हंबरडे, लॉकडाऊन ते मरणाच्या भीतीने नाही तर जिवंत राहण्याच्या आशेने मुंबईतून आपआपल्या राज्यात हजारो मीटर पायी चालत जाणारे मजूर आणि त्यांचे भररस्त्यात तडफडून झालेले मृत्यू. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावल्याला आता एक वर्ष झाले आहे. पुन्हा तशी परिस्थिती नको असेल तर मात्र काळजी घ्यावी लागेल.

तब्बल 100 वर्षांनंतर कोरोनाच्या रुपाने ही महामारी संपूर्ण जगात आली. त्याआधीही अनेक संसर्गजन्य आजार आले. पण ते त्या त्या देशांपुरतेच मर्यादित राहिले. पण कोरोनाने हद्दच पार केली. चीनमध्ये जन्माला आलेला कोरोना आपल्या घरात येईल हा स्वप्नातही कोणी विचार केला नव्हता. पण तसे झाले खरे आणि मार्चमध्ये हा सूक्ष्म विषाणू देशात आला. त्याला कोणी येथून आणायला गेलं नाही. पण तिथून येणार्‍या एका व्यक्तीने तो सोबत आणला. त्याचा वाढणारा संसर्ग आणि वाढणारा मृत्यूचा आकडा आणि देशाची लोकसंख्या पाहता अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी 19 मार्चला संवाद साधला. त्यावेळी त्यांनी 22 मार्चला जनता कर्फ्युची घोषणा केली. सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत कोणीही घराबाहेर पडू नका अशी आर्जवी विनंतीच मोदींनी जनतेला केली.

यावेळी 22 तारखेला 5 वाजता 5 मिनिटं थाळी नाद करण्याचे आवाहन त्यांनी केलं. त्याला कारणही तसंच होतं. कारण तोपर्यंत युरोपमध्ये कोरोनाने कहर केला होता. घऱात व घराबाहेर कोरोनामृतांचे खच पडत असल्याचे भयाण फोटो एव्हाना सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रेत पुरण्यासाठी जमीन कमी पडत होती. यामुळे काही देशांनी महाकाय खड्ड्यातच प्रेत पुरण्यास सुरुवात केली होती. तर चीनने संपूर्ण जगाला अंधारात ठेवत हजारो कोरोना मृतदेहांची होळीच केली. पण सॅटेलाईटने या ज्वाळा कॅमेर्‍यात टिपल्या. कोरोनाचा भयंकर चेहरा हळूहळू जगासमोर आला. त्यातच कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना होता. त्यांच्यामुळे संसर्ग वाढत होता. यामुळे जर्मनी, इटली सरकारने अशा वृद्धांसाठी शहराबाहेर कॉलनीच तयार केली.

- Advertisement -

कोरोनाची लक्षणं असलेल्यांनाच नाही तर नसलेल्या वयस्क लोकांनाही पोलीस घरातून उचलून गावाबाहेर नेत होते. तेथील घरात त्यांना ठेवले जात होते. त्यांच्या जेवणाची राहण्याचीच नाही तर मरण्याचीही सोय सरकारने व्यवस्थित केली होती. कारण या वयस्क लोकांना आजारी पडल्यावर तिकडे बघायलाही कोणी फिरकत नव्हतं. सैनिकांच्या पहार्‍यात हे वयस्क शेवटचा श्वास घेत होते. घरातल्यांना फक्त ते गेले एवढाच निरोप दिला जात होता. थोड्या फार फरकाने हीच परिस्थिती अमेरिकेतही उद्भवली. पण अत्याधुनिक वैद्यकिय यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या अमेरिकेचे कोरोना काय वाकडं करणार या तोर्‍यात वावरणार्‍या तत्कालीन अध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांनीही अखेर कोरोनापुढे गुडघे टेकले. अनेक देशांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन केला. यापुढे भारताची काय बिशाद हेच ओळखत मोदींनीही लॉकडाऊनचा निर्णय घेतला.

मोठी लोकसंख्या असलेल्या भारतातील नागरिकांची मानसिकता तयार करणं गरजेचे होतं. यासाठीच 22 तारखेला जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंग सांभाळा हे देखील सांगण्यात आले. पण अतिउत्साही भारतीयांनी थाळी नादचा उद्देशच बदलून टाकत थाळ्यांबरोबर पत्रे, पराती, ढोल आणि हातात येईल ते बडवत गावभर मिरवणुकाच काढल्या. सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला. भारतीयांच्या मानसिकतेचे ते दर्शन होते. व्हिडीओ व्हायरल झाले. आंतरराष्ट्रीयस्तरावर कोरोनाच्या काळातलं भारतीयांचे हे वर्तन बघून जग चक्रावलं. रुग्ण वाढले. मग नाईलाजाने मोदींनी 25 मार्च ते 14 एप्रिल या काळासाठी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. सगळं ठप्प झालं. मात्र अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या. यादरम्यान, लोकांना गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ठराविक वेळा देण्यात आल्या. पण लोकांना त्यानिमित्ताने पाय मोकळे करण्यासाठी चान्स मिळाला.

- Advertisement -

वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने पुन्हा दुकानात गर्दी वाढू लागली. यादरम्यान, रुग्णसंख्याही वाढली. इतर देशांच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर कमी जरी असला तरी त्याचा वेग वाढत होता. युरोपसारखी परिस्थिती देशात निर्माण झाली. रुग्णसंख्या वाढली बेड कमी पडू लागले. व्हेंटीलेटरची कमतरता जाणवू लागली. देशात महाराष्ट्र हॉटस्पॉट होता. सर्वाधिक रुग्ण मुंबईत होते. देशाच्या आर्थिक राजधानीला कोरोनाचा विळखा बसला होता. यादरम्यान नागरिकांचे मनोबल वाढवण्यासाठी मोदींनी 5 एप्रिलला घरातील लाईट पेटवून आजूबाजूला पसरलेला अंध:कार दूर करण्याचे आवाहन केला. लोकांनी ते ही गेले. कोणी बाल्कनीत टॉर्च पेटवल्या तर काहींनी घरातील दिवे चालूबंद केले. प्रत्येकजण 14 एप्रिल केव्हा होतो. लॉकडाऊन केव्हा संपतो याची वाट पाहात होता. यादरम्यान, मिळालेला रिकामा वेळ लोक घरात चांगलचुंगल करून खात पित होते.

पदार्थांचे फोटो ग्रुपवर टाकून कधीही न मिळालेल्या सुट्टीचा आनंद साजरा करत होते. पण यादरम्यान, रुग्णसंख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढत होता. यामुळे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वाढली. एव्हाना वर्क फ्रॉम होम भारतात रुजले. शाळा कॉलेजेसही ऑनलाईन भरू लागली. हा भारतीयांसाठी नवीन ट्रेंड होता. कोरोनारुग्णांची सेवा करताना, कोरोनाशी लढताना शेकडो आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांनी जीव गमावला. तर दुसरीकडे याचकाळात घरात बायका मुलांवरील अत्याचारात वाढ झाली. लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद पडल्याने अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या घरातला, बाहेरचा पुरुष बिथरला. त्यातला जनावर जागं झालं घऱाघरात बायकांच नाही तर पोरांवरही लैंगिक अत्याचार झाले. काहींनी याला वाचा फोडली तर काहींनी गप्प राहण्याला प्राधान्य दिलं.

यादरम्यान, 21 दिवसांचा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला गेला. 29 एप्रिलपर्यंत मृतांचा आकडा हजारापार गेला. सुरुवातीला सुट्टीच्या आनंदात लॉकडाऊन साजरा करणारे मध्यमवर्गीयांच्या काळजाचा ठोका चुकला. तर लोकांनी दिलेल्या अर्ध्या प्लेट खिचडीवर किती दिवस जगणार. किती दिवस अर्धेपोटी राहणार. काम धंदा बंद. कसं जगायचं. या प्रश्नाने मुंबईसह देशातील इतर राज्यांमध्ये काम करणारा मजूर हादरला. ट्रेन बंद, बस बंद. सगळेच मार्ग बंद. घरी कसं जायचं या विचाराने मजूर अस्वस्थ झाला. शेवटी उपाशीच मरायचं असेल तर गड्या आपुला गाव बरा म्हणत बायका पोरांना घेऊन गावाकडे निघाला. हजारो किलोमीटर पायी प्रवास करत हा मजूर निघाला होता. यातील काहीजण सुरक्षितपणे घरी पोहचले. तर काहीजणांचा जीव वाटेतच गेला. काहीजणांचा प्राण विश्रांतीसाठी रुळावर बसलेले असताना भरधाव रेल्वेखाली चिरडून गेला. ही शोकांतिका अनेकांच्या वाट्याला आली.

यामुळे या मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यासाठी सोनू सूदसारखी दिलदार मंडळी पुढे आली. मजुरांच्या जाण्याने मुंबई ओकी बोकी झाली. त्यातून राजकारणही सुरू झाले. 1 मे रोजी श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी सुरू करण्यात आली. त्यानंतर 4 मे रोजी लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतर परदेशात अडकलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी मिशन वंदे मातरम ही विमान सेवा सुरू करण्यात आली. रुग्ण वाढत होते. यामुळे 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आली. 1 जूनपर्यंत भारत जगातील सर्वाधिक कोरोना रुग्णांचा देश झाला. त्यानंतर मात्र नागरिक शहाणे झाले. कामधंदा सुरू करायचा असेल तर कोरोनापासून दूर राहायला हवे. त्यासाठी सरकारने ज्या ज्या सूचना दिल्या होत्या त्या त्या पाळल्या गेल्या. यामुळे जूननंतर देशात कोरोनाचा चढता आलेख घसरला.

रुग्णसंख्या आटोक्यात आली. सरकारने सुटकेचा निश्वास सोडला. 8 जूनपासून राज्याराज्यांनी कोरोनाची परिस्थिती बघून अनलॉक सुरू केले. यामुळे सहा महिने विस्कळीत झालेले सामान्यांचे आयुष्य हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले. पण तरीही सरकारने नागरिकांना खबरदारीच्या सूचनाही दिल्या होत्या. त्याही नागरिकांनी तंतोतंत पाळल्या. गणेशोत्सव म्हणा, रक्षाबंधन, ते अगदी दिवाळीसारखे सणही लोकांनी घरातच राहून साजरे केले. यामुळे साहजिकच कोरोनाची साखळी तोडण्यात सरकारला यश मिळालं. यात 2020 संपलं. तोपर्यंत कोरोनावरील औषधे बाजारात आली. त्यामुळे नागरिक निश्चिंत झाले. आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरु झाले.

पुन्हा एकदा कोरोना वाढलाय. लोक गर्दी करू लागले आहेत. जे कोरोनाला मान्य नाही. मग आता आपणच ठरवायचं. लॉकडाऊनची वर्षपूर्ती करायची की त्याची पुनरावृत्ती…सगळं आपल्याच हातात आहे. सरकार, आरोग्य यंत्रणा आहेच. पण आता ती अ‍ॅम्बुलन्स, तो सायरन ऐकायचा नसेल देशच नाही तर आपल्या भविष्यालाही व्हेंटीलेटरवर न्यायचं नसेल तर कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेच लागतील.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -