घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमराठा समाजाच्या सर्वंकष हितासाठी एक चिंतन !

मराठा समाजाच्या सर्वंकष हितासाठी एक चिंतन !

Subscribe

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याविषयी विधान केले होते. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयीही काही गांभीर्यहिन विधान केले होेते. त्यावरून बराच गदारोळ झाला. काहींनी राजपालांनी माफी मागण्यापासून ते राजपालांनी परत जावे, इथेपर्यंत भूमिका घेतली. या निमित्ताने एक गोष्ट लक्षात घ्यावी लागले, छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव यांच्यावरून मतेभद आहेत. इतिहासातील नव्याने पुढे आलेल्या पुराव्यांनुसार काही गोष्टी वेगळ्या आहेत. पण यावरून एकूणच मराठी समाजात पडणारी उभी फूट ही चिंताजनक आहे. त्यामुळेच यावर जाणकारांनी चिंतन करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याविषयी वक्तव्य करताना एकेरी भाषेचा उल्लेख केला, त्याचबरोबर काही इतिहास संशोधक आणि संघटनांचे रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत, दोघांचा इतिहासात संबंध आल्याचे पुरावे नाहीत, असे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर मुंबई उच्च न्यायालयाचा दाखल देऊन रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत, असे स्पष्ट केले. राज्यपाल कोश्यारी आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार यांच्यात कसे विळ्या-भोपळ्याचे संबंध आहेत, हे सर्वश्रुत आहे.

त्यात पुन्हा त्यांनी शिवाजी महाराजांसंबधी केलेले वक्तव्य यामुळे आगीत तेल ओतले गेले. सध्याच्या राजकीय वातावरणात तापण्यासारखा हा विषय असल्यामुळे कोश्यारी आणि भाजपच्या विरोधात असलेल्या पक्षांनी हा विषय जास्तीत जास्त तापवण्याचा प्रयत्न केला. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांनी हे वक्तव्य मागे घ्यावे, असे आवाहन केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांनी त्या वक्तव्यावरून राज्यपालांनी माफी मागावी, अशी आक्रमक मागणी केली. पण राज्यपालांनी याविषयी माफीही मागितली नाही आणि आपले विधान मागेही घेतले नाही. मी ऐतिहासिक तथ्यांचा शोध घेईन, असे सांगून विषयला बगल दिली.

- Advertisement -

राज्यपालांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आणि अनेक पायाभूत सुविधांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते, त्यामुळे यावेळी काय होणार असे सगळ्यांना वाटत होते. देशभर कोरोना पसरायला महाराष्ट्रातील काँग्रेस जबाबदार आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेतून केलेल्या भाषणातून केला होता, त्यामुळे अगोदरपासून काँग्रेस नेते बार भरून तयार होतेच. त्यांनी त्यांचे आंदोलन एका बाजूला चालवले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनेही आंदोलनाचा पवित्रा घेतला होता, पण राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच पंतप्रधान मोदींच्या सोबत हजर असल्याने राष्ट्रवादीला जास्त आक्रमकपणा दाखवणे शक्य झाले नाही. सत्तेत असलेल्या शिवसेनेला राज्यपालांच्या वक्तव्याविषयी मौन धारण करून बसावे लागले. कारण शिवसेना ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मानणारी आहे.

बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकांमधून आणि ‘जाणता राजा’ या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या महानाट्यातून समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते, असे लिहिले आहे आणि दाखवले आहे. त्यामुळे शिवसेनेने शांत बसणे अपेक्षित होते. शेवटी पुण्यातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा मुद्दा भाषणातून सोयीस्कररित्या टाळला. कारण शिवाजी महाराजांविषयीचा वाद वाढला तर त्यातून भाजपचीच जास्त हानी होणार यांची त्यांना कल्पना होती. त्यातून पुन्हा मोदींनी अरबी समुद्रात जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी जलपूजन केले होते, त्याची अजून सुरुवातही झालेली नाही, हे शल्यही महाराष्ट्रातील लोकांच्या मनात आहे. महाराष्ट्रातील भाजपची हातातोंडाशी आलेली सत्ता गेली, त्यानंतर तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आपोआप पडेल असे वाटत असताना त्याला अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. भाजपला ते पाडण्यात काही केल्या यश येत नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या राज्यपालांच्या विषयाला बाजूला ठेवून त्या विषयाला इंधन मिळणार नाही, अशी व्यवस्था केली असावी.

- Advertisement -

रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत, हे इतिहास संशोधनांतून सिद्ध झालेले आहे, असे काही इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे. काही इतिहास लेखकांनी या गोष्टी अतिरंजित करून लिहिलेल्या आहेत. त्यामुळे यातील वास्तव लक्षात घ्यायला हवे, असे त्यांचे म्हणणे आहे. इतिहास संशोधन हे सतत सुरू असते, त्यातून विविध पुरावे पुढे येत असतात. त्यामुळे वेगवेगळे निष्कर्ष काढले जात असतात. जसे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे की, आर्य हे बाहेरून भारतात आले. काहींचे म्हणणे आहे, आर्य हे इथलेच आहेत. बरेचदा सामाजिक परिस्थितीचा विचार करून ऐतिहासिक कांदबरीकार लेखक इतिहासातील घटनांचा आधार घेऊन लोकांना आवडतील, अशा साहित्यकृती तयार करतात. महाराष्ट्रात ब्राम्हण आणि क्षत्रिय हे प्रामुख्याने सवर्णांमध्ये गणले जातात. त्यातूनच लेखक मंडळी काही गोष्टींचा सांधा जोडत असतात, पण काही इतिहास संशोधकांच्या मते हा वास्तवाचा अपलाप आहे. ज्यांना लेखणी चालवण्याची परंपरा होती, त्यांनी आपले वर्णश्रेष्ठत्व जोपासण्यासाठी आपल्या सोयीनुसार इतिहासातील घटनांना आकार दिला. त्यामुळे आम्ही हे मान्य करणार नाही, असे काहींचे मत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेपासून ते दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी त्यांचे गुरू नव्हते, असे वादाचे विषय आहेत. यात एकवाक्यता होत नाही. पण सामाजिकदृष्ठ्या हानीकारक ठरणारी गोष्ट आहे, ती म्हणजे एकूणच महाराष्ट्र आणि जगभर पसलेला जो मराठी समाज आहे, त्यामध्ये यावरून वितुष्ट निर्माण होत आहे. एका बाजूला आपण मराठी भाषा आणि संस्कृती, साहित्य, चित्रपट, नाटक, लोककला, संगीत यांच्यासाठी एकत्र येऊन अखिल भारतीय, जागतिक पातळीवर संमेलने घेत असतो. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म जागवावा, अशी गर्जना देत असतो. अमृतातेही पैजा जिंके, असा मराठी भाषेचा महिमा सांगून तिला अभिजात दर्जा मिळावा म्हणून सगळे मराठीजन एकत्र येत असतो.

मराठी माणूस उद्योगधंद्यात पुढे कसा येईल, यासाठी आपण समाजातील सगळे मराठीजन एकत्र येत असतो. दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा, असे अभिमानाने छाती पुढे काढून बोलताना आपण सगळे एकजात मराठी असतो. त्यावेळी आपल्या त्या अभिमानात कुठलीही जात आढवी येत नसते. असे असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव यांच्यावरून जे वाद उठतात, त्यावरून चिंता वाटू लागते. त्यामुळेच त्यावर समाजातील विचारवंतानी आणि समाजाला दिशा देणार्‍यांनी चिंतन करण्याची गरज आहे. कारण मराठी समाजामध्ये काही गोष्टींवर अशी उभी फूट पडणे हे एकूणच मराठी समाजाच्या भविष्यातील वाटचालीसाठी आणि प्रगतीसाठी घातक आहे. कारण अशा फुटीचा फायदा बरेचदा मराठी समाजाचे हितशत्रू घेत असतात.

जेव्हा भारतावर मोगली साम्राज्याचा अंमल होता, त्याविरुद्ध कुणी ब्र काढायला धजत नव्हते, त्यावेळी मराठी समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यानंतर पेशव्यांनी अटकेपार झेंडे रोवून त्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर केले. हा सगळा इतिहास पाहिला की, एक गोष्ट लक्षात येते की, हा मराठी समाज एकसंध राहिला तरच तो त्याची प्रगती साध्य करू शकेल आणि त्याच्यावर आक्रमण करणार्‍या हितशत्रूंपासून स्वत:चे संरक्षण करू शकेल. मराठी माणसांच्या एकजुटीतून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे, त्यासाठी सगळे मराठीजन एकवटे होते. त्यात राजकीय नेते, साहित्यिक, विचारवंत, सामान्य नागरिक, अगदी रस्त्यावर भाजी विकणारा मराठी माणूस सहभागी झाले होते. तेव्हा मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र मिळाला. महाराष्ट्रापासून मराठी भाषिक नागपूर वेगळा होऊ नये, सगळ्या मराठी माणसांनी एकत्र रहावे म्हणून नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला. राज्याच्या विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात घेण्यात येते.

जागतिक पातळीवर अनेक मराठी लोक आपल्या कर्तृत्वाने चमकत आहेत. पुढील काळात मराठी समाज म्हणून आपल्याला प्रगती करताना कुठल्याही कारणांवरून समाजात उभी फूट पडणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. माणसे म्हटली की, त्यांच्यामध्ये मतभेद हे ओघाने येतातच. इतिहासावर होत असलेल्या संशोधनातून विविध नवे पुरावे पुढे येत असतात, पण त्यावर चर्चा करताना समाजात दुही निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असते. अगदी इतिहासातील काही घटना बघितल्या तर असे दिसेल की, त्यावर तज्ज्ञांचे आणि संशोधकांचे एकमत होत नाही. चर्चा, खंडन मंडन सुरूच राहते. पण हे मतभेद इतके टोकाला जाता काम नयेत की, त्यामुळे समाजाची एकसंधता धोक्यात येईल. बरेचदा अशा वादग्रस्त गोष्टींचा आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी काही राजकीय पक्षांकडून वापर करून घेतला जातो.

त्यांचे लक्ष्य हे समोर दिसणारी निवडणूक जिंकणे इतकेच असते, पण एकूणच समाजाची काय हानी होईल, इतका दूरचा ते विचार करत नाहीत. पण समाजाला त्या निवडणुकीपर्यंतच नव्हे तर खूप दूरच पल्ला गाठायचा असतो. इतिहासातील नव्या पुराव्यांच्या बाजूने आणि विरोधात असलेल्या मंडळींनी समाज म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे पुढे जायचे आहे, या वास्तवाचा पक्का विचार करून हे मनावर कोरून ठेवायला हवे. कारण या पूर्वीही असे वाद झालेले आहेत. ब्राम्हण-ब्राम्हणेतर असा भेद निर्माण झालेला होता. त्यातून मराठी समाजामध्ये वितुष्ट पसरून एक वर्ग दुसर्‍याच्या विरोधात लढतोय, असे वातावरण निर्माण झाले होते. पण एकमेका सहाय्य करू, या भावनेतूनच मराठी समाज अधिक भक्कम होणार आहे, हे विसरून चालणार नाही.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते सेनापती बापट म्हणाले होते, महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर वैरी पराधिनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. हे वास्तव आहे, महाराष्ट्र म्हणजे सगळा मराठी समाज हा भारताचा आधार आहे, हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. इतिहासाचे अभ्यासक पु.ग.सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या ‘माझे चिंतन’ या अतिशय मौलिक आणि वास्तवाचे भान आणून देणार्‍या पुस्तकात म्हटले आहे, उत्तरेत धुमाकूळ घालणार्‍या मुसलमान सरदारांची थडगी महाराष्ट्रात का, कारण जशी माती तशी माणसे. महाराष्ट्र आणि मराठी माणूस हा नेहमीच छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन देश गौरवासाठी झिजलेला आहे. अशा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव या विषयांवरून सामाजिक वितुष्ट निर्माण होणे आणि त्यातून मराठी मने एकमेकांविषयी कलुषित होणे हे समाजहिताचे नाही. त्यामुळे जेव्हा असे विषय पुढे येतात, तेव्हा समाजातील जाणकार माणसांनी पुढाकार घेऊन समाजाचे ऐक्य अबाधित ठेवायला हवे. हिंदवी स्वराज्य आणि साम्राज्य स्थापन करण्याच्या मराठी माणसांच्या देदीप्यमान इतिहासापासून आपण प्रेरणा घ्यायला हवी. काही गोष्टी या वितुष्टाचे कारण ठरता कामा नयेत. कारण त्यातून हितशत्रूंचे हित साधले जाईल आणि समाज म्हणून मराठी माणसांचे नुकसान होईल.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -